सृजनाच्या वाटा

सृजन म्हणजे जणू आपल्या अंतर्यामीचा उन्मेष!

या उन्मेषाचे विविध आविष्कार एका व्यासपीठावर आणण्याचा एक अभिनव उपक्रम आम्ही 'मैत्रीण.कॉम' वरील सर्व मैत्रिणींसाठी घोषित करत आहोत - सृजनाच्या वाटा.

या उपक्रमांतर्गत दर महिन्यासाठी एक विषय (थीम) निवडण्यात येईल. त्या एक महिन्याच्या कालखंडात या विषयाच्या अनुषंगाने सदस्य मैत्रिणींनी आपापल्या कलाकृती इथे सादर करायच्या आहेत. या कलाकृती कोणत्याही स्वरुपातील आणि / किंवा माध्यमातील स्वनिर्मित कलाकृती असू शकतील.

उदा : मार्च-एप्रिल २०१५ करता 'वसंत ऋतू' ही थीम निवडली आहे. तर या थीमवर आधारीत पेंटिंग, शिल्पकला, क्ले मॉडेलिंग, कविता, कोणत्याही प्रकारचे लेखन (विनोदी, नाटक, नाटकातील प्रवेश, प्रहसन, आठवणी, वैचारिक, सामाजिक इ.) , क्विलिंगची फ्रेम, हस्तकला, इन्स्टॉलेशन (घरी करून त्याचे फोटो अपलोड), स्वतः बसवलेलं नृत्य ( युट्युब लिंक), गायन ( युट्युब लिंक), वादन, स्वतःची कविता वाचन ( युट्युब लिंक), रांगोळी, क्विल्ट, नेकलेस, ओरीगामी, झेन-टँगल्स, फोटोग्राफी, कोलाज, म्युझिक पीस, शॉर्ट फिल्म असं काहीही सृजनात्मक इथे प्रकाशित करता येईल. हवं तर या विषयाशी संबंधित दुसर्‍या एखाद्या कलाकाराची प्रसिद्ध अथवा अप्रसिद्ध कलाकृती (उदा. पेंटिंग, स्कल्प्चर, इन्स्टॉलेशन इ.), सिनेमा वगैरेची ओळख/अ‍ॅप्रिसिएशन ही करता येईल. याव्यतिरिक्तही तुमच्या आवडीच्या कोणत्याही माध्यमातून तुम्ही तुमची कला सादर करू शकता.

या उपक्रमांतर्गत पाककृती सादर करायची असल्यास नेहमीची, पारंपारिक पाककृती न टाकता त्यावर थोडे स्वतःचे प्रयोग करून मग टाकावी, अशी अपेक्षा आहे. थोडक्यात, त्यात नाविन्य आणि वेगळा प्रयोग असेल याची काळजी घ्यावी. सॅलड डेकोरेशन, व्हेजिटेबल कार्व्हिंग किंवा थीम केक यांचेही स्वागत आहे.

या उपक्रमाचा हेतूच हा की, एखाद्या विषयाकडे प्रत्येकीचा बघण्याचा जो वेगळा दृष्टीकोन असतो त्याला साद घालायची आहे. विषय एकच पण प्रत्येकजण त्याचा वेगळा पैलू बघेल, तिला त्या विषयाचा एक वेगळा कोन भावेल आणि ते व्यक्त करण्याचे प्रत्येकीचं माध्यम वेगळं असेल ....

दर महिन्याचा विषय हा केवळ एक सर्वसाधारण विषय असेल. प्रत्येकीनं त्या विषयातील आपल्याला भावलेला उपविषय आपापला शोधून काढावा अशी अपेक्षा आहे. उदा. आपला पहिला विषय आहे - वसंत ऋतू. या विषयाचे अनेक पैलू आहेत. कोणाला वसंत ऋतूतील बहरलेली झाडे दिसतील, कोणाला बसंत, बहार अशा रागांची भूल पडेल, कोणी वसंतातील ऊर्जेला मूर्तरुप देऊ पाहील, कोणी केवळ वसंतातील रंगांशी खेळू पाहील ..... जितकं चिंतन कराल तितकी वसंताची रुपं तुम्हाला भेटतील. आणि या अनेकविध रुपांतील तुम्हाला भावलेलं रूप म्हणजेच तुमचा उपविषय. मग अशा उपविषयावरील कलाकृती तुम्हाला आवडेल त्या माध्यमात निर्माण करून इथे सादर करायची आहे. सगळ्या मैत्रिणींच्या कलाकृती एकत्र बघून एकाच विषयावर किती विविधतेनं विचार करता येत, हा अनुभव आपल्याला नक्कीच संपन्न करणारा असेल, नाही का?

आणि हो, कलाकृतीमागचं तुमचं चिंतनही यानिमित्ताने वाचायला आम्हाला आवडेल. त्यामुळे ही कलाकृती कशी जन्मली, तुमच्या चिंतनातील अमूर्ततेपासून ते इथे सादर होण्यापर्यंतचा तिचा प्रवास कसा झाला हे ही नक्की लिहा.

नियम :

  • हा उपक्रम सार्वजनिक असेल.
  • आपली कलाकृती सादर करण्यासाठी नविन लेखनात जाऊन 'सृजनाच्या वाटा' हा गृप निवडा. त्या गृपांतर्गत 'मार्च-एप्रिल २०१५-वसंत ऋतू' हा सबगृप निवडा. तुमच्या कलाकृतीला योग्य ते शीर्षक देऊन धागा काढा.
  • एकच मैत्रीण एका माध्यमातील किंवा विविध माध्यमातील कितीही कलाकृती सादर करू शकेल. पण प्रत्येक कलाकृतीसाठी वेगळा धागा काढावा.
  • सदस्य मैत्रिणींचे पाल्यही या उपक्रमात भाग घेऊ शकतील. आपल्या पाल्याची कलाकृती टाकताना पाल्याचे नाव आणि वय लिहावे.
  • कलाकृती ही स्वतःची ( अथवा पाल्याची ) निर्मिती असावी. आधी इतरत्र प्रकाशित झालेली पण विषयानुरुप असलेली कलाकृतीदेखिल इथे टाकायला हरकत नाही.
  • दुसर्‍या कोणाची कलाकृती केवळ कलाकृती / सिनेमा अ‍ॅप्रिसिएशन या प्रकारासाठी करता वापरता येईल.
  • कलाकृती संयुक्तपणे म्हणजे काहीजणींनी एकत्र मिळून केलेली असली तरीही चालेल. पण त्या सगळ्या मैत्रीण.कॉमच्या सदस्य असल्या पाहिजेत. कलाकृती इथे टाकताना एकाच आयडीने टाकावी आणि हेडरमध्ये सगळ्यांचे नाव नमूद करावे.

Keywords: 

उपक्रम: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle