ग्लेशिअर नॅशनल पार्क ( भाग २) - वेगळे रूप!

या ग्लेशिअरच्या आम्ही दोघं इतके प्रेमात पडलो की परत पुढील वर्षी इथे यायचच हा निश्चयच केला आम्ही.

आणि आलो देखील. खरं तर या वर्षी उन्हाळ्यात ऑलरेडी यल्लोस्टोन झालं होतं, ४-५ दिवस. पण सप्टेंबरच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात १-२ मित्र्-मैत्रिणींना आम्ही ग्लेशिअर चं वर्णन ऐकवलं आणि वरती येत असाल तर पुढल्या आठवड्यात जाऊन येऊ ३-४ दिवस हे देखील पटवलं...season अजूनही चांगला असेल अशी ग्वाहीही काही विचार न करता देऊन टाकली...बहुदा यंदा, गेल्या वर्षी ठरवल्यानुसार जायचच हा विचार इतका पक्का होता आणि ग्लेशिअरची इतकी जबरदस्त ओढ लागलेली की आम्ही फारसं weather वगैरे बघण्याच्या भानगडीत पडलो नाही वाटतं. मित्रमंडळानी पण नको तेवढा विश्वास टाकून येण्याची तयारी दाखवली...

मग काय सप्टेंबरच्या तिसर्‍या आठवड्यातल्या एका मुहुर्तावर आम्ही दोघे आणि अजून ३ मित्र्-मैत्रिणी निघालो ग्लेशिअरला. यावेळी हवामान थंड असेल म्हणून कँपिंग मात्र नशिबाने काढले नव्हते. प्रत्यक्ष पार्कात पोहोचलो आणि स्वागतालाच कळलं की Going to the sun road हा Logan Pass पुढे बंदच आहे. पार्कात already थोडी थोडी हिमवृष्टी चालू झाली होती. पार्कात यावेळी visitors ची संख्या अगदीच नगण्य होती. हरकत नाही...तेवढं तर तेवढं असा विचार करून आम्ही दोघांनी दुसर्‍या दिवशी आम्ही आदल्या वर्षी आवडलेल्या पण न झालेल्या Grinnel Glacier ट्रेकला जायची टूम काढली.

सर्व जामानिमा करून निघालो...थंडीची जॅकेट्स, हातमोजे, पायात जाड मोजे, कानटोपी, असं सारं चढवून निघालो. पण trekking चे sturdy shoes आम्हा दोघांकडेच होते (तेच ते गेल्या वर्षी घेतलेले!). बाकी तिघांनी आपले साधे sneakers च घातलेले.

ट्रेलहेड पाशी गाडी लावून आम्ही ट्रेल चढायला सुरुवात केली नी ५व्या मिनिटाला पहिला दणका बसला. पाण्याचा एक ओहोळ डोंगरावरून खाली येत होता नी त्यात पाय घातल्याने ग्रुपमधील एकीच्या शूजच्या पार आत ते बर्फाचं पाणी शिरून तिला हुडहुडी भरली. मग शूज काढा, सॉक्स मधील पाणी पिळून घ्या हे उद्योग झाले...पण ते गारेगार सॉक्स परत घालणे म्हणजे शिक्षाच होती....पण इतक्यात कशी हार मारणार म्हणून निघालो सगळे पुढे. आधीच प्रचंड थंडी नी त्यात एखाद मैल चाललो असू तर पाऊस सुरु झाला. आम्ही आमचे पोंचू चढवले. मंडळींचा उत्साह नी निर्धार खचू लागला. पण आमचा ग्रुपलीडर म्हणजे नवरा सर्वांचे morale boost करत पुढे ढकलतच होता. जवळपास 4 मैल चालून वर जायचं होतं नी हा आपला हे काय, आलंच आता.. हे वळण गेलं की आलंच हे ऐकवत सर्वांची गाडी रेटत होता. अजून एखाद मैल गेला. आमची चालण्याची वाट आता ओहोळातूनच चालली होती. एव्हाना आमच्या दोघांच्या शू़ज मध्ये सुद्धा पाणी गेले होते. सर्वजण गोठलेल्या अवस्थेत चालत होते. परतूया आता असा एक सूर उरलेल्या तिघांचा चालू झाला. मला थंडीही वाजत होती आणि पुढेही जायचं होतं. खरंतर यावेळेस सुध्दा ग्रिझली अस्वलांची भीती होतीच्...आणि या थंडीपायी पाण्यात पाय घालून घालून एखाद्याला hypothermia व्हायचा अशीही मला भीती वाटत होती. नवर्‍याला याचे काही नाही...चाललाय पुढे. अजून १/२-१ मैल चाललो असू की एकीने एका दगडावर बसकण मारली आणि जाहिर केले, मी ही इथे बसणार आहे आता. तुम्ही लोकं वर जाऊन या तोपर्यंत मी इथेच बसणार आणि परतताना तुमच्या बरोबर येईन परत खाली...आता कोणाला एकटं कसं सोडून जाणार त्यामुळे सर्वचजणं परतूया असं आम्हा उरलेल्या चौघांचं मत पडलं....ग्रुप लीडर ने तरी देखील "आता आलाच वाटतं शेवटचा Grinnel Glacier पॉईंट" असा काहीसा एक डायलॉग टाकून बघितला पण यावेळी मात्र सर्वांनी त्याला धरून बडवायचीच धमकी दिली. अखेरीस सर्वजणं परतीच्या वाटेवर लागलो....पावसातून- पाण्यातून वाट काढत खालती आलो तोपर्यंत हाता-पायाची बोटं अक्षरशः बधीर झाली होती. हात खिश्यात घालून गाडीची किल्ली काढायला जमत नव्हतं अक्षरशः. कसेबसे गाडीत बसलो आणि गाडीचा हीटर सर्वांत वरच्या तापमानाला नेऊन बोटं शेकली...तब्बल ५-७ मिनीटं लागली बोटात प्राण परत आणून steering wheel धरता येईपर्यंत...नंतरचे २ दिवस जे काही पार्कात होतो ते फक्त गाडीने जमेल तेवढे फिरलो आणि माफकच उतरून फिरलो.तर असा हा ग्लेशियरचा वेगळाच अनुभव यावेळी.

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle