माझी खाद्ययात्रा..

२००९मध्ये खरडलेले.. :)

अमेरिकेत आल्यापासून, आणि मुख्य म्हणजे नवर्‍याच्या संगतीने मी खवैय्या झाली आहे.. आधी पाप्याचे पितर होते.. आता काय ते सांगत नाही जाऊदे.. तर मुद्दा हा की मी खवैय्या झालीए.. आधी केवळ जाणीजे यद्न्यकर्म या उदात्त हेतूने जेवायचे.. पानात पडेल ती भाजी दोन पोळ्या.. मूड असेल तर भात. संपलं जेवण..असं दोन वेळा.. आई बिचारी मला वेगवेगळे पदार्थ करून खायला घालायची.. पण मला तेव्हढी आवडच नव्हती.. दादा भारतात असताना कसं नेहेमी साग्रसंगीत पंगत असायची.. फर्माईशींची रेलचेल.. पण नंतर बंदच पडले..
असं असताना, मी इतकी बदलावे म्हणजे फारच झालं.. इतकी म्हणजे इतकी की आता मला झोपेतही भूक लागते.. सारखे नवीन पदार्थ करायचा(निदान खाण्याचा तरी) उत्साह येतो.. नवरा स्वखुषीने करून देणार असेल तर लॉटरीच! पण एकंदरीत असं आहे.. पण ..
इथेही गोची आहेच.. मला स्वयपाक करायला खूप काही आवडत नाही! Sad म्हणजे आवडतो.. पण तेव्हढा पेशन्स नाही.. काहीतरी उरकायचे झाले.. नशिबाने पदार्थ चांगले (?) होतात म्हणुन बरंय..
माझं एक असं.. आणि नवर्‍याची कथा वेगळीच.. त्याला दर १५ (?) दिवसांनी तरी बाहेरचे जेवण आठवते.. कितीही घरात छान केले तरी बाहेर जाऊन जेवण्याची मजाच वेगळी!
या अशा परिस्थितीमुळे आमचं अमेरिकेतलं पौष्टीक जीवन(पर्यायाने आमचे वजन!) समृद्ध होणार नाहीतर काय?? :)
अगदी सुरवातीला जेव्हा मी येऊन २-४ च दिवस झाले होते, तेव्हा माझा स्वयपाक म्हणजे दिव्य प्रकार होता! मी सकाळी ९.३० पासून कामाला लागायचे. आधी इंडीयात आईला रेसीपि विचारायची. मग ते सगळं सामान एक एक करून टेबलवर दिसेल अशा जागी फोडणीच्या क्रमातच आणायचे. कारण त्या काळात मी हमखास सगळी भाजी फोडणीत घातल्यावर छान चिरून ठेवलेल्या मिरच्या टेबलावरच आहेत वगैरे दृष्टांत व्हायचा.. त्यामुळे सगळं समोर क्रमाने ठेवायचे..म्हणजे आधी मोहरी, मग मिरच्या, मग कांदे आणि मागे जी काही भाजी असेल ती वगैरे!! Lol मग एक एक करून फोडणी जमवायची.. त्याकाळात मीठाचा अंदाज तर नव्हताच..! पण त्याचबरोबर, मिरच्या अती तिखट असतात, आणि साखर अती अ-गोड असते हे ही कळायचे होते.. आता विचार करा काय प्रकरण होत असेल ते भाजी नामक ?! पोळ्या तर विचारायच्याच नाहीत!! सलग २-३ महीन्यांच्या अथक परिश्रमानंतर मला पोळ्या जरा गोल, बर्‍यापैकी मऊ कॅटॅगरीतल्या जमायच्या... २-३ महीने, तव्यावरून काढतानाच पोळि खायला सुरवात केलीत तर तुमचे दात शाबूत.. नाहीतर! अरे देवा.. त्यातून हो.. माझी गोल्डन टेंपल नामक मैद्याची कणीक! Sad जाऊदे.. संपले ते दुष्ट दिवस!
तर एके रात्री नेहेमीप्रमाणे माझा स्वयपाक बिघडला.. पोळ्या तर येतच नव्हत्या! भाजी आणि काहीतरी कोबीची भाजी करणार होते वाट्टं.. कोबी विनाशकाले बुद्धीने फुडप्रोसेसर मधून काढला.. लगदा! म्हटलं करूयात काहीतरी इनोवेटीव्ह! .. भाजी नेहेमी सारखी केली.. नंतर काय वाटलं माहीत नाही , मी त्यात बेसन टाकले.. पीठ पेरून कोबी वगैरे.. झालं भलतंच! स्पष्ट सांगायचे तर ते दिसत होते, कोबीचे पिठले !!

झालं... माझ्या गंगा यमुना सुरू!! काय रडले त्या काळात मी स्वयपाकावरून.. नवरा बिचारा आधीच नव्याने नवरा झालेला.. काही कळेना ह्यात काय रडण्यासारखे! पण मला तो भयंकर अपमान वगैरे वाटायचा.. की नवर्‍याला काय हे अन्न घालतीय मी जेवायला! :D

मग शेवटी आम्ही निघालो, बाहेर जेवायला..
इतक्या रात्री काय असणार हॉटेल उघडे?
टॉपर्स पिझ्झा दिसला..
गेलो.. नवर्‍याने काहीतरी चिकनचा मागवला होता, माझा पालापाचोळा.. असं जेवण म्हणून खायची सवय नव्हती हो तेव्हा!! चिकन तर सारखं नकोच वाटायचे.. भारतात २ महीन्यातून एकदा आवडीने खायचे.. इथे जरा पंचाईतच ! पण तो पिझ्झा आवडला तसा..
मग अधून मधून हे चालायचेच.. स्वयपाक बिघडला चला बाहेर ! एकदा तर मी खूप उशीरा स्वयपाक करायला लागले.. ११ वाजले असावेत रात्रीचे.. आणि सुरी असली भसकन घुसली बोटात.. भळाभळा भळाभळा रक्त !! अरे देवा.. त्या काळात इतकं चिरून घेतलंय ना मी मला! पण ते डेंजर होतं सर्वात.. जरा जास्तच रक्त होतं.. आणि ते जाऊदे... नवर्‍याचा दुष्ट्पणा किती ?? लग्गेच मला झोंबणारं ऍंटीसेप्टीक लावायला घेऊन यायचा! आणि मी जी काही आरोळी ठोकायचे..... नंतर मला कळलं त्यात काळजी वगैरे जरा कमीच आहे, नुस्ता दुष्टपणा आहे त्याचा !! :D :D:D:D:D

आता रात्री ११ ला इथे केमिस्ट सोडून काहीही उघडे नसतात.. दुकानं आय मिन... :| एक्सेप्ट डेनीज् डायनर.. २४ तास उघडे(:P).. त्यानंतर तो आमचा कट्टाच झाला! कधीही तिथे जाऊन बसायचे, एक काहीतरी खायला आणि सतत रिफिल होणारीकॉफी ऑर्डर देऊन २-३ तास गप्पा ठोकत बसायचे.. कधी एडवर्ड्स सिनेमाज मधे पिक्चर टाकायचा आणि १ ला यायच जेवायला.. सही प्रकार आहे तो !!

त्यानंतर घरी पिझ्झा ऑर्डर करणे झालेच सुरू.. कधी पापा जॉन्स, पिझ्झा हट, डॉमिनोज, टॉपर्स .. सगळे पिझ्झे अफलातून. तोपर्यंत चिकनलाही जीभ सरावलेली.. पण सर्वात भारी म्हणजे डॉमिनोज चा पिझ्झा आणि ओव्हन बेक्ड सॅंडविचेस.. आह्हा! पापा जोन्सचा क्रस्ट आणि चीझी पिझ्झा.. टॉपर्सचा एकदम जनरसली टॉपिंग्स टाकलेला पिझ्झा, पिझ्झा हटचा पिझ्झा मिया वाला पिझ्झा... एकसे एक आहेत सगळे !! किती खाल्ले तरी कंटाळा येत नाही.. (हे एकावेळेसचे नाही म्हणते.. :) )
टॅको बेलचे नाव आलेच पाहीजे यात.. सुरवातीला म्हणजे चिकन फार गुड बुक मधे नव्हते तेव्हा मी इथला बीन बाहा चलूपा विदाऊट बीफ ट्राय केला होता.. काय बेकार लागली होती चव.. बीन्सना काही चवच नव्हती.. परत कधी वाट्याला नाही गेले मग.. परंतू आत्ता आत्ता एका प्रवासाहून येताना रात्री उशीरा चिकन बाहा चलूपा खाल्ला.. आणि मी मंत्रमुग्ध झाले !! आता मला भूक लागली की चिकन चलूपा आठवतो, यावरून काय ते समजा !! :| बाकी टॅको बेलमधले बरिटोज, सॅलड्स वगैरे सगळं छान असलं तरी त्यांचे कौतुक करून मला चिकन चलूपाचा हिरमोड नाही करायचा ! त्याला बेस्ट पदार्थ इन टॅको बेलचे बक्षिस दिलेच पाहीजे !!
पी एफ चॅंग, चायना बिस्त्रो... आहा! इथे जायचं म्हण्जे एक्दम साग्रसंगीत असतं.. कसंही आवरून , घरच्या कपड्यात नाही काही !! छान आवरून, ठेवणीतले कपडे घालून ( हेहे... हे उगीच!) तिथे जायचे.. कायमच वेटींग असतं तिथे.. पण तो वेळ कसाही जातो.. सुंदर म्युझीक.. भरपूर फुलझाडं, झाडांवर लायटींग, कारंजी, लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे, जिथे मोठेही खेळतात.. सुंदर एरिआ आहे एकंदरीत..
खाणं तर क्या कहने.. कंग पाओ चिकन, लेट्युस चिकन रॅप्स, फ्राईड राईस, क्रॅब केक्स,क्रॅब वॉन्टॉन्स .. अफलातून आहेत इथले पदार्थ.. ( चायनिज मधे इथलं पांडा एक्स्प्रेस सुद्धा सहीच ! )
त्याच्यासमोरच आहे, कॅलिफॉर्निया पिझ्झा किचन..
इतकी सुंदर पिझ्झाची चेन मी नाही पाहीली कुठे... सर्वत्र पसरली आहे, आणि सगळीकडे माणसं उतू जात असतात !
इथला थाई चिकन पिझ्झ्यामधे चक्क दाण्याचा कूट आहे..! आणि तो थाई सॉस बरोबर इतका सह्ही लागतो की काय सांगू!! शिवाय माझा अतिशय आवडता पिझ्झा म्हणजे, मॅंगो तंदूरी चिकन पिझ्झा.. यात पिझ्झा बेसवर चक्क आपली एखादी पंजाबी भाजी ओतली आहे टॉपिंग म्हणून असं वाटावं इतकी देसी चव !! नक्की खाऊन पाहावा !!
 ( भूक लागली आता !! Sad )

आमच्या घराजवळच एक मेडीटेरनिअन खानावळ आहे.. अलिबाबा’ज कॅफे म्हणून.. छोट्टूसं हॉटेल.. १०-१५ बाकडी.. एका मोठ्या खोलीचं एका भिंतीने स्वयपाकघर व हॉटेल अशी विभागणी.. खिडकी मधून ऑर्डर घेणे-देणे चालू.. आणि सतत घमघमाट! तिथे श्वॉर्मा फार छान मिळतो हे माझ्या नवर्‍याचं मत.. मला त्या ऑड नावामुळे की काय जरा नकोच वाटत होतं.. परंतू तिथे गेलो.. सुरवातीला अपेटायझर म्हणून फलाफल.. वाह.. कोथिंबीर वडीचा चुलत भाऊ इतक्या लांब भेटेल असं वाटलं नव्हतं! आता श्वॉर्माबद्दलही उत्सुकता दाटून आली.. एका छोट्या हॅंडलवाल्या वेताच्या परडीमधून मस्त पेपर मधे गुंडाळलेली एक गुंडाळी दिसली.. त्यात बर्‍याच ओळखीच्या भाज्या.. रोस्टेड चिकन.. आणि सुंदर मेडीटेरनिअन मसाले.. पण अती प्रचंड.. म्हणजे निदान माझ्या पोटाला ते फार हेवी होतं एकावेळेस.. त्यानंतर बकलावा किंवा खोबर्‍याच्या केकसदृश गोड पदार्थ खायचा.. बरोबर भातुकलीत असतात तशा छोट्ट्याश्या कपांमधून २-२ घोट तुर्की कॉफी किटलीमधून ओतून प्यायची.. अतिशय गोड प्रकार आहे हा !! :)

मेडीटेरनिअनचा विषय निघालाच आहे तर ’सी साईड ग्रिल’ बद्दल लिहीलेच पाहीजे.. हे नावाप्रमाणे खरंच सी साईडला आहे.. एका साईडला समुद्र आणि दुसर्‍या बाजूला हार्बर अशा अप्रतिम लोकेशनला हे रेस्टॉरंट आहे.. बाबा घनोश(म्हणजे जवळपास आपलं वांग्याचे भरीत) , हमस अप्रतिम आहेतच.. पण इथली चिकन कुबिदे ही डिश अफलातून आहे ! इतकं मुलायम चिकन मी कुठेही नाही खाल्लं!

कंप्लीट मेडीटेरनिअन इंटेरिअरने तुम्ही खरंच त्या विश्वात जाता.. इथे
याच ठीकाणी एक पर्शियन आईसक्रीमही मिळते.. एक्झॅक्ट आपले केशर पिस्ता.. फक्त त्यावर मँगो, चेरीचे तुकडे आणि गुलकंदाचा रस... :) इंटरेस्टींग कॉंबिनेशन राईट ??
थाई फुड.. काय लिहीणार.. चायनिज इतकंच थाईही खूप छान मिळतं इथे.. सावडी( हो अशा नावाचं हॉटेल आहे इथे! मला झोपडीच वाटतं ते.. अरे हो, परवा वाचलं शिकागो का कुठेतरी झोपडी नावाचंच इंडीयन रेस्टॉ. आहे म्हणे!! ( करेक्ट मी इफ आय ऍम रॉंग..)
असो.. सावडी, चार्न थाई, एक्झॉटीक थाई वगैरे काही जागाही सहीच.. सावडी मधल्या लोकांना इंग्लिशचा गंध नाहीए, त्यामुळे तिथे ऑर्डर देणे हा जरा करमणुकप्रधान किंवा कटकटीचा कार्यक्रम असतो! पण पदार्थ बरोबर आल्याशी मतलब.. बेसिल फ्राईड राईस बरोबर कुठलीही चिकन डीश छान लागते खरं.. पण थाई फुड फार तेलकट असते, मला एकदा जरा त्रास झालेला घशाचा, त्यामुळे कमीच झाल्या आहेत वार्‍या..
मंगोलिअन बार्बेक्यु.. सगळ्या भाज्या, मीट, चिकन काय हवं असेल ते आपण सिलेक्ट करायचे.. आणि मग शेवटी आपल्याला त्या सर्व भाज्या/चिकन वगैरे मंगोलियन बार्बेक्यु सॉस मधे भाजून देतात.. हे ही छान लागते..

मी इथे आल्या आल्या नवर्‍याचे सुरू झाले.. सुप्प्लॅन्टेशनला(Souplantation) जाऊ ! हेहे .. हे नाव वाचून मला खरच खूप हसू यायचे.. असं कसं नाव.. आणि ते पण सॅलड खाऊन काय पोट भरेल का.. पण एकदा गेलोच.. आणि जातच राहीलो.. ! सुरवातीला सॅलड्सचा बार..इथे जे पाहीजे ते, पाहीजे तित्के मात्र एकदाच घ्या.. मग त्यात, वेगवेगळे बीन्स, लेट्युस, बाकीचे आपले नेहेमीचे सॅलड, सर्व भाज्या, एग्स आणि बरेच काय काय.. त्यात रांच,मेयॉनिज,हनी मस्टर्ड जे काही हवंय ते घ्यायचे.. .. आणि मग तुमच्या सिटींग ऍरेंजमेंटपाशी

यायचे.. ती जागा बुक झाली की आतल्या सेक्शनमधे हुंदडायला मोकळे.. आत तर काय अनलिमिटेड सुप्स,केक्स, पिझ्झा, मफिन्स, फ्रुट अन जेली, आईस्क्रिम्स ... कितीही घ्या...
आपल्याला वाटतं सॅलडने काय पोट भरेल.. पण इथे येऊन झोप येईल इतकं खाणं होतं!! सही Restaurant !!

डाफ्ने( Daphne's) नावाचे ग्रीक रेस्टॉरंट आहे इथे.. तिथेही फेटा चीझ, हमस,पीटा ब्रेड, फलाफल असलेले 

अपेटायझर्स, वेगवेगळे सॅलड्स, गिरो (Gyro) सॅंडविचेस , आणि अजुनही बर्‍याच लंच / डिनर मेनुज आहेत इथे.. हे ही सुंदर रेस्टॉरंट आहे.. फक्त या ग्रीक चवीची सवय व्हायला कदाचित वेळ लागेल.. पहील्याच झटक्यात आवडण्यासारखं जरा कमीच आहे..

चिलीज.. खूप रात्रीपर्यंत उघडे असणारे अजुन एक हॉटेल.. फील जरा क्लब 

सारखाच आहे ! त्यामुळे लोकं फुल्ल धिंगाणा घालत असतात इथे.. इथली साउथवेस्टर्न एग रोल्स ही डीश जर तुम्ही नाही खाल्लीत तर काहीच अर्थ नाही! अप्रतिम ! दुसरा शब्द नाही..

असाच इथला अजुन एक प्रकार.. मी नाव विसरले डीशचे.. पण त्यात चक्क लाकडावर भाजलेला , लिंबू वगैरे पिळून तिलापिया मासा दिला होता ! ते प्रेझेंटेशन पाहूनच आपण खरं तर गार होतो ! खाऊन , त्या चवीने अजुनच !! Lol

या लिस्ट मधले शेवटचे रेस्टॉरंट म्हणजे ’वुड रांच’ ... आमच्या घराच्या गल्लीतच आहे हे.. सतत गर्दी.. म्हणजे पुण्यातल्या श्रेयस,वैशाली,वाडेश्वर,अभिषेक अशा सगळ्या हॉटेल्सची गर्दी एकत्र केली तर किती होईल.. तितकी!! सतत काय ?? शेवटी गेलोच तिथेही...... नावाप्रमाणे बाहेरूनच इंटेरिअरचा अंदाज आला.. वुडन रस्टीक इंटेरिअर.. आत गेलो.. उंच टेबल- बाकड्यांवर बसवलं.. आख्ख्या हॉटेलात फक्त टेबलावरच्या मेणबत्तींचा उजेड.. आम्ही अपेटायझर म्हणूनश्रेडेड ओनिअन फ्राय मागवले.. जरावेळाने वेटरने एक जवळपास बादलीभर तळलेले कांदे आणून ठेवले !!!!! ती क्वांटीटी मी आजवर पाहीलेल्या हॉटेल्स मधली सगळ्यात प्रचंड होती!! एकंदरीत आयडीआ आलीच... काय प्रकरण आहे... पाणी आणि कोक मागवला तर ते आलं आपली लोणच्याची बरणी असते ना? त्यातून !! ती आख्खी बरणी हातात धरून प्यायचं पाणी!! हाहा !! आम्हालाही गंमत वाटू लागली... ऑर्डर घाबरून २ सॅंड्विचचीच केली.. म्हटलं किती येतंय कोणास ठाऊक ! मश्रुम पोटॅटो आणि बार्बेक्यु चिकन सॅंडविचमधे आमचे पोट पूर्ण भरले !! विचार करा काय प्रकार आहे हा...

अफलातून एक्स्पिरिअन्स ...
बाकी तर काय खूप असतात Restaurants. मी मला आवडणारी इथे लिहीली..
अजुन बीजेज् चा पिझ्झा आहे, हॅबिटचे सॅंडविच, क्रॅब हाऊस चे क्रॅब केक्स, रेड लॉब्स्टरचा ब्रेड, टीजीआय फ्रायडे(म्हणजे, थॅंक गॉड इट्स फ्रायडे!) चे हटके वातावरण, एग्ज अन थिंग्स मधला ब्रेकफास्ट.. ( नवर्‍यानी सांगितलेली अनमोल माहीती, इथे फक्त अतिशय सुंदर मुलींनाच वेट्रेस म्हणून काम मिळते ! ह्म्म्म... असो... ), युनिव्हर्सल मधले बुका दे बेप्पो या फनी नावाचे इटालिअन रेस्टॉरंट, जॅपनिज यामातो सुशी, कोल्डस्टोनचे बनाना स्प्लिट आईसक्रीम, बास्कीन रॉबिन्सचे आईसक्रीम केक्स, चीझकेक फॅक्टरीमधले केक्स, एकंदरीत त्यांची प्रचंड क्वांटीटी.. याशिवाय इस्ट कोस्ट वरच्या वेगळ्या चेन्स, वेगळी हॉटेल्स असतीलच !
असो... अशी ही सगळी माझी अमेरिकेतील खाद्ययात्रा.. जेव्हा जेव्हा माझ्या स्वयपाकाने दगा दिला तेव्हा तेव्हाचे हे माझे आधारस्तंभ ! ही लिस्ट करून ठेवावी असं डोक्यात होतंच.. ब्लॉगला एक उत्तम चमचमीत विषय मिळाला! :)
एक वि.सू : आम्ही हे सगळं वर्षभरात खाल्लं आहे याची नोंद घ्यावी! तसे एरव्ही तितके खादाड नाही आहोत ! :) :)

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle