मोनार्क - २

मोनार्क - १

butterfly line divider R_0.png

कॅनडात जन्मलेला छोटा फ्रेडी म्हणजेच प्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ डॉ. फ्रेड ऊर्कहट (Dr. Fred Urquhart).खिडकीत तासन तास बसून पक्षी आणि किटकांना न्याहाळणारा फ्रेडी हळूहळू भीड चेपल्यावर किडे पकडू लागला. फुलांवर बसून मध चाखण्यात गुंग असलेली फुलपाखरं,भुंगे काचेच्या बरणीने हळूच झडप तो घालून पकडत असे. किटकांनी भरलेली बरणी घरी आणून निरिक्षण करीत बसणं हा फ्रेडीचा नवा उद्योग. बरेचदा फ्रेडीची ही शिकार बंद बरणीत एक-दोन दिवसात गुदमरुन मरुन जात. असे मृत किट्क मग फ्रेडीच्या 'कलेक्शन बॉक्स'मधे संग्रह करण्यासाठी जात असत. शाळेजवळच्या दलदलीभोवती फिरणारे विविध प्रकारचे किटक बघत बसणं फ्रेडीला आवडत असे. शाळा आणि किटकसंग्रह याव्यतिरिक्त फ्रेडीची आवडती जागा म्हणजे गावतलं सार्वजनिक वाचनालय. साधारण आठ वर्षाचा होईपर्यंत फ्रेडीने या वाचनालयतल्या लहान मुलांच्या विभागातील निसर्ग व विज्ञानावरील सर्व पुस्तकांचा फडशा पाडला होता. निसर्गाविषयीची त्याची आवड व वाचनाचा अवाका पाहून ग्रंथपाल मिस मॅकिनटोश यांनी फ्रेडीला मोठ्यांच्या विभागातली पुस्तक वाचायची परवानगी दिली. परवानगी मिळताच फ्रेडीने निवडलेलं पहिलं वहिलं पुस्तक होतं, चार्ल्स डार्विन यांचं, "Origin of the Species".


पुढे महाविद्यालयात जीवशास्त्र हा विषय अभ्यासासाठी निवडल्यावर, किटकांविषयी शास्त्रीय माहिती फ्रेडला मिळत गेली. त्यातच त्याची आवड व उत्सुकता पाहून जीवशास्त्र शिकवणारे प्राध्यापक श्री.टायलर यांनी फ्रेडीला जीवशास्त्रची प्रयोगशाळा खुली करुन दिली. या प्रयोगशाळेत बंद बाटलीत ठेवलेले अनेक प्रकारचे पक्षी, किटक त्यांची शास्त्रीय माहीती फ्रेडसाठी मोठा खजिना होता. संगीताची आवड असल्याने फ्रेड भुंग्यांची गुणगुण, रातकिड्यांची किरकिर यात संगीत शोधत असे. याच आवडीचा उपयोग करुन त्याने पुढे 'Morphology and Ecology of the Orthoptera' या विषयात १९४० साली त्याने डॉक्टरेट मिळवली.


याच प्रयोगशाळेत एक विभाग फुलपाखरांसाठी ठेवलेला होता. विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलपाखरांमधे नारींगी-काळया पंखांच्या फुलपाखरांकडे फ्रेड्चं विशेष लक्ष आकर्षून घेतलं. हिच ती फुलपाखरं फ्रेड लहान असतांना उन्हाळ्याच्या दिवसात हजारोंच्या संख्यने आसपास उडतांना पहात असे. आणि हिवाळा होताच आश्चर्यकारकरित्या ती गायब होत असतं. हिवाळ्यात हि फुलपाखरं जातात तरी कुठे? हा छोट्या फ्रेडीला नेहमीच पडणारा प्रश्न! फ्रेडला बुचकळ्यात टाकाणारी ही फुलपाखरं होती - 'मोनार्क'.

monarch.jpg

मोनार्क बटरफ्लाय अथवा मोनार्क या नावाने ओळखली जाणारी ही उष्णकटीबंध प्रदेशात लाखो वर्षांपासून अस्तित्वात असणारी फुलपाखराची एक जात. उत्तर अमेरिकेत सुरवातीच्या काळातल्या स्थायिक होणार्‍या बरेचसे लोक (इ.स.१६५०-१७०२) इंग्लंड व हॉलंड या देशातून आल्या होते. अमेरीका खंडात पाहिलेली ही सुंदर आणि शानदार फुलपाखरांची ही जात या लोकांना नविन होती. तुलनेने मोठाले पंख, गडद नारींगी-काळा रंग, त्यावर अधून मधून दिसणारे पांढरे ठिपके पाहून या फुलपाखरांना त्यांनी आपला लोकप्रिय राजा 'King of Orange विल्यम दुसरा' याच्या नावावरुन 'मोनार्क' असं राजेशाही नाव दिलं. मोनार्क या शब्दाचं मुळ Monarkhes या ग्रीक शब्दात आहे. Monos म्हणजे एकटा + arkhein म्हणजे राज्य करणे. हाच शब्द पुढे लॅटीन मधे Monarcha व इंग्रजीत Monarch असा वापरला जातो. मोनार्क जातीच्या फुलपाखाराच वैज्ञानिक नाव Danaus. Danaus हा ग्रीक देवता झ्युसचा नातू. असं म्हणतात Danaus च्या मुली आपला सक्तीने केला जात असलेला विवाह टाळण्यासाठी आपली जन्मभूमी सोडून पळून गेल्या. मोनार्क या नावाच्या बरोबरीने 'King Billy butterfly' तसंच मिल्कविड बटरफ्लाय असंही या फुलपाखरांना संबोधलं जातं.


अमेरिकेत टेक्सास ते न्यू इंग्लंड, फ्लोरिडा ते मिनेसोटा तसंच दक्षिण कॅनडात उन्हाळ्याच्या दिवसात सर्रास दिसणारी ही फुलपाखरं फक्त मिल्कविडच्या पानांवर आपली गुजराण करतात. साधारण अर्धा ग्रॅम वजनाची, चार पंख व सहा पाय असलेल्या या फुलपाखरांत नर हे माद्यांपेक्षा गडद रंगाचे असतात. इतर फुलपाखरांच्या जातींप्रमाणे मोनार्कही जन्मापासून अंड(३-४ दिवस), अळी (१०-१४ दिवस), कोष(१०-१४ दिवस) आणि प्रौढावस्था अशा चार अवस्थेतून जातात. सर्वात महत्त्वाची अवस्था अर्थातच अळी. या काळात मूळ आकारमानापेक्षा अळी २००० पट वाढते.


उन्हाळ्यात हजारोंच्या संख्येने उत्तर अमेरीकेत आढळणारे मोनार्क हिवाळ्याची चाहूल लागताच मात्र आश्चर्यकारकरित्या गायब होतात. फुलपाखरांच्या इतर अनेक जातींप्रमाणे मोनार्कही हिवाळ्याच्या दिवसात उष्ण प्रदेशात स्थलांतर करतात. परंतु एकदा स्थलांतर केल्यावर फिरुन परतणारी मोनार्क ही एकमेव जात!


पण मग हिवाळा सुरु होताच हे नाजूकसे जीव जातात तरी नक्की कुठे? संपूर्ण हिवाळा त्यांचं वास्तव्य कुठे असतं? लहानपणासून फ्रेडला सतावणार्‍या या प्रश्नांची उकल करण्यात डॉ. फ्रेड ऊर्कहट (Dr. Fred Urquhart). यांनी एक- दोन नव्हे तर आपल्या आयुष्याची तब्बल चाळीस वर्ष या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात खर्ची केली. ही कथा आहे छोट्या प्रवाशांच्या सर्वात लांबच्या प्रवासाची.

(क्रमशः)



संदर्भ :

(१) Monarch Butterflies - Mysterious Travelers By Bianca Lavies
(२) The Incredible Journey of the Butterflies (DVD -2009)
(३) The Monarch Butterfly - International Traveler By Fred Urquhart

(लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.)

butterfly line divider R_0.png

मोनार्क - ३

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle