वेडींग ड्रेस - 2

"कदाचित एवढे दिवस या वेडिंग प्लॅनिंगच्या जास्तीच्या भारामुळे मुळे मी थकलेय. मला आरामाची गरज आहे" या विचारावर शिक्कामोर्तब करत क्रिस्टन तिच्या बेडरूम मध्ये गेली. मोबाईल सायलेंट करणार तेवढ्यात आठवलं डॅनियल किंवा जेसीकाचा कॉल येऊ शकतो, म्हणून तो विचार तिने डाववला. कानात इयरफोन्स अडकवले. प्लेलिस्ट शफल केली, खिडकीचे दार आणि पडदे ओढत खोलीत अंधार केला, केसांची पोनी सैल केली आणि तिच्या मऊसूत बेडवर आडवी झाली.
अगदी पाच मिनिटात गाण्यांनी तिच्या मेंदूशी सूर जुळवले आणि तिचा डोळा लागला.
..........

दुतर्फा दाट हिरव्यागार झाडीतून जाणारा अरुंद, काही ठिकाणी सपाट, काही ठिकाणी खाचखळगे असणारा रस्ता.... लाकडी गेट आणि मेलबॉक्स ...आत शिरल्यावर, छोटासा पण टुमदार बंगला.... प्रशस्त हॉल.. त्याच्या मुख्य दारातून प्रवेश करताच समोरच्या भिंतीवर फुलीच्या आकारात अडकवलेल्या तलवारी... जवळच तशीच अडकवलेली एक रायफल.. डावीकडच्या भिंतीवर काळविटाचे प्रिसर्व्ह केलेले भेसूर डोळ्यांचे मुंडके... उजवीकडे स्टडी रूम मध्ये घेऊन जाणारे दार, रूम मध्ये प्रवेश करताच समोरच्या भिंतीत छताला लागणारे काचेचे कपाट, त्यात ठेवलेली जाडजूड पुस्तके....कपाटापासून थोडेसे अंतर सोडून मांडलेला भला मोठा आयताकृती टेबल, त्यावर एक मोठासा, पिवळट ,जूनकट, नकाशा.... टेबल च्या एका बाजूला अंगात लाल सोनेरी युनिफॉर्म घातलेला, कम्बरेला पट्टा आणि पिस्टल होल्डर, त्यातून डोकावणारी पिस्तूलाची मूठ...गोरापान, सोनेरी-पांढरे केस, करड्या डोळ्यात जरब, ओठांवर केसांच्या कल्ल्याना जाऊन मिळणाऱ्या भरघोस सोनेरी मिशा, साधारण पन्नाशीच्या आसपास असणारा पण अंगकाठीने मजबूत मनुष्य ..नकाशाकडे निर्देश करत कुठलेसे नियोजन करणारा, टेबलाच्या इतर बाजुंना त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकताना त्याच रंगातले गणवेषधारी....
.पुन्हा स्टडी च्या बाहेर... तोच प्रशस्त हॉल .. डावीकडे एका कोपऱ्यातून वर जाणाऱ्या नागमोडी पायऱ्या, मध्यम आकाराची बेडरूम.. डाव्या बाजूला भिंतीला लागून लाकडी, सुंदर कोरीवकाम केलेला ड्रेसिंग टेबल.. मध्यभागी हलके निळसर, रेशमी बेडशीट अंथरलेला बेड.. जांभळ्या रंगाच्या तशाच रेशमी अभ्र पांघरलेल्या गुबगुबीत उशा.....
बेड वर बसलेली, उंची आणि तलम रेशमाचा गर्द हिरव्या रंगाचा आणि जांभळ्या फुलांचे नाजूक भरतकाम असलेला ड्रेस घातलेली, हातात पांढरे पीस लावलेले बोरू घेऊन कागदावर काहीतरी लिहीत बसलेली आणि लिहिता लिहिता मध्ये मध्ये काहीतरी आठवण्यासाठी मान वर करून बघणारी मुलगी... चेहऱ्यावर हलकेसे गोड हसू, समोरच्या उघड्या खिडकीतून येणारी वाऱ्याची झुळूक तिच्या लांबसडक, मोकळ्या, रेशमी, सोनेरी केसांवर लाटा निर्माण करतेय.. लिहिण्यात मग्न...
तेवढ्यात कसलीशी चाहूल लागल्यासारखी ती आता मान सरळ करून डावीकडे बघतेय, हसू एकदम मावळलेलं, चेहरा गंभीर.. तिचे डोळे सुंदर आहेत की भीतीदायक.. निळसर, पण थंड, बर्फासारखे, अतिथंडाव्यामुळे चटका लावणारे, बधिर करणारे!!
क्रिस्टन चे डोळे खाडकन उघडले तेव्हा ती घामाने चिंब झाली होती, हृदयाची धडधड कानांना स्पष्ट ऐकू येत होती. काही क्षण तिला स्वतःची रुम ही ओळखु येईना. घड्याळ पाहते तर झोपून केवळ अर्धा तास झाला होता. काय होते ते .. ते घर, ती मुलगी... कोण होती? क्रिस्टन चे डोके प्रचंड जड झाले..

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle