आणि पाऊस..

झोपेतून जागी होत असताना अजून तिचे डोळेही उघडले नव्हते , पण खिडकीवर टपटप आवाज ऐकला आणि उबदार पांघरुणातून उठलीच ती . तो आला होता , भेटायला , किती दिवसांनी . तिचा पाऊस ! आणि तिला त्याने साद घातली होती , त्याच्या पद्धतीनी . तिला सगळ्या त्याच्या पद्धती माहित होत्या . टपटप , रिपरिप टपक-टापक, धो-धो , टाप -टप् , तिचा लाडकाच ना तो. मग खिडकीत त्यांची गाठभेट आणि त्याच्या अजूनच उनाडक्या , अजूनच टापुर -टुपूर , ‘वेडा कुठला’ म्हणाली ती , पण तिथेच उभी राहिली . तोही जरा मग शहाणपणाची चादर पांघरलेल्या यड्यासारखा , तिला दाखवण्यासाठी म्हणून जरासा शांत झाला.

तिची नजर मात्र झिम्माड खेळणाऱ्या त्याच्याकडे. झाडा-पानांशी याची मस्ती चाललेली . कुठे हिरव्यागार पानावर अलगद पडून हळूच हिरवा रंग घे , मातीत रुजताना करडा रंग घे , पोपटाच्या पाठीवर हुप्प बसून पोपटी येडा , पांढऱ्या फुलावर चमकणारा श्वेतू बाबू . कसं रे जमतं असं तुला ? किती तू असा स्वतःचा नसलेला . दो घडीचा संसार मांडणार आणि मग इथे -तिथे नाचून परत मातीत विलीन . कि इतका स्वतःचाच असतोस की चारदोन क्षण दुसऱ्याचं प्रतिबिंब सामावून , स्वतः दुसऱ्यांच्या रूपाचा भूल भुलैय्या बनूनही , स्वतःतच इतका गोळीबंद , घट्ट की पुन्हा तू – तूच होतोस , असतोस. तू असा की तू तसा ? पण एक खरं , तू वेडा . का कोण जाणे डोळ्यात पाणी आलं तिच्या . वेडी माणसंच खरी शहाणी असतात हेच खरं .

डोळे पुसले आणि अजून तिसऱ्या त्यांच्या दोस्ताची आठवण आली तिला .पाऊस आहे , मी आहे , मग चहा नको का ? गॅस वर ठेवलेल्या पाण्याचं नर्तन सुरु असताना ह्याचाही बाहेर गोंधळ. स्वयंपाकघराच्या खिडकीतून होतं लक्ष तिचं . चहा घेऊन आली मग ती , मस्त थंडगार गॅलरीत . तिची आवडती जागा. म्हटलं तर घरात म्हटलं तर बाहेर . चौकट जपणाऱ्या तिच्यासारखीची ती आवडती जागा. मग मात्र हा घनगंभीर होऊन बरसायला लागला .

घन घन बरसे
बिजुरी चमके

वेगळाच वाटला तिला मग तो . अशा वेळी बोलायचं नसतं . स्वतःशी सुद्धा . हे त्यांचं ठरलं होतं .आणि तिला जमलं होतं. बस मग ते क्षण पीत बसायचं असतं फक्त .. पुढच्या नांदत्या सौख्य क्षणांसाठी काही काळ स्वतःला विन्मुख बसता आलं पाहिजे . तिला जमलं होतं ते , त्यानेच शिकवलं होतं .

बरंच शिकवलं होतं त्याने . सुंदर मोकळं कसं व्हायचं , आतून बाहेरून स्वच्छ न्हाऊन कसं निघायचं , वेडं कसं बनायचं , वेड कसं लावायचं . थोडा वेळ बरसून संपायचं कसं. असं सगळं.
सगळ्यात कठीण म्हणजे तो जातो ती वेळ . निरोपाची . चकवा आहे मुलखाचा . तो जातो पण असतोही . म्हणजे तो नसतो पण त्याच्या खाणाखुणा असतात आणि त्यांत लपलेला तो असतो . वेडा कुठला . बाहेर त्याचा रौरव, टीप टीप संपली कि हिच्या डोळ्यात टीप टीप सुरु .

कसं जमतं रे तुला असं इतकं गाजवून नंतर स्वतःला लपवणं आणि मग संपल्यासारखं भासवणं ? कि खरंच संपतोसच तू?

आपलं बरसण्याचं काम झालं कि कसा गुडुप्प होतोस गवतात , फुलापानांत . नामानिराळा . इतकं खोलवर मनात भिडून मग तरीही तू अलिप्तंच , इतकी अलिप्तता !!
मला मात्र लिंपून ठेवतोस , तुझ्या वेढ्यात, तुझ्या तिढ्यात . अश्या पावसात प्रियकराची आठवण येते म्हणतात , पण दस्तुरखुद्द तू सामोरा असताना माझा पाय तर या साजणाच्याच वेढ्यातून निघता निघत नाही . तुला पार करून मला स्वतःलाच जिथे भेटणं मुश्किल तिथे कुठला आणिक प्रियकर अन काय .
असा वेढा तुझा मला , आतून बाहेरून . असा वेढतोस तू !! येडूच !! गंभीरतेचं , रौरवाच , शांततेच सोंग घेऊन मला फिरवून आणतोस ह्या सगळ्यातून . मलाच बनवतोस ‘येडू’ .
हा खेळ तुझा , वाईट्ट आहेस झालं .

पुन्हा कधी येणारेस ?

~ देवयानी गोडसे

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle