अस असं घडलं ... ८. सृजन

( स्थळ : लाखो वर्षापूर्वीची, एक अश्मयुगीन गुहा)

ऊन आता फारच कडक होऊ लागलं होतं. मुलं, बायका, पुरुष आता फार वेळ बाहेर जाईनाशी झाली. आसपासचे छोटे झरेही आटले. गुहेबाहेरचे गवतही पिवळे धम्मक झालं. झाडांचे शेंडेही हिरव्याची साथ सोडू लागले. सीतेला कसलीतरी चाहूल लागली होती. मनात आत खूप काही आर्त, हूरहूर लावणारं वारं वाहू लागलं होतं. तिला रामाचा विरह आता अजिबातच सोसवेना. तो सतत बरोबर असावा असं वाटू लागलं.
कधी सकाळीच डोंगरामागच्या छोट्या झालेल्या नदीत पाय सोडून बसावं अन ऊन अंगाला अगदी भाजू लागलं तर मनसोक्त नदीमधे डुंबत रहावं, पाण्यापासून जराही दूर होऊ नये असं वाटू लागलं तिला. पण मग ऊन फारच तळपायला लागलं की राम तिला ओढून जवळच्या झाडांच्या सावलीत नेई. मग तिथे बसल्या बसल्या फळांच्या खाली पडलेल्या इवल्या इवल्या बिया ती गोळा करत बसे. राम शेजारी पडलेल्या वाळलेल्या फांद्या गोळा करी अन वाळक्या वेलींनी बांधून त्याची मोळी करे. मग ऊन्हाचा मारा अगदीच असह्य झाला की दोघे गुहेत परत येत.
अजून काही दिवस उलटले. अन एक दिवस, दिवस उगवलाच नाही. रात्रभर कसले कसले आवाज येत राहिले. अन मधेच लख्ख उजेड होई, जंगलातला काळाकुट्ट अंधार क्षणात उजळून निघे. अन मग जोरात सुरु झाला पाऊस!

साऱ्या आकाशातून जणू मोठी नदीच वाहू लागली साऱ्या जंगलावर. सगळे अतिशय आनंदले. गुहेच्या बाहेर आले. आणि आकाशातून पडणाऱ्या या नदीखाली चिंब भिजू लागले. मधेच उजेडाचा लखलखाट होऊ. आणि पुन्हा कडकडाट असा आवाज. लहानमुलं घाबरून आपल्या आयांच्या कुशीत लपत. सीतेलाही या आवाजाची भिती वाटे. पण आता आईपासून ती खूप दूर आलेली. मग ती चटकन रामाचा हात घट्ट पकडे. लखलख होई तशी ती चटकन रामाजवळ सरके. रामही तिला जवळ घेई अन हसून म्हणे, " अग किती घाबरतेस? आता काही दिवस हे असंच चालायचं."
" मग काही दिवस तू माझ्या अगदी जवळ रहा बरं सतत" ती हळूच म्हणायची. त्या दोघांच्या वागण्याकडे वडिलधारी मंडळी जरा दुर्लक्षच करत पण सहान मुलं बघून खुखु खिखि करत.
हळूहळू सगळेच चिंब भिजले. आता गार वाराही जोरात सुटला. सगळेच आता गारठू लागले. आणि एक एक करत सगळे गुहेच्या आत आले. मोठ्या बाबांनी शेकोटीत अजून लाकडं घातली, जाळ मोठा केला. सगळे त्या शेकोटी भोवती उब घेत बसून राहिले.

सीतेला माहिती होतं. आता हा पाऊस असाच खूप दिवस पडत राहील. ती लहान होती तेव्हापासून हा पाऊस तिला खूप आवडत असे. त्याहून जास्त आवडे, ते पाऊस आल्यानंतर आजुबाजूचे सगळे जंगल कसे नवे, ताजे, हिरवेगार होई, ते! पावसाचे आणि या जंगलाच्या हिरवेपणाचे नाते तिने कधीचेच ओळखले होते. राम भेटल्यापासून तिला, तिचे आणि रामचे नातेही असेच काहीसे वाटायचे.
हा, त्या दोघांचा एकत्र असा दुसरा पाऊस! या आधीचा पाऊस झाला तेव्हा सीता नुकती रामच्या गुहेत रहायला आलेली. पण तेव्हा ती मनातल्या दु:खात इतकी बुडालेली की तो पाऊस तिला फारसा कळलाच नव्हता. आईबाबांना सोडून पहिल्यांदाच इतकी दूर आलेली ती. नवीन लोकं, नवीन गुहा, नवीन जंगल... ती खूप बावरली होती, गोंधळली होती. पण मग तिला हे सगळं ओळखीचं होत गेलं. रामच्या साथीत याही जंगलाचे हिरवे होणे ती अनुभवत गेली. पावसासारखाच राम तिचा सखा होत गेला.

खूप दिवस पाऊस सतत पडत राहिला. हळूहळू जमीन, माती-पाणी यांनी नरम, मऊ, उपजाऊ झाली. गेले काही दिवस सीतेने एक वेगळाच खेळ शोधून काढलेला. गुहेच्या एका बाजुला ती गोळा केलेल्या फळांच्या इवल्या इवल्या बिया मऊ झालेल्या मातीत ठेऊ लागली. कधी गोल आकारात, कधी एका एका रेषेत. कधी डोंगराच्या आकारात तर कधी झाडांच्या फांद्यासारख्या. मऊ मातीत काही वेळाने या बिया हळूच आत जात, नाहीशा होत. असं करत तिने जमवलेल्या सगळ्या बिया त्या मऊ मातीत झोपून गेल्या, लपून गेल्या...

अन मग एके दिवशी सुर्याचे सोनेरी ऊन जंगलावरती पसरले. गुहे बाहेरचा पाऊस थांबला होता. सगळे आनंदाने बाहेर आले. सीताही बाहेर आली. आणि चकितच झाली. तिने जिथे जिथे फळांच्या बिया ठेवल्या होत्या, तिथे काही काही छोटी छोटी पाने जमिनीतून वर डोकं करत होती. तिने उत्सुकतेने त्यातल्या एकाला हात लावला. तशी ती पानं हळूच तिच्या हातात आली. माती अजूनही खूप ओली, मऊ होती. त्यातून ही पानं सहज मातीतून सुटून तिच्या हातात आली. तिने नीट पाहिले. तर पानांच्या खाली तिला फळांची बी दिसली. हो हो, तीच बी, जी तिने गोळा केलेली, मऊ मातीत ठेवलेली. अन मातीत लपून गेलेली बी! पण त्या बी मधून ही पानं कशी बाहेर आली? तिला काहीच कळेना. तिने अजून 2-3 पानं काढून बघितली. एकाखाली होती तशीच बी. तर काहींच्या खाली नव्हती. तेव्हढ्यात तिला रामने हाक मारली. खाली नदीकडे चल म्हणून. सीता मग सगळे विसरली. आणि दोघे नदीकडे निघाले.

इतक्यात नदी किती मोठी झालेली! पाणी लालकाळे दिसत होते. नदी नुसती धो धो धावत होती. आता त्या नदीत उतरायची सीतेला भीती वाटली. ती परत फिरली. तिला काही गोष्टी आता अगदी नको वाटायला लागलेल्या. मोठे आवाज नकोत, फार माणसं नकोत, गुहेच्या एका कोपऱ्यात बसून रहायची.

अजून असेच काही दिवस गेले. सीता खूप दिवसांनी गुहे बाहेर आली. तिचे लक्ष गेले तर तिने ठेवलेल्या बियांमधून आलेली छोटी छोटी पानं आता दिसत नव्हती. ती थोडी पुढे झाली तर तिथे मात्र दोन छोटी झुडुपं उभी होती अजूनही. तिला फार आवडली ती झुडुपं. आता सीता त्या झुडुपांपाशीच बराच वेळ असे. तसंही तिला आता फार हालचाल झेपत नव्हती. ती मग गुहेत नाहीतर त्या झुडुपांपाशीच बसायची. तिच्या हळूहळू दोन गोष्टी लक्षात आल्या. एक तर ही दोन छोटी झुडुपं अगदी नदीकाठच्या मोठ्या झाडांसारखी होती. त्यांची पानं, त्यांचा रंग, वास सगळं त्या झाडांसारखं होतं. आणि दुसरं, तिच्या पोटात मधेच काहीतरी जोरात हलत असे.

असेच अजून काही दिवस गेले... आता पाऊस अगदीच थांबलेला. सारे जंगल हिरवेगार झालेले. नेहमीप्रमाणे बायका, पुरुष धान्य गोळा करायला, शिकार करायला बाहेर पडली. सीतेला मात्र आता हे अगदीच जमेना. तिच्या पोटाचा घेरही खूप वाढलेला. खाली वाकताना त्रास होई. मोठ्या बायका आता तिची जास्त काळजी घेत होत्या. जास्त बाहेर जाऊ देत नव्हत्या. सीतेलाही गुहेबाहेरच्या त्या दोन झाडांजवळच बसावसं वाटे. आता ती दोन्ही झाडं चांगलीच मोठी झाली होती.

अजून काही दिवस असेच गेले. हवेतला गारठा आता खूपच वाढला होता. सीता आता अजूनच थकली होती. जेमतेम गुहेबाहेर येऊन बसे. ती दोन झाडं आता अगदी नदी जवळच्या झाडांसारखी दिसू लागली होती. सीता मनात म्हणाली " ही त्यांच्याहून लहान पण थेट त्यांच्यासारखीच. जणूकाही त्यांची बाळंच! ..." अन अचानक सीतेच्या मनात काही चमकलं. अन तेव्हाच तिच्या पोटातही जोरात काही हललं. ती जोरात ओरडली. पुन्हा पोटात एक कळ उमटली. ती पुन्हा कळवळली. तशी मोठ्या बायका धावत आल्या. त्यांनी तिला आधार देत गुहेत आणलं.

" आई, रामच्या आई,..." सीता कळवळत म्हणाली
" हो ग, हो पोरी कळतय मला. खुप दुखतय ना? थोडं सहन कर. " रामच्या आई तिला थोपटत म्हणाल्या.
" आई, ती बाहेरची दोन झाडं.... आईग...."
" हा, हा, दमानं जरा. बोलू नको आता काही"
" आई, अहो ती नदी जवळच्या... झाडांची... आईग.... बाळं आहेत..."
" हो हो, बाळच होतय तुला. दम धर. थोडी कळ सोस, बोलू नको बाळा आता काही..."
" आई... आईग... अहो माझ्या बाळाबद्दल नाही, झाडाची बाळं.... आईग..."

अन मग अजून कितीतरी वेळा तिने कळा दिल्या... अन मग एका मोठ्या आई...ग... बरोबर एक नाजूक, छोटासा टॅह्यॉ एेकू आला. अन मग थोड्या वेळाने पुन्हा एका मोठ्या आई...ग बरोबर अजून एक टॅह्यॉ ...
" अगबाई दोन दोन झाडांचं काहीतरी बोलत होती न सीता? बघा दोन बाळं जन्माला आली" रामची आई आनंदाने बोलली. सीतामात्र अगदी थकून गेली होती. पण ती जास्त थकली होती यासाठी, कि जे ती सांगत होती, ते समजलच नव्हतं अजून कोणाला...

झाडांनापण बाळं होतात आणि ती आपण लावू शकतो हे सीतेला मात्र अगदी स्पष्ट कळलं होतं!

हिच ती शेतीची सुरुवीत होती! एका सृजनातून दुसरे सृजन समजले होते सीतेला. अन पुढे समजणार होते साऱ्या मानवजातीला! सृजन, मानवाला मिळालेले एक वरदान!

( डिसक्लेमर : ही कथा असली तरी त्यामागची परिस्थिती खरी आहे. इतिहासात असं मानलं जातं की शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. अर्थातच तत्कालिन भाषा कशी असेल, संवाद कसे असतील , इतर तपशील यांबाबत तार्किक अंदाजच बांधला आहे. नावंही अर्थातच काल्पनिक पण परंपरेशी नाळ जोडणारी.)
पूर्व प्रकाशित : बंगळूर कट्टा

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle