तेरी याद साथ है

"आई लवकर दे गं पोहे मला , उशीर होतोय"
पहाट म्हणावी का मध्य रात्र हा प्रश्न पडावा अशा वेळेला रियाचा आरडा ओरडा ऐकुन आई दचकून उठली आणि त्या पाठोपाठ रितूही...आईच्या वैतागलेल्या चेहऱ्याकडे पाहून शांतपणे smile देणाऱ्या आपल्या दिदीला पाहुन खरंतर ती चक्रावली होती, इतक्यात तिच्या डोक्यात प्रकाश पडला..
'अभी ! येस्स अभी येणारेय आज. म्हणून मॅडम इतक्या खुष आहेत तर'
"काय ग एवढ्या लवकर...."
आईचं वाक्य पूर्ण होण्या आधीच रितूने खुलासा केला,
"अग आई आज अभी येणारेय ना. मग कशी झोप लागेल त्याच्या रियाला? "
आणि पुढच्या क्षणी तिच्या पाठीत धपाटा पडला
"hey don' t you dare to call me Riya. मला फक्त अभीच रिया म्हणू शकतो. कळलं?"
"हो हो कळलं हं !"
'आज पहिल्यांदा भेटतील ही दोघं!’ वेडावून पळणाऱ्या रितुला पाहून तिच्या मनात विचार आला.
"एवढ्या लवकर कशाला निघतेयेस? आणि कशी जाणारेस? काय विचारतेय मी? अगं, कार्टे लक्ष दे कि जरा. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास ! आधीच हिला घरात लक्ष द्यायला नको आणि त्यात आता अभी येणारेय म्हणाल्यावर तर काही खरं नाहीच! घरी घेऊन ये गं त्याला "
आईची अखंड बडबड चालू होती. पण आईकडे लक्ष द्यायला रियाचं मन तिथे होतंच कुठं? ते तर आधीच एअरपोर्ट वर पोहचल होतं.
"कसा येईल हा? पोहचेल ना व्यवस्थित? तो निघायच्या आधी एकदा फोनवर बोलून घ्यायला हवं होतं, अशी कशी झोप लागली झोप?" डोक्यात विचारंचं काहुर माजलं होतं
"अभी ला आणायला मी एकटी जाणार" तो येणार हे कळालं त्या दिवशीच तिने डिक्लेअर करून टाकलं.पण त्यासाठी तिला सुरुवातीला कोणी परवानगी देईना. मग खूप आकांतांडव केल्यावर मम्मा - पप्पा एकदाचे जा म्हणाले आणि तिने सुटकेचा निश्वास टाकला... त्या दिवशी कितीही उत्साह असला तरी आज घरातून निघताना मात्र ती जरा बावरली होती. ती आयुष्यात पहिल्यांदा एकटी इतक्या दूर जाणार होती. तेही अभीला आणायला. म्हणूनच की काय अभीला घरी नीट घेऊन जाणं ही आता तिला तिची नैतिक जबाबदारी वाटायला लागली होती.
अर्थात फक्त हेच कारण नव्हतं ! आज तिला 'अभी' भेटणार होता. तब्बल १० वर्षानंतर !

"आई मी अभीकडेच राहीन ग आज. उद्या येते. काळजी करू नकोस. पोहचल्यावर फोन करते. ठिकेय ना?"
आईच्या उत्तराची जराही वाट न पाहता ती पळाली देखील.तिच्या मनाची चाकं आता गाडीच्या चाकांपेक्षा वेगात धावत होती. तीन तासाच्या त्या प्रवासात ती कित्येकदा भूतकाळात जाऊन आली. हजारदा तिने या १० वर्षाची उजळणी केली. अभीला सांगायच्या अनेक गोष्टी तिने हजारदा मनात घोकल्या.

तसंही काय सांगायचं राहीलं होतं अभीला?

" मी कधी चुकुन बँकरप्ट झालोच तर त्याचं मुख्य कारण रिया आणि अभीचे तासंतास चालणारे फोन कॉल्स असणारेत " एकदा पप्पा म्हणालेले तिला आठवलं आणि ती खुदकन हसली.
अतिशयोक्ती चा पार्ट सोडला तर ते बर्‍याच अंशी खरं ही होतंच.. अगदी 'आज मी कुठल्या कलरचा ड्रेस घालू रे?' हे असले निर्णय पण ती अभीला विचारून घ्यायची.

आणि एकदाची गाडी एअरपोर्टला पोहचली.अगदीच ऑनटाईम पोहचली होती ती ! तिकडे अभीची फ्लाईट आणि इकडे रियाची गाडी एकाच वेळी एअरपोर्टला land झाली होती. "जिथे तिथे माझ्यासोबतच पोहचतो हा !" . रियाला स्वतःच्या विचारांचं हसायला आलं.
मनात हुरहूर घेऊन रिया दाराशी गेली. अराईव्हल च्या गेटकडे आतुरतेने पाहत असलेल्या रियाच्या डोळ्यात काही वेळाने एक नाराजी पसरली... अभी आलाच नव्हता.
घाईघाईने तिने अभीला फोन लावला. पण तोही switched off !
"कसं शक्य आहे हे?" रिया रडायचीच बाकी होती आता. या एका क्षणासाठी ती कित्येक रात्री जागली होती. या दिवसाची तिने डोळ्यात प्राण आणून वाट पहिली होती.
"पण नेमक झालं काय? गेला कुठे हा? याच्या फ्लाईटला तर काही झालं नसेल ना !”
मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ते काही खोटं नाही. इतक्यात मागून कुणीतरी तिला मिठी मारली. त्यासरशी रियाने झटकन मागे वळून पाहिलं आणि समाधानाचं स्मित तिच्या चेहऱ्यावर पसरलं.
अभी !
त्याला पाहताच रियाने त्याला घट्ट मिठी मारली.त्या मिठीची आर्तता त्यावेळी त्यांना पाहणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात आली असेल.
'ही जोडी कधीच तुटू नये !'
प्रत्येकाला वाटावं असा तो क्षण !
"अभिनव अमोघ कुलकर्णी" , रियाचं एक छोटसं विश्व ! रियाची दुनिया !
आणि ही त्यांची एक छोटीशी गोष्ट !.......
________________________________________________________________

"अभी नको ना रे जाऊस मला सोडून"
"मी येईन ना परत. लवकरच"
"नक्की ?"
"नक्की"
"Promise ?"
"Promise "
हमसून हमसून रडणार्‍या ९ वर्षाच्या अभी-रियाकडे पूर्ण चाळ ओल्या डोळ्यांनी पाहत होती.
________________________________________________________________

रियाला साधारण १० वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला. आणि ती अभीला आणखीनच बिलगली.
"काय झालं गं राणी?"
"अभी तू लवकर परत येईन म्हणाला होतास. चक्क १० वर्षांनी परत आलायेस"
"आता आलोय ना पण परत? कायमचा ! तुझ्यासाठीच तर आलोय"
"आता जाणार नाहीस ना कध्धीच?"
"नाही गं"
"नक्की?"
"नक्की"
"Promise ?"
"Promise "
१० वर्षांपूर्वीचा तो प्रसंग दोघांनाही जसाच्या तसा आठवला तसे दोघही खळखळून हसले.
________________________________________________________________

'अभी आणि रिया !'
असं म्हणलं जातं की देव गाठी स्वर्गात बांधतो.
फक्त लग्नाच्याच नाही तर इतरही सगळ्याच नात्यांच्या ! खरंच असेल ते. नाही तर अभी-रियासोबत घडलेल्या या सगळ्या घटनांना फक्त योगायोग म्हणुन कसं चालेल?
________________________________________________________________

१० नोव्हेंबर १९८९, हॉस्पिटल मध्ये दोन नर्स दोन बाळांना घेऊन त्यांच्या आयांपाशी आल्या. किर्तीला मुलगा आणि प्राजक्ताला मुलगी झाली होती. विशेष म्हणजे दोघांच्याही जन्मवेळा थोड्या फार फरकाने एकच !
किर्तीने प्राजक्ताच्या आणि प्राजक्ताने किर्तीच्या बाळाचं नाव ठेवलं. रिया आणि अभिनव!
ही आनंदाची बातमी राजेशला कळवण्यासाठी केल्या गेलेल्या फोनवर किर्तीला एक वेगळीच बातमी कळली. दैवाने किर्तीच्या पारड्यात एका मुलाचं दान घातल्यावर दुसर्‍या पारड्यातुन कर्त्या पुरुषाचं दान सहज काढुन घेतलं होतं. राजेशला देव स्वतःकडे घेउन गेला खरा पण त्या धक्क्यातून किर्ती सावरू शकली नाही. आणि राजेशसोबत सार्‍याच वाटा चालण्याचे वचन घेतलेली किर्ती त्याच्याच मार्गाने निघुन गेली. अगदी काही तासातच!
राजेशने कीर्तीशी घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केलं होतं आणि म्हणूनच दोघांच्याही घरच्यांनी त्यांची साथ कायमची सोडली. वर्षभरात त्यांच्या संसारवेलीवर एक फुल उमललं खरं पण ती वेल त्याक्षणी कायमची तुटली. राजेश आणि किर्तीचं बाळ जन्माला येताचक्षणी जगात एकटं पडलं होतं.
अन दैवाने पुन्हा त्याचं रुप दाखवलं.
प्राजक्ताला पाहिला आलेल्या अमोघ-अभिलाषाचं मुल जन्मताच दागावायाचं. अनेकदा प्रयत्न करूनही फळ न मिळाल्याने त्यांनी सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या.कीर्तीची कहाणी ऐकल्या ऐकल्या अभिलाषाने तिकडे धाव घेतली. रडणार्‍या त्या जीवाला पाहून तिला भरून आलं आणि तिने त्याक्षणी त्याला छातीशी कवटाळलं ते पुन्हा कधीही दूर न करण्यासाठी !
काही क्षणांपूर्वी अनाथ झालेल्या त्या जीवाला आता नवीन नाव मिळालं होत.
"अभिनव अमोघ कुलकर्णी !"
चाळीमध्ये आता दोन जीवांचं आगमन झालं होत. रिया आणि अभीची गाठ तिथेच बांधली गेली. जन्मापासून एकत्र असणाऱ्या त्या दोन जीवांना आता कुणाचीच नजर लागणार नव्हती. अगदी दैवाचीही नाही!
________________________________________________________________

बघता बघता ९ वर्ष सरली आणि अमोघला बाहेर देशात जायची जायची संधी मिळाली. संपूर्ण चाळ आनंदून गेली होती.अभिलाषा मात्र द्विधा मनस्थितीत होती.एकीकडे नवं विश्व खुणावत होतं तर एकीकडे ही जिवाभावाची माणसं सोडून जाण्याचं दु:ख . पण जायचंच हे अमोघने ठरवून टाकलं आणि चाळी मधे लगबग सुर्रू झाली. या सोहळ्यात सगळे मग्न असताना दोन लहान जीव मात्र मुसमुसत होते.
"मी येईन गं परत"
अभी त्याच्या रियाला समजावत होता आणि अभीची रिया त्याला बिलगून हाताशपणे विनवत होती
"नको ना रे जाऊस अभी "
________________________________________________________________

कुलकर्णी कुटुंबाला भारत सोडून १० वर्ष झाले होते. यथावकाश चाळीतुन एक एक जण बाहेर पडत गेले आणि केवळ आठवणीतच राहिले.पण प्राजक्ता आणि अभिलाषाची गोष्टच निराळी होती. दोन देशातल्या अंतराने त्यांच्या नात्यात मुळीच अंतर पडलं नव्हतं. कलेकलेने वाढणाऱ्या आपल्या फुलांची खबरबात दोन्ही कुटुंब एकमेकांना देत होते. आणि ही फुल देखील एकमेकांसाठीच बनली होती जणू !.
"अभी आज की नाही मी chocolate खाल्लं " हा रियाने अभीला केलेला पहिला फोन, आणि "तुझ्यासाठी खूप सारे chocolates घेऊन येतोय गं" हा अभीने रियाला केलेला कालचा फोन आणि मधले असेच असंख्य फोनकॉल्स.... अभी-रिया च्या नात्याचं हेच तर खरं टॉनिक होत. आज रिया-अभी १० वर्षांनी भेटत होते. पण त्या भेटीमध्ये जराही नवखेपणा नव्हता. १० वर्षातला प्रत्येक क्षण ते सोबत असल्यासारखाच जगले होते.
पण आज अभीला मारलेल्या मिठीतून रियाला एका गोष्टीची जाणीव झाली.
'नुसतं बोलण्यात आणि प्रत्यक्षात अभीच्या जवळ असण्यात खूप फरक आहे. खरचं आज खूप मोठ्ठा आधार असल्यासारखा वाटतय.अभी शिवाय जगच नाही. आता अभी सोडून गेला तर मी नाहीच जगू शकणार.'
________________________________________________________________

गाडी घराजवळ पोहचत आली. आणि रियाची मगापासून चालू असलेली अखंड बडबडही थांबली. तसा अभी म्हणाला,
"रिया एक सांगायचं होत"
"बोल ना मग ठोम्ब्या permission कसली घेतोयेस??"
“मी तनुला प्रपोज केलं इथे यायच्या आधी . खरं तर ती एक formality होती म्हण ना!, तुला पण महीतीये she loves me and I knew that "
"......."
"बोल ना ग काहीतरी. अर्थातच तुझ मत खूप important आहे रिया. तू तनुला ओळखतेसच. तुला ती पसंत नसेल तर I won’t move forward "
"......."
" हे फक्त फ्लिंग वगैरे नाहीये रियू. आयेम इन लव्ह विथ हर. I am damn serious about her Riya, but your opinion matters a lot'
काय बोलावं ते न कळल्यामुळे ती फक्त डोळे विस्फारून अभीकडे पहात राहिली.

ही प्रतिक्रिया न समजल्यामुळे अभी पुर्णपणे गोंधळुन गेला होता. खरं तर त्याच्यासाठी ही प्रतिक्रिया अगदीच अनपेक्षित होती.
"रिया अग बोल ना....."
"नालायक, मुर्ख, बावळट"
अभीच वाक्य पुर्ण होण्याआधीच रियाने त्याला फटकवायला सुरुवात केली.
"दोन दिवस झाले प्रोपोज करुन आणि आज सांगतोयेस मला? लाज तरी वाटते का? आणि डायलॉग्स कुठून शिकलास इतके सारे? आता मात्र हद्द झाली हं अभी ! वर तोंड करुन मलाच म्हणे तुला पसंद नसेल तर आय वोन्ट गो फॉर इट. अरे गाढवा, तुझ्या चॉईसवर माझा पुर्ण विश्वास आहे. तू प्रेमात पडलायेस म्हणजे काही तरी स्पेशल असणारच या मुलीत.. मला कधी भेटवणारेस तिला? आणि किती रे चालू आहेस तू? तुला ती आवडते हे माहीत होतं मला पण प्रपोज वगैरे करतोयेस हे सांगितलं सुद्धा नाहीस. आता Explanation देऊ नकोस काही. मला भेटायचंय तनुला. कधी भेटवशील???"
"पुढच्या महिन्यात येतेय ती इथे. खास तुला भेटायला."
"really? मस्तच !"
"रिया"
"हं?"
"तू खुष आहेस ना?"
अभीच्या या प्रश्नावर एक सेकंद शांतता पसरली खरी पण पुढच्याच क्षणी अभीला मिठी मारुन अभीच्या रियाने उत्तर दिलं,
"नक्कीच ! तू खुष आहेस ना? मग मी पण असणारच ना? I am damn happy ! Finally You got your own world "
"That is not true honey ! you are my world & you will be forever !"
रियाने अभीला तोंड भरुन स्माईल दिली.
"रिये,पोहे खाऊ का उपिट" दिवसाच्या सुरुवातीला असले प्रश्न विचारणार्‍या अभीने आज त्याची लाईफ पार्ट्नर निवडली होती. रियाला या गोष्टीची जराही कल्पना न देता. हे खरं कारण होतं रियाच्या नाराजीचं. पण एका क्षणापुरतंच !. पुढच्या क्षणाला रियाचं मन आनंदाने भरुन गेलं होतं. रियाच्या अभीला 'त्याची' तनु मिळाली होती. अगदी त्याला हवी तशीच. आज रियापेक्षा आनंदी व्यक्ती जगात शोधुन सुद्धा सापडली नसती.
आणि अभी...
साता समुद्रापलीकडे असुन सुद्धा रिया थोडीशी जरी दुखावली गेली तरी अभीला लगेच कळायचं. आता तर ती त्याच्या समोर होती. रियाचं दुखावलेलं मन आणि त्यामागचं कारण अभीला लगेच समजलं. त्याने हे मुद्दाम केलं नसलं तरी रिया hurt झालीच होती. त्याला स्वतःचाच राग आला. एका क्षणासाठी का होईना पण नव्या नात्याने जुनं नातं दुखावलं गेलं होतं..
दोन नात्यांमधली घट्ट वीण इथेच दिसुन येते नाही? स्वतःची नाराजी विसरुन समोरच्याच्या आनंदात रममाण होणं आणि स्वतःचा आनंद विसरुन पुढच्याच्या नाराजीचा विचार करणं.... खरं प्रेम म्हणजे अजुन नेमकं काय??
रिया आणि अभी बनलेच होते एकमेकांसाठी.......

कोण म्हणतं एक मुलगा आणि एक मुलगी चांगले मित्र असु शकत नाहीत?
रिया आणि अभी होते. त्यांच्यातल्या नात्याला एकच नाव होतं. मैत्री! निखळ मैत्री ! निरागस, निर्मळ, शुद्ध, पवित्र ! म्हणाल तर ईश्वरापेक्षाही जास्त ते आपल्या मैत्रीला मानत होते. पुजत होते.
अभीसाठी रिया आणि रियासाठी अभी एक विश्व होतं. त्यांच्या या विश्वात सगळ्यांना प्रवेश होता पण कुणाच्याही येण्या-जाण्याने त्या विश्वात कधीच काहीच बदल झाला नव्हता.
.................
तनु आली. तन्वी ! अतिशय गोड ! नावाप्रमाणेच सुंदर ! परदेशात जन्मुन तिथेच वाढली तरी आचार विचाराने पुर्णपणे भारतीय ! रियावर अभीइतकंच प्रेम करणारी. त्यांच्या मैत्रीला त्यांच्या इतकंच पुजणारी.
रिया - तनू च्या नात्याचं सार्‍यांना विशेष वाटायचं, इतके दिवसात एकदाही तनूने रियाला दुखावलं नव्हतं
अभीच्या आयुष्यात इतर कोणापेक्षाही रियाला importance जास्त आहे हे तनू १० वर्षांपासुन पाहत होती. त्यामुळेच की काय तिने अभीला रियासकट स्विकारलं होतं. रियाबद्दल कुठलाही आकस न ठेवता. कुठल्याही प्रकारचा पजेसिव्हनेस नाही, जेलसी नाही. कसलं शुद्ध आणि स्वच्छ मन!!!

आणि रिया तर 'सातवे आसमानपर' होती. आधी अभीकडुन तिने तनुबद्दल बरचं काही ऐकलं होतं. पण तनुला प्रत्यक्षात भेटल्यावर तर ती अजुनच निश्चिंत झाली. 'अगदी अशीच पार्टनर मिळायला हवी होती माझ्या अभीला!'

अर्थात तनु आल्यापासुन अभी आणि रियाच्या भेटी थोड्याश्या कमीच झाल्या होत्या. त्यातही कॉलेज, क्लासेस आणि नेहमीच्या कामांमुळे अभीला १००% वेळ देणं रियाला जमत नव्हतं.तरी त्यांचे फोन चालु असायचे.

एके दिवशी अभीला सरप्राईज म्हणुन भेटायला गेलेल्या रियाला एक नविन सरप्राईज मिळालं. तनु आणि अभी कोकणात फिरायला निघाले होते. रियाच्या दृष्टीने ही फार मोठी गोष्ट नसली तरी तिला वाईट नक्कीच वाटलं.
'अभीने एकदा विचारलं सुद्धा नाही... मी गेले नसतेच पण तरीही...बदलतोय अभी..तनू मुळेच' विचारांचा भुंगा डोकं पोखरू लागला.
"रिया? अगं लक्ष कुठाय?" तनुच्या प्रश्नावर रियाची तंद्री भंगली.
"तुझी बॅग भरतेयेस ना??"
"माझी? कशाला ?"
"मग? आपण तिघंही जातोय."
"हे कधी ठरलं? तुम्ही मला काहीच सांगितल नाहीत."
"त्यात सांगण्यासारखं काय आहे?? ते तर बाय डिफॉल्ट आहे ना??? तुला सोडून आम्ही जाणं शक्य आहे का?"
रियाच्या मनात आलेल्या या विचारांची तिला त्याक्षणी लाज वाटली. तिने शरमुन अभीकडे पाहिलं. अभी फक्त तिच्याकडे मिश्किल नजरेने पाहत होता..त्या नजरेत अजुन एक भाव होता..'वेडे, मी तुला दुरावणं खरचं शक्य आहे का गं? ते ही तनू मुळे???'

रियाच्या मनातलं तनुचं स्थान कितीतरी पटीने उंचावलं गेलं होतं.!

आणि तनुला या दिवसांमध्ये एक गोष्ट खुप व्यवस्थित समजली होती - अभी-रिया आता एकमेकांशिवाय राहु शकणार नाही. आणि आता अभीचं पुन्हा घरी ला परतणं बर्‍यापैकी impossible आहे. तनूला इथे रहायला आवडत होतंच मग तिनेही पुढंचं शिक्षण घेण्यासाठी इथे यायचा निर्णय मनोमन घेऊन टाकला
________________________________________________________________

बघता बघता २ महिने निघुन गेले. तनुची परत जायची वेळ आली होती. पण ती काही महिन्यातच परतणार होती. कायमची ! तनुने तिचा निर्णय सगळ्यांना सांगितला. सगळीकडे आनंदी आनंद होता...

पण सगळं काही सुरळीत चालू असताना काहीतरी विपरीत घडण्याची तयारी चालू असते म्हणतात...

पुन्हा एकदा दैवाने खेळ खेळला... १९ वर्षात एकदाही न घडलेली गोष्ट घडली.. रिया-अभी चा अबोला !
________________________________________________________________

घरी परत येण्याआधी अभीने एका जॉबसाठी अप्लाय केलं होतं. जगातल्या नावाजलेल्या कंपनीजपैकी ती एक कंपनी होती. अभिचा काईंड ऑफ dream job ! पण रियाला त्याने या गोष्टीची अजिबात कल्पना दिली नव्हती कारण त्याला माहित होतं ती त्याला पुन्हा जाऊ देणार नाही. आणि आज अभीला अपॉईंट्मेंट ईमेल मिळालं. अभीला आता जावंचं लागणार होतं. ते ही ३ दिवसातच. त्याने निर्णय घेतला. रियाच्या मनाविरुद्ध...

पुन्हा एकदा प्रचंड मोठी ताटतुट ! पण यावेळी फक्त शरिरानेच नाही तर मनानेसुद्धा. रिया काहीही समजुन घेण्याच्या मन:स्थितीतच नव्हती.ती खुप दुखावली गेली होती, अभी जातोय म्हणून नाही तर तो आपल्यापासून सतत काही तरी लपवतोय ही गोष्ट तिला खात होती.खुप समजावुनही काही ऐकायला तयार नव्हती. कशी ऐकणार? अभीच्या जवळ असण्याची सवय झाली होती तिला. इतके वर्ष राहिली ती अभीपासुन दुर, पण आता त्या आधाराची सवय आणि गरज निर्माण झाली होती. पुन्हा त्या आधाराशिवाय जगणं? शक्यच नाही!

अभीशिवाय जग असतं हे रिया विसरुन गेली होती.अभीपासुन पुन्हा दुरावणं? त्यापेक्षा मरण परवडलं असतं तिला.
________________________________________________________________

"तू जायचं ठरवलंच असशील तर ठिकेय पण मी नाही येणार तुला भेटायला. तू पण येऊ नकोस."

१३-मार्च-२००८,

अभी पुन्हा एकदा रियाला एकटं सोडुन निघाला होता. सगळ्यांनी अभीसाठी एक फेअरवेल पार्टी आयोजित केली होती. रियाने त्या पार्टीला यायला ठाम नकार दिला होता.
"तू निघालायेस ना पुन्हा? मला सोडुन?"
"रिया २ वर्षाचीच तर गोष्ट आहे. मी लगेच पुन्हा येईन गं. Promise"
"तू मुळीच कुठलीही प्रॉमिसेस देऊ नकोस अभी आता. तू ९ वर्षापुर्वी सुद्धा प्रॉमिस तोडलंस आणि आता सुद्धा तोडतोयेस"
"रिया समजुन घे गं. खरंच हा जॉब खुप महत्त्वाचा..."
"आणि मी? मी नाहिये महत्त्वाची तुझ्यासाठी?"
"अगं पण माझ्या इथे असण्या नसण्याने आपलं नात बदलणार आहे का? की प्रेम कमी होणार आहे? तसं असतं तर...."
"काही बोलु नकोस अभी. आज मला अजिबात समजावु नकोस. मी ऐकणार नाहीये. तुला जायचंंय ना? जा तू पण मी नाही येणार तुला भेटायला आता."
"असं नको करुस गं रिया. दोनच दिवस राहिलेत आपल्याकडे. मी परवा निघतोय. आता नाही आलीस तर परत नाही भेटणार मी तुला"
"नकोच भेटुस अभी. तेच बेटर आहे"

फोन कट झाला. दोन्हीकडे दुखावलेली मने!

पुर्ण दिवस रियाची नुसती धुसफुस चालू होती. सकाळी बोलणं झाल्यावर अनपेक्षितरित्या अभीने रियाला एकही फोन केला नव्हता. रियासाठी खुप मोठ्ठा धक्का होता हा. तिनेही फोन करायचाच नाही अस ठरवलं. रियाला रडून रडून ताप भरला. संपुर्ण दिवस तिने पाताळेश्वराच्या मंदिरात बसुन काढला. कुणाशी बोलायची तिची इच्छा नव्हती. सकाळी कॉलेजला म्हणुन बाहेर पडलेल्या तिला घरीही जायची इच्छा राहिली नव्हती.कशी फेस करणार होती ती आईला?

"कुणात इतकं गुंतू नये बाळा. अभीशिवाय जग असतं, जरा पहायला शिक. इतकी सवय लावुन घेऊ नकोस की त्याच्याशिवाय श्वास घेणंही जमायचं नाही "

रियाला आईचे शब्द आठवले.

पण नाही! अभीवर विश्वास होता. "तो कधीच मला सोडुन जाणार नाही. पण आज?? एकही फोन नाही. इतका स्वार्थी झाला हा? की स्वतःच्या आनंदापुढे माझी आठवणही नाही? पण असं होणं शक्य नाही. मी चांगलीच ओळखते माझ्या अभीला. पण मग अजुन फोन कसा नाही केला याने?? काही झालं तर नसेल ना त्याला?" रिया मनातुन चरकली.
"पण त्याला काही झालं तर सगळ्यांत आधी मला सांगतील मम्मा-पप्पा...काही नाही. असले विचार करायचे नाहीत. बिझी असेल तो."
रियानी स्वतःला समजावलं पण आता मात्र ती तडक घरी निघाली.
.................
"अगं होतीस कुठे तू? मुर्ख मुली! फोन का switched off आहे तुझा सकाळपासुन? तुला फोन करुन करुन जीव जायची वेळ आली. कुठे गं जातेस अशी निघुन? कसा कॉन्टॅक्ट करायचा तुझ्याशी? नाही नाही ते विचार येत होते डोक्यात"
आई रागाने बोलता बोलता थरथर कापत होती.
रियाला आठवलं मीच तर सकाळी रागाने फोन switched off केलेला आणि उगाच अभीला शिव्या दिल्या.
"चल पटकन अभीकडे जायचयं."
"आई तू जा. मी नाही येणार."
"ऐकायला शीक जरा. पटकन आवर"
"आई एकदा सांगितल ना. मला त्रास होईल तिथे जाऊन. मी येणं खरंच तितकं गरजेचं आहे का?"
"हो ! तू येणं खुप गरजेचं आहे. अभीचा accident झालायं"
पायाखालची जमिन सरकणं काय असतं ते कळलं रियाला. कष्टाने रंगवलेलं चित्र एका क्षणात पाणी सांडुन खराब व्हावं तसं काहीसं झालं होतं.रियाच्या मेंदूने काम करणं बंद केलं होतं. तडक निघाली रिया....तिच्या अभीकडे....
पण....
"आता आली नाहीस तर मी परत भेटणार नाही रिया"
हे वाक्य अभीने खरं करुन दाखवलं होतं.रिया पोहचायच्या आधीच अभी तिला सोडुन गेला होता. पुन्हा एकदा....
पण यावेळेस खरंच कायमचा ! पुन्हा कधीही न परतण्यासाठी.!

"तू माझा श्वास आहेस रिया" रियाला ती संध्याकाळ आठवली. तनु येण्याच्या आदल्या दिवशीची संध्या़काळ. रिया अभीला चिडवत होती.
"उद्या काय बाबा कुणीतरी खूप्प महत्वाची व्यक्ती येणारेय. मग कोण विचारतयं आम्हाला!"
"तू माझा श्वास आहेस रिया. तुझ्याशिवाय एक सेकंद पण राहू शकणार नाही मी" अभीने खरं करुन दाखवलं होतं त्याचं वाक्य!

रियाला दैवाशी खेळायला आवडायचं. मी दैवालाही हरवू शकते ही घमेंड होती तिची. आज रियाला दैवाने हरवलं होतं.
त्यादिवशी तिला सावरण्याची हिम्मत अगदी देवाकडेही नव्हती. रियाच्या आयुष्यातल्या कहाणीचा अंत झाला होता.
________________________________________________________________

२०-मार्च-२०११
सकाळी फोनची रिंग वाजली. पप्पा होते.
"तनुने suicide केलयं रिया. आपण कमी पडलो."

तनूवर मानसिक परिणाम झाला होता.ती कोणालाच ओळखत नव्हती.एक शब्दही बोलत नव्हती.तिची नजर बर्‍याचदा शुन्यात असायची.इतरवेळी सतत काहीतरी शोधत रहायची.कदाचित अभीला !

रियाला अभी गेला ती संध्याकाळ आठवली. त्या दिवशी तनु शेवटचं वाक्य बोलली होती.
"रिया शेवटी तुझ्या अभीला मीच तोडलं तुझ्यापासुन. मला वाचवायला गेला तो आणि त्यालाच गाडीने धक्का दिला. मला माफ कर. मी तुझी गुन्हेगार आहे."

अभि गेल्यावर तनूने पुन्हा भारतात येऊ नये हे सगळ्यांचं मत पडलं, रिया तनुशी फोनवर रोज बोलायची.जितकं अभीशी बोलली असती तितकंच. पण तनुनी कधीच काही रिप्लाय दिला नाही. तिला माणसात आणायचा सगळ्यांनीच खुप प्रयत्न केला पण तनू खुप दुर गेली होती. रिया तिला जिवापाड जपायाची. कारण तनू हे एकच कारण होतं ज्यामुळे रियाला अभीचा आभास निर्माण होईचा.
रियासाठी आज सगळं काही संपल होतं. तनुचं प्रेम नक्कीच श्रेष्ठ ठरलं होतं. तनु आज खुप खुष असेल कारण ती आता तिच्या अभीकडे गेली होती.
रियासाठी एक खुप मोठं पर्व संपल होतं. आता अभीच्या फक्त आठवणी तिच्यासोबत असणार होत्य. आज रियाची गोष्ट पुर्णपणे संपली होती.
________________________________________________________________

१३-मार्च-२०१२
आज चार वर्ष झाली या गोष्टीला. दैवाचे खेळ आता रिया शांतपणे पाहते. तिला रिया म्हणणार्‍यांवर आता तिचं विशेष प्रेम आहे कारण त्या प्रत्येकात तिला अभी दिसतो.

आजही ती उठल्यापासुन झोपेपर्यंत सगळ्या गोष्टी अभीला सांगते. जोडल्या गेलेल्या मनांना मृत्युही तोडु शकत नाही हे मात्र अगदी खरं !

अर्थातच अभीशिवाय ही जग आहे हे शाश्वत सत्य तिने आता स्वीकारलंय पण तिचं आयुष्य बरंचसं बदललंय हे मात्र नक्की. अभीशिवाय रियाचं आयुष्य म्हणजे एक खरंतर एक तडजोड आहे - दैवाशी केलेली. पण तडजोडी शिवाय कशातच मज्जा नाही बघ रिये हा अभिचा फंडा तिलाही बर्‍यापैकी पटायला लागलाय.

अभी म्हणायचा "श्वास घेणं म्हणजे जीवन नाही तर श्वास जगणं म्हणजे जीवन."

रियाला अभीनी श्वास जगायला शिकवलं होतं..पण आता ती फक्त चालु आहे म्हणुन श्वास घेतेय श्वास जगणं तिनं सोडुन दिलंय.
रियाची सकाळ आता खळखळत्या हास्याने होतं नाही पण एक छोटंसं स्मित नेहमी तिच्या चेहर्‍यावर असतं कारण अभीचा अनमोल ठेवा आजही तिच्याजवळ आहे, अभीच्या आठवणी !
अभी जग सोडुन गेला पण रियाच्या जगातुन अभी जाणं शक्यच नाहीये. त्याचं स्थान आजही तिच्या मनात्,आयुष्यात आहे तसंच आहे.
'अढळ ! ध्रुवासारखं !'

-समाप्त.....
________________________________

"प्रिय भी,तुझ्यासाठी तुझ्या रियाकडून ही श्रद्धांजली. मला माहित आहे श्रद्धांजली या शब्दाचं तुला नेहमी विशेष वाटायचं. श्रद्धांजली हा कसला शब्द आहे? जीवलग लोकांवर प्रेम असतं, श्रद्धा काय...! हो ना? पण तुझ्या जाण्यानंतर मला कळलं की ते प्रेम हीच श्रद्धा असते. तू जवळच आहेस ही श्रद्धा, तू मला पहातोयेस ही श्रद्धा ! तू आजही माझाच आहेस ही श्रद्धा! हो श्रद्धाच ! विश्वास आणि श्रद्धेमध्ये काय फरक आहे अस विचारलं होतस ना मला? तेंव्हा उत्तर माहित नव्हतं पण आज कळालं, विश्वास कशावरही असु शकतो पण श्रद्धाही फक्त पवित्र गोष्टींबद्दलच असते.आपलं प्रेम,नातं आणि मैत्री तितकीच पवित्र आहे.!

आज मी एकटी नाहीये, तुझ्या आवडीचा पाऊस आहे सोबतीला, आणि हातात तुझ्या आवडीचा चहा आणि मागे लॅपटॉप वर माझं आवडतं गाणं लागलंय -

कहनेको साथ अपने एक दुनिया चलती है
पर छुपके इस दिल मे तनहाई पलती है
तेरी याद साथ है !

Miss you so much !"
-तुझीच रिया

________________________________
(ही कथा माझ्या मनाच्या खुप जवळची आहे. त्यामुळे सत्य की काल्पनिक त्याने फारसा फरक पडत नाही.)

- पुनर्प्रकाशित...!

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle