असं असं घडलं...३. मध्ययुग

आधीचा भाग

इतिहासात प्राचिन, मध्ययुगीन आणि आधुनिक हे तीन प्रमुख कालखंड.
प्राचीन आणि आधुनिक युगांच्या मधले हे युग म्हणून मध्य युग. यालाच अंध: काराचे युगही म्हटले जाते.

कसे होते हे मध्य युग, का होते अंध:काराचे?

प्राचीन काळी राजेशाही अस्तित्वात होती. मोठी मोठी साम्राज्ये होती. कालांतराने एव्हढी मोठी साम्राज्ये चालवणे अवघड होत गेले. काही राजांची पुढची पिढी तितकी बलवान राहिली नाही. राज्य कारभारासाठी वेगवेगळ्या प्रदेशात राजाने आपले अधिकारी- सरदार- सरंजामदार नेमले होतेे. त्या त्या प्रदेशातले ते अधिकारी बनले. हळूहळू हेच राजाचे सरदार बलवान होऊ लागले. एका अर्थाने आपापल्या विभागात ते सत्ताधिश बनू लागले. आणि राजाचे साम्राज्यावरचे नियंत्रण सुटू लागले. राजा नाममात्र होऊ लागला.

जगभर बहुतांशी ठिकाणी साधारण अशीच परिस्थिती निर्माण झाली. हळूहळू मोठ्या साम्राज्याची छोटी छोटी राज्ये तयार झाली. यालाच सरंजामशाही ही म्हटले जाते. इंग्रजीत यालाच फ्युडॅलिझम म्हटले जाते. आणि सरंजामदारांना फ्युडल लॉर्ड्स.

य़ा युगाला अंध:काराचे युग, ब्लॅक एज असेही म्हटले गेले. त्याची कारणे बघताना आपोआपच या काळाची ओळख आपल्याला होऊन जाऊन जाईल.

राजकीय परिस्थिती तर आपण पाहिली. एका बलवान राजाकडून छोट्या छोट्या अनेक सरदार, सरंजामदारांकडे सत्ता गेली. कधी कधी तर सत्ता नेमकी कोणाची याचा पत्ताही लागेनासा झाला. आपला राजा कोण या बाबत प्रजा आंधळी झाली म्हणून हे अंध: काराचे युग.

तशात सत्ता मिळवण्यासाठी सतत संघर्ष झाले. अगदी वडिल- मुलगा, दोन सख्खी भावंडं, भावजय- दिर, काका-पुतण्या अशा विविध नात्यांमधे अगदी जीवावर उठण्या इतका संघर्ष, सतेसाठी झाला या काळात.
आणि हे अत्यंत स्वाभाविक म्हणून मानले गेले. राजाच्या मुलाने राजा विरुद्ध केलेले बंड हा जणुकाही पायंडा पडून गेला.

त्याच बरोबर सतत बाजू बदलणे, आज एका राजाचा सेनापती तर पुढील काळात दुसऱ्याचीच नोकरी स्विकारणे हेही घडत होते. आज एकाची मनसब (एखाद्याची चाकरी करण्यासाठी दिलेली ठरावीक रक्कम/ जमीन) उद्या दुसऱ्याची. हे सहज होत होते.

सामान्य जनताही कधी एका राजाच्या वर्चस्वाखाली तर पुढे दुसऱ्याच राजाचे नागरिक होऊ लागली. एकाच व्यक्तीला दोन दोन वेगवेगळ्या राजांना एकाच वेळेस कर द्यावा लागत असे. एव्हढेच नाही तर वर्षातला आठ महिने व्यक्ती शेतकरी असे तर उरलेले चार महिने तीच व्यक्ती सैनिक असे.

एकुणातच निष्ठा हा प्रकार बदलता राहिला. कशाचीच शाश्वती राहिली नव्हती.

सामाजिक बाबतीत या काळात अनेक बंधने, नियम आले. त्या त्या प्रदेशापुरतीच गरज भागवणे, इतर प्रदेशांशी संबंध न ठेवणे होऊ लागले. आपला वावराचा परिघ लहान झाला की आपली दृष्टी, दृष्टिकोनही संकुचित होत जातो, तसंच या काळात झालं. धार्मिक बंधने वाढली. रुढी परंपरा यांची जाचक बंधने आली. विचारांची कवाडं मिटली गेली. एका अर्थाने समाजाने स्वत:ला बंदिस्त अंधारात कोंडून घेतले. म्हणून हे अंध:काराचे युग.

आर्थिक बाबतीतही संकुचितता आली. आधी राजेशाहीत मोठा पैसा राजाच्या हाती केंद्रित होता. स्वाभाविकच राजदरबार श्रीमंत होता. व्यापारासाठी लागणारा, गुंतवणुकीसाठी लागणारा पैसा उपलब्ध होता. शिवाय जहाजबांधणी, भांडवल यासाठीही हे उपयुक्त होते. पण आता राजेशाहीची जागा सरंजामशाहीने घेतली. स्वाभाविकच आर्थिक सत्ताही विभागली गेली. अनेक छोटे छोटे सरदार, सरंजामदार झाले आणि एकसंध मोठी आर्थिक सत्ताही विकेंद्रित झाली. व्यापार, जहाजबांधणी, भांडवल यासाठी मोठा, खेळता पैसा राहिला नाही. यामुळे समाजाचा आर्थिक विकास थांबला म्हणून हे अंध:काराचे युग.

लष्करी आघाडीवर ही याचा परिणाम झाला. पूर्वी एक मोठे सैन्य राजाच्या नेतृत्वाखाली होते. आता त्याचीही विभागणी झाली. सरदार सरंजामदार आपल्या प्रदेशापुरते सैन्य ठेऊ लागले. शिवाय या सरदार- सरंजामगारांचे आपापसात वाद, भांडणं, युद्ध होऊ लागली. छोट्या छोट्या पण सततच्या कुरबुरी चालूच राहिल्या.

याच सुमारास इतर धर्मीयांची आक्रमणे, संपर्क, प्रभावही होऊ लागला. यातून आपला धर्म टिकवण्यासाठी धर्माची बंधने, नियम अजून कठोर केली गेली.

एकुणातच प्रजेला कोणाचाच भरवसा राहिला नाही. आपला तारणकर्ता कोण याबाबत एक संदिग्धता समाजात निर्माण झाली. सततची युद्धे, खालावलेले जीवनमान, आर्थिक उतरती कळा, धार्मिक छळ आणि धर्मांधता, पडलेल्या दुष्काळांतून वर येण्यासाठी राजाची मदत नाही,.... या आणि अशा अनेक गोष्टींमुळे या युगातला अंध:काराचे युग मानले जाते.

भारतात मध्ययुग कधी सुरु झाले याबद्दल मतभिन्नता आहे. काहींच्यामते गुप्त साम्राज्यानंतरचा काळ म्हणजे साधारण इ.स. 650 पासून मध्ययुगाचा काळ धरला जातो. तर काहींच्यामते इ.स. 1000 मधल्या तुर्कांच्या आक्रमणापासून मध्ययुग; तर काहींच्या मते इ.स.1206 पासून सुरु झालेल्या गुलाम वंशाच्या दिल्ली सल्तनत पासून.
पण ते असो.

आता आपल्याला लक्षात घ्यायचय ते इतकच की मोठी मोठी साम्राज्य मोडून पडली आणि त्याची छोटी छोटी छकलं तयार झाली. अन या छोट्या प्रदेशापुरते स्थानिक राज्यकर्ते आले. समाजात रुढीपरंपरांचा पगडा वाढला. सततची छोटी युद्ध सुरु झाली. विज्ञाना पेक्षा मान्यतांना स्विकारले जाऊ लागले. समाज अधिकाधिक शेतीवर अवलंबून राहू लागला. व्यापार, इतर जगाशी संपर्क कमी होऊ लागला. आपापसातला संशय, अविश्वास वाढू लागला. सामान्य जनतेला वाली उरला नाही.....
हे सगळे घडले तो काळ म्हणजे मध्ययुग, अंध:काराचे युग!

आता तुम्ही म्हणाल अवलने, हेच युग, हे असे नकारात्मक युग का निवडले लेखमालिकेची सुरुवात करायला? आहे याचे उत्तर आहे. पण त्यासाठी तुम्हाला पुढील आठवड्याची वाट पहावी लागेल fadfad

पुढचा भाग

/* */ //