शतशब्दकथा - निकाल

मैत्रीणवर एवढ्यात बर्‍याच एक से एक शतशब्दकथा वाचल्या. त्यावरून मी पूर्वी लिहिलेल्या या २ कथा आठवल्या. मिपावर शशक स्पर्धा झाली होती त्यात दुसर्‍या फेरीत पहिल्या कथेचा उत्तरार्ध/सिक्वेल लिहायचा होता. इथे दोन्ही भाग एकत्र केलेत.

निकाल

दहावीचा निकाल लागला. सगळीकडून कौतुक झालं. आमची एकच खोली, आईबापांचे हातावरचे पोट, पण बाईंनी कॉलेजची फी भरली. अशातच मामा आले घरी. "कुठे शिकवताय पोरीला, मी मुलगा बघितलाय, हुंड्याशिवाय लग्न होईल." मामा पैसावाले. बैठका झाल्या, लग्न पण लागले. तिकडे दिवसभर शेतात काम अन रात्रीचा मार. कामाचे काही नाही, परीक्षेत पण हंडे भरून आणायची सवय होती, पण तिकडे गुरासारखे राबवायचे. जीव नकोसा झालेला. मामाची पोरगी कॉप्या करून दवाखान्यात सिस्टर. अन मला धाडले नरकात. रोजच्या रडायचा पण वैताग आला एक दिवस अन ठरवलं. याचा निकाल लावायचाच. आता मागे फिरायचं नाही. निघाले तशीच. मंगळसूत्र मोडले. अन पळून आले इकडे बाईंच्या संस्थेत. उद्यापासून कॉलेज सुरु.

निकाल - उत्तरार्ध

शेवटची सही करताना बघता बघता मन भूतकाळात गेले. सासरच्या त्रासाला कंटाळून परत आल्यावर मामांनी केलेले भांडण, समाजातली खोटीनाटी बदनामी, एकटी बघून लोकांनी घेतलेला गैरफायदा, कधीतरी सोबतच्या श्रीमंत मैत्रिणींचा वाटलेला हेवा, पण नशीबाने लाभलेले कायम पाठबळ देणारे मार्गदर्शक, कापड दुकानात काम करत संस्थेच्या वसतीगृहात राहून कष्टाने पूर्ण केलेले शिक्षण, काळा कोर्ट चढवून कोर्टात आले तो दिवस…
आणि आज समोर होती सुनीता, डोळ्यात तीच चमक, अंगावर माराच्या त्याच खुणा. हुंड्यासाठी हिला जाळायला निघाले होते. पण पठ्ठीने पुराव्यानिशी खेचून आणले कोर्टात. इतक्या वर्षात काय बदलले असा प्रश्न पडतो कधीतरी, पण हेच बदलण्यात माझा खारीचा वाटा. आज न्यायाधीश म्हणून निकाल दिलेली ही पहिली केस.

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle