मोनार्क - १

कॅनडातल्या एका छोट्या गावात रेल्वेलाईन शेजारच्या घरात खिडकीत बसून, रुळावरुन थडथडत धावणार्‍या मालगाड्यांची वाट बघत बसणं हा पाच वर्षाच्या छोट्या फ्रेडीचा आवडता छंद. मालगाड्यांची वर्दळ जेव्हा कमी होत असे तेव्हा रेल्वेलाईन पलिकडे पसरलेलं मोठ्ठ्च्या मोठ्ठं माळरान न्याहाळत बसणं हे फ्रेडीचं अजून एक काम. हिरव्यागार गवतात उगवलेली पिवळी-पांढरी रानटी फुलं,त्यावर घोंघावणार्‍या मधमाशा, रंगीबेरंगी फुलपाखरं, मधनूच भिरभिरणारे चतुर, फ्रेडी आपल्या पिटुकल्या डोळयांनी तासनतास निरखत बसे. एके दिवशी मांजरीच्या पिल्लासारख्या मऊमऊ अंगाच्या मधमाशीला पाहून अगदी न रहावल्याने फ्रेडी धावतच तिला पकडायला गेला. मधमाशीच्या अगदी जवळ जाताच मधमाशीने फ्रेडीच्या हाताला जोरदार डंख मारला. हाताला जोराचा झटका बसलेला फ्रेडी कळवळतच आईकडे धावला. आईने लागलीच जखमेवर मलमपट्टी करुन छोट्या फ्रेडीला समजावलं, "निसर्गाने संरक्षणासाठी मधमाशांना जन्मतःच तजवीज केलेली असते. नुसत्या हाताने मधमशी पकडायला गेलं तर त्या स्वरक्षणासाठी डंख मारतात. यापुढे कुठल्याही किट्काला नुसत्या हाताने स्पर्श करायला जाऊ नकोस." रोज खिडकीतून दिसणार्‍या पिटुकल्या मधमाशा इतक्या जोराने हल्ला करुन स्वतःच रक्षण करतात या गोष्टीचं फ्रेडीला राहून राहून कुतुहल वाटत होतं. वयाच्या पाचव्या वर्षी किट्क जगताशी जवळून झालेली ही छोटी ओळख फ्रेडीच्या आयुष्याला पुढे एक अनपेक्षित कलाटणी देणार होती.

butterfly line divider R.png

मेक्सिकोतल्या सिएरा माद्रेच्या डोंगराळ भागातले रस्ते फुलपताकांनी सजले होते. आस्तेकांच्या काळापासून चालत आलेला 'एल दिया दे लोस मुएर्तोस" - मृतात्म्यांसाठी सणाचा आज दिवस. घरोघरी जय्यत तयारी चालली होती. मंडळी नविन कपडे घालून, तयार होऊन स्मशानाच्या दिशेने मृतात्म्यांसाठी भेट्वस्तू घेउन लगबगीने निघाली होती. जन्माने मेक्सिकन असलेली कॅथी, अमेरिकन केन सोबत थोड्या निराशेनेच स्मशानाकडे निघाली होती. कॅथी-केन दांपत्याच्या निराशेचं कारणंही तसंच होतं. गेले दोन वर्ष रोज मोटरसायकलवरुन गावोगाव फिरुन दोघे हताश झाले होते. जंगजंग पछाडूनही हाती काहीच लागलं नव्हतं. केनसोबत स्मशानाकडे जाताच कॅथीला प्रसन्न वाटू लागलं. जागोजागी थडग्यांवर ठेवलेली रंगीबेरंगी फुलं, मृतात्म्यांसाठी आणलेले गोड्धोड पदार्थ, फळांच्या वासाने वातावरण प्रसन्न झालं होतं. फुलाफळांच्या वासाने रंगीबेरंगी फुलपाखरं, मधमाशा स्मशानात भिरभिरत होत्या आणि अचानक कॅथीचं लक्ष सिएरा माद्रेच्या पर्वतरांगेकडे गेलं. केनला खूण करुन तिने त्या दिशेने काहीतरी दाखवलं. क्षणातच दोघांच्या चेहर्‍यावर पुसटशी आनंदाची लकेर उमटली. ज्या कोड्याची उकल शोधण्याकरीता कॅथी व केनच नव्हे तर दूरवर कॅनडात अहोरात्र कुणीतरी धडपडत होतं त्या कोड्याचा एक महत्वाचा दुवा हाती लागला होता. जिग्सॉ पझलच्या अनेक तुकड्यांच्या पसार्‍यात एक महत्त्वाचा तुकडा योग्य ठिकाणी जुळला होता.

butterfly line divider R.png

खाली पसरलेला निळाशार अथांग समुद्र आणि त्याहून निळं डोक्यावरचं आकाश, मध्यान्हीचा सुर्य तळपत होता. हवेच्या प्रचंड झोताबरोबर चिमुकल्या पंखांच्या सहय्याने 'अ‍ॅना' जीव तोडून ऊडत होती. पंखातली शक्ती हळूहळू कमी होत होती. क्षणभर टेकायला दूरदूर पर्यंत जमिनीचा पुसटसा मागमूस दिसत नव्हता. छोट्या 'अ‍ॅना' साठी हे मोठं धाडस होतं पण 'अ‍ॅना'जवळ दुसरा पर्याय उपलब्ध नव्ह्ता. हिवाळा जवळ आल्याची चाहूल तिच्या तीक्ष्ण मेंदूला केव्हाच लागली होती. आणि हा दूरवरचा प्रवास करणारी ती काही एकटी नव्हती. तिच्या आधी कित्येक पिढ्या वर्षानुवर्ष हा समुद्र पार करतच होत्या. तिलाही हे करावंच लागणार होतं. स्वतःसाठी नव्हे तर पुढच्या पिढीसाठी, ती जगवण्यासाठी, फुलवण्यासाठी. पण 'अ‍ॅना' नक्की कुठे चालली होती? आणि का?

butterfly line divider R.png

निसर्गाच्या एका विलक्षण कोड्याचं गुपित 'अ‍ॅना'च्या प्रवासात दडलं होतं. प्रवास नुसत्या किलोमीटर, मैल असल्या फुटकळ परिमाणात मोजला जाणारा नव्हे तर प्रवास अनेक पिढ्यांचा, वर्षानुवर्षं अविरत चालत आलेला. किटकशास्त्रातलं एक अजब स्थलांतर.

butterfly line divider R.png

फ्रेडीचं निसर्गावरचं निस्सिम प्रेम, वर्षानुवर्षं त्याने उपसलेले कष्ट, निराशेत जागलेल्या अनेक रात्री, कॅथी-केनची अफाट धडपड आणि त्याच्याच जोडीला अमेरिकेतल्या हजारो निरपेक्ष हातांनी केलेली मदत - या सर्वाचा परिपाक म्हणून निसर्गाच्या एका अनोख्या चमत्कारची उकल होणार होती. या जिग्सॉ पझलचा शेवटचा तुकडा जेव्हा जोडला गेला तेव्हा "२० व्या शतकातला किटकशास्त्रातला एक सर्वात मोठा शोध" जगाला अवाक करुन टाकणार होता.

मोनार्क - २

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle