हवाई - भाग ३ - आगमन आणि 'फॉल्स'

हवाईचे 'कोना' एअरपोर्ट अगदी छोटेसे आहे. एकावेळी एकच विमान लँड होत असल्याने फार कमी वर्दळ होती. १५व्या मिनिटाला सामान घेऊन आम्ही एअरपोर्टच्या बाहेर होतो. अंगातले जॅकेट्स, स्वेटर्स काढुन मोकळा श्वास घेतला. काय सुंदर, उबदार हवा होती. बाहेर भरपुर चाफ्याची, बोगनवेल आणि इतर फुलांची झाडे होती. मोठी नारळाची झाडे आणि पाम ट्रीज वगैरे तत्सम प्रकारही होते. आपण खरंच हवाईला पोचलोय हे स्वतःला सांगितले. एका झाडाखाली पडलेले चाफ्याचे फुल उचललेच न राहावुन.

रेंटल कार जेथुन घेणार होतो त्यांची शटल एअरपोर्टवर आली, त्यात बसलो. आम्ही 'एसयुव्ही' बुक केलेली पण ऐनवेळी तेथल्या मॅनेजरच्या काय मनात आले कोण जाणे, तो आम्हाला म्हणाला 'मस्टँग' घेऊन जा. मुलाला कन्वर्टिबल्स फार आवडतात त्यामुळे तो आनंदाने नाचु लागला. मला बुटक्या स्पोर्ट्स गाड्या बिलकुल आवडत नाहीत. हॅमकमध्ये बसल्यासारखे विचित्र पॉश्चर होते त्यात (असे मला वाटते). पण मुलाच्या आनंदावर विरजण नको म्हणुन मस्टँग घेउन निघालो. रस्त्याच्या एका बाजुला निळाशार पॅसिफिक महासागर आणि दुसर्या बाजुला काळाकुट्ट थंड लाव्हा पसरलेला भुभाग. वर हलकेसे ऊन, धुके आणि अगदी खालपर्यंत आलेले ढग या सगळ्यांच्या एकत्रित अस्तित्वाने अगदी गुढ प्रदेशात आल्यासारखे वाटत होते. वाटेत एका ठिकाणी गाडी थांबवुन काही फोटो काढले:

IMG_4176.JPG

करपलेल्या जमिनीतुनही जिद्दीने वर आलेली झुडपे:
DSC_0918.JPG

हॉटेलचे पहिले दर्शनही अगदी प्रेमात पाडण्यासारखे होते. उंच ताडमाड झाडे, झावळ्यांनी शाकारलेली तंबुवजा घरे, शंखशिंपल्यांच्या माळा घालुन अर्ध्या कपड्यांत फिरणारे आबालववृद्ध! अगदी मस्तं वाटले. चेक इन करेतो सुर्यास्त होत आलेला. मग लॉबीतच सुर्यास्त पहात पहात 'Mai Tai' रिचवले.(The Mai Tai is a cocktail based on rum, Curaçao liqueur, orgeat syrup, and lime juice, associated with Polynesian-style settings). हवाईला सर्वात प्रथम आगमन केलेले लोक Polynesian होते.

IMG_3459.JPG

DSC_0883.JPG

कुणीतरी येऊन आमच्या गळ्यात ऑर्किड्सच्या माळा घालुन आमचे स्वागत केले आणी मी 'याचसाठी केला होता अट्टाहास' अशी भरुन पावले. वर रुमवर पोचलो आणि आधी बाल्कनीत जाऊन व्यु चेक केला. अर्धा समुद्र आणि अर्धे हॉटेल दिसत होते. खाली तीन स्विमिंग पुल्स दिसत होते. मुलाचा चेहरा प्रचंड खुलला. खुलणारच! हवाईला येऊन कौतुक कसले तर हॉटेलच्या स्विमिंग पुलचे. जाऊ का मॉम, जाऊ का मॉम असा प्रश्न आता दर ५ मिनिटाने येणार हे अनुभवाने माहिती झालेलेच. नवरयाकडे पाहिले तर तो रिमोट्सची बटणे दाबत टीव्ही चालु करण्यात रमलेला. याला कुठेही जा, टीव्ही लागतो. मग जरा विचार केला आणि दोघांनाही कटवायचा प्लॅन केला. नवरयाला सुचवले की तु याला पुलवर नेऊन आण, तो पर्यंत मी सामान लावते. किंवा मी जाते, तु सामान लाव. अपेक्षेप्रमाणेच त्याने डुंबायचा ऑप्शन स्वीकारला. मग मी मस्त फ्रेश होऊन कपडे, शुज, इलेक्ट्रॉनिक्स, खाऊपिऊ नीट लावले. जोडीला समुद्राच्या लाटांचा आवाज आणि संध्याकाळी घरी परतलेल्या पक्ष्यांचा कलकलाट होताच.

तासाभराने पोटात कावळे कोकलायला लागले. टाईम झोन वेगळा असल्याने आमची खरेतर झोपायची वेळ झाली होती. थकवा जाणवत होता. तरीही जवळच्या एका रेस्टॉमध्ये गेलो. दिवसभर बरेच जंक झालेले असल्याने 'थाई करी, भात आणि फळे' खाल्ली. जेवताजेवता बोका काय करतोय हे पहावे म्हणुन अ‍ॅप उघडले. त्याची सिटर येऊन गेलेली नुकतीच. त्यामुळे भुकेला नसला तरी अस्वस्थ वाटत होता. वर खाली फिरुन सर्व खोल्यांतुन शोधत होता आम्हाला. वाईट वाटले आणि एका जवळच राहणारया मित्राला फोन केला. तो टीव्ही पहात होता. त्याला म्हंटले जे काही पाहतोयस ते आमच्या घरी जाऊन पहा प्लीज. आता येथे ही काळोख पडत होता. दुसरया दिवशी भटकंती चालु करायची असल्याने लवकर झोपलो.

तर, आजचा दिवस होता रेनबो फॉल्सचा. Concierge ने सुचवले की तेथपर्यंत जाताच आहात तर जवळच 'Akaka Falls State Park' आहे तेही पहा. आमच्या हॉटेलातच नाश्ता केला आणि निघालो. नाश्त्याला नेहमीचेच अमेरिकन ब्रे.फा आयटम्स होते पण मला आवडली ती त्यांची अतिशय फ्रेश चवीची सुप्स आणि ब्रेडचे गोडतिखट प्रकार.

रेनबो फॉल्सची ड्राइव्ह तासाभराची होती. आमच्या हॉटेलवरुन तेथे पोचायला 'ब्लॅक सॅडल रोड'च जातो. अतिशय सुंदर ड्राइव्ह. सुरुवात केली तेव्हा गरम तापमान होते आणि लाव्हा सुकलेली जमीन होती. साधारण ४५ मिनिटांनंतर मात्र आम्ही धुक्यांत अणि ढगांत शिरलो आणि तापमान १०/१५ फॅ खाली गेले. कोरडी जमीन मागे पडली आणि हिरवीगार झाडी दुतर्फा लागली. अधुनमधुन टुमदार घरे आणि शाकारलेल्या बागाही दिसु लागल्या. १५ मिनिटे ती हिरवळ, रंगीत फुले, फळझाडे डोळ्यांत साठवुन रेनबो फॉल्सला पोचलो.

मॉम, खरंच रेनबो दिसेल का या मुलाच्य प्रश्नावर मी हो, बहुतेक, असेच उत्तर देत होते. धबधब्याच्या कठड्यावर पोचलो आणि फेसाळ, शुभ्र अशा झोकावणारया पाण्यात खरंच इंद्रधनुष्य दिसले. फोटोत नीट पकडू नाही शकले पण तरीही देतेय फोटो. बराच वेळ स्तब्धपणे ते दृष्य मनात साठवत घेत उभे राहिले. मग आजुबाजुचा परिसर फिरुन पाहिला. अगदी कैक हजारो वर्ष जुने वृक्ष होते तेथे. जाडजुड पारंब्या आणि भरदिवसाही मिट्ट काळोख होईल अशी त्यांची सावली.

IMG_4250.JPG

IMG_4253.JPG

IMG_4255.JPG

IMG_4254.JPG

तेथुन पाय निघेना पण मग इतर ठिकाणेही पहायची म्हणुन निघालो आणि 'अकाका' फॉल्सच्या रस्त्याला लागलो. वाटेत हा स्टॉल दिसला आणि थांबलोच.
IMG_4256.JPG

ताजं ताजं शहाळंपाणी, अननस, पपई, पेरु, ऊस असं तुडुंब पोट भरेस्तोवर खाल्लं. इतकी गोड अननसं मी आयुष्यात पहिल्यांदाच खाल्ली. अगदी मधुर आणि रसाळ. जराही डोळे मिचमिचले नाहीत खाताना की दात आंबले नाहीत. शहाळंही प्रचंड मोठं आणि अगदी गोड पाणी, मलईवालं होतं. मी आठही दिवस जेथे मिळेल तेथे अननस खाल्ले. एकतर हे माझे आवडते फळ आहे आणि म्हंटले इतके गोड अननस परत हवाईला आल्याशिवाय मिळणार नाही.

अकाका फॉल्सला थोडे चालावे लागते पण रेनफॉरेस्ट एरिआ असल्याने अतिशय सुखद वाटते त्या पायवाटेने जाताना. धबधब्याचे दर्शन तर निव्वळ अप्रतिम. धबधब्याचा 'सोलो' मिळाला नाही त्यामुळे हाच चालवुन घ्या. उंचीवरुन पडणारा धबधबा तसाही कॅमेराच्या छोट्या लेन्समध्ये पुर्ण मावत नव्हता.
IMG_4257.JPG

एव्हाना दुपारची जेवायची वेळ झाली होती. तेथुन निघताच मेन रस्त्याला लागताच जे रेस्टॉ दिसले तेथे जेवलो. हवाईचे प्रसिद्द जेवण म्हणजे, 'Luau Pig' (जमिनीत एक खडा करुन त्यात जाळ करुन, गरम दगड मांडले जातात आणि त्यावर मांस शिजवले जाते). आम्ही पोर्क खात नसल्यामुळे हे चाखता आले नाही पण इतर पदार्थ चांगले होते.

जवळचे ऊमामा फॉल्सही आजच करुन घेऊया असा विचार मनात आला आणि तेथे फोन करुन झिपलाइन्स चालु आहेत का विचारले. तेथे पोचल्यावर मुलाचे वजन पुरेसे नसल्याने त्याला झिपलाइन करता येणार नाही असे समजले. मग सगळेच चालतच फिरलो. हा परिसरही अतिशय देखणा आहे.

IMG_4252.JPG

ट्रॉपिकल गार्डन आणि रिवर वॉक अतिशय सुंदर आहे. आजुबाजुला घनदाट, ओली झाडी, भरदिवसा पडलेला काळोख आणि नीरव शांतता. असेच चालत रहावे आणि ही वाट कधीच संपु नये असे वाटत होते. अगदी शांत परिसर. फक्त धबधब्याचाच काय तो आवाज. मध्येमध्ये क्वचित पक्ष्यांचे गुंजन. हवाईचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सरपटणारे प्राणी नाहीत. इथली इकोसिस्टिम पुरातन काळापासुनच अशी आहे की येथे फक्त निरुपद्रवी प्राणी, पक्षीच राहतात. जंगली प्राणी, माकडे, हरणे, ससे, साप, मगरी, घुबड इत्यादि जमातीच येथे नाहीत. येथे जे पाणी, पक्षी आढळतात त्यांना काहीच 'डिफेंस मेकॅनिझम' नाही. म्हणजे की नखं, काटे, विष वगैरे. अगदी नंदनवनच म्हणा की. हवाईत मध्यंतरी बेकायदेशीर रितीने साप आणण्याचे प्रयत्न काही संघटनांनी केले तेव्हापासुन एअरपोर्टवर अगदी कसुन तपासणी चालते. कुठलीही फुले, फळे, धान्य, खाद्यपदार्थ नेण्या, आणण्याचे कडक नियम आहेत. मी परत येताना चाफा घेऊन आलेय ( पिवळा आणि लाल). बघु कसा तरतो ते आमच्या थंड हवेत  106
IMG_4251.JPG

एव्हाना हॉटेलला परत चला अशी मुलाची भुणभुण सुरु झालेली. मोटीवेशन अर्थातच स्विमींग पुल. काळोखही पडु लागलेला. दीड तासांत हॉटेलवर पोचलो. तेथे हवाईअन कलचरल प्रोग्रॅम सुरु होता. तो थोडावेळ पाहिला. सोबतीला अर्थातच 'mai tai'. बार्बेक्युही होता. थोडं चरलो आणि समुद्रावर फिरुन आलो. उद्याच्या दिवसाचे प्लॅनिंग केले. उद्या संपुर्ण दिवस 'वॉल्कॅनोज नॅशनल पार्क' ला डेडिकेटेड असणार होता.

हवाई - भाग २ - पुर्वतयारी आणि प्रयाणः https://www.maitrin.com/node/3314

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle