हवाई - भाग २ - पूर्वतयारी आणि प्रयाण

तर, हवाईच्या सगळ्यात मोठ्या आयलंडवर म्हणजेच बिग आयलंडवर जायचे ठरले, तिकीटे बुक झाली, हॉटेलही बुक झाले. आता तिथल्या ८ दिवसांच्या प्लॅनिंगची जबाबदारी माझ्यावर होती. 'tripadvisor' या साईटवर 'things to do in Big Island Hawaii' असा सर्च टाकला आणि माहितीचे भांडारच उघडले माझ्यासमोर. पहिल्या दिवशी नुसतंच दडपुन जाऊन सर्च विंडो बंद केली आणि हॉटेलला फोन केला.

आमचे हॉटेल वायकोलोआ (Waikoloa) या 'कोना' एअरपोर्टजवळील भागात होते. बिग आयलँडला 'हिलो' एअरपोर्टवर उतरले तरी चालते. आम्हाला 'कोना' पर्यंत डायरेक्ट फ्लाईट मिळाल्याने आम्ही तो ऑप्शन निवडला. concierge ला फोनवर विचारले की काय काय करता येईल ८ दिवसांत? तो म्हणे, काही काळजी करु नका, आम्ही रोज सकाळी सगळ्यांंना ओरिएंटेशन देतो. ते अटेंड करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित प्लॅन करता येईल. मनात म्हंटले, ओरिएंटेशन्सच ऐकायची तर हवाईला कशाला जायचे ते? बसतो ऑफिसातच कीबोर्डला चिकटुन. त्याला समजावले, बाबारे ओरिएंटेशन आम्ही अटेंड करुच पण मला काहीतरी सांग की तुमच्या आयलंडवर नक्की काय काय आहे. मग त्याने ५/६ ठिकाणांची जुजबी माहिती देऊन एक मॅप पाठवला मला, जो समजायला अतिशय सोप्पा होता आणि मला व्यवस्थित आयडिया आली की आयलँडवर नेमके कुठे काय आहे.हा मॅप नेटवर मलातरी सापडला नाही. नेटवरील मॅप असा आहे:(सोप्पाच वाटतोय आता जाऊन आल्यमुळे Heehee )

download.jpg

आता काम सोपे झाले, ट्रीपअ‍ॅडवायझर सर्च करुन आता सगळी ठिकाणे मॅपवर पहायला सुरुवात केली. बिग आयलंडचे वैशिष्ट्य म्हणजे इथे मैला मैलांवर भुभाग आणि तापमान, हवामान बदलते. आमचे हॉटेल जे 'कोहाला कोस्ट' अंतर्गत येते तेथे काही मैल अगदी गरम तापमान (७०-८५ फॅ) आणि 'नॉर्थ कोहाला' (जे एक तासाच्या ड्राइव्हवर आहे) किंवा 'हिलो' (जे २ तासांच्या ड्राइव्हवर आहे) तेथे गेलो की रेनफॉरेस्ट एरिआ आणि (५५-६० फॅ) तापमान. समुद्रही मैलामैलाला बदलतो, म्हणजे वाळूचा रंग, पोत, लाटांच्या लयी वगैरे.

बिग आयलंड हा प्रामुख्याने ज्वालामुखीचा प्रदेश आहे. गेले काही वर्षांत ज्वालामुखीने घातलेल्या तांडवाने अनेक ठीकाणी भुभाग करपलेला आहे, जो मॅपवरही स्पष्ट दिसत होता. आम्ही जवळुन काढलेल्या भुभागाचा फोटो:

DSC_0615.JPG

बिग आयलंडवरील 'हवाई वॉल्कॅनोज नॅशनल पार्क' फार प्रसिद्ध आहे आणि तेथे दोन अ‍ॅक्टिव ज्वालामुखींचा उद्रेक चालु आहे असे नेटवर वाचले. मुलाला ते वाचुन एकाएकी हवाई हे जगातले बेस्ट डेस्टीनेशन वाटू लागले. मग काही दिवस फक्त भरपुर वाचन केले नेटवर. ईतके वाचले ईतके वाचले की येता जाता, 'बिजली गिराने मै हु आयी' हे गात हुंदडु लागले. मुलगाही 'हवाहवाई हवाहवाई' असे बागडु लागला. घरात नवीनच आलेला बोकाही शेपटी फेंदारुन इकडे तिकडे दुडकु लागला. ज्या घरात पडशील तिथल्या चालीरीती नीट आत्मसात कर असा कानमंत्र दिला असावा त्याला कुणीतरी. नवरा एकदम न्युट्रल. प्लॅनिंगची जबाबदारी नव्हती ना डोक्यावर त्याच्या. म्हणजे काही फिसकटले प्लॅनिंगमध्ये की बोट दाखवायला मी होतेच की.

खालील ठिकाणे मी 'मस्ट विझिट' या यादीत घातली: (याच ठिकाणांचे सेपरेट भाग करुन भरपुर माहिती आणि फोटो टाकेन).

१. रेन्बो फॉल्स (ईथे धबधब्यात कायम इंद्रधनुष्य दिसते).
IMG_4170.JPG

२. वापिऑ वॅली (Waipi'o Valley). तेथे लोकं वेगळाच उच्चार करायचे. मनात आम्हाला अडाणी म्हणत असावेत.
IMG_4171.JPG

3. ब्लॅक सँड बीच (ईथे मोठी मोठी पाणकासवे दिसतात). कासवांचे फोटो नंतर.
DSC_0924.JPG

४. 'हवाई वॉल्कॅनोज नॅशनल पार्क' - सध्या हा फोटो चालवुन घ्या.
IMG_4172.JPG

५. 'हवाई ट्रॉपिकल बोटॅनिकल गार्डन' -
IMG_3373_0.jpg

६. मॅजिक सँड बीच. स्नोर्केलिंग साठी.
IMG_4182.JPG

७. उमामा फॉल्स. येथे फार मोठ्या अंतराच्या झिपलाइन्स आहेत ज्या धबधब्यावरुन जातात. आणि धबधब्यात खेळताही येते.
DSC_0837.JPG

बाकी वेळ मिळेल तशी इतर ठिकाणे करायचे ठरवले, जसे की, 'kau Coffee Mill', 'Miloli'i Beach' (हाही स्नॉर्केलिंगसाठी उत्तम आहे), 'Hawi Village' आणि 'कोना' येथील शॉपिंग सेंटर. आमच्या हॉटेलचा बीचही संथ आणि नितळ असल्याचे समजल्याने तेथेही 'कायाकिंग', 'पेडल बोट्स' वगैरे करायचे होते.

आता ट्रीपसाठी खरेदी सुरु केली. खंडीभर समरवेअर असुनही कपडे, बीचवेअर, फुटवेअर, स्नॉर्केलिंग गिअर घेतले. ट्रीपच्या आठवडाभर आधीच बॅग्ज भरायला घेतल्या आणि सगळी खरेदी आत जाऊन बसली. मग दररोज आठवेल तशी भर घालत गेलो. औषधं, टिकाऊ स्नॅक्स, टॉयलेट्रीज, मेकअप, रोजचे कपडे. मुलासाठी ८ दिवसांचे ८ सेट्स बनवुन ठेवले. नाहीतर ऐनवेळी तो कशावरही काहीही घालतो आणि लाज आणतो.

या सगळ्यांत बोक्यानेही फार छळले. खाली बसुन बॅगा भराव्यात तर तो मांडीवर फतकल मारुन बसे. झाले, १० मिनिटांत पायाला रग लागायचीच. उभे राहुन बॅगा भराव्यात तर तो बॅगेत घुसे. तिघांच्या ६ बॅग्जपैकी एकातरी बॅगेत तो रोज घुसायचाच आणि सगळा डोंगर उकरुन आत बसायचा.ढिम्म हलायचा नाही. त्याने पहिल्यांदा हे केले तेव्हा आम्हाला कळालेच नाही की तो बॅगेत आहे. आम्ही घरभर शोधले त्याला. हाका मारल्या. हाकेला ओ देईल तर शप्पथ. एरवी उगा म्याव म्याव करुन घर डोक्यावर घेतो. आम्ही घाबरलो की चुकुन दार तर उघडे ठेवले नव्हते ना, पळुन तर गेला नसेल ना. फ्रीजच्या मागे, कॅबिनेट्समध्ये, फर्निचरखाली इथे तिथे वाकुन आमचे सहपरिवार योगा सेशन झाले तरी सापडेना. मग त्याची फुडबॅग जोरजोरात वाजवल्यावर तो टुणकन उडी मारुन बॅगेच्या बाहेर आला आणि मुलाला दिसला.

एकीकडे बोक्यासाठी सिटर शोधणेही चालु होते. त्याच्यासाठी कुठले लाइट्स, पंखे चालु ठेवायचे, रोज किती खायला द्यायचे, काय खेळ खेळायचे. लपला तर कुठे, कसे शोधायचे हे ट्रेनिंग सिटरला दिले. कॅमेरे दाखवले आणि ते चालु असतील हेही संगितले. नाहीतर उगीच गोंधळ. आमचे जुने घर नुकतेच विकले तेव्हा घर बघायला अनोळखी लोक येतील म्हणुन कॅमेरे लावलेले आणि काय काय पहावे लागले फुटेजमध्ये! आणि असे काही छुपे कॅमेरे नाहीत, चांगले ठळक दिसतील अशा ठिकाणी लावल्येत तरी काही लोकांना पाचपोच नसतो म्हणुन सिटरला आधीच सावध केले. शेजारीपाजारी आम्ही ८/१० दिवस नसु असे कळवुन ठेवले. मुलाने तसा गावभर बँड वाजवलाच होता. पण विश्वासु एकादोघांकडे चाव्या दिल्या. इमर्जन्सी काँटॅक्ट्स दिले.

आदल्या रात्री फ्रीज नीट रिकामा केला, बॅगेत आलं आणि बडीशेप भरली. या दोन गोष्टींशिवाय मी कुठेही राहु शकत नाही. अगदी हवाईलाही. सकाळी बोक्याचे जास्तंच लाड केले आणि एअरपोर्टकडे निघालो. त्याला मात्र आम्ही नेहमीच्या शाळा,ऑफिसलाच चाललोय असे वाटल्याने त्याने आमच्य इमोशनल अत्याचारांपासुन स्वतःची सुटका करुन घेत सोफ्यावर अंग टाकले. मी बरोबर पोहे बनवुन घेतलेले. मला कुठेही जाताना आता घरचे जेवण मिळणार नाही म्हणुन दु:ख होते. मग मी असे काहीतरी बनवुन घेऊन निघते. तेवढेच दु:ख कमी होते. मुलगा आणि नवरा जंकी असल्यामुळे घरचे खावे लागणार नाही याचा त्यांना कोण आनंद झालेला असतो. त्यांनी सिक्युरिटी क्लिअरंस होताच, कुकीज, बर्गर्स, नुडल्स असे काय काय चरायला सुरुवात केलेली. माझे पोहे मी विमानाच्या गेटवर जाऊनच संपवले.

हवाईला जाताना लोकं गळ्यात चाफ्याच्या, ऑर्किड्सच्या माळा (Lei) घालतात असे एका सिनेमात पाहिले होते. मलाही तसे करायचे होते पण आमच्या गेटवर कुणी तसले काही विकत नव्हतेच मेले. नवर्‍याला विचारले तर तो म्हणे 'अग वेडे(म्हणजे मनात अग बावळटे),हवाईला उतरल्यावर मिळतात त्या माळा'. त्याने पाहिलेल्या सिनेमात तस्सेच होते. थोडीशी खट्टु होऊन विमानात बसले. बाहेरची थंडी पाहुन आपण १० तासांत एकदम सुंदर हवामानात असु या गोष्टीचे फार सुख वाटत होते.

हवाई- भाग १ - बीज आणि ठिणग्या: https://www.maitrin.com/node/3308

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle