हॅपिली एव्हर आफ्टर (अर्थात पांढऱ्या घोड्यावरच्या राजपुत्राची खरीखुरी गोष्ट)

एक आटपाट नगर होतं. तिथे एक सुशील, सद्वर्तनी राजा राज्य करत होता. त्याची एक तशीच सुशील, सद्वर्तनी राणी होती. त्यांना एक मुलगा होता. मुलगा म्हणजे राजपुत्रच तो! तो उसळत्या रक्ताचा, मौजमजा आवडणारा तरुण होता. गुरुकुलातून विद्यार्जन संपवून आल्यावर राजवाड्यात डिट्टो डीडीएलजेचा प्रसंग घडला. गुरुकुलातून आलेल्या प्रगतिपुस्तकात राजपुत्राने मिळवलेले गुण आणि निकाल सोडून 'नौकानयनात अ+. नेमबाजी ब. वर्तणूक समाधानकारक.' वगैरे भरताड लिहिलेलं पाहून राजाला निकाल काय तो समजलाच होता, पण त्याने तो काही व्यथित वगैरे झाला नाही. त्याने त्याचं तारुण्य असंच विद्यार्जन करत, नंतर लढाया लढत आणि मग राज्य करत; थोडक्यात, अत्यंत रटाळ पद्धतीने घालवलं होतं. त्यामुळे त्याने राजपुत्राला सोन्याच्या चषकातून १०० वर्षं जुना सोमरस दिला आणि अनुपम खेरासारखं दाटल्या कंठाने 'जा, जी ले अपनी जिंदगी' असं सांगितलं. राजपुत्रालादेखील राजाकडून हीच अपेक्षा होती. त्यानेही डोळ्यांत पाणी आणून 'थँक्स डॅड!' म्हणून राजाला घट्ट मिठी मारली आणि हळूच चषकातला सोमरस बाजूच्या झाडाच्या कुंडीत ओतून दिला. गुरुकुलात राहत असताना त्याने बाजूच्या गावात जाऊन अध्येमध्ये तिथं बनणार्‍या देशी दारूची चव चाखली होती आणि ती त्याला फारच आवडली होती. राजवाड्यात स्टेटस सांभाळायचं म्हणून अनेक वर्षं जुनी मद्यं, महागातले ब्रँड वगैरेच गोष्टी असत. त्यात काही मजा नाही, कडक दारू बनवावी तर त्या गावातल्या लोकांनीच, हे राजपुत्राचं पक्कं मत होतं. अर्थात, राजाराणी वा महालातल्या स्टाफसमोर हे असलं मत व्यक्त करायची त्याची छाती नव्हती आणि ती दारू राजरोस महालात आणायचीही! मात्र त्याचा गुरुकुलातला घनिष्ठ मित्र त्याला नियमित भेटायला येत असे, त्याच्या पिशवीतून लपूनछपून काही बाटल्या नियमित येत असत. आणि काही 'खास प्रौढांसाठी' असलेल्या सीड्यादेखील! राजपुत्र झटपट आपल्या लॅपटॉपावर त्या कॉपी करून घेत असे. त्याचा लॅपटॉप चुकून कधी राजाराणीनं बघितला असता, तर ते हार्टअ‍ॅटॅक येऊन ताबडतोब खपले असते हे नक्की!

असो. विद्यार्जनाची कटकट संपली, आपण नापास झाल्याचं राजाला किंवा राणीला काही विशेष वाटलं नाही, ह्यामुळे राजपुत्राला हुश्श झालं. त्याने उत्साहाने काय काय मौजमजा करायची, याचे बेत आखायला सुरुवात केली. राजधानी झपाट्यानं बदलत होती. मौजमजा करण्यासाठी नवनवी ठिकाणं उपलब्ध झाली होती. राजपुत्राला सगळीकडेच मुक्त प्रवेश होता. खेरीज जुगारबिगार खेळताना तो राजपुत्र असल्याने कॅसिनोचे मालक त्याला काही डाव उदारपणे जिंकू देत असत. काही पबांमध्ये खास राजपुत्रासाठी म्हणून शाही, अतिशय महागातली कॉकटेलं बनवली जात. नवीन कुठलीही गाडी बाजारात आली की, पहिल्यांदा ती राजवाड्यावर टेस्ट ड्राइव्हसाठी येई आणि मगच इतरेजनांना दृष्टीस पडे. अशा सगळ्या गोष्टी राजपुत्राला फार सुखावत असत. सकाळी उशिरा उठायचं आणि रात्री उशिरापर्यंत असल्या विविध उद्योगांत वेळ घालवायचा, हा त्याचा दिनक्रम ठरला होता. मात्र, झोपायच्या वेळी बिछान्यावर आडवा पडून डोळे मिटले की, त्याची झोप पार उडून जात असे. मिटल्या डोळ्यांसमोर त्याला कायम राज्यातली मुख्य गणिका चंद्रलेखा दिसत असे. त्याला तिचं भयंकर आकर्षण होतं. त्याच्या पौंगडावस्थेपासूनच्या सगळ्या फँटस्यांमधली बाई कायम चंद्रलेखाच असायची इतकं! ती आता पन्नाशीला आली होती तरी एकदम मादक दिसत असे. बोटॉक्सची इंजेक्शनं, आवश्यक तिथं सिलिकॉन इम्प्लांट आणि पॉवर योगा असं सगळं करून तिनं मादकता टिकवून ठेवली होती. चंद्रलेखेनं मनात आणलं तर ती कुठल्याही राजाशी लग्न करून थेट पट्टराणी होऊ शकते, असं तिच्याबद्दल बोललं जाई. त्यामु़ळेच की काय, राजा काही वर्षांपूर्वीपर्यंत अधूनमधून तिच्या हवेलीत एखादी रात्र राहत असे, तेव्हा राणीच्या कपाळावर चिंतेचं नि आठ्यांचं जाळंच दिसत असे, कधीतरी ती दोनदोन दिवस क्रोधागारातच जाऊन बसत असे. आता दोघांचंही वय झालं तसं राणीनं ते सोडून दिलं होतं. राजाही चंद्रलेखेकडे आता जाईनासा झाला होता. त्याचा कल आता अध्यात्म, विरक्ती वगैरे गोष्टींकडे म्हणे झुकू लागला होता. दरबाराचं कामकाज आटोपलं की, राजा जेवणाआधी अर्धा तास नियमित भजन करू लागला होता. रात्री साधारण नवाच्या सुमारास राजाराणी झोपायला जात असत. त्या महिन्यातल्या पौर्णिमेला रात्री नवानंतर चंद्रलेखेकडे जायचं राजपुत्रानं नक्की केलं. आपण राज्याचे युवराज आणि भावी राजे असल्यानं चंद्रलेखा आपल्याला नाही म्हणणार नाही, असा त्याचा होरा होता. प्रत्यक्षात मात्र घडलं वेगळंच!

चंद्रलेखेकडे तो पोचला तेव्हा ती कुठेतरी जायला तयार होत होती. तिने शक्य तितकी झिरझिरीत वस्त्रं परिधान केली होती. मोजके ठसठशीत अलंकार घातले होते. जाणवेल न जाणवेलसा माफक मेकप केला होता. तिच्या सख्या तिच्याशी काहीतरी थट्टेनं बोलत होत्या नि तीही ते ऐकून लाजत, लटकं रागावत होती. राजपुत्र आल्याचं पाहून मात्र तिचा चेहरा किंचित त्रासिक झाला. पण तो राजपुत्रच असल्यानं तिला त्याचं आदरातिथ्य करणं भाग होतं.

"निरोपही न पाठवता आलात? महाराज नेहमी सेवकाबरोबर संध्याकाळी निरोप धाडतात. आपणही निरोप पाठवला असता तर आपलं नीट स्वागत करता आलं असतं." त्याच्यासमोरच्या आसनावर बसत ती म्हणाली. तिच्या दास्यांनी समोर सोमरसाची सुरई, पेले आणि फळांची तबकं वगैरे आणून ठेवली.
"अं.. अं.. छे छे.. नीट स्वागत वगैरे काय? असली काही औपचारिकता मी मानत नाही.. पण निरोप पाठवायचा राहून गेला खरा..." त्याने सारवासारव केली.

'निरोप आणणार्‍या सेवकानं राजाकडे चुगली केली असती म्हणजे लागली असती वाट..' त्याच्या मनात येऊन गेलं. आधीच त्या ठिकाणी त्याला प्रचंड अस्वस्थ वाटायला लागलं होतं. तिच्या सख्या, दास्या, हवेलीतल्या इतर बायका अधूनमधून डोकावून याच्याकडे कुतुहलाने पाहून जात होत्या. मधूनच कुठल्यातरी गवाक्षातून हळू आवाजातली कुजबुज आणि हसण्याचा फिसफिसाट कानी येत होता. त्या सगळ्याजणी आपल्याबद्दलच बोलत आणि आपल्यालाच हसत आहेत, असं वाटून राजपुत्राचा आत्मविश्वास हळूहळू खच्ची होत होता. गणिकेकडे येणंजाणं, तिच्याशी संबंध ठेवणं काही सोपं नाही, हे त्याला कळून चुकलं होतं. त्याची एकंदरीत अस्वस्थ चुळबुळ पाहून चंद्रलेखेनं एका सेविकेला त्याला विशेष कक्षात नेण्याची आज्ञा केली.

विशेष कक्ष भलताच सजवलेला होता. चारी बाजूंच्या भिंतींवर शृंगारिक चित्रं काढली होती. तसेच, मंचकाच्या मागच्या बाजूला चंद्रलेखेचा उन्मादक आविर्भावातला संगमरवरी पुतळा ठेवला होता. ठिकठिकाणी फुलदाण्यांत सुवासिक फुलांचे गुच्छ खोचून ठेवले होते. सुवासिक मेणबत्त्या जळत होत्या. तिथे एकही सेविका नव्हती, ते पाहून राजपुत्राला हायसं वाटलं. आता चंद्रलेखा आली की, तिला आपला हेतू सांगून तिच्यासोबत रात्र घालवता येईल, या विचाराने त्याला उत्साही वाटू लागलं. राजवस्त्रं उतरवून त्याने तिथे असलेला नाईटड्रेस घातला आणि चंद्रलेखेची आतुरतेनं वाट पाहू लागला. पण काही वेळाने चंद्रलेखेऐवजी तंग वस्त्रं परिधान केलेली एक सेविका तबकात फुलं, अरोमाथेरपी तेलं वगैरे घेऊन आली. 'चंद्रलेखाबाईसाहेब बाहेर गेल्या आहेत महत्त्वाच्या कामासाठी. थोड्या वेळात येतीलच. त्याआधी तुम्हांला रिलॅक्स वाटावं म्हणून थाई पद्धतीचा मसाज करायला त्यांनी सांगितलं आहे. तुम्ही टॉवेल गुंडाळून या मसाजमंचकावर पहुडा.' असं म्हणून ती सफाईदारपणे मसाजाची तयारी करू लागली. राजपुत्राचा पुन्हा विरस झाला. चंद्रलेखेनं त्याला व्यवस्थित टाळल्याचं त्याला कळलं, पण आलोच आहोत तर हा मसाज तरी अनुभवून जाऊ, असा विचार करून तो त्या मंचकावर जाऊन पहुडला. सेविका आपल्या कामात अतिशय तरबेज होती आणि राजपुत्राला मसाज फारच आवडला, तरी चंद्रलेखा आपल्याला सहजी प्राप्त न झाल्याची बोच त्याला लागलीच.

खरंतर दुसर्‍या दिवशी सगळ्या गोष्टींवर विचार करताना त्याला चंद्रलेखेचा भयानकच राग आला होता आणि राजाला सांगून त्या सौंदर्याने उन्मत्त झालेल्या बाईला चांगली शिक्षा करावी, असं त्याच्या मनात हजारदा येऊन गेलं होतं. पण राजाराणीला आपण चंद्रलेखेकडे गेल्याचं कळलं तर महालात भरपूर तमाशे होतील, हे त्याला माहीत होतं. पुन्हा तिच्या हवेलीत लपूनछपून जायचा विचार एकदोनदा मनात आला त्याच्या, पण आधीचा प्रसंग आठवला की, त्याचा धीर खचत असे. तिथल्या त्या कुजबुजणार्‍या आणि फिसफिस हसणार्‍या असंख्य बाया आणि समोरच्या माणसाला स्वतःच्या सौंदर्याने कःपदार्थ वाटायला लावणारी ती चंद्रलेखा.. तिचा नाद आपण सोडावा हेच बरं, असं त्याने मनाशी ठरवलं. गणिकेचं प्रेम असतं पैशांवर, दागदागिन्यांवर, ते काही खरं प्रेम नव्हे, आपली पत्नीच आपल्याला खरं काय ते प्रेम देईल, तेव्हा आपणही सुशील आणि एकपत्नीव्रती बनायचं, असं त्याने ठरवून टाकलं आणि लवकरात लवकर एकपत्नीव्रती बनण्यासाठी एक पत्नी शोधायची त्याने जोरदार तयारी सुरू केली.

अर्थात हेही काम सोपं नाही, हे त्याच्या लवकरच लक्षात आलं. राजघराण्याच्या छोट्यात छोट्या बाबींसाठीही अनेक नियम, अटी लागू असत. लग्न ही तर फारच मोठी बाब होती. राजघराण्यातल्या व्यक्तीसाठी जोडीदार आणायची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ होती. त्यात राजपुत्राला पत्नी आणायची तर ती राजकन्याच असली पाहिजे, तिचे राज्य क्षेत्रफळ, नैसर्गिक साधनसंपत्ती, खजिन्यातली संपत्ती, इत्यादी प्रत्येक बाबीत तोडीस तोड असले पाहिजे, तिच्या बापाची ठरेल तेवढा हुंडा देण्याची तयारी हवी, त्या राजाने कुठल्याही युद्धात मुलीच्या सासरकडून लढायचा करार करावा, खेरीज ती सौंदर्यवती असली पाहिजे, तिच्या डाव्या घोट्याजवळ एक तीळ असला पाहिजे, तिचे केस पिंगट, लांब आणि मृदू असले पाहिजेत, तिला चौदा विद्या आणि चौसष्ट कला अवगत हव्यात, तिच्या पत्रिकेत चक्रवर्ती पुरुष संततीचा योग हवा, इत्यादी बर्‍याच भानगडी होत्या. खेरीज चेटकीण वा जादूगार यांनी पळवून नेऊन कैदेत टाकलेल्या राजकन्यांना सोडवून आणून त्यांच्याशी लग्न करायचं किंवा स्वयंवरात भाग घेऊन पत्नी पटकवायची, या प्रक्रियांसाठी वेगळी कलमं होती. शाही लायब्ररीत बसून ते सगळं वाचतानाच राजपुत्राला धाप लागली. अशा भयंकर अटींतून पार पडून एखादी राजकन्या मिळेपर्यंत आपण बहुधा पन्नाशी गाठणार, अशा भीतीनं त्याला ग्रासलं.

या अटी कमी करण्यासाठी मग त्याने त्याची लाडकी युक्ती केली. त्याने राजाराणींसमोर आपण राज्य, युवराजपद, महाल त्यागून वनात जात असल्याची घोषणा केली. राजाराणी घाबरले.

"का रे बाळा असा अविचार करतोस?" राणीनं मेकप खराब होणार नाही, याची काळजी घेत डोळ्यांत पाणी आणलं.
"तुला आजपर्यंत इतकं लाडाकोडात ठेवलं. आता तुझ्याहाती राज्य सोपवून निवृत्त व्हायचा प्लान करू लागलो न लागलो तोच तू असं बोलायला लागलास..." राजा कुलभूषण खरबंदा बोलेल, तशा आवाजात म्हणाला.

बराच वेळ दोघांनी मनधरणी केल्यावर राजपुत्रानं हळूच खरं काय ते सांगितलं. मग त्या तिघांची त्या रात्री बरीच चर्चा (पक्षी: भांडणं) झाली. एकुलता एक असल्यानं त्या दोघांना इमोशनल ब्लॅकमेल करून राजपुत्र शेवटी जिंकलाच, पण 'निवडलेली मुलगी राजकन्याच पाहिजे' ही एक अट मात्र कायम राहिली.

दुसर्‍या दिवसापासून मग राजपुत्राने आसपासच्या राज्यांविषयी माहिती काढण्याचा सपाटा लावला. कुठल्या राजाला मुली आहेत, असल्यास त्यांची वयं काय आहेत, सुंदर, मादक (चंद्रलेखेइतक्या!) आहेत का, आपल्याला बायको म्हणून शोभतील का, स्वयंवर वगैरे जाहीर झालं आहे का, असा मिळेल तो डेटा लॅपटॉपावर टाकून त्याने सखोल संशोधन केलं. त्या गडबडीत नवी सीडी बघायची राहूनच जात होती तरी त्याला वाईट वाटलं नाही. अखेर या संशोधनाचं फळ त्याला मिळालं. उत्तरेकडच्या पर्वतरांगांपलिकडे असणार्‍या राज्याच्या राजकन्येची, पद्मिनीची माहिती त्याला त्यात दिसली आणि तिची आठवण पुन्हा त्याच्या मनात उफाळून आली. पद्मिनी त्याची बालमैत्रीणच होती. लहानपणी ते एकमेकांना बरेचदा भेटलेही होते. लहानपणी ती फार गर्विष्ठ होती, असं राजपुत्राचं मत होतं. ती त्याला तिची मर्जी असेल तेव्हाच स्वतःच्या खेळण्यांना हात लावू देत असे किंवा तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळू देत असे. एकदा तर तिने त्याला 'ए शेंबड्या..' असंही म्हटलं होतं. तेव्हाच त्याने मनात 'हिला कध्धीकध्धी आपली राणी बनवायचं नाही..' असं पक्कं ठरवून टाकलं होतं. पण शेवटी त्या काय बालपणीच्या गोष्टी! तिच्या सोळाव्या वाढदिवसाला जाताना आपलं मत बदलत चालल्याचं त्याला जाणवलं होतं आणि त्याच भरात त्या भेटीत तिला एकटं गाठून प्रपोज करायचंही त्याचं ठरलं होतं. पण ऐनवेळी त्या जादूगाराने घोळ केला. पद्मिनीचे बाबा अतिशय तापट स्वभावाचे होते आणि त्यांना जादूगार, चेटकीण वगैरे मंडळी अजिबात आवडत नसत. त्यांच्या राज्याच्या हद्दीत असणार्‍या जादूगार आणि मांत्रिकबिंत्रिक मंडळींना शाही नोंदणी कार्यालयात रीतसर नोंदणी करावी लागे आणि इतर जनतेपेक्षा तिप्पट कर भरावा लागे. बाहेरदेशीचा एक जादूगार असाच एकदा त्यांच्या राज्यात आला होता आणि त्याला हे काही माहीत नव्हतं. तो अपॉइंटमेंटही न घेता सरळ दरबारात राजाशी बोलायला गेला. साहजिकच राजाने त्याचा भयंकर अपमान केला आणि त्याला शंभर फटक्यांची शिक्षा देऊन राज्याबाहेर हाकलून लावलं. या अपमानानं चिडलेला तो जादूगार नेमका राजकन्येच्या सोळाव्या वाढदिवशी उपटला आणि त्यानं तिला पळवून नेलं.

तलवारबाजीच्या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकाच्या परीक्षेत राजपुत्रानं 'बी' श्रेणी मिळवली असल्याने त्याला तलवार चालवायचा बर्‍यापैकी आत्मविश्वास वाटत होता. तसंच, आपल्या अंगच्या गुणांनी, चतुराईने आपण जादूगारावर मात करून पद्मिनीला सोडवून आणू शकू, अशीही त्याला खात्री होती. त्यामुळे त्याने जादूगाराचा शोध घेऊन पद्मिनीला सोडवून आणायचं ठरवलं. लहानपणी तिने त्याला हिडीसफिडीस केलं असलं तरी आता परिस्थितीमुळे ती मवाळ झाली असणार, तिला जादूगाराच्या तावडीतून सोडवणार्‍या माणसावर कृतज्ञतेनं ती प्रेमाचा वर्षाव करील, आपल्याशी लग्न करून समर्पित भावनेनं संसार करू लागेल, अशी त्याची अटकळ होती. एकदा सगळं मनात पक्कं केल्यावर त्याने वेळ फुकट दवडला नाही. शाही तबेल्यांतून एक उमदा, अबलख घोडा, काही मोहरा आणि तलवार घेऊन तो प्रवासाला निघाला.

त्याने सात बर्फाच्छादित पर्वत ओलांडले, सात वेगवान नद्या ओलांडल्या, सात अरण्यं पार केली. वाटेत भेटलेल्या एका घारीवर आणि एका ससाण्यावर दया केली. त्याबदल्यात ससाण्यानं जादूगाराच्या गुहेचा पत्ता त्याला सांगितला आणि घारीनं भूक न लागू देणारी एक दुर्मिळ मुळी त्याला आणून दिली. मजल-दरमजल करत तो जादूगाराच्या गुहेपाशी पोचला. लपतछपत आत जाऊन त्याने पाहिलं, तर राजकन्येला बांधून ठेवलं होतं, तोंडावरदेखील चिकटपट्टी होती, तिची वस्त्रं जीर्ण झाली होती, फाटली होती. तिच्यासमोर हातात चाबूक घेऊन जादूगार उभा होता. राजकन्येचा असा छळ राजपुत्राला अगदी पाहवेना. त्याने जादूगाराच्या अंगावर झेप घेऊन त्याच्याशी लढाई सुरू केली. पण कितीही तलवारीचे वार केले तरी तो काही मरेना. तेव्हा त्याला गोची लक्षात आली. त्याचा जीव कुठेतरी दुसरीकडे असणार होता. राजपुत्र जिवाच्या करारानं ती गोष्ट शोधू लागला, तेव्हा जवळच असलेला एक पिंजरा आणि आतला पोपट त्याच्या दृष्टीस पडला. पोपट चांगलाच गबदुल दिसत होता, त्याच्या पिंजर्‍यात खाण्याची लयलूट दिसत होती. चाणाक्ष राजपुत्राला जादूगाराचा जीव त्या पोपटात आहे, हे कळायला अजिबात वेळ लागला नाही. त्याने जादूगाराचा हल्ला चुकवून पोपट पिंजर्‍यातून काढला आणि त्याची मान मुरगाळली. तिकडे जादूगार मरून धाडकन जमिनीवर कोसळला. राजपुत्राला अत्यानंद झाला. त्याने धावत जाऊन पद्मिनीला मुक्त केलं, तिच्या तोंडावरची चिकटपट्टी काढली. ती आता हंबरडा फोडून आपल्या मिठीत कोसळणार, असं त्याला क्षणभर वाटलं. तो बाहू पसरून उभा राहिला. ती हंबरडा फोडून जादूगाराच्या प्रेतावर जाऊन पालथी पडली आणि तिने आक्रोश सुरू केला. राजपुत्र सटपटलाच! धीर करून त्याने तोंड उघडलं,

"पद्मिनी.."

"नालायका, मूर्ख माणसा.. माझ्या जोडीदाराचा, प्रियकराचा जीव घेतलास तू.." ती रडणं थांबवून त्याला शिव्या देत म्हणाली.

"अगं, मी वाचवलं आहे तुला. याने तुला पळवून नेलं होतं ना.. त्याने छळ केला तुझा.. तुला बांधून.." हिला संमोहित करून ठेवलं होतं की काय इथे, असा विच्रार त्याच्या मनात चमकून गेला.

"त्यानं मला पळवून आणलं हे खरंय. पण नंतर मीच त्याच्या प्रेमात पडले होते.." पद्मिनी हुंदके देत म्हणाली.

"स्टॉकहोम सिंड्रोम.." राजपुत्र पुटपुटला.

"गपे ए सिंड्रोमवाल्या, तो चांगला माणूस होता. राजवाड्यात मला न मिळालेलं स्वातंत्र्य त्यानं मला दिलं. माझ्यावर भरभरून प्रेम केलं. माझा प्रत्येक हट्ट पुरवला..."

"अगं पण मी आलो तेव्हा त्यानं तुला बांधून ठेवलं होतं म्हणून मला वाटलं.." तो बोलताबोलता थांबला. आपण बघितल्या गोष्टीचा भलताच चुकीचा अर्थ लावून काय गाढवपणा केला ते त्याला आत्ता उमगलं. पण आता जादूगार तर मेला होता. त्याने धाडस गोळा करून राजकन्येला विचारलं,

"आय'म सॉरी. पण तो तर आता मेला.. पण मी आहे. मी तुला पत्नी म्हणून स्वीकारेन. करशील का माझ्याशी लग्न?"

ती फणकारलीच एकदम. "तुझ्यासारख्या यडपटाशी लग्न? आणि पुन्हा ते राजवाड्यातल्या बंदिस्त, रटाळ आयुष्यात परत जाणं? त्या हजारो नियमांमध्ये स्वतःला बांधून घेणं? अडलंय माझं खेटर! मी इथंच राहणार आता. एखादा असाच रांगडा, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा जोडीदार शोधून. जा, नीघ.." असं बोलून ती नाट्यमयरीत्या जादूगाराच्या कलेवरावर पडून ढसाढसा रडू लागली. राजपुत्र पाय ओढत माघारी फिरला.

आधी चंद्रलेखा, मग पद्मिनी... आपल्याच वाट्याला असे फजितीचे प्रसंग का यावेत, हे बिचार्‍याला कळेना. पद्मिनी प्रसंगानंतर तर राजपुत्र जवळपास पाचेक महिने खिन्नच होता. एवढा प्रवास, खर्च, लढाई सगळं करूनही त्याच्या पदरात काहीही पडलं नव्हतं. त्याला निराश वाटत होतं. आपण कुचकामी आहोत, सुंदर बायांना आपण आवडूच शकत नाही, आपल्याला बायको कधी मिळणारच नाही, अशा नकारात्मक विचारांनी त्याच्या मनात घर केलं होतं. त्यातच एकदा उदासपणे तो राजवाड्यातल्या तळ्याकाठी बसला असताना त्याला बाजूला एक आकाराने मोठी बेडकी दिसली. राजकन्या आणि बेडूक-राजपुत्राची गोष्ट त्याला ठाऊक होतीच. ही बेडकी कदाचित शापित, सुंदर राजकन्या असेल तर? पण ती काही मनुष्यवाणीनं बोलत नव्हती. त्यामुळे ती सुंदर पण मुकी राजकन्या असावी, असा त्याने तर्क लढवला. त्याने बेडकीला हातात उचललं. तिच्या बुळबुळीत स्पर्शानं त्याच्या अंगावर शहाराच आला. त्याने आजूबाजूला कुणी आहे का याचा अदमास घेतला नि इकडेतिकडे सावध नजर टाकून, हळूच बेडकीचं चुंबन घेतलं. त्याच क्षणी तळ्याजवळच्या झाडीतून दोन दास्यांच्या हसण्याचा फिसफिसाट त्याच्या कानी आला. तो एकदम गडबडला. त्या गडबडीत बेडकीच राहिलेल्या बेडकीनं टुणकन तळ्यात उडी मारली.

"ई, बघ तरी कसला डेस्पो आहे राजपुत्र.. बायका मिळत नाहीत म्हणून आता... ईईईई!" त्यातली एक दासी म्हणाली.

"नैतर काय, पण ती बेडकीसुद्धा याच्या हातून निसटून गेली बघ.. तिलाही नाही आवडला बहुधा हा." दुसरीने तिची री ओढली आणि पुन्हा दोघी फिसफिस करत हसल्या.

राजपुत्राला भयंकर म्हणजे भयंकर संताप आला. दोन्ही दास्यांना कामावरनं डच्चू देऊन, हालहाल करून मृत्युदंड द्यावा, अशी त्याला इच्छा झाली. पण आता महालातल्या स्टाफची संघटना होती. असलं काही त्यानं केलं असतं, तर एकाचवेळी सगळा स्टाफ काम सोडून गेला असता. हे लोक काम सोडून गेले असते तर राजाराणीनं हायच खाल्ली असती आणि घडल्या प्रकाराबद्दल त्यालाच दोषी मानलं असतं. तो नुसताच धुसफुसत, हात चोळत बसला.

आता पाणी डोक्यावरनं जायला लागलं होतं. काहीतरी तातडीनं करायलाच हवं होतं. अभूतपूर्व पराक्रम करून एखादी सौंदर्यवती राजकन्या जिंकून आणायलाच हवी होती. म्हणजे असल्या सगळ्या लोकांची तोंडं बंद झाली असती. निराशा झटकून तो कामाला लागला.

एक दिवस तो जंगलातून जात असता त्याला समोर झाडाखाली एक तरुणी बेशुद्ध पडलेली दिसली. तिचे लांब केस अस्ताव्यस्त झाले होते. कपडे फाटले होते. ती खूप गोरीपान होती. त्याने आपल्याजवळचं पाणी तिच्या तोंडावर शिंपडलं. ती हळूहळू शुद्धीवर आली. आपले कपडे सावरत उठून बसली.

"कोण आहेस तू? इथं या जंगलात बेशुद्ध कशी पडलीस?"

"मी लांबच्या गावाहून आले आहे. अनाथ आहे. आईबाप, भावंडं, नातेवाईक कुण्णी कुण्णी नाहीत मला. मी शेजारपाजारच्यांच्या मदतीवर लहानाची मोठी झाले. गावातल्या सावकारपुत्राला माझ्या प्राप्तीची अभिलाषा निर्माण झाली अन् तो मला त्रास देऊ लागला. मी बधत नाहीसं बघून त्यानं माझ्यावर चोरीचा आळ घातला आणि मला गावातून हाकून लावलं. मी प्रवास करतकरत इथवर आले अन् माझ्यामागे एक दरोडेखोर लागला. त्याच्यापासून सुटका करून घेऊन पळतापळता इथं दगडाला अडखळून पडले आणि बेशुद्ध झाले.. काय मेला हा बाईचा जन्म.." असं म्हणून तिनं एकदम गळाच काढला.

राजपुत्रानं तिला निरखून पाहिलं. ती नाकीडोळी ठीकठाकच होती. चंद्रलेखा किंवा पद्मिनीप्रमाणे मादक तर नव्हतीच नव्हती. केस पिंगट, लांब, मऊ होते आणि गोरीपान होती मात्र! तेवढं तर तेवढं.. राजपुत्रानं स्वतःच्या मनाची समजूत घातली आणि तो तिच्याशी गप्पा मारू लागला. त्याची नि तिची वेव्हलेंथ मात्र झकास जुळली. राजपुत्र जे जे काही बोले, ते तिनं भक्तिभावानं ऐकलं. त्याने केलेल्या पाचकळ विनोदांवरही ती खळखळून हसली. तो चावट काही बोलला तेव्हा तिनं लगेच सलज्जपणे मान खाली घातली आणि थोड्या वेळानं पापण्या नाजूकपणे फडफडवत त्याच्याकडे नजर उचलून हळूच पाहिलं. या माफक विभ्रमांनीही राजपुत्र पुरताच गारद झाला. 'हीच आपली जीवनसंगिनी'! त्याच्या मनानं ग्वाही दिली. पण एक घोळ होताच. ही मुलगी काही राजकन्या नव्हती. राजाराणी या बाबतीत कुठल्याही इमोशनल ब्लॅकमेलला अजिबात बधले नसते, हे राजपुत्राला ठाऊक होतं. पण अखेर मनाजोगती मुलगी मिळाल्याने हुशारलेल्या राजपुत्राचा सुपीक मेंदू दुप्पट वेगानं चालू लागला.

त्यांच्या राज्याच्या सीमाभागात एक म्हातारी चेटकीण राहत असे. तिनं चेटूकव्यवसाय सोडून दिल्यालाही खूप वर्षं झाली होती, पण ती तरुण असताना म्हणे लोकांना तिची जबर दहशत वाटे. राजपुत्रानं तिच्याकडे मदत मागण्याचं ठरवलं. त्याने आपला सगळा प्लान तपशीलवार त्या मुलीला समजावून सांगितला आणि ती दोघं चेटकिणीला भेटायला निघाली.

चेटकिणीचं घर अगदी जुनाट दिसत होतं, पडायला आलं होतं. घरात कुबट वास भरून राहिला होता. म्हातारी, जुनेर नेसलेली चेटकीण खोकत खोकत, अंगणात बाजेवर बसून चहा घेत, विडी ओढत होती. आधी तिनं अपरिचित आगंतुकांना आपल्या घराभोवतालच्या शंभर मीटरच्या परिघातही फिरकू दिलं नसतं. पण या दोघांना पाहून तिनं साधी बाजूला ठेवलेली छडीही उचलली नाही. कमाल तुसड्या, चिरक्या आवाजात तिनं पृच्छा केली,

"क्कोण्णे ते माझ्या दारात?"

तिचा तो सूर ऐकून राजपुत्र काहीसा हिरमुसलाच, पण त्याने कमरेची मोहोरांनी भरलेली थैली काढून तिला दिली.

"मला म्हातारीला एवढ्या मोहरा का बाबा?" मोहरा पाहून बदललेला, नरमाईचा सूर ऐकून राजपुत्राला हायसं वाटलं आणि त्याने आपली भन्नाट योजना तिला ऐकवली. चेटकिणीनं आधी 'नाही, नाही' म्हणून खूप नकार वगैरे दिला पण मोहरांची संख्या बरीच वाढवल्यावर ती कशीबशी तयार झाली.

"लोकेशन, सेट, हत्यारं वगैरे तुलाच सर्व तयारी करायला लागेल. माझे हातपाय चालत नाहीत बा आता." ती धूर्तपणे म्हणाली.

"करतो. मीच सगळं करतो. तू फक्त सांगितलं तेवढं कर. मी कळवेन त्यादिवशी, सांगेन तिथं चुलीवरच्या हंड्यात काहीतरी ढवळत उभी रहा. तुम्हां चेटकिणींना ठाऊक असलेली ती जादूई मिश्रणं का काय ते.."

"बरं. आता एवढ्या मोहरा देतोयस. कल्याण होवो तुझं! तुझं काही आदरातिथ्य करता येत नाही मला. पण आल्यासारख्या ह्या दोनदोन वड्या तरी घ्या दोघंजण.." चेटकिणीनं हिरव्यागार रंगाच्या कसल्याशा वड्या त्यांच्यासमोर धरल्या. राजपुत्र नि ती मुलगी दोघं घाबरून धूम पळत सुटले. चेटकीण खूश होऊन पुढे बराच वेळ चिरक्या, विचित्र आवाजात मोठमोठ्यानं हसत राहिली.

..राजपुत्रानं लॅपटॉप उघडून नीट प्लान करायला सुरुवात केली. चेटकिणीच्या जंगलाशेजारच्या जंगलात एक पडका मनोरा होता. त्यानं ते लोकेशन निवडलं. मग थ्रीडी डिझाइनासाठी असलेलं सॉफ्टवेअर वापरून तिथली रचना पक्की केली. काही भाडोत्री कलाकार तिथं चेटकिणीचे हस्तक म्हणून काम करायला आणले. खोट्या पण एकदम खर्‍यासारख्या दिसतीलशा तलवारी, भाले आणले. त्या मुलीचा त्या दिवशी खास मेकप करायला एका पार्लरवालीला सांगितलं. यात त्याचा पैसा पाण्यासारखा खर्च होत होता. पण आधीच्या दोन प्रसंगांत गेलेली अब्रू परत मिळवायची तर हे करणं भाग होतं. शिवाय, ती राजकन्याच आहे, हे राजाराणीला पटवून द्यायचं होतं.

प्रत्यक्ष घडामोडीच्या दिवशी एखाद्या थरारपटाच्या चित्रीकरणासारखंच दृश्य होतं. त्या मुलीबरोबरीनं चेटकिणीनंही स्वतःसाठी महागाचा कपडेपट करवून घेतला होता. चेहर्‍यावर भडक मेकप थापून ती चुलीवरच्या हंड्यात भयंकर वासाचं काहीतरी द्रावण जोरजोरात ढवळत उभी होती. बाजूला साखळदंडांनी त्या मुलीला बांधून ठेवलं होतं. अधूनमधून बाजूला ठेवलेल्या कागदांवरचे वाचून चेटकीण आणि ती मोठमोठ्यानं आपले संवाद म्हणत होत्या. मग ठरल्यावेळी राजपुत्र अबलख घोड्यावर, हातात तलवार परजत मनोर्‍यापाशी आला. त्याने आणि चेटकिणीच्या हस्तकांनी ठरल्याप्रमाणे तुंबळ मारामारी केली. राजपुत्रानं अर्थातच त्यांना लोळवलं. मग तो मनोर्‍यात प्रवेश करता झाला. चेटकीण आणि त्याने आपले ठरलेले संवाद बोलले. राजपुत्र जरा जास्तच तपशीलवार लढाई करायला लागला, तशी चेटकीण हळूहळू वैतागू लागली. तिचा वैताग पाहून राजपुत्रानं मग लढाई आवरती घेतली. सगळ्या लढाईचं शूटिंग केलेला कॅमेरा घेऊन आणि राजकन्येला आपल्यापुढे घोड्यावर बसवून राजपुत्र वायुवेगानं राजधानीकडे दौडत निघाला.

.. धुळीनं, रक्तानं माखलेल्या राजपुत्राला आणि सोबतच्या मुलीला पाहून राजाराणी धावतच आले.

"आई, बाबा, ही नवलभूमीची राजकन्या.. हिरण्मयी.. एका क्रूर, दुष्ट चेटकिणीनं हिला तब्बल वीस वर्षं कैद करून ठेवलं होतं. मी हिला सोडवून आणलं आहे."

"हो.. यांचे हे माझ्यावर आजन्म न फिटणारे उपकारच झाले आहेत.." हिरण्मयीनं पापण्यांची नाजूक फडफड करत त्याला दुजोरा दिला. राजा अजूनही थोडा गोंधळलेला दिसत होता.

"हे नवलभूमीचं राज्य कुठे आलं बरं?" हा प्रश्न येणार हे राजपुत्राला ठाऊक होतंच. इंटरनेटवरून माहिती काढून त्याने आधीच त्याचं उत्तर तयार ठेवलं होतं.

"बाबा, इथून खूप दूर, आग्नेय दिशेला, सात पर्वत आणि दोन समुद्र पार केले की, नवलभूमीचं राज्य आहे. आहे म्हणजे होतं. हिरण्मयी लहान असताना नवलभूमीवर परचक्र आलं. त्यात हिरण्मयी आणि तिची दाई या दोन व्यक्तीच पळून जाण्यात यशस्वी झाल्या. बाकी सगळं राज्य, सगळे लोक नष्ट झाले. तिथं आता केवळ अवशेष आहेत. इकडं जंगलातून जाताना चेटकिणीनं दाईजवळून हिरण्मयीला पळवलं आणि एका मनोर्‍यात आजवर डांबून ठेवलं होतं. मी त्या मनोर्‍याजवळून जात असताना मला त्याच्या गवाक्षात हिरण्मयीचा सुंदर चेहरा दिसला आणि मी तिच्या प्रेमात पडलो.. आज पराक्रमाची शर्थ करून मी तिची सुटका केली. आई, बाबा, मी तुमची अट पाळली आहे. हिरण्मयी राजकन्याच आहे, मला ती खूप आवडली आहे.. आम्हांला आशीर्वाद द्या." दोघंही राजाराणीच्या पायांशी वाकले. आजच्या प्रसंगासाठी राजपुत्रानं खास फर्माईश केली म्हणून हिरण्मयीनं बर्‍यापैकी पाठ उघडी टाकणारा पोषाख घातला होता. ती वाकली तेव्हा तिच्या पाठीवरची वेणी सरकली आणि तिच्या पाठीवर मध्ये असलेली गुलाबफुलाची जन्मखूण मागे उभ्या असलेल्या लोकांना दिसली. मागच्या घोळक्यात उभी असलेली एक राधिका नावाची मध्यमवयीन दासी ती खूण पाहून मोठ्यानं किंकाळी फोडून जमिनीवर कोसळली.

... पुढे बर्‍याच घटना झाल्या म्हणे! 'म्हणे' अशासाठी कारण खरं काय कुणाला माहीत नाही. कुणी म्हणालं, हिरण्मयी म्हणजे राधिका आणि तिचा एक त्यावेळचा सैनिक प्रियकर यांची अनौरस मुलगी निघाली. मग म्हणे, यावरून राजाराणी आणि राजपुत्र यांची कडाक्याची भांडणं झाली. मग म्हणे, शेवटी राजाराणी हरले. मग त्यांनी म्हणे, राधिकेला पेटीभरून सोन्याच्या मोहरा दिल्या आणि तोंड बंद ठेवायला सांगितलं. मग राजपुत्र-हिरण्मयीचं लग्न एकदाचं लागलं. पण राणीनं म्हणे बराच काळ या जोडप्याशी अबोलाच धरला होता. यातलं खरं काय, खोटं काय, माहीत नाही कुणालाच नक्की! काही गॉसिप करणार्‍या दास्यांनी इकडेतिकडे काहीबाही पसरवलं खरं! अगदी पुढच्या वर्षी ऑडिटरांनी या लग्नानिमित्त झालेल्या बर्‍याच गुप्त खर्चांवरून राजा, राजपुत्राला फार पिडलं नि त्यातल्या एका ऑडिटरामागे राजपुत्र शेवटी खरी तलवार उपसून त्याला मारायला धावला, इथपर्यंत काहीबाही ऐकू आलं. एवढंच नाही तर लग्नानंतर काहीच दिवसांत हिरण्मयीला चंद्रलेखेकडे राजपुत्र गेला होता त्या गोष्टीचा पत्ता लागला नि तिनं थेट त्याला सोडायची धमकी दिली, असंही!

.. अखेर काही काळानं ते दोघं सुखानं नांदू लागले, हे मात्र अगदी शंभर टक्के खरं!

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle