आजोळ

अनिश्काच्या लेखावरून मला पण माझ्या आजोळविषयी लिहावसं वाटल. मला अजीबात लिहीता येत नाही तरीही प्रयत्न करतेय.
आम्हा बहिणींची पण उन्हाळ्याची सुट्टी कुर्ला, मुंबई इथे जायची. सुट्टी लागली रे लागली की आम्ही (बहिणी व आई) नाशिकहून पंचवटी एक्सप्रेसने दादरला जायचो. तिथे मामा आम्हाला घ्यायला आलेलाच असायचा. मग टॅक्सीत बसून आम्ही कुर्ल्याला जायचो. आज्जी आजोबा आमची वाट बघतच असायचे. कधी थोडा जरी उशीर झाला तर आजी आम्ही लवकर यावं याकरिता एक भांडं पुढच्या दारामागे उपडं ठेवायची कारण मोबाईल फोनची सोय नव्हती तेव्हा. मामाचा मोठ्ठा बंगला आहे, अजूनही आहे पण आता बहुमजली केलाय. आज्जीच्या घरामागे आणि पुढे अंगण होतं. पुढच्या अंगणात खूप उंच नारळाचे झाड होतं / आहे, शिवाय मोगरा, चांदणी, अबोली ही झाडं तर होतीच.
सकाळी स्वयंपाकाच्या ताई आल्या की आम्ही भावंडं तव्यावरची गरम गरम पोळी आणि बरोबर तूप व मामीने केलेला घरचा जाम किंवा हापुस आंब्याचा रस असा भारीभक्कम नाश्ता करायचो. कधी फोडणीचा भात, कधी इडल्या खायचो. आज्जीच्या घराला मेंदीच्या झाडांचं कुंपण होतं. आम्ही बहिणी तिची पानं तोडायचो. मग आज्जीने तिचा जूना पाटा वरवंटा मागच्या अंगणात ठेवलेला असायचा त्यावर ती मेंदीची पानं वाटून त्याचा अगदी लगदा करायची व आम्हा बहिणींच्या हातांवर लावायची. आम्ही काही ते तसले हात फार काळ ठेवायचो नाही कारण भाऊ आम्हाला गुदगुल्या तरी करायचे किंवा पाठीला, नाकाला उगाच खाज येतेय वाटायचं. शिवाय खूप वेळ मेंदी ठेवली तर जास्त रंगेल मग मेंदीचा पुढचा कार्यक्रम लांबेल. अशा खुप कारणांनी आम्ही अर्ध्या तासातच हात धूत असू. मग ते नारिंगी हात एकमेकींना दाखवायचो. दुपारची वेळ झाली की आम्ही मामे, मावस अशी आठजणं मागच्या अंगणात खूप खेळ खेळायचो, लंगडी, गल्लीतल्या इतर मुलांबरोबर डब्बाऐसपैस खेळायचो. आमचा भावंडांचा दुपारचा मेन कार्यक्रम होता तो म्हणजे बदाम सात खेळायचा. आम्ही ८ मुलं म्हणून पत्त्यांचे दोन कॅट घेऊन खेळायचो. माझी एक मावस बहिण आहे ती कायम हरायची. तिच्यावर किती गुण आले ते मोजायला कधी कधी तीला आपल्याच हाता पायाची बोटं कमी पडायची मग इतर भावंडं खुशीने त्यांची हातापायाची बोटं पुढील गुण मोजण्याकरिता द्यायची. कधी मागच्या झाडावर चढून पेरू तोडायचो. नाव गाव फळ फूल खेळायचो, व्यापार, काचापाणी खेळायचो. समोरच्या घरात कुंदा नावाची ताई जिचे केस खुप लांब होते अगदी गुढग्यापर्यंत ती आम्हाला गोष्टी सांगायची. आज्जीच्या घरी उन्हाळ्याचे दिवस होते तरी गरम व्हायचे नाही कारण तिच्या घराला लाल कोबा होता. उन्हाळ्यात पण तो थंड असायचा. संध्याकाळचे पाच वाजले की मामी आम्हाला ओळीत बसवून सातूचे पीठ द्यायची. माझी मावशी शाळेत शिक्षीका होती व जवळच रहायची मग कधी ती आली की आम्ही सगळे तिचा चहा झाला की तिच्याबरोबर तिच्या घरी जायचो. ती पाचव्या मजल्यावर रहायची ६४ पायर्या होत्या तिच्या घरात जायला. मग तिच्या टीव्हीवर जो लागेल तो कार्यक्रम बघायचो. तिने टीव्हीला रंगीबिरंगी कागद लावला होता कलर टीव्ही सारखा दिसावा म्हणून :) मग आम्ही तिच्याकडे जेऊन रात्रीच घरी यायचो. कधी आम्हाला चाॅकलेट खावसं वाटल की आज्जी आमच्या हातावर सुट्टे पैसे द्यायची मग आम्हा भावंडांची वरात किराणा दुकानात जायची. इतक्या प्रकारची चाॅकलेट्स होती की कुठलं चाॅकलेट घ्यावं हा मोठा गहन प्रश्न असायचा. दुकानदारपण कधी ओरडायचा नाही की किती वेळ लावताय म्हणून. रोजच बर्फाचा गोळा, कुल्फी खायचो. बर्याचवेळा संध्याकाळी आम्ही पुढच्या अंगणात 'राम लक्ष्मण सीता' हा खेळ खेळायचो, म्हणजे काय तर स्टेचू किंवा फ्रीज. माझा छोटा मामा आम्हाला आऊट करण्याकरिता खुप हसवण्याचा प्रयत्न करायचा. कधी शिवाजी म्हणाला हे करा ते करा हा पण खेळ होता. कधी कधी माम्या आम्हाला नाच करून दाखवायच्या मग आम्ही सगळी मुलं आपापल्या गॅदरींग मधले नाच करून दाखवायचो. मामांना सुट्टी असली की ते आमच्याकरिता व्हीसीआर भाड्याने आणायचे मग हिंदी, मराठी सिनेमे आम्ही बघायचो. कधी सगळी मुले घाटकोपरला दुसर्या मामाकडे जायचो. आज्जी तिच्या ठरलेल्या रिक्षावाल्याला बोलवायची मग त्याच्या हातावर ₹१७ टेकवयची मग तो आम्हा मुलांना तिच्या दारापासून ते त्या मामाच्या दारापर्यंत पोचवायचा. घाटकोपरच्या मामीचं घर खुप स्वच्छ असायचं. तिच्या चादरीपण खुप पांढर्या शुभ्र असायच्या. तीला नोकरीकरिता दोन लोकल बदलाव्या लागायच्या. पण तरी ती न दमता आम्हा मुलांच करायची. मला अजूनही आश्चर्य वाटतं की कसे तिने केले असेल? मामा मामींनी आम्हा मुलांना सगळी मुंबई दाखवली आहे. कधीकधी आमच्याबरोबर एका मामीच्या बहिणीची दोन मुले पण असायची. माझी आज्जी म्हणजे लक्ष्मीच वाटायची आम्हाला. कायम तिच्या पांढर्या शुभ्र केसात मोगर्याचा गजरा माळायची. हातात पाटल्या बांगड्या गळ्यात मंगळसुत्राबरोबर मोहनमाळ पण असायची. ती तिचे सुरकूकलेले हात झोपतांना आमच्यावरून फिरवायची इतकं छान वाटायचं ना! महिना झाला की आज्जी आम्हाला न्हाव्याकडे पाठवायची मुलींना कानाखाली एक बोट व मुलांना अगदी बारिक कटींग हे प्रमाण असायचे. कधी बरं नसलं पडलं झडलं तर आम्हला इतर मुलांबरोबर पुढच्याच गल्लीत असलेल्या डाॅक्टरकडे पाठवायची.
आमच्यावर आज्जीआजोबांइतकच मामा मामींनी भरभरून प्रेम केलयं. खुप सुंदर आठवणी आहेत. ते घर मला खुप आवडायचं. आम्ही वाशीत घर बघत होतो तर मी नवर्याला सांगितलं की घ्यायचं तर निदान रोहाऊस तरी घे. त्याने ऐकलं माझं.:) माझी मुलेपण ह्या आनंदाला मुकताय. पण मी ठरवलयं की माझ्या नातवंडांना तरी हे सुख जितकं होईल तितकं देईन. :)

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle