न आवडलेली पुस्तकं

ह्या विभागात आवडलेल्या पुस्तकांबद्दल लिहावं अशी सूचना आहे. अशी पाटी दिसली की ती तोडून काय होतं हे बघितल्याशिवाय मला समाधान लाभत नाही. (उगाच नाही माझ्या घरात एक मांजर!) तर हा धागा न आवडलेल्या पुस्तकांबद्दल. अपेक्षा अशी आहे की 'सनातन.ऑर्ग'सारखी स्वस्त करमणूक छाप पुस्तकं नाहीत, तर जरा आब बाळगून असलेल्या लोकांचं लेखन, किंवा पुस्तकांबद्दल तुमच्या तक्रारी काय आहेत हे लिहाल. एरवी चेतन भगत बौर्य आहे यात काही नावीन्य नाही.

न आवडलेलं आणि मुद्दाम उल्लेख करावंसं पहिलं पुस्तक म्हणजे मेघना पेठेंची 'नातिचरामि'. मला त्यांच्या कथा आवडतात, 'हंस अकेला' आणि 'आंधळ्यांच्या गायी' अधूनमधून परतपरत वाचायलाही मला आवडतात. पण कादंबरी हा प्रकार त्यांना नीट जमला नाही असं माझं व्यक्तिगत मत. सुरुवातीलाच येणारी, मानसोपचाराची गरज आहे, असं वाटायला लावणारी एका नव्हाळी घटस्फोटितेची वर्णनंच मला बौर्य झाली. दोन्ही कथासंग्रहांमधल्या स्त्रिया धीट, व्यक्तिमत्त्व असणाऱ्या, म्हणून आकर्षक आहेत. त्या पार्श्वभूमीवर अशी रडारड करणारी बाई लिहिल्यामुळे कंटाळा आला. तावच्या तावभर एवढी भकास वर्णनं मला झेपली नाहीत. ३०-३२ पानांवर मी ते वाचू शकले नाही.

दुसरं म्हणजे मीना प्रभूंचं 'माझं लंडन'. लग्न करण्याएवढी वयाने मोठी, डॉक्टर झालेली मुलगी लग्न होऊन रड्या हवेच्या देशात गेली म्हणून किती रडारड! बरं गेली ती सौदीसारख्या देशात नाही. प्रतिष्ठित पदवी मिळवून, प्रगत देशात जाऊन ही बाई रडारड कसली करते! ब्रिटनमध्ये बायकांना मतदानाचा हक्क मिळूनही तेव्हा दशकं लोटलेली होती; स्त्रियांना कोणत्याही विद्यापीठात प्रवेश मिळत होता; भारतापेक्षा आर्थिक आणि सामाजिक पातळीवर अधिक पुढारलेल्या देशात आपखुशीने जाऊन एवढी एकोणीसाव्या शतकातल्या बाईने करावी तसली रडारड काय करते ही! ... असं झालं होत होतं. हे पुस्तक मी १५-२० पानांवर वाचू शकले नाही.

शिक्षणासाठी मी काही वर्षं मँचेस्टरच्या जवळ खेड्यात राहिले आहे. हे पुस्तक हातात घेतलं तेव्हा मी नुकतीच डिपेंडंड व्हीजावर अमेरिकेत आलेली; नोकरी करण्याची शक्यता किमान काही वर्षं लांब आहे याची मलाही तेव्हा जाणीव होती. नुकतीच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक मीना प्रभूंनी लढलेली होती; आणि त्यात झालेली हार त्यांनी आब राखून पचवता आलेली नव्हती. ह्या सगळ्या अनुभवांमुळे 'ही बाई फार रडारड करते बुवा; हिचं काय वाचायचं' असं होऊन पुस्तक हातातून (शब्दशः) गळून गेलं (कारण दुपारी डुलकी काढण्याआधी पुस्तक उघडलं होतं).

/* */ //