Odd Man Out (भाग १ ते १५)

प्रस्तावना-

आज आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एक कथा तुम्हां वाचकांसमोर प्रस्तुत करते आहे.

देशासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकाचं देशप्रेम आणि त्याग हा तर जगमान्य आहे. पण अशा प्रत्येक सैनिकाच्या पाठीशी उभा असलेला त्याचा परिवार हा बऱ्याचदा पडद्याआड राहातो.

माझी ही कथा त्या प्रत्येक सैनिकाला आणि त्याच्या परिवाराला समर्पित आहे- त्या परिवारातील सदस्यांच्या त्यागाला, त्यांच्या देशप्रेमाला समर्पित आहे.

जयहिंद !

Odd Man Out

"युनिट ची move आलीये."

संग्राम नी घरात आल्या आल्या नम्रताला सांगितलं.

"कुठे?" तिनी हळूच विचारलं.

खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तिला आधीच माहीत होतं, फक्त संग्रामच्या पुढच्या काही शब्दांनी त्यावर शिक्कामोर्तब होणार होतं.

"Valley मधे. अगदी बॉर्डर एरिया मधे." संग्राम शांतपणे म्हणाला.

अपेक्षित असूनही हे उत्तर ऐकल्यावर काही क्षण नम्रता अंतर्मुख झाली. 'म्हणजे आता पुन्हा कमीतकमी दोन वर्षं तरी वेगळं राहावं लागणार.' तिच्या मनात आलं.

पण मनातली विचारांची घालमेल चेहेऱ्यावर किंचितही न दाखवता तिनी विचारलं," कधी निघणार?"

"अजून सहा महिन्यांनी. पण मी advance party मधे जाणार आहे त्यामुळे पुढच्या महिन्याभरातच जावं लागेल.मला जेवायला वाढ.परत जायचंय ऑफिस मधे." बेडरूम मधे जाता जाता संग्राम म्हणाला.

"अरे, पण आज शनिवार आहे. मुलींबरोबर..."

तिला मधेच थांबवत तो म्हणाला, "आज नाही जमणार गं. थांबलो तर ऑफिसमधे पोचायला उशीर होईल. तीन वाजता बोलावलंय CO (commanding officer) नी."

"बरं, बरं! ये तू लवकर युनिफॉर्म चेंज करून. मी पान वाढते तुझं." असं म्हणत नम्रतानी संग्राम करता पोळ्या करायला घेतल्या.

"आज रात्री यायला उशीर होईल कदाचित . संध्याकाळी मुलींना स्विमिंग करता घेऊन जायचं ठरवलं होतं. प्लीज, आज तू जा ना त्यांना घेऊन. त्यांना सांग, म्हणावं- बाबा उद्या नेतील ..नक्की!" घाईघाईत जेवण संपवत संग्राम म्हणाला.

"अरे, नीट जेव ना! इतकी कसली घाई ?"

नम्रताचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत त्याचं जेवण झालं सुद्धा !

बाहेर पडता पडता त्यानी परत एकदा आठवण करून दिली," मुलींना सांगशील ना समजावून?"

त्यावेळचा त्याच्या चेहेऱ्यावरचा तो अपराधी भाव बघून नम्रताला एकदम गलबलून आलं. चेहेऱ्यावर उसनं हसू आणत ती म्हणाली,"अरे, येतच असतील दोघी एवढ्यात.आज शनिवार आहे ना...half day आहे आज...स्कूल बस ची वेळ झालीच आहे. तूच सांग ना त्यांना. Don't worry, त्या काही रुसणार वगैरे नाहीत. खूप समजूतदार आहेत दोघी."

"अगं म्हणूनच अजून जीवावर येतं त्यांना हे सगळं सांगणं..त्यांचा हिरमोड झाला तरी कधीच कुठलेही tantrums नसतात दोघींचे.."

एवढं बोलून त्यानी गाडी स्टार्ट केली. निघता निघता काहीतरी आठवल्या सारखं त्यानी तिच्याकडे वळून बघितलं आणि म्हणाला," तुम्ही तिघी कुठे राहणार याबद्दल विचार करून ठेव. रात्री मी आलो की बोलू त्या विषयी."

"लवकर ये. एकत्रच जेवू दोघं.. मी थांबते तुझ्यासाठी." नम्रता त्याच्या हळूहळू लांब जाणाऱ्या पाठमोऱ्या छबीला म्हणाली. पुढच्या वळणावर त्याची गाडी दिसेनाशी होईपर्यंत ती बघत उभी होती.. आजच नाही तर रोज अशीच थांबायची ती....अगदी तो नजरेआड होईपर्यंत त्याला बघत राहायची. हे जेव्हा संग्रामच्या लक्षात आलं होतं तेव्हा तो काहीसा वैतागून तिला म्हणाला होता,"हे असं अगदी नवीन लग्न झालेल्या बायकांसारखं काय करतेस? असं शेवटपर्यंत बघत बसलीस तर काय मी लवकर परत येणार आहे का? मला किती embarrassing होतं माहितीये का? तू अशी दाराबाहेर उभी राहून बघतीयेस हे येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना दिसतं."

त्याला असा वैतागलेला बघून नम्रताला खूप मजा वाटली होती. त्याला अजून चिडवायला म्हणून हसत हसत ती म्हणाली,

"अरे, त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? माझ्याच नवऱ्याला बघते ना मी? उलट इतर नवरे च म्हणत असतील त्यांच्या बायकांना....'बघ, नम्रताचं किती प्रेम आहे तिच्या नवऱ्यावर.... नाही तर तू !!!'

अरे, एकदा विचारून तर बघ युनिट मधल्या बाकी ऑफिसर्स ना ? म्हणजे पटेल तुला माझं म्हणणं. घेतोस का चॅलेंज ?"

पण त्यावर अजून च वैतागून ,"ही असली फालतू चॅलेंजेस नाही घेत मी..." असं काहीतरी पुटपुटत तो तिथून निघून गेला होता.

त्याला असं खोटं खोटं चिडवायला खूप आवडायचं नम्रताला. तो irritate झाला की एखाद्या लहान मुलासारखा दिसायचा. मानेला एक हलकासा झटका देत तोंड फुगवून तिच्यासमोरून निघून जायचा.

त्याला आधी असं चिडवून मग त्याच्या मागे मागे फिरत त्याला मनवण्यात एक वेगळीच मजा होती.

पण त्याला आवडत नाही हे कळल्यानंतर मात्र रोज नम्रता लिविंग रूम च्या खिडकीतून च त्याला निरोप द्यायची.. तिच्या स्टाईल मधे.. अगदी तो दिसेनासा होईपर्यंत .

आज हे सगळं आठवून नकळत तिच्या चेहेऱ्यावर हसू उमटलं. अचानक तिच्या लक्षात आलं की विचारांच्या नादात असल्यामुळे आज ती बाहेर उभी राहूनच त्याला निरोप देत होती.तिनी पटकन आजूबाजूला पाहिलं... कोणी बघितलं तर नाही ?? आणि मग स्वतःच्याच वेडेपणाला हसत ती घरात जायला वळली. इतक्यात समोर रस्त्यावर स्कूल बस थांबली आणि तिच्या दोघी मुली पळत पळत येऊन तिला बिलगल्या.

"आई, लवकर जेवायला वाढ. खूप भूक लागलीये. बाबा आले का? आज ते मला backstroke शिकवणार आहेत." घरात जाताजाता तिची मोठी मुलगी- नंदिनी- उत्साहात घडाघडा बोलत होती. छोटी अनुजा ' ए, मला पण शिकवणार आहेत.." असं काहीतरी बोलत ताईच्या मागेमागे आत गेली. ऑलमोस्ट साडेचार वर्षांचं अंतर होतं दोघींच्या वयात.. नंदिनी नऊ वर्षांची आणि अनुजा जेमतेम साडेचार वर्षांची...….पण तरीही त्या दोघी बहिणी कमी आणि मैत्रिणीच जास्त होत्या. अनुजा म्हणजे तर अगदी नंदिनीची सावलीच जणू ! ताई करेल तेच आणि तसंच ती पण करणार हे ठरलेलं असायचं!!

आतून मुलींच्या हाका ऐकू आल्या आणि भानावर येऊन नम्रता घरात शिरली. एकीकडे मनात विचार चालू होता...'मुलींना कसं सांगायचं?' तसं पाहिलं तर - 'आज बाबांना यायला जमणार नाहीये' हे इतकं साधं आणि सोपं वाक्य ...पण ते योग्य रीतीने सांगणं महत्वाचं होतं...अशा प्रकारे की ज्यामुळे मुलींना जास्त वाईट नाही वाटणार..

नम्रता ला ही situation काही नवीन नव्हती. आज पर्यंत बऱ्याचवेळा असं झालं होतं.... खूप उत्साहात चौघं मिळून एखादा प्रोग्रॅम ठरवायचे आणि ऐनवेळी काहीतरी काम निघाल्यामुळे संग्राम ला ऑफिस मधे जावं लागायचं...एकदा तर महिनाभर आधीपासून ठरवलेला पिकनिक चा त्यांचा प्लॅन असाच फिस्कटला होता. अगदी दोन दिवस आधी संग्राम ला बाहेरगावी जावं लागलं होतं... flood relief operation साठी.

मुलींचा खूपच विरस झाला होता तेव्हा. आपल्या बाबांना असं अचानक गावाला जाताना बघून नंदिनीच्या डोळ्यांत पाणी साठलं होतं आणि तिला तसं बघून साहजिकच अनुजा नी भोकाड पसरलं होतं. नम्रतानी कसंबसं शांत केलं होतं दोघींना.. खूप समजावलं, सगळी परिस्थिती explain करून सांगितली. दोघींना कुशीत घेऊन म्हणाली," अगं, पिकनिक ला तर काय आपण कधीही जाऊ शकतो की नाही? पण आत्ता तिथल्या लोकांना बाबांच्या मदतीची गरज आहे. तिकडे तुमच्यासारखीच खूप छोटी छोटी मुलं आहेत." हे ऐकून अनुजा म्हणाली," पण मग त्यांचे आई बाबा आहेत ना? ते करतील की मदत!"

"हो ना !आम्हांला मदत लागली तर आम्ही बोलावतो का त्यांच्या बाबांना ?" नंदिनी नी री ओढली.

मुलींचं लॉजिक ही अगदी योग्यच होतं म्हणा!आता नम्रतानी आपला पवित्रा बदलला.. "हो गं, करेक्ट आहे तुमचं. पण मला एक गोष्ट सांगा..अगदी खरं सांगायचं बरं का.... तुम्ही दोघी बाबांकडूनच का शिकता स्विमिंग ? माझ्याकडून का नाही शिकत ?"

नंदिनी विचारात पडली...खरं सांगितलं तर आईला काय वाटेल??

पण अनुजा नी सरळ कबूल केलं," कारण बाबा तुझ्यापेक्षा जास्त छान स्विमिंग करतात. एकदम expert आहेत ते ..म्हणून."

नम्रता ला हवं असलेलं उत्तर मिळालं होतं.." तेच तर ! आत्ता बाबा ज्या गावात गेलेत ना तिकडे नदीला पूर आलाय, त्यामुळे सगळ्यांच्या घरांत पण पाणी शिरलंय. मग अशा वेळी जे स्विमिंग मधे expert आहेत त्यांनाच बोलावतील ना ? म्हणून मुद्दाम तुमच्या बाबांना बोलावलंय."

हे ऐकताच दोघी मुलींच्या चेहेऱ्यावर एकदम हसू आलं. 'आपले बाबा किती ग्रेट आहेत' या नुसत्या कल्पनेनीच दोघी सुखावल्या. नम्रता ची युक्ती सफल झाली होती.

आणि मग बाबांची ती 'achievement' सेलिब्रेट करायला म्हणून तिघींनी मिळून घराबाहेरच्या लॉन वरच केली होती पिकनिक !!

या अशा अनिश्चीततेमुळेच की काय पण जेव्हा चौघं एकत्र असायचे तेव्हा मात्र खूप धमाल करायचे.पण आता इतक्या वर्षांत मुलींना देखील या सगळ्याची सवय झाली होती. कदाचित त्यांच्या आजूबाजूला , त्यांच्या मित्र मैत्रिणींच्या घरी पण हीच परिस्थिती असल्यामुळे त्यांना त्यात काही वावगं वाटत नसावं.

" या गं दोघी लवकर जेवायला." नम्रतानी गरमागरम पोळ्या dining table वर ठेवत मुलींना हाक मारली. नेमका त्याच वेळी कुठलासा कार्टून शो सुरू होता. अनुजा नी हळूच विचारलं," आई, आज टीव्ही समोर बसू जेवायला ? फक्त आजचाच दिवस, please !!!" खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तिला आधीच माहिती होतं.. कारण या बाबतीत नम्रता खूप strict होती. 'प्रत्येक कामासाठी एक जागा ठरलेली आहे. त्यात शक्यतो बदल करायचा नाही."असा तिचा आग्रह असायचा. " जेवण फक्त dining table वर च, तसंच अभ्यास हा फक्त स्टडी टेबल वरच.. कॉटवर लोळत किंवा टीव्ही बघत जेवण किंवा अभ्यास केलेला तिला अजिबात खपायचा नाही.

ती काही बोलणार इतक्यात अनुजा च म्हणाली,"काही हरकत नाही. पटकन जेवतो आणि मग जातो टीव्ही बघायला." आई ओरडेल की काय या भीतीनी तिनी आधीच पांढरं निशाण फडकावलं. तिची ती धांदल बघून नम्रता ला अचानक तिच्यावर खूपच प्रेम आलं.. तिला उचलून खुर्चीवर बसवत नम्रता म्हणाली, "गुड गर्ल! चला आता दोघी जेवा बघू लवकर."

"बाबा येऊ दे ना..एकत्रच जेवू.. मग स्विमिंग ला पण जायचंय ना आम्हांला!" नंदिनीच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. तिच्यासाठी तिचे बाबा म्हणजे 'हिरो' होते.. त्यांच्या बद्दल बोलताना ती नेहेमीच खूप खुश असायची.

दर शनिवारी मुलींच्या शाळेचा हाफ डे असल्यामुळे दुपारी सगळेजण एकत्रच जेवायचे.एकीकडे जेवण आणि एकीकडे गप्पा !! शाळेतल्या गमतीजमती , मित्र मैत्रिणींच्या तक्रारी, त्यांची 'so called' सिक्रेट्स,अभ्यासात मिळालेले गोल्डन स्टार्स........जेवण संपायचं पण चौघांच्या गप्पा नंतरही कितीतरी वेळ चालूच असायच्या. कधीकधी तर बाप लेकी एकमेकांत इतके गुंग व्हायचे की ते नम्रताला चक्क विसरून जायचे...पण या गोष्टीचा तिला कधीच राग किंवा दुःख नाही वाटलं. उलट त्या तिघांना असं त्यांच्याच विश्वात गुरफटलेलं बघून तिला खूप समाधान वाटायचं. तिला जाणीव होती की या सगळ्या गप्पा, चेष्टा मस्करी, तिघांचं असं एकत्र वेळ घालवणं..... हेच सगळं नंतर बहुमूल्य आठवणींच्या रुपात त्यांच्यासमोर येणार होतं. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा ते चौघं असा एकत्र वेळ घालवायचे तेव्हा तेव्हा नम्रता ते सोनेरी क्षण कॅमेरात टिपून ठेवायची. तिच्या या सवयीमुळे मागच्या आठ नऊ वर्षांत अशा कितीतरी आठवणी फोटोग्राफ्स च्या रुपात तिनी अल्बम्स् मधे साठवून ठेवल्या होत्या. संग्राम गमतीनी म्हणायचा देखील," आपल्या लग्नात पण एवढे फोटो नव्हते काढले गं! तुझ्या या छंदामुळे आपल्या घरातलं सामान वाढतंय आणि कितीतरी फोटो स्टुडिओ वाल्यांची घरं चालतायत."

पण नम्रता हे सगळं ऐकूनही न ऐकल्यासारखं करायची. कारण तिला माहित होतं की संग्राम जरी वर वर हे सगळं म्हणत असला तरी प्रत्येक वेळी बाहेरगावी जाताना तो त्यातले लेटेस्ट अल्बम्स् हळूच -कोणाच्या नकळत - आपल्या सामानात ठेवून घ्यायचा. म्हणजे त्याला असं वाटायचं की 'कोणाला कळलं नाही', पण नम्रताच्या नजरेतून कधीच काहीच सुटायचं नाही.तरीही तिनी कधी त्याला तसं बोलून नाही दाखवलं.कारण ती संग्रामला पूर्णपणे ओळखून होती. स्वतः च्या भावना इतरांसमोर व्यक्त करणं हा त्याचा स्वभावच नव्हता. लग्नानंतर काही दिवसांतच नम्रताला तसं जाणवलं होतं. एक दोन वेळा ती बोलली देखील होती त्याच्याशी याबद्दल. पण त्याचं उत्तर ठरलेलं होतं.."हम तो ऐसे ही हैं।"

त्याच्या 'ऐसे ही' असण्याबद्दल तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्याचा स्वभावच तसा होता ;आणि हे ती जाणून होती. पण तरीही का कोणास ठाऊक , तिला कधी कधी त्याची काळजी वाटायची. वाटायचं, अशा सगळ्या भावना मनात ठेवून ठेवून त्याला त्रास तर नाही ना होणार ! खास करून दुःख, राग या आणि अशा निगेटिव्ह भावनांचा वेळीच निचरा नाही झाला तर भविष्यात तब्येतीवरही परिणाम होऊ शकतो.. असं कुठेसं वाचलं होतं तिनी.

आणि गंमत म्हणजे नम्रताचा स्वभाव अगदी याउलट होता. संग्राम जितका गप्प आणि शांत तितकीच ती बडबडी ! दिवसभर तिच्या तोंडाची टकळी चालू असायची. तिची नणंद नेहेमी म्हणायची," तुमची म्हणजे अगदी 'रब ने बना दी जोडी' आहे....संग्रामचा बोलण्याचा quota तू पूर्ण करतेस ! "

संग्रामच्या अशा धीरगंभीर स्वभावासाठी त्याच्या आईकडे मात्र एक स्पष्टीकरण ठरलेलं असायचं," अगं, आधी खूप खेळकर स्वभाव होता त्याचा.. पण NDA मधे गेल्यापासून असा झालाय."

त्यांच्या या विधानाला घरातील इतर सगळ्यांचा आणि मुख्य म्हणजे खुद्द संग्राम चा ही अगदी पूर्ण विरोध होता, पण त्या मात्र आपल्या मतावर ठाम असायच्या...'माँ का प्यार...और क्या?" असं म्हणून नम्रता नेहेमी हसून साजरं करायची.

आत्ताही हे सगळं आठवून तिला हसू आलं.

"अगं आई, मी विचारतीये की बाबा कधी येणार...त्यात हसण्यासारखं काय आहे?" नम्रताच्या हाताला स्पर्श करत नंदिनी नी विचारलं.

"अं, काय गं बेटा? काय म्हणालीस ? सॉरी, मी दुसराच कुठलातरी विचार करत होते." नम्रता भानावर येऊन म्हणाली.

'आज असं का होतंय? छोट्या छोट्या गोष्टींमुळे अशा आठवणींच्या लडी का उलगडतायत मनात?' नम्रता विचारात पडली. तेवढ्यात अनुजा नी तिचा चेहेरा आपल्याकडे वळवून घेत विचारलं," सांग ना, बाबा कधी येणार ?"

आता मुलींना खरं काय ते सांगायची वेळ आली होती. आपलं सगळं संभाषण कौशल्य पणाला लावून नम्रता म्हणाली," अगं, खरं म्हणजे बाबा आज लवकरच आले होते .. पण त्यांना आज काहीतरी खूप महत्त्वाचं काम आहे..एकदम अर्जंट.. आणि म्हणून त्यासाठी सगळ्याच अंकल्स ना परत बोलावलंय ऑफिसमधे. काम झालं की लग्गेच परत येतील बाबा."

" म्हणजे आज ते स्विमिंग करता नाही येऊ शकणार?" नंदिनीनी हिरमुसल्या स्वरांत विचारलं.

तिचा हात हातात घेऊन नम्रता म्हणाली," नक्की कसं सांगणार ना? काम लवकर संपलं तर येतीलही कदाचित. पण मला एक आयडिया सुचलीये. मी येऊ का तुमच्या बरोबर ? आज तुम्ही दोघी मिळून मला underwater पोहायला शिकवा. मी कितीवेळा ट्राय केलं पण तुमच्यासारखं जमतच नाही मला. कुठे चुकतं काय माहीत ! प्लीज, आज शिकवा ना तुम्ही मला !"

नम्रताची ही युक्ती सफल झाली. 'आज आपण आईला शिकवणार' या नुसत्या कल्पनेनीच दोघी मुली खूप खुश झाल्या आणि पटापट जेवण संपवून स्विमिंग ला जायची तयारी करायला पळाल्या.

ठरल्याप्रमाणे संध्याकाळी नम्रता दोघी मुलींना स्विमिंग करता घेऊन गेली. सुरुवातीची काही मिनिटं दोघीनी आईला ' underwater ' स्विमिंग शिकवायचा प्रयत्न केला. पण लवकरच शिकवणं राहिलं बाजूला आणि त्या दोघींचं आपसांत खेळणं सुरू झालं. त्यांना असं हसताना, खेळताना बघून नम्रताला हुश्श झालं. तिला एकदम संग्राम ची आठवण आली.मुलींना असं बघून त्याला किती आनंद होतो हे तिला माहीत होतं. तो नेहमी म्हणायचा," आपल्या दोघी मुली natural swimmers आहेत. त्यांना फारसं शिकवावं नाही लागत."

नंदिनीचे मित्र मैत्रिणी तर तिला mermaid च म्हणायचे. आणि त्याचं कारणही तसंच होतं- नंदिनी इतक्या सहजपणे पोहायची- जणूकाही एखादी मासोळीच सुळसुळत जावी पाण्यातून....अगदी पाण्याचा एकही थेंब न उसळता !!

अनुजा चा मात्र बराचसा वेळ जलक्रीडेतच जायचा. नंदिनी पोहत असताना पाण्याखालून जाऊन तिचे पाय ओढणं, तिच्या पाठीवर चढून बसायचा प्रयत्न करणं यातच तिला खरी मजा यायची. नम्रताची एक मैत्रीण तिला लाडानी 'गोल्डफिश' म्हणायची.

दोघी मुलींचं पोहणं झाल्यावर तिघी घरी परत आल्या. एरवी अंधार पडायला सुरुवात झाली की नम्रता दोघींना पूल मधून बाहेर निघायची घाई करायची. तसं पाहता स्विमिंग पूल मधे आत आणि बाहेर दोन्हीकडे दिव्यांची सोय असल्यामुळे पुरेसा उजेड असायचा. त्यामुळे कसलाही धोका नव्हता.

कधी कधी संग्राम तिला म्हणायचा देखील," अगं, इतकी काय घाबरतेस? हा स्विमिंग पूल आहे...नदी किंवा समुद्राचं वाहतं, खोल पाणी नाहीये..." नम्रताला देखील हे सगळं पटत होतं, पण तिची अवस्था 'तुज कळते परी ना वळते ' अशी होती.

ती शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत टिळक टॅंक मधे पोहायला जायची. तिथल्या तिच्या सरांनी पहिल्याच दिवशी तिला सांगितलं होतं,"अंधार पडल्यावर कधीही पोहण्यासाठी म्हणून पाण्यात उतरायचं नाही." त्या दिवशी त्यांनी अजूनही काही सूचना दिल्या होत्या. पण त्यातली ही अंधाराबद्दलची सूचना मात्र नम्रताच्या डोक्यात फिक्स झाली होती.आणि म्हणूनच 'Better safe than sorry' या तत्वाला अनुसरून ती काळजी घ्यायची.

पण आज मात्र तिनी दोघींना मनसोक्त पोहू दिलं - अर्थात तिचं लक्ष होतंच ..त्यांना अजिबात नजरेआड होऊ नाही दिलं तिनी.. बऱ्याच वेळानंतर मग मुलीच म्हणाल्या," आई, आता घरी जाऊया. खूप भूक लागलीये."

घरी पोचल्यावर मुलींची पेटपूजा होईपर्यत दिवेलागणीची वेळ झाली होती. नम्रतानी देवापुढे दिवा लावला. उदबत्ती लावता लावता मधेच ती क्षणभर थांबली - काहीतरी आठवल्यासारखी. उदबत्तीचा पुडा पुन्हा जागेवर ठेवत तिनी धुपकांडीची डबी उचलली. संग्राम ला संध्याकाळच्या वेळी घरभर पसरलेला धुपाचा मंद सुगंध खूप आवडायचा. म्हणायचा,"मन कसं अगदी प्रसन्न होतं घरात आल्या आल्या!"

"तुला आवडतो म्हणून आज धूप लावलाय देवापुढे...लवकर ये घरी!" तिनी मनातल्या मनात संग्रामला सांगितलं. तेवढ्यात दोघी मुली आल्या आणि देवासमोर बसून पर्वचा म्हणायला लागल्या. हादेखील नम्रतानी घालून दिलेला नियम होता. रोज संध्याकाळी शुभं करोति, हनुमान स्तोत्र आणि अथर्वशीर्ष हे म्हटलंच पाहिजे.

रात्री दोघी मुलींना झोपवताना नम्रता अंगाईगीतं किंवा गोष्टींच्या ऐवजी ही अशी देवाची स्तोत्रं म्हणायची ...अगदी सुरुवातीपासूनच ! त्यामुळे मुलींना वेगळं पाठांतर करायची गरजच नव्हती.

संग्रामच्या आई बाबांना त्यांच्या नातींचं खूप कौतुक वाटायचं. प्रत्येक वेळी सुट्टीत घरी गेल्यावर ते दोघं विचारायचे,"यावेळी कोणतं नवीन स्तोत्र शिकवलं आईनी ? म्हणून दाखवा बरं !"

मग काय, पुढचा अर्धा पाऊण तास स्तोत्र पठणाचा कार्यक्रम चालायचा ;आणि त्याची सांगता शेवटी आजीकडून खाऊ मिळून व्हायची.

नम्रता पुन्हा एकदा आठवणींत रमली होती. अनुजाच्या हाकेनी ती एकदम भानावर आली. तिनी घड्याळाकडे पाहिलं- सात वाजून गेले होते. मुलींची जेवायची वेळ होत होती. रोज दोघी मुली सव्वासात- साडेसातच्या सुमारास जेवायच्या आणि आठ सव्वाआठ पर्यंत झोपून जायच्या.

नम्रता स्वैपाकघराकडे वळणार इतक्यात नंदिनी म्हणाली," आई, अगं आत्ता भूकच नाहीये. मगाशीच तर केक आणि मिल्कशेक प्यायलो ना !" लगेच मौका साधून अनुजा तिला चिडवत म्हणाली," ए, केक पितात का कधी ? केक खातात आणि मिल्कशेक पितात. हो ना गं आई?"

त्यावर नंदिनी वैतागून म्हणाली,"मला पण माहितीये ते; तू नको शिकवू मला. चुकून म्हणाले मी तसं."

त्यावर अनुजा काहीतरी बोलायला पुढे सरसावली... ही भांडणाची नांदी आहे हे लक्षात आल्यामुळे नम्रतानी दोघींना गप्प केलं.

आज स्विमिंग हुन उशिरा परत आल्यामुळे वेळेचं गणित थोडं चुकलं होतं. "ओके, मग आता काय करूया?" नम्रताच्या या प्रश्नावर मुलींच्यात काही खाणाखुणा झाल्या आणि चेहेऱ्यावर कमालीचा साळसूदपणा आणत दोघीनी आपली बाजू मांडली.

" आई, आजच्या दिवस थोडं उशिरा झोपलं तर चालेल का गं? बाबा येऊ दे ना. आजची स्विमिंग पूल मधली गंमत सांगायची आहे त्यांना." अनुजा नी नम्रताच्या गळ्यात हात टाकत म्हटलं. "आणि आत्ता तर फक्त सव्वासात च वाजलेत.आणि उद्या रविवार आहे ना- थोडं उशिरा उठलं तरी चालेल." नंदिनीनी अनुजाच्या वक्तव्याला दुजोरा देत म्हटलं.

एरवी मुलींच्या या अशा मागण्या नम्रता मान्य करायची नाही. पण आजची गोष्ट वेगळी होती.दुपारपासून मुली बाबांची वाट बघत होत्या. आणि संग्रामला पण त्यांच्याबरोबर वेळ घालवायला मिळाला नाही म्हणून वाईट वाटत असणार. म्हणून मग नम्रतानी त्या दोघींना बाबा येईपर्यंत जागं राहायची परवानगी दिली.

या अचानक आणि अनपेक्षितपणे मिळालेल्या ग्रीन सिग्नलमुळे मुली एकदम खुश झाल्या." आई, you are the best." म्हणत तिला बिलगल्या.

दोघींना त्यांचा आवडता 'टॉम अँड जेरी' शो लावून देत नम्रता म्हणाली,"बाबा येईपर्यंत तुम्ही दोघी कार्टून शो बघा. बाबा आले की मग आपण सगळे एकत्रच जेवू या."

एवढं बोलून ती डिनर ची तयारी करायला म्हणून स्वैपाकघरात जायला निघाली. धुपाचा वास हळूहळू कमी होत होता. तिनी देवघरात जाऊन अजून एक धुपकांडी पेटवली आणि तिच्याही नकळत देवाला नमस्कार करण्यासाठी हात जोडले.

नम्रता बराच वेळ तशीच हात जोडून उभी होती. नजर देवघरातल्या देवांवर खिळली होती.... पण कुठेतरी शून्यात हरवल्यासारखी ! मनात वेगवेगळे विचार येत होते- युनिट चं फील्ड लोकेशन वर जाणं... खरं तर मागच्या काही महिन्यांपासून सगळेच या बातमीची वाट बघत होते. कारण गेली पाच एक वर्षं युनिट पीस लोकेशन मधे होती....आता फील्ड मधे जाऊन तिथे गेल्या दोन वर्षांपासून तैनात असलेल्या एका युनिटची जागा घ्यायची होती,

'यावेळी युनिट हार्ड फील्ड मधे जाणार' अशी कुणकुण होतीच सगळ्यांना. त्यामुळे ऑफिसर्स बरोबरच युनिट मधल्या ladies नी पण हळूहळू पुढची प्लॅंनिंग करायला , त्या दृष्टीनी विचार करायला सुरुवात केली होती. कारण नव्या जागी ऑफिसर्स बरोबर त्यांच्या परिवारांना राहायची परवानगी नव्हती. बरीच कारणं होती त्यामागे..आणि ती सगळी अगदी योग्यच होती....सगळ्यात मुख्य कारण म्हणजे परिवारातल्या सदस्यांची सुरक्षा ! त्याशिवाय म्हणाल तर शाळा, अद्ययावत वैद्यकीय सेवा या महत्वाच्या बाबींची उणीव !

त्यामुळे जेव्हा एखादी युनिट फील्ड लोकेशन वर जाते तेव्हा त्या युनिट मधल्या ऑफिसर्स आणि जवानांचे परिवार यांना त्यांच्याबरोबर जाणं शक्य नसतं.

अशा वेळी प्रत्येक परिवार आपापल्या दृष्टीनी जसं सोयीचं असेल त्याप्रमाणे ठरवतो. काही बायका आपल्या मुलांना घेऊन सासरी किंवा माहेरी जाऊन राहतात तर काही जणी आर्मी च्या Field Area Family Accommodation (FAFA) किंवा Separated Family Accommodation (SFA) मधे राहतात.
FAFA या नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल..जेव्हा एखाद्या सैनिकाची फील्ड पोस्टींग येते, तेव्हा त्याच्या परिवारासाठी आर्मी तर्फे काही शहरांमधे अशी घरं उपलब्ध करून दिली जातात. ही घरंही इतर आर्मी च्या घरांसारखीच असतात आणि शक्यतो आर्मी कॅन्टोन्मेंट च्या परिसरातच असतात. जर एखाद्या ऑफिसर च्या परिवाराला या घरात राहायचं असेल तर त्यासाठी त्या शहरातल्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तसा अर्ज करावा लागतो. त्या ऑफिसर ची जी रँक असेल त्या पेक्षा एक रँक खालचं घर मिळतं… म्हणजे जर एखाद्या ‘मेजर’ च्या परिवाराला SF accommodation हवं असेल तर त्यांना कॅप्टन च्या रँक करता अधिकृत असलेलं घर मिळतं.

नम्रतासमोर देखील हे सगळे पर्याय होते आणि त्यातूनच तिला सध्याच्या परिस्थितीत योग्य असा पर्याय निवडायचा होता.

पण हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं. बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागणार होता. मुलींची शाळा हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा होता. चालू शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत नम्रता आणि मुली याच घरात राहू शकणार होत्या, पण त्यानंतर मात्र त्यांना हे घर सोडून दुसरीकडे शिफ्ट करावं लागणार होतं. आणि - हे 'दुसरीकडे' म्हणजे नक्की कुठे - याबद्दलच विचार करायला सांगितलं होतं संग्रामनी तिला.

पहिला पर्याय होता- संग्रामच्या आईवडिलांकडे - गणपतीपुळ्याला जाऊन राहाणं. खरं म्हणजे नम्रताच्या दृष्टीनी हाच पर्याय सगळ्यात योग्य होता...आणि त्याचं कारणही तसंच होतं....ते म्हणजे तिचे सासू सासरे! दोन दिवसांपूर्वीच त्यांच्याशी फोन वर बोलताना संग्रामनी त्याच्या फील्ड पोस्टींगचं त्यांच्या कानावर घातलं होतं. 'संग्राम पुन्हा बॉर्डरवर जाणार आहे' या नुसत्या कल्पनेनीच तिचे सासू सासरे किती हवालदिल झाले होते. त्यांच्या बोलण्यातून, आवाजाच्या कंपनातून त्यांची काळजी, त्यांना वाटणारी भीती नम्रताला जाणवली होती.

अशा परिस्थितीत जर ती मुलींना घेऊन त्यांच्याबरोबर राहिली असती तर त्यांना खूप मोठा मानसिक आधार मिळाला असता. आणि दोन्ही नातींबरोबर त्यांचा वेळही चांगला गेला असता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे- 'त्यांना धीर द्यायला,त्यांची काळजी घ्यायला नम्रता आहे'- या एका जाणिवेमुळे संग्राम पण त्या बाबतीत निर्धास्त झाला असता.

पण या सगळया आयडियल situation मधे एक मोटठी अडचण होती आणि ती म्हणजे तिथे मुलींसाठी योग्य शाळा नव्हती. तसं पाहता आत्ता मुली लहान वर्गात होत्या- नंदिनी तिसरीत आणि अनुजा नर्सरी मधे, त्यामुळे पुढची एक दोन वर्षं एखाद्या छोट्या शाळेत गेल्या असत्या तरी फारसा फरक नसता पडला.. पण प्रश्न होता त्यानंतरच्या शिक्षणाचा. कारण अजून दोन अडीच वर्षांनी संग्राम फील्ड मधून परत आल्यानंतर जेव्हा ते सगळे एकत्र राहणार तेव्हा तिथल्या एखाद्या चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळणं हेही आवश्यक होतं.

दुसरा पर्याय होता- पुण्याला नम्रताच्या माहेरी राहायचा. पण तो पर्याय स्वतः नम्रतालाच मान्य नव्हता. याबाबतीत तिचे विचार अगदी स्पष्ट होते... माहेरपणाला म्हणून थोडे दिवस तिकडे जाऊन राहाणं वेगळं आणि सलग दोन अडीच वर्षं राहाणं वेगळं!

तसं पाहता नम्रताचा मोठा भाऊ आणि भावजय खूपच प्रेमळ होते. तिची श्रेयावहिनी तर तिच्यासाठी मोठ्या बहिणीच्या जागी होती. जेव्हा जेव्हा नम्रता मुलींना घेऊन माहेरी जायची तेव्हा प्रत्येक वेळी वहिनी आणि दादा अगदी उत्साहानी, आपलेपणानी त्यांचं आदरातिथ्य करायचे. नंदिनी आणि अनुजाला पण खूप आवडायचं पुण्याला मामाच्या घरी जायला! दादाचा मुलगा अथर्व पण त्या दोघींचा फेव्हरिट भाऊ होता.

नंदिनी तीन चार वर्षांची असताना एकदा नम्रता तिला घेऊन माहेरी आली होती, त्यावेळी अथर्वनी नंदिनी ला 'झुकझुक झुकझुक अगीनगाडी' हे गाणं शिकवलं होतं.. तेव्हापासून प्रत्येक वेळी पुण्याला जाताना नंदिनी तेच गाणं म्हणत राहायची. आणि आता तिचं ऐकून अनुजा पण तिच्या सूरात आपला सूर मिसळायची !

एकदा तर अनुजा तिच्या मामीला म्हणाली होती," तू खरंच आमची मामी आहेस का?" तिच्या या प्रश्नाचा रोख कोणाच्याच लक्षात नाही आला, पण तिच्या पुढच्या प्रश्नानी मात्र सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली होती. अनुजानी विचारलं," मग त्या गाण्यातल्या सारखी तू आम्हांला रोज रोज पोळी आणि शिकरण का नाही देत?आणि गुलाबजाम सुद्धा ?" आणि गंमत म्हणजे, आपलं 'मामीपण' सिद्ध करण्यासाठी म्हणून आता प्रत्येकवेळी श्रेया अगदी प्रेमानी मुलींकरता शिकरण आणि गुलाबजाम करायची....अगदी आठवणीनी !

पण तरीही 'माहेरी राहाणं' हा पर्याय नम्रताला मान्य नव्हता. 'ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये' हे नात्यांबद्दलचं सत्य ती जाणून होती.

या अशा पार्श्वभूमीवर नम्रताकडे एकच पर्याय होता...SF ऍकोमोडेशन घेऊन राहाणं !

देवघरातल्या सगळ्या देवांना पुन्हा एकदा नमस्कार करून नम्रता स्वैपाकघरात शिरली. संग्राम किती वाजेपर्यंत येईल हे काही नक्की नव्हतं. पण तिनी तिच्याकडून जेवणाची तयारी सुरू केली. आज मुली पण जाग्याच होत्या. दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे मुलींना शाळेसाठी लवकर उठायची पण काही गडबड नव्हती.त्यामुळे नम्रतानी दुपारी एकत्र जेवण्याचा फिस्कटलेला प्लॅन आत्ता रात्री अंमलात आणायचं ठरवलं.

'आजचा हा डिनर स्पेशल होण्यासाठी काय बरं करावं?' एकीकडे चौघांची पानं मांडता मांडता तिचं विचारचक्र चालू होतं. तिनी घड्याळात पाहिलं- पावणेआठ होत आले होते...म्हणजे अजून कमीतकमी अर्धा पाऊण तास तरी होता जेवायला....'बस्स्, इतका वेळ पुरेसा आहे..' असं म्हणत ती पटापट कामाला लागली.

बाकी स्वैपाक तर तयारच होता.. फक्त त्याला थोडे स्पेशल 'personal touches' दिले की काम झालं. अशी ही ऐन वेळेची धावपळ नम्रताला काही नवीन नव्हती. आज पर्यंत कितीतरी वेळा घरी अचानक आलेल्या पाहुण्यांना तिनी स्वैपाक करून जेवायला वाढलं होतं. युनिट मधले अविवाहित ऑफिसर्स अधूनमधून यायचे घरी जेवायला...आणि तेही एकदम अचानक! कधी तिच्या हातच्या एखाद्या पदार्थांची आठवण झाली म्हणून, तर कधी मेस मधलं जेवण खाऊन कंटाळा आला म्हणून....

कारण काहीही असलं तरी ते सगळे ज्या हक्कानी तिच्याकडे जेवायला मागायचे ना त्यामागचं त्यांचं प्रेम बघून नम्रताही खूप मनापासून त्यांच्यासाठी स्वैपाक करायची.

पण हे फक्त नम्रताच्या बाबतीतच नव्हतं , तर युनिट मधल्या सगळ्याच ladies तितक्याच आपुलकीनी या सगळ्या ज्युनिअर ऑफिसर्स चे लाड करायच्या.

या अशा 'on the job training ' मुळे आता नम्रता या बाबतीत एकदम एक्सपर्ट झाली होती.

तिनी फ्रीज उघडून आत एक नजर टाकली. एक दोन मिनिटं विचार केल्यावर तिच्या चेहेऱ्यावर हसू आलं. तिचा मेन्यू ठरला होता. तिनी फ्रीज मधला केक बाहेर काढला. फ्रीजर मधे आईस्क्रीम होतंच. तिनी फ्रूट बास्केट मधून केळी आणि सफरचंद घेतली आणि पुढच्या काही मिनिटांत 'ट्राईफल पुडिंग' तयार करून फ्रीजमधे सेट होण्यासाठी ठेवून दिलं. "दोघी मुली खुश होतील पुडिंग बघून "- नम्रता स्वतःलाच शाबासकी देत म्हणाली.

"आता नवरोबा साठी काय बरं करावं?" खरं सांगायचं तर हा प्रश्न कायमच नम्रताचा पाठलाग करायचा. तसे संग्रामचे खाण्या पिण्या च्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे नखरे नसायचे. ती जे त्याच्यासमोर ठेवेल ते तो आवडीनी खायचा. पण जर त्याला कधी विचारलं की ' आज काय बनवू?' तर त्याचं उत्तर ठरलेलं असायचं," काहीही बनव. तू जे बनवशील आणि जसं बनवशील ते खाईन मी मुकाट्यानी." यातल्या 'जसं' या शब्दावर अवाजवी जोर दिला जायचा !

पण मग अशा वेळी नम्रताचंही उत्तर ठरलेलं असायचं.." मी जे काही बनवते ते नेहेमी चांगलंच असतं, आणि म्हणूनच तू काही न बोलता खातोस!"

पुन्हा एकदा नम्रता आठवणींत गुंतायला लागली. एकीकडे संग्राम बद्दल विचार करत तिनी त्याच्या आवडीची काकडीची कोशिंबीर करायला घेतली. पुढच्या काही मिनिटांत पापड आणि मिरगुंडही तळून झाले. " वाह मॅडम! क्या बात है।" नम्रतानी परत एकदा स्वतःच स्वतःची पाठ थोपटली आणि ती मुलींबरोबर कार्टून शो बघायला बसली.

तिच्या कुशीत शिरत नंदिनी नी विचारलं," आई, तू पोह्याचे पापड तळलेस ना ?"

"हो,तुला कसं कळलं ? वास आला वाटतं या नकट्या नाकाला!" नम्रता तिचं नाक चिमटीत पकडून कौतुकानी म्हणाली.

"Wow, मला पण खूप आवडतात पोह्याचे पापड ! मी खाऊ आत्ता?" अनुजानी विचारलं.

"अगं, बाबा आले की आपण सगळे एकत्रच बसूया जेवायला. उद्या तुम्हांला सुट्टी आहे ना, म्हणून आज तुम्ही हवं तितका वेळ जागं राहू शकता.आणि हो...आज मी ट्राईफल पुडिंग पण केलंय."

हे म्हणजे मुलींसाठी अगदी ' एक पे दूसरा फ्री' ऑफर सारखं होतं.

अचानक नंदिनीला काहीतरी आयडिया सुचली.. ती अनुजा ला म्हणाली," चल, आपण आजच्या डिनर साठी एक मस्त मेन्यू कार्ड बनवूया. मेस मधे पार्टीच्या वेळी असतं ना तसं!" तिनी नम्रताकडून सगळा मेन्यू माहित करून घेतला आणि दोघी त्यांच्या खोलीत पळाल्या. आता त्यांना त्या कार्टून शो मधल्या टॉम आणि जेरी मधे काही इंटरेस्ट राहिला नव्हता. टीव्ही बंद करून नम्रता देखील लिव्हिंग रूमच्या खिडकी पाशी जाऊन उभी राहिली - संग्रामची वाट बघत!

आता बाहेर चांगलाच काळोख पसरला होता. रस्त्यावरच्या दिव्यांच्या उजेडामुळे मधे मधे स्पॉट लाईट्स टाकल्यासारखा भास होत होता. कॉलनी मधले रस्ते आम रहदारीचे नसल्यामुळे नेहेमीच शांत असायचे. एरवी हीच शांतता नम्रताला प्रिय असायची ...ट्रॅफिक नाही, गाड्यांच्या हॉर्नस् चे आवाज नाहीत...त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण नाही. किती फ्रेश वाटायचं तिला ते वातावरण. त्या शांततेची सवयच झाली होती आता तिला.

पण आज मात्र त्या शांततेमुळे तिला काहीसं एकटं पडल्यासारखं वाटत होतं. 'कधी एकदा संग्रामच्या गाडीचा हॉर्न ऐकू येतो' असं झालं होतं तिला.

" आई, हे बघ ...आम्ही मेन्यू कार्ड बनवलं... मस्त आहे ना !" अनुजा नम्रताच्या डोळ्यांसमोर कार्ड नाचवत म्हणाली. नम्रतानी कार्ड हातात घेऊन बघितले... वरच्या बाजूला बरोब्बर मध्यभागी थोडा वेडावाकडा पण गोलाकार चंद्र आणि त्याच्या भोवती छोट्या मोठ्या चांदण्या..… नम्रता काही बोलणार इतक्यात अनुजा म्हणाली," खरं म्हणजे मला ट्राईफल पुडिंग चं चित्र काढायचं होतं, पण जमतच नव्हतं नीट . मग ताईच म्हणाली की 'आपण डिनर साठी कार्ड बनवतो आहोत ना म्हणून तू चंद्र आणि तारे काढ '.... अनुजाच्या डोळ्यांत तिच्या ताईबद्दल कौतुक अगदी ओसंडून वाहत होतं. "ताई किती हुशार आहे ना गं! तिला किती मस्त मस्त आयडिया सुचतात."

"हो गं! आणि तुझं ड्रॉइंग बघून पण खरंच वाटतंय बरं का रात्र झालीये असं !!!" नम्रता कार्ड उघडत म्हणाली. कार्डच्या आत उजव्या बाजूला जेवणाचा सगळा मेन्यू लिहिला होता. पण त्यातही नंदिनीची कलात्मकता दिसून येत होती....तिनी एका मोठ्या वर्तुळात सगळया पदार्थांची नावं लिहिली होती.....म्हणजे आपण एखादं ताट वाढतो ना तसं... जिथे भाजी वाढतात तिथे भाजीचं नाव, डाव्या बाजूला पापड, कोशिंबीर यांची नावं वगैरे वगैरे.... नम्रताला खरंच खूप कौतुक वाटलं तिचं ! तिनी नंदिनीला विचारलं," बेटु, तुला कसं माहीत कुठे काय वाढतात ते?" त्यावर अगदी सहजपणे ती म्हणाली," तू नेहेमी नैवेद्याचं ताट असंच तर वाढतेस की!"

'मुलं आपलं वागणं किती लक्षपूर्वक बघत असतात, त्यातून शिकत असतात...याचं हे अजून एक उदाहरण' नम्रताच्या मनात आलं. तिनी नंदिनीला जवळ घेतलं आणि म्हणाली," मस्त झालंय कार्ड...एकदम युनिक !"

"पूर्ण बघ ना.." असं म्हणत नंदिनी नी कार्डच्या आत डाव्या बाजूला बोट दाखवलं. तिकडे लक्ष जाताच नम्रताच्या डोळ्यात टचकन पाणी आलं...नंदिनीनी एका युनिफॉर्म मधल्या माणसाचं चित्र काढलं होतं. त्यात name tab वर तिच्या बाबांचं नाव होतं आणि चित्राच्या वर लिहिलं होतं... 'आजचे प्रमुख पाहुणे '

"आई, बाबांना आवडेल ना गं आमचं कार्ड ?" दोघी मुलींनी विचारलं. "इतकं सुंदर कार्ड बनवलंय तुम्ही...नक्कीच आवडेल त्यांना." नम्रता आपले अश्रू लपवत घोगऱ्या आवाजात म्हणाली.

तेवढ्यात रस्त्याच्या वळणावर ओळखीचा हॉर्न ऐकू आला. नम्रता काही बोलणार इतक्यात "बाबा आले, बाबा आले" म्हणत अनुजा आणि नंदिनी दाराच्या दिशेनी धावल्या.

नम्रतानी अक्षरशः धावत जाऊन दार उघडलं. दाराबाहेर संग्रामला बघताच दोघी मुली पळत जाऊन त्याला बिलगल्या. त्याच्याही चेहेऱ्यावर आनंद अगदी स्पष्ट दिसत होता. दिवसभराचा कामाचा शीण मुलींना बघितल्यावर एका क्षणात नाहीसा झाला होता. त्या तिघांना असं इतकं खुश बघून नम्रताला तिच्या कॅमेरा ची आठवण झाली. पण यावेळी कॅमेराच्या फंदात न पडता समोरचं दृश्य तिनी आपल्या मनातच साठवून ठेवलं.

"बाबा, लवकर चला घरात. तुम्हांला एक गंमत दाखवायची आहे." दोघी मुली संग्रामला ओढत घरात घेऊन आल्या.

घरात शिरल्या शिरल्या संग्राम क्षणभर थांबला. धुपाचा मंद सुगंध घरभर दरवळत होता.त्यानी एक दीर्घ श्वास घेतला... अहाहा ! त्याचं मन एकदम प्रसन्न झालं. त्यानी नम्रताकडे बघितलं. तिची नजर जणूकाही त्याच्यावरच खिळली होती. त्यानी तिला नजरेनीच 'थँक यू' म्हटलं ...तिनी पण हसून हलकेच आपली नजर झुकवत त्याला प्रतिसाद दिला.

संग्रामनी कधी नम्रताला बोलून नाही दाखवलं पण त्याला नेहेमीच तिचं कौतुक वाटायचं.

'मला कधी काय हवं असतं ते हिला न सांगताच कसं कळतं ?' त्याला सतत हा प्रश्न पडायचा. एका भावुक क्षणी त्यानी तसं विचारलंही होतं तिला. त्यावर ती म्हणाली होती," आपण जेव्हा एखाद्याला आपलं मानतो, त्याच्यावर मनापासून प्रेम करतो ना; तेव्हा न सांगता देखील सगळं कळतं."

"या लॉजिक ला काही अर्थ नाहीये..असं असेल तर मग मला का नाही कळत तुझ्या मनातलं ?"त्यानी वैतागून म्हटलं होतं.

त्याला अजून चिडवत नम्रता म्हणाली होती," कारण माझं प्रेम तुझ्या प्रेमापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे..... Simple logic !"

तिनी जरी गमतीनी म्हटलं असलं तरी संग्रामला अगदी मनापासून पटलं होतं ते.

संग्रामचा स्वभाव तसा पहिल्यापासूनच अबोल- स्वतःच्या भावना लोकांसमोर उघड करून दाखवणं त्याला फारसं जमायचं नाही....इतकंच काय पण त्याच्या इच्छा, अपेक्षा पण कधी तो जाहीर नाही करायचा. आणि नेमकं हेच नम्रताला खटकायचं !

तिनी त्याला तसं एक दोन वेळा बोलूनही दाखवलं होतं," तुला काय आवडतं, काय नाही - हे तू सांगितल्याशिवाय कसं कळेल मला?" तिचा मुद्दा अगदी योग्य होता. पण त्यावर संग्रामचं उत्तरही ठरलेलं असायचं," त्यात सांगण्यासारखं काय आहे? तुला जे योग्य वाटतं ते तू करत जा. तुझी प्रत्येक गोष्ट माझ्या आवडीप्रमाणे असायला पाहिजे असं कुठे लिहिलंय!"

"अरे, पण मला आवडतं तुझ्या आवडीच्या गोष्टी करायला !" या नम्रताच्या वक्तव्यावर तर तो अजूनच वैतागायचा आणि म्हणायचा,"Stop acting like a typical wife."

शेवटी - 'एका जगावेगळ्या माणसाशी आपलं लग्न झालंय' असा उदात्त विचार करून ती स्वतःचं समाधान करून घ्यायची. पण मग हळूहळू तिला त्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी कळायला लागल्या. तो जे शब्दांतून जाहीर करत नव्हता ते आता त्याच्या चेहेऱ्यावरुन, त्याच्या हावभावातून तिच्यापर्यंत पोचत होतं. एकदा गमतीनी ती संग्रामला म्हणाली होती,"बाझीगर सिनेमात ते गाणं आहे ना- किताबें बहुतसी पढी होंगी तुमने - ते बहुतेक आपल्याला बघूनच लिहिलंय. फक्त त्यात शाहरुख खान शिल्पा शेट्टी चा चेहेरा वाचत असतो...इथे ते काम मी करते!"

"तुला प्रत्येक situation साठी अशी गाणी नाहीतर मराठी म्हणी बऱ्या सुचतात," असं म्हणत त्यावेळी संग्रामनी तिचं म्हणणं हसण्यावारी नेलं होतं पण खरं सांगायचं तर त्यालाही तिचं म्हणणं मनापासून पटलं होतं. त्याच्या आवडी निवडी, त्याचे मूड्स सगळं काही सांभाळायची ती !

त्याच्या कामाचं स्वरूप असं होतं की कितीतरी वेळा त्याला घरासाठी, नम्रता आणि मुलींसाठी वेळ देणं शक्य नसायचं ; पण प्रत्येक वेळी नम्रता अगदी हसत हसत सगळी परिस्थिती सांभाळून घ्यायची. कधी तक्रार नाही की नाराजीचा सूर नाही.

मुलींचे वाढदिवस, त्यांचे अभ्यास, परीक्षा, स्पोर्ट्स डे, annual डे, मुलींच्या आणि (स्वतःच्या सुद्धा) तब्येतीच्या तक्रारी , बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई.....आणि या सगळ्यांबरोबर एका ऑफिसरची बायको म्हणून तिच्यावर असलेल्या आर्मी च्या जबाबदाऱ्या.........या आणि अशा अनेक लढाया ती एकटी लढायची ! आणि म्हणूनच संग्राम तिला 'One woman army' म्हणायचा.

"बाबा, तुम्ही प्लीज डोळे बंद करा ना...तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे"......अनुजा संग्रामचा हात ओढत म्हणाली. भानावर येत तो म्हणाला," अरे वा! मस्तच की! पण काय आहे ते तरी सांगा."

"आत्ताच सांगितलं तर मग सरप्राईज कसं राहणार?" नंदिनी म्हणाली.

"हं, खरंच की.." असं म्हणत संग्रामनी अनुजाला पाठुंगळी घेतलं, तिनी तिच्या चिमुकल्या हातांनी त्याचे डोळे झाकले आणि नंदिनी त्याचा हात धरून त्याला डायनिंग टेबल पाशी घेऊन गेली.

संग्राम ला घेऊन मुली डायनिंग रूम मधे आल्या. नंदिनी नी टेबल वर संग्रामच्या ताटाशेजारी ते मेन्यू कार्ड ठेवलं आणि अनुजाला खूण केली. मग अगदी फिल्मी स्टाईल मधे "ढँणटँढँण" म्हणत अनुजा नी त्याच्या डोळ्यांवरचे हात काढले.

संग्रामनी टेबल वरून नजर फिरवली. आज त्यांच्या दोघांच्या प्लेट्स बरोबर मुलींच्या प्लेट्स ही बघून तो भलताच खुश झाला." अरेच्या, तुम्ही दोघी अजून जेवला नाहीत?" त्यानी अनुजा ला तिच्या खुर्चीवर बसवत मुलींना विचारलं.

"उद्या सुट्टी आहे ना दोघींना, म्हणून मीच म्हणाले की सगळे एकत्रच जेवू. दुपारपासून तूझी वाट बघतायत दोघी." नम्रता पानं वाढता वाढता म्हणाली.

त्यावर संग्राम काही बोलणार इतक्यात नम्रतानी हळूच मेन्यू कार्डच्या दिशेनी इशारा केला. संग्रामनी तो अचूक टिपला आणि कार्ड हातात घेऊन म्हणाला," अरे वा... आज तर पार्टी आहे आपल्याकडे! हे इतकं छान मेन्यू कार्ड कुठून आणलंत ? मेस मधल्या कार्ड पेक्षा पण मस्त आहे हे तर !"

"कुठून आणलं नाहीये काही....मी आणि ताईनी घरीच बनवलंय. मी बाहेरचं drawing काढलंय आणि ताईनी आतलं.." अनुजानी एक दमात सांगून टाकलं.

"हं, तरीच म्हटलं हे कार्ड इतकं स्पेशल कसं काय ? अरे वाह...चंद्र तारे ...छान च काढलंयस की!" संग्राम ची तारीफ ऐकून अनुजा एकदम खुश झाली. खुर्चीवर उभी राहात कार्ड उघडून दाखवत ती म्हणाली,"आतमधे तर बघा...अजून एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी .."

संग्रामनी कार्ड बघितलं- त्याची नजर डाव्या बाजूच्या चित्रावर गेली.. नंदिनी अपेक्षेनी त्याच्याकडे बघत होती. तिच्या चेहेऱ्यावर उत्सुकता अगदी स्पष्ट दिसत होती. पण काही न बोलता ती तिच्या बाबांच्या प्रतिक्रियेची वाट बघत होती.

संग्रामच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते. आधी कुतुहल मग मुलींबद्दलचं कौतुक, प्रेम आणि अभिमान....त्यानी नंदिनी कडे बघितलं आणि म्हणाला,"थँक यू बेटा! खूप मस्त आहे कार्ड. तुझी ही ताटात मेन्यू लिहायची आयडिया मला खूप आवडली. आणि ही चीफ गेस्ट ची पण....एकदम मस्त !"

"आता मी हे कार्ड लॅमीनेट करून माझ्या फाईलमधे ठेवणार आहे. " नंदिनीला जवळ घेत तो म्हणाला.

"आपल्याकडे जेव्हा कोणी पाहुणे येतील तेव्हा त्यांच्यासाठी पण दोघी असंच कार्ड बनवाल का?"

'बाबांना आपलं कार्ड आवडलं' हे कळल्यावर दोघी खूप खुश झाल्या. त्या दोघींसाठी संग्राम कडून होणारं कौतुक सगळ्यात महत्त्वाचं असायचं.'सारी दुनिया एक तरफ, और हमारे बाबा एक तरफ'....असं समीकरण होतं त्यांचं.

"चला आता, लवकर जेवायला बसूया." बाप-लेकींमधलं संभाषण मधेच थांबवत नम्रता म्हणाली.

जेवताना एकीकडे दोघी मुलींची अखंड बडबड चालू होती. कित्ती कित्ती गमतीजमती सांगायच्या होत्या बाबांना... शाळेतली मजा,स्विमिंग पूलमध्ये केलेली दंगा मस्ती, एकमेकींच्या तक्रारी.....

गप्पांच्या नादात जेवण कधी संपलं कळलंच नाही कोणाला.

"बाबा, आज तुम्ही या ना आम्हांला झोपवायला!" अनुजानी संग्रामकडे लाडिक हट्ट केला.तिला दुजोरा देत नंदिनी पण म्हणाली," हो बाबा, प्लीज , या ना. आणि आज तुम्ही आम्हांला एखादी मस्त गोष्ट सांगा.....आजोबा सांगतात ना तशी."

"हो, पण ती ससा आणि कासवाची नाही बरं का... तुम्ही सारखी सारखी तीच गोष्ट सांगता...आज नवीन सांगा." अनुजा तोंड फुगवत म्हणाली.

"गोष्ट !अरे बापरे !!!" संग्रामला जणू काही धर्मसंकटात पडल्यासारखं वाटत होतं. कारण त्याचा आणि गोष्टींचा अगदी दूर दूर पर्यंत संबंध नव्हता.अनुजा म्हणाली तसं, त्याला फक्त एकच गोष्ट माहीत होती.

"आपण नुसत्याच गप्पा मारुया ना.. मला गोष्टी लक्षातच नाही राहात." संग्रामनी आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला.

त्याचं बोलणं ऐकून अनुजा काही क्षण विचारात पडली. आणि मग कंबरेवर हात ठेवून त्याच्याकडे बघत म्हणाली," अरेच्या , म्हणजे मग तुम्ही आजोबांसारखे म्हातारे झाल्यावर आम्हांला गोष्टी नाही सांगणार ??"

तिचा तो निरागस प्रश्न आणि त्याहीपेक्षा जास्त-प्रश्न विचारतानाचा तिचा आविर्भाव बघून बाकी तिघांची हसता हसता पुरेवाट झाली. पण त्यामुळे अनुजा अजूनच गोंधळात पडली. "अगं, मी खरंच म्हणतीये. गंमत करत नाहीये."

तिला समजावत नंदिनी म्हणाली," अगं, बाबा जेव्हा आजोबांसारखे म्हातारे होतील तेव्हा आपण सुद्धा बाबांसारख्या मोठ्या झालेलो असू ना? मग? ते कसे सांगणार आपल्याला गोष्टी?"

आता अनुजाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ती पण "ए, खरंच की..." म्हणत हसायला लागली.

पण 'बाबांकडून गोष्ट ऐकायचा' दोघींचा निर्धार अजूनही कायम होता. त्यांच्या बालहट्टापुढे संग्रामचं काही चालेना.. त्यानी मदतीच्या अपेक्षेनी नम्रताकडे पाहिलं. त्याला असा हतबल झालेला बघून नम्रताच्या मनात एक मजेशीर विचार आला,' सीमेवर शत्रूला धूळ चारणारा हा शूरवीर मुलींच्या निरागस हट्टापुढे मात्र चारो खाने चित झालाय."

तिला हसताना बघून संग्राम अजूनच गडबडला. शेवटी न राहवून नम्रता त्याच्या मदतीला धावली. ती मुलींना म्हणाली," अगं, गोष्टी तर काय कोणीही सांगेल तुम्हांला.. त्यात काय एवढं ! पण NDA मधल्या गमतीजमती तर फक्त बाबाच सांगू शकतात ना? आज तुम्ही त्याच ऐका ."

मुलींना ही आयडिया एकदम आवडली. आता त्या दोघी "NDA, NDA..." करत संग्रामच्या अवतीभोवती नाचायला लागल्या.

संग्राम कृतज्ञता भरलेल्या नजरेनी नम्रताकडे बघत तिला म्हणाला," थँक्स, you are my saviour. आपका ये एहसान मैं कैसे चुकाऊंगा?"

"ते बघू नंतर... आधी मुली काय म्हणतायत ते बघ." खोलीतून बाहेर जाता जाता नम्रता म्हणाली. तिच्या मागे येत संग्राम म्हणाला," सकाळी मी म्हणालो होतो त्याबद्दल काही विचार केलास का ? कुठे राहायचं ठरवलंयस? मी मुलींना झोपवून येतो, मग बोलू आपण त्या विषयावर."

पुढच्या काही मिनिटांतच मुलींच्या खोलीतून हसण्या खिदळण्याचे आवाज येऊ लागले. संग्रामचे NDA मधले किस्से ऐकताना मुली पण खूप एन्जॉय करत होत्या. मधूनच 'बाबा, तुम्ही किती ब्रेव्ह आहात... तुम्हांला भीती नाही वाटली ....' असे मुलींचे रिमार्कस ऐकू येत होते.

थोड्या वेळानंतर हळूहळू आवाज कमी होत गेला... नम्रतानी मुलींच्या खोलीत डोकावून बघितलं- अनुजा संग्रामच्या कुशीत झोपून गेली होती. नंदिनी मात्र डोळ्यांवरची झोप परतवत,बाबांशी गप्पा मारण्यात दंग होती. पण नम्रताच्या अंदाजाप्रमाणे पाच एक मिनिटांत तिचीही विकेट पडणार होती.

बराच वेळ झाला तरी संग्राम आला नाही म्हणून नम्रता परत खोलीत डोकावली. बघते तर काय- मुलींबरोबर त्यांचे बाबा सुद्धा गाढ झोपी गेले होते.

त्या तिघांना असं शांत झोपलेलं बघून नम्रताला त्यांच्यावर अचानक खूप प्रेम आलं. किती निरागस दिसत होते तिघंही!

'आता संग्राम जाईपर्यंत पुढच्या एक दीड महिन्यात या तिघांनाही असंच एकत्र वेळ घालवायला प्रोत्साहित केलं पाहिजे'- नम्रताच्या मनात आलं.' एकमेकांपासून दूर असताना या अशा आठवणीच उपयोगी ठरतात...'

या आत्ताच्या क्षणाला कायमचं जतन करण्यासाठी ती कॅमेरा आणायला निघाली, तेवढ्यात तिला तिच्या आजीचं एक वाक्य आठवलं- 'झोपलेल्या माणसाचा कधी फोटो काढू नये..अपशकुन असतो तो.'

एरवी नम्रता या असल्या विचारांना अंधश्रद्धा मानायची. यावरून बऱ्याच वेळा तिचे आणि तिच्या आजीचे वाद ही व्हायचे. पण आज या हळव्या क्षणी का कोण जाणे तिनी तिच्या आजीचं ऐकायचं ठरवलं.

चोरपावलांनी खोलीत जाऊन तिनी तिघांची पांघरुणं सारखी केली, लाईट बंद केला आणि बाहेर येऊन हलक्या हातानी खोलीचं दार बंद केलं.

रविवारी पहाटे नेहेमीपेक्षा जरा लवकरच जाग आली नम्रताला. तिनी हळूच मुलींच्या खोलीचं दार उघडून पाहिलं- तिघंही शांत झोपले होते. त्यांना तसंच त्यांच्या स्वप्नांच्या दुनियेत सोडून ती स्वैपाकघरात गेली. स्वतःसाठी मस्त आलं घालून चहा बनवला. वाफाळलेल्या चहाचा कप घेऊन ती बाहेर बागेतल्या झोपाळ्यावर जाऊन बसली. एकीकडे आपल्या पायानी हलकेच जमिनीला रेटा देत ती झोका घेत होती. हळूहळू आकाशात केशरी रंगाची उधळण व्हायला सुरुवात झाली होती. सूर्यकिरणांच्या प्रकाशात बागेतल्या हिरवळीवरचे दवबिंदू मधूनच चमकत होते. समोरच्या कडुनिंबाच्या त्या मोठ्या फांदीच्या ढोलीत राहणारं चिमणपक्षांचं जोडपं खाली उतरून गवतात चोची मारत फिरत होतं.

खरं म्हणजे नम्रताला बागकाम वगैरे मधे फारसा इंटरेस्ट नव्हता पण या घराच्या पुढे मागे इतकी मोकळी जागा होती..जर नीट काळजी घेतली नसती तर गवताचं रान माजलं असतं घराभोवती.. म्हणून मग तिच्या एका मैत्रिणीच्या मार्गदर्शनाखाली नम्रतानी पुढच्या बागेत वेगवेगळी फुलझाडं लावली, मुलींना खेळण्यासाठी म्हणून एका कोपऱ्यात वाळू घालून छोटंसं 'sand pit' बनवलं. तिचा हा उत्साह बघून संग्रामनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला बागेत एक छानसा झोपाळा बसवून घेतला....वर छान फ्रिलची शेड होती त्याला ! तेव्हापासून दर रविवारी सकाळचा चहा ते दोघं या झोपाळ्यावर बसूनच घ्यायचे. दोघी मुली आणि त्यांचे मित्र मैत्रिणी सुट्टीच्या दिवशी नुसता धुडगूस घालायचे तिच्या बागेत. संग्रामनी त्या सगळ्यांसाठी कडुनिंबाच्या एका फांदीवरून rope ladder पण लावून दिला होता.

विचारांच्या नादात नम्रता उठून घराच्या मागच्या बाजूला असलेल्या किचन गार्डन मधे गेली.

एका कोपऱ्यात तिनी टोमॅटो, वांगी, मिरच्या, भेंडी वगैरे भाज्या लावल्या होत्या. त्याचबरोबर मेथी, कोथिंबीर, पुदिना सारखा हिरवा पाला पण होता. बरोब्बर मध्यभागी एक मोठ्ठं आळं करून मुलींनी त्यात आंब्याच्या चार पाच कोयी पुरल्या होत्या . रोज दोघी तिथे पाणी घालायच्या. मागच्याच आठवड्यात एक छोटंसं रोपटं पण उगवलं होतं तिथे! किती खुश झाल्या होत्या दोघी ते बघून...

लगेच त्यांचे प्लॅन्स पण सुरू झाले- त्या झाडाला जे आंबे येतील त्यांचा मँगो शेक करायचा का आम्रखंड ? बराच वेळ चर्चा झाल्यावरही जेव्हा त्या बाबतीत एकमत होईना तेव्हा मग त्या दोघी निवाड्यासाठी नम्रता कडे आल्या होत्या.

"हे म्हणजे अगदी 'बाजारात तुरी' सारखंच झालं की गं !" नम्रता हसून म्हणाली होती," आधी आंबे लागू दे झाडाला, मग आपण मिल्कशेक आणि आम्रखंड दोन्ही करूया की !"

त्यावर नंदिनी नी विचारलं," आई, अजून किती दिवस लागतील आंबे यायला ?"

" मला नक्की नाही माहित, पण बहुतेक अजून तीन चार वर्षं तरी लागतील. पण तोपर्यंत आपण इथून दुसऱ्या गावाला गेलेलो असू." नम्रता नी गौप्यस्फोट केला.

"म्हणजे ? आपल्याला या झाडाचे आंबे नाही खाता येणार?" नंदिनीनी नाराजीच्या सूरात विचारलं.

"अगं, त्यात एवढं वाईट वाटण्यासारखं काय आहे? आपण जरी नसलो तरी त्या वेळी इथे जे कोणी राहात असतील त्यांना मिळतील ना तुम्ही लावलेल्या झाडाचे आंबे !" नम्रताचं हे लॉजिक अनुजाला काही पटलं नव्हतं.

"ए, this is not fair." ती तोंड फुगवून म्हणाली.

तिला समजावत नम्रता म्हणाली," तुम्ही लॉन मधल्या मोठ्या कडुनिंबाच्या झाडाखाली खेळता ना रोज ? आणि त्या रोप लॅडर वर जेव्हा सगळे मिळून 'आर्मी आर्मी' खेळता तेव्हा किती मजा येते की नाही ? ते झाड आपण नाही लावलं .. आपल्या आधी जे कोणी या घरात राहात होते त्यांनी लावलं होतं ... हो ना ? तसेच तुम्ही लावलेल्या झाडाचे आंबे दुसऱ्या कोणाला तरी खायला मिळतील."

दोघी मुलींना तिचं म्हणणं कळत होतं पण वळत नव्हतं. त्यांचे उदास चेहरे बघून नम्रता पुढे म्हणाली," काय माहित... कदाचित अजून काही वर्षांनंतर पुन्हा आपली पोस्टिंग याच गावात होईल आणि आपण पुन्हा याच घरात राहायला येऊ ! आणि मग तेव्हा तुम्हांला आंबे खाता येतील..!"

नुसत्या कल्पनेनीच मुली खुश झाल्या होत्या.

त्यांना हे सगळं सांगत असताना नम्रताला त्यांच्या देहराडून च्या घरातली गंमत आठवली. संग्रामची जेव्हा देहराडून ला पोस्टिंग झाली होती तेव्हा त्यांच्या घराच्या बागेत एक मोठ्ठं लीची चं झाड होतं. सीझन मधे खूप बहरून जायचं ते झाड लीचीं नी ! नंदिनी तेव्हा जेमतेम तीन वर्षांची होती - नुकतीच प्ले स्कूल मधे जायला लागली होती ती. तिला खूप आवडायची त्या झाडाची लीची... रोज सकाळी शाळेत जायच्या आधी ती अक्षरशः लीची चा ब्रेकफास्ट करून जायची.

एक दिवस दुपारच्या वेळी एक वयस्कर जोडपं घरी आलं. नम्रतानी दार उघडल्यावर त्यांनी दोघांनी आपली ओळख करून दिली..." गुड आफ्टरनून...आपण एकमेकांना प्रत्यक्ष ओळखत नाही. पण साधारण तेरा चौदा वर्षांपूर्वी आमची देहराडून मधे पोस्टिंग झाली होती आणि तेव्हा आम्ही याच घरात राहात होतो. आमच्या मुलानी शाळेच्या एका प्रोजेक्ट साठी म्हणून बागेत एक लीचीचं झाड लावलं होतं. पण नंतर थोड्याच दिवसांत आम्ही दुसऱ्या गावाला गेलो.

आत्ता इतक्या वर्षांनंतर एका लग्नासाठी आलोय इथे. आपलं घर पुन्हा एकदा बघायची खूप इच्छा आणि उत्सुकता होती, म्हणून आलोय. आणि अजून एक काम होतं... आमच्या मुलानी सांगितलंय - त्यानी लावलेलं ते झाड किती मोठं झालंय ते बघायला!"

त्यांचं ते बोलणं ऐकून नम्रताला एकदम गहिवरून आलं. त्यांच्याबरोबर एक इन्स्टंट कनेक्शन निर्माण झालं होतं. तिनी त्यांना सगळं घर दाखवलं. बागेतलं ते लीचीचं झाडही दाखवलं. 'आपल्या मुलानी लावलेल्या छोट्याशा रोपाचा आता इतका मोठा वृक्ष झालाय' हे बघून दोघांना खूप आनंद झाला होता ...'चेहेऱ्यावरून आनंद ओसंडून वाहणे' या वाकप्रचाराचा खरा अर्थ त्या दिवशी समजला होता नम्रताला.

आणि जेव्हा त्यांना कळलं की नंदिनी अगदी आवडीनी त्या झाडाच्या लीची खाते; तेव्हा त्या आनंदाची जागा समाधानानी घेतली होती.

खूप गप्पा रंगल्या होत्या त्या दिवशी त्या सगळ्यांच्या. परत जाताना जुन्या आठवणींसोबत अजूनही काहीतरी घेऊन गेले होते दोघं... खास त्यांच्या मुलासाठी म्हणून नम्रतानी पिशवी भरून लीची दिल्या होत्या बरोबर.

आणि त्या बदल्यात तिला एक खूप महत्त्वाची शिकवण मिळाली होती. - आपण केलेलं कुठलंही सत्कर्म कधी वाया जात नाही. कधी न कधी त्याचं फळ मिळतंच... कधी आपल्याला तर कधी दुसऱ्याला!

"Good morning" अचानक संग्रामचा आवाज ऐकून नम्रता क्षणभर दचकली. तिनी मागे वळून पाहिलं.. संग्राम हातातल्या ट्रे मधे चहाचे दोन कप घेऊन उभा होता. "माझ्याबरोबर चहा प्यायला वेळ आहे का मॅडमकडे?" संग्रामनी खट्याळ हसत नम्रताला विचारलं. "वाह! याला म्हणतात 'चोराच्या उलट्या बोंबा !" नम्रतानी पण तितक्याच खट्याळ स्वरांत उलटा टोला हाणला. त्याच्या हातातले चहाचे कप बघून तिनी विचारलं,"आज अगदी चहा वगैरे! काय झालंय नक्की? हे मस्का पॉलीश कशासाठी?" संग्राम काही बोलणार इतक्यात नम्रताच म्हणाली,"आज पण जायचंय वाटतं ऑफिसमधे ?"

संग्रामच्या चेहेऱ्यावरचा ' तुला कसं कळलं ?' हा प्रश्न अगदी स्पष्ट वाचता येत होता नम्रताला. त्याची उडालेली तारांबळ बघून ती म्हणाली," तू तर एरवी सुद्धा बऱ्याचदा रविवारी ऑफिसमधे जातोस. आता तर युनिट इथून हलणार आहे म्हटल्यावर कामाचं प्रेशर नक्कीच वाढलं असणार ना! त्यामुळे आता पुढचे काही आठवडे तुझ्याकडे आमच्यासाठी जास्त वेळ नसणार याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि त्याबद्दल माझी काहीही तक्रार नाहीये. त्यामुळे तू उगीच अपराधी नको वाटून घेऊ." पुढे होऊन ट्रे मधला कप उचलत ती म्हणाली,"वाह! स्पेशल चहा दिसतोय ..मला आवडतो तसा.. आलं घातलेला!"

नम्रतानी केलेली चहाची तारीफ ऐकून संग्रामची कळी खुलली. दोघंही बोलत बोलत बाहेर झोपाळ्यावर जाऊन बसले.

"सॉरी नम्रता, काल रात्री मुलींना झोपवता झोपवता मी पण झोपून गेलो." संग्राम ओशाळल्या स्वरांत म्हणाला.त्याच्या हातावर हात ठेवत नम्रता म्हणाली," अरे, it's ok. तू पण खूप दमला होतास काल. I can understand. तू असं उगीच सॉरी वगैरे नको म्हणू. तुला suit नाही करत ते." एकदम काहीतरी आठवल्यासारखी नम्रता म्हणाली," मुली उठल्या का? थांब, बघून येते." तिला थांबवत संग्राम म्हणाला," गाढ झोपेत आहेत दोघी. मी बघितलं मगाशीच. पण खरंच , काल रात्री बऱ्याच दिवसांनंतर मुलींबरोबर इतका वेळ घालवता आला. खूप बरं वाटलं गं!"बोलता बोलता संग्राम कुठल्यातरी विचारांत हरवल्यासारखा गप्प झाला. 'आता हे पुढचे काही दिवसच आहेत मुलींबरोबर, नम्रताबरोबर राहायचे... एकदा का युनिट फील्डवर गेली की मग दोन अडीच वर्षांचा दुरावा...अर्थात अधे मधे सुट्टी मिळेलच म्हणा, पण ते म्हणजे- दुधाची तहान ताकावर !' संग्रामच्या मनातली ही चलबिचल त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्याचं हे असं हळवं रूप बघून नम्रताला खूप गलबलून आलं. पण या बाबतीत त्याच्याशी काही बोलायचीही सोय नव्हती. कारण तिला माहित होतं..तिनी जरी त्याला विचारलं की 'कसला विचार करतोयस?" तर त्याचं उत्तर असणार होतं ," काही नाही."

त्यामुळे विषय बदलत नम्रतानी विचारलं," किती वाजता जायचं आहे ऑफिसमधे ? लंचपर्यंत येशील ना परत? आज मुलींना मनप्रीतकडे जायचं आहे. अंगदचा वाढदिवस आहे ना आज. त्याची birthday party संध्याकाळी आहे, पण तिनी मुलींना सकाळपासूनच बोलावलं आहे. अनुजाचा बेस्ट फ्रेंड आहे ना तो! त्यामुळे आज ब्रेकफास्ट नंतर दोघींना तिकडे घेऊन जाईन. थोडा वेळ थांबून मनप्रीतला संध्याकाळच्या पार्टीसाठी थोडी मदतही करीन.तू जेव्हा ऑफीसमधून घरी यायला निघशील ना तेव्हा मला फोन करून सांग. म्हणजे मग मी पण निघेन तिच्या घरून."

"अरे वा ! म्हणजे आज अनुजा मॅडमचा तोरा विचारायलाच नको ! अंगदला मिळणारी गिफ्ट्स ही घरी घेऊन नाही आली म्हणजे मिळवलं." संग्राम कौतुकानी हसत म्हणाला. "हो ना! पण जरी तिनी तसं केलं ना तरी अंगदला काही प्रॉब्लेम नसेल, बघ तू...दोघांचं चांगलंच मेतकूट जमलंय." त्याच्या बोलण्याला दुजोरा देत नम्रता म्हणाली.

"हो, काल रात्री आलं माझ्या लक्षात," संग्राम सांगत होता," अगं, काल रात्री दोघी मला त्यांच्या होमवर्क च्या वह्या दाखवत होत्या ना तेव्हा अनुजाच्या बॅगमधे मला अंगदची पण वही दिसली. मला वाटलं चुकून आली असेल हिच्याकडे...तू एकदा सांगितलं होतंस ना की दोघं एकाच बेंचवर बसतात म्हणून....पण चुकून वगैरे काही नाही..अंगदनी स्वतःच दिली म्हणे तिला...म्हणाला, 'कल मेरा बर्थडे है ना, इसलिये मेरा होमवर्क तुम करके लाओ।' आणि ही पठ्ठी पण अगदी इमाने इतबारे घेऊन आली...आणि जेव्हा मी तिला म्हणालो ना की- असं दुसऱ्याचं होमवर्क आपण नाही करू- तर डोळे मोठे करत मला म्हणाली -'पण अंगद च म्हणाला की 'बर्थडे के दिन कोई होमवर्क नहीं करता ' म्हणून ...आणि एवढंच नाही .. तर म्हणे अंगद नी हिला प्रॉमिस केलंय की हिच्या बर्थडेला तो करेल दोघांचं होमवर्क - आता बोल!!!"

" किती निरागस असतात नाही लहान मुलं," नम्रता म्हणाली," तुला आठवतंय, नंदिनी जेव्हा प्ले स्कूल मधे होती तेव्हा एकदा तिच्या drawing ला दोन स्टार्स मिळाले होते आणि तिच्या मैत्रिणीला एक पण नव्हता मिळाला.. तेव्हा नंदिनीनी आपल्या वहीतला एक स्टार काढून त्या मैत्रिणीच्या वहीत लावला होता-आणि जेव्हा तिला कारण विचारलं तेव्हा किती सहजपणे म्हणाली होती...' तिच्याकडे एकही स्टार नव्हता आणि माझ्याकडे एक एक्स्ट्रा होता म्हणून मी माझ्याकडचा एक स्टार तिला दिला..सेम सेम व्हावं म्हणून!'

पुढचा काही वेळ दोघंही मुलींच्या आठवणींत रमून गेले. अचानक संग्रामला काहीतरी आठवलं आणि तो म्हणाला,"अगं, तुझं काय ठरलंय- कुठे राहणार तुम्ही तिघी?" त्यावर नम्रता म्हणाली," मुलींचं सेशन संपेपर्यंत तर इथेच राहाणं योग्य आहे. पण नंतर मात्र SF अकोमोडेशन मधे शिफ्ट करू."

"ओके, मग आजच मी पुण्यात SFA करता ऍप्लिकेशन पाठवायची तयारी करतो ," उठून आत जाता जाता संग्राम म्हणाला. "नाही, पुण्यात नको...तुझ्या युनिटच्या लोकेशन पासून जे सगळ्यात जवळ असेल ना त्या गावातल्या SFA मधे राहू आम्ही." नम्रतानी एक दमात सांगून टाकलं. तिचं उत्तर ऐकून संग्राम थबकला. मागे वळून तिच्याकडे बघत म्हणाला,"ते तर जम्मू आणि अखनूर दोन्ही ठिकाणी आहे ..चालेल का तुला? पण का गं .. पुणे का नको?"

"जम्मूमधे राहायला काहीच प्रॉब्लेम नाहीये मला." नम्रता त्यांचे चहाचे कप उचलून घेत आत जाता जाता म्हणाली. तिला मधेच थांबवत संग्रामनी विचारलं," पण पुणे का नकोय? मागच्या वेळी जेव्हा मी फील्ड मधे होतो तेव्हा तर तूच मुद्दाम पुण्याच्या SFA मधे राहायचं ठरवलं होतंस ना! मग या वेळी का नको ? काय झालंय नम्रता...तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना?" तिच्याकडे रोखून बघत संग्रामनी विचारलं.संग्रामची नजर चुकवत नम्रता म्हणाली."काहीही काय बोलतोयस?मी का बरं काही लपवीन तुझ्यापासून ? खरंच काही नाही झालं. पण आता यापुढे तुझ्या जितकं जवळ राहता येईल तितकं राहायचं ठरवलंय." पण तिच्या या उत्तरानी संग्रामचं समाधान नाही झालं; नम्रताला त्याच्या नजरेत अजूनही काही प्रश्न दिसत होते. पण त्यानी अजून काही विचारायच्या आधीच ती -' मुली उठल्या का बघते'- असं काहीतरी पुटपुटत घरात निघून गेली.

संग्रामच्या प्रश्नांचा मारा चुकवून नम्रता घरात आली खरी, पण तिला खात्री होती की - आज ना उद्या तिला त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायलाच लागणार होतं. त्याचा स्वभाव ती ओळखून होती. जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा पिच्छा पुरवल्याशिवाय राहायचा नाही तो . खरं म्हणजे त्याच्यापासून लपवण्यासारखं काहीच नव्हतं...पण पुण्याला न राहण्याबद्दलची तिची कारणं त्याला पटतील की नाही याबद्दल नम्रताला शंका होती.

तसं पाहता, आजपर्यंत जेव्हाही काही महत्वाचे निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी दोघांनी आधी त्याबाबतीत एकमेकांशी बोलून, नीट डिस्कस करून मगच एकमतानी सगळे निर्णय घेतले होते..... पाच वर्षांपूर्वी जेव्हा संग्रामची फील्ड पोस्टींग आली होती तेव्हा नम्रता दुसऱ्या वेळी प्रेग्नंट होती. फील्ड असल्यामुळे साहजिकच संग्रामबरोबर तिकडे जाणं तिला शक्य नव्हतं.तेव्हा तिनी आणि नंदिनी नी कुठे राहावं याबद्दल दोघांनी खूप विचार केला होता. खरं म्हणजे संग्रामच्या आई वडिलांकडे राहण्याचा ऑप्शन होता, पण त्याच्या आईच्या मते, नम्रताच्या तेव्हाच्या शारीरिक कंडिशन मधे तिनी त्यांच्या घरी राहणे योग्य नव्हतं. कारण त्या दिवसांमधे ते दोघं नुकतेच नाशिकहून त्यांच्या गणपतीपुळ्याच्या घरात शिफ्ट झाले होते. आणि गणपतीपुळ्याला नम्रताची डिलिव्हरी करण्यापेक्षा पुण्यात करावी असं त्यांचं स्पष्ट मत होतं.त्यासाठी त्या स्वतः पुण्याला नम्रता बरोबर राहायला तयार होत्या.

रिटायरमेंट नंतर आपल्या वडिलोपार्जित घरात जाऊन राहायची संग्रामच्या आईची बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती . त्यांच्या लहानपणापासूनच त्यांना समुद्राचं खूप आकर्षण होतं.

कधी कधी चेष्टेच्या मूड मधे आल्या की त्या नम्रताला म्हणायच्या," अगं, तुला म्हणून सांगते... ह्यांना होकार देण्यामागे मुख्य कारण होतं- ह्यांचं गणपतीपुळ्याचं घर....जेव्हा आम्ही पहिल्यांदा ह्यांच्या घरी गेलो होतो ना..चहा पोह्याच्या कार्यक्रमासाठी...तेव्हा यांचं घर बघून मी आधीच ठरवलं होतं- 'मुलगा कसा का असेना, मला पसंत आहे.' तसं मी हळूच माझ्या आईच्या कानात फुसफुसले देखील होते. त्यावर तिनी विचारलं होतं," मुलाला बघायच्या आधीच?" तेव्हा डोळे मिचकावत मी तिला म्हणाले होते," दिल आया घर पे..तो लडका क्या चीज़ है?" माझं ते बोलणं ऐकून आई मला दटावत म्हणाली होती," गप्प बस. वाह्यात कुठली!"

पण खरंच खूप आवडलं होतं मला यांचं ते घर ... समुद्रकिनाऱ्यापासून अगदी जवळ... घराच्या दिंडी दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला डावीकडे एका कोनाड्यात छोटीशी गणपतीची मूर्ती होती. तिच्या समोर एक छोटीशीच पणती तेवत होती. मूर्तीला जास्वंदीच्या लाल भडक फुलांचा हार घातला होता.माझ्या आईनी आत जाता जाता त्या मूर्तीसमोर हात जोडले होते.." देवा माझ्या मुलीचं लग्न ठरू दे" हेच मागितलं असणार मनातल्या मनात.. दिंडी दरवाज्यातून थोडं वाकून आत गेल्यावर जेव्हा मी समोर पाहिलं ना....अहाहा! किती खुश झाले माहितीये घर बघून..समोर मोठं अंगण..त्यात बरोब्बर मध्यभागी एक मोठ्ठं तुळशीवृंदावन.. थोडं पुढे गेल्यावर डावीकडे विहीर होती आणि तिच्यावर एक रहाट सुद्धा होता.... घराच्या मागच्या परसात नारळाची झाडं होती, केळीची बाग पण होती छोटीशी.. आणि पडवीत एक मोठ्ठा लाकडी झोपाळा- पितळ्याच्या कड्या असलेला....छान चौसोपी, दुमजली घर होतं... टुमदार, कौलारू !! अगदी माझ्या स्वप्नातल्या घरासारखं....त्या क्षणी मी पण त्या कोनाड्यातल्या गणपतीची मनोमन प्रार्थना केली ..' गणपतीबाप्पा, या घरासारखाच हा मुलगा पण मला आवडू दे, आणि मुख्य म्हणजे त्याचाही होकार असू दे.' आणि ऐकलं बाई देवानी माझं...."

नम्रतानी त्यांचं हे स्वगत इतक्या वेळा ऐकलं होतं की आता तिचं पण सगळं पाठ झालं होतं. एकीकडे त्यांचं बोलणं ऐकता ऐकता तीही नकळत मनातल्या मनात हे सगळं बोलायला लागायची.पण त्यांच्या चेहेऱ्यावरचा तो आनंद बघून ती त्यांना मधेच न टोकता सगळं काही ऐकून घ्यायची. घरातले बाकी सगळे मात्र ' झाली सुरू सत्यनारायणाची कथा ..." असं म्हणत त्यांची चेष्टा करायचे. पण घरच्यांच्या चेष्टेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत त्या आपलं स्वगत चालूच ठेवायच्या," अगं नम्रता, आमचं लग्न झालं ना तेव्हा संग्रामचे बाबा तिकडेच पुळ्यामधेच नोकरी करायचे.जेमतेम वर्षभर राहिले असेन मी आमच्या त्या घरात- पण मग यांना नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमधे नोकरी मिळाली आणि आम्ही गणपतीपुळ्याहून नाशिकला शिफ्ट झालो. ते घर सोडून येताना मी इतकी रडले होते...आमच्या लग्नात माहेर सोडून सासरी जाताना पण एवढं वाईट नव्हतं वाटलं गं मला." इतक्या वर्षांनंतरही दर वेळी हे सगळं सांगताना त्या तितक्याच भावुक व्हायच्या.आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या दोन्ही मुलांना घेऊन चांगल्या दीड एक महिना गावातल्या घरात जाऊन राहायच्या. मग जेव्हा संग्रामचे बाबा रिटायर झाले तेव्हा मात्र त्यांनी दोघांनी कायमचंच गणपतीपुळ्याला जाऊन राहायचं ठरवलं.

पण तिथल्या पेक्षा पुण्यात अद्ययावत वैद्यकीय सुविधा असल्यामुळे नम्रतानी पुण्यात राहावं असा त्यांचा विचार होता.संग्रामच्या आईच्या बोलण्यात तथ्य होतं आणि म्हणूनच त्यावेळी गणपतीपुळ्याला राहायचा ऑप्शन नम्रतानी कॅन्सल केला. त्यामुळे मग राहता राहिला एकच पर्याय...आणि तो होता पुण्यात SFA घेऊन राहाणं. संग्रामला सोडून एकटं राहण्याची ती नम्रताची आणि नंदिनीची पहिलीच वेळ होती. त्यात भर म्हणून- नम्रता तेव्हा प्रेग्नंट होती.त्यामुळे संग्रामला थोडी काळजी वाटत होती, पण पुण्यात राहायचं ठरल्यामुळे त्याची ती काळजी दूर झाली.

त्यांच्या त्या निर्णयामुळे तिच्या माहेरची मंडळी आणि तिचे मित्र मैत्रिणी खूपच खुश झाले होते. आता किमान दोन वर्षं तरी त्यांना नम्रताचा सहवास मिळणार होता. खरं सांगायचं तर नम्रता पण खूप एक्साईटेड होती पुण्यात राहण्यासाठी. कारण लग्न झाल्यापासून ती कायम पुण्यापासून लांब राहिली होती. त्यामुळे नातेवाईकांकडचे सण समारंभ, मित्र मैत्रिणींची वरचेवर होणारी गेट टुगेदर्स, भावंडांच्या सरप्राईज पार्टीज् हे आणि असे अनेक आनंदाचे प्रसंग ती मिस करायची. प्रत्येक वेळी इतक्या लांबून येणं शक्य नसायचं, त्यामुळे तिला त्या कार्यक्रमांच्या फोटोज वरच समाधान मानावं लागायचं.

पुण्यात शिफ्ट होण्याच्या आधीपासूनच तिनी मनातल्या मनात प्लॅंनिंग करायला सुरुवात केली होती- मित्र मैत्रिणींबरोबर पिकनिकस, तिच्या खासम् खास मैत्रिणींबरोबर sleepovers , फॅमिली मेंबर्स चे वाढदिवस आणि anniversaries.... एक ना अनेक...खरंच खूप एन्जॉय करणार होती ती तिचं पुण्यातलं वास्तव्य ! तिच्या लग्नानंतर सगळ्यांची तिच्याकडे एकच तक्रार असायची..' तू जेव्हा जेव्हा पुण्यात येतेस तेव्हा नेहेमी घाईतच असतेस. आमच्यासाठी कधीच पुरेसा वेळ नसतो तुझ्याकडे .' त्या सगळ्यांची नाराजी दूर करायचं ठरवलं होतं तिनी.

आज इतक्या वर्षांनंतरही नम्रताला तेव्हाची तिची ती एक्साईटमेंट आठवली आणि स्वतःचीच गंमत वाटली .'खरंच, किती मजा केली होती त्या दोन वर्षांत पुण्याला' तिच्या मनात आलं,' संग्रामला सोडून सलग दोन वर्षं राहायची अशी ती पहिलीच वेळ होती. वाटलं होतं की कसं काय निभावणार सगळं ! पण बघता बघता ती दोन वर्षं संपली होती.'

संग्राम जेव्हा फील्डमधून परत आला होता तेव्हा पुण्याचं ते घर सोडून जाताना नम्रताला जितका आनंद झाला होता तितकंच वाईट पण वाटत होतं. बरंच काही दिलं होतं तिला त्या दोन वर्षांनी....खूप चांगल्या आठवणी, चांगले अनुभव...पण तरीही आता संग्रामच्या यावेळच्याच नव्हे तर भविष्यातल्या देखील कोणत्याही फील्ड tenure मधे नम्रताला पुण्यात SFA घेऊन राहायचं नव्हतं....तिचा निर्णय झाला होता....आणि त्यामागे कारणंही तशीच होती, फक्त ती सगळी कारणं संग्रामला सांगावी की नाही याच द्विधा मनस्थितीत नम्रता अडकली होती.

एकीकडे संग्रामला काय आणि कसं सांगावं याचा विचार करत करत नम्रतानी स्वैपाकघरातली कामं हातावेगळी करायला सुरुवात केली. तिच्या अपेक्षेप्रमाणे काही मिनिटांतच संग्राम किचनमधे आला. तो नम्रताला काही विचारणार इतक्यात फोनची रिंग वाजली. एरवी सकाळी कामाच्या वेळेत कोणाचा फोन आला तर नम्रता खूप इरिटेट व्हायची. सकाळच्या कामाच्या घाईगर्दीत प्रत्येक मिनिट किमती असायचं, त्यामुळे अशावेळी बऱ्याचदा ती वाजणाऱ्या रिंगकडे दुर्लक्ष करायची. पण आज मात्र तिनी त्या फोन करणाऱ्या व्यक्तीचे मनोमन आभार मानले. "कोणाचा फोन आहे ते बघते मी, तोपर्यंत तू मुलींना उठव." असं संग्रामला सांगत तिनी फोनच्या caller id वरचं नाव बघितलं. मनप्रीतचा फोन होता.

"चला, अर्ध्या तासाची निश्चिंती झाली बगूनाना!" मनप्रीतचं नाव बघून संग्राम पु.ल.देशपांडेंच्या टोनमधे म्हणाला. हसत हसत त्याला मुलींच्या खोलीच्या दिशेनी ढकलत नम्रतानी फोन उचलला, "हाय मनप्रीत.. गुड मॉर्निंग. कैसी चल रही है पार्टी की तैय्यारी?" नम्रता नी विचारलं. तसं पाहता मनप्रीत चा नवरा हा संग्रामपेक्षा ज्युनिअर होता-त्याहिशोबानी खरं तर नम्रता मनप्रीत पेक्षा सिनियर होती. पण गेल्या काही महिन्यांत त्या दोघींमधे सिनियर-ज्युनिअर चं नातं न राहता दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. मनप्रीतला जेव्हा जेव्हा काही सल्ला हवा असायचा तेव्हा ती सरळ नम्रताकडे धाव घ्यायची आणि नम्रता पण अगदी मोठ्या बहिणीच्या नात्यानी तिला जमेल तेवढी सगळी मदत करायची. आणि यात भर म्हणून अंगद आणि अनुजा यांचीही चांगलीच गट्टी जमली होती. त्यामुळे काही ना काही कारणानी त्या दोघींचं दिवसातून किमान एकदा तरी बोलणं व्हायचंच .... आणि संग्राम म्हणाला तसं त्यांचं संभाषण बराच वेळ चालायचं.पण आज मनप्रीत पार्टीच्या तयारीत बिझी असल्यामुळे लवकरच दोघीनी आपलं बोलणं आवरतं घेतलं.

मुलींच्या खोलीतून त्यांच्या आणि संग्रामच्या हसण्या खिदळण्याचे आवाज ऐकू यायला सुरुवात झाली. 'आज दोघींसाठी पर्वणीच आहे' नम्रताच्या मनात आलं,'सकाळी सकाळी त्यांना उठवायला त्यांचे बाबा घरात आहेत.'

दोन तीन वेळा हाका मारूनही जेव्हा तिघांपैकी कोणीच ब्रेकफास्टसाठी आले नाही तेव्हा नम्रताच मुलींच्या खोलीत गेली.खोलीतला एकंदर प्रकार पाहून तिनी डोक्यावर हात मारून घेतला.तिघं मिळून 'दुकान दुकान' खेळत होते. नंदिनी दुकानाची मालक होती, संग्राम गिऱ्हाईक आणि अनुजा त्याला त्यांच्या कपाटातून एक एक कपडे काढून दाखवत होती..." ये देखिये सर...कितनी सुंदर फ्रॉक है। " स्वतःचा एक फ्रॉक संग्रामसमोर ठेवत अनुजा म्हणाली. संग्रामनी पण अगदी खरंच गिर्हाईक असल्यासारखं विचारलं,"इसमें बडा साईझ दिखाईए ना।" मग अनुजा नी तिच्या कपड्यांच्या ढिगात नंदिनीचे पण कपडे आणून टाकले..नंदिनी पण अगदी मालकाच्या तोऱ्यात अनुजाला सूचना देत होती. शेवटी संग्रामनी एक फ्रॉक सिलेक्ट केला आणि विचारलं," ये कितने का है?" अनुजानी सांगितलेल्या किमतीला ओके म्हणत त्यानी खोटे खोटे पैसे पुढे केले..ते बघून नंदिनी एकदम म्हणाली," अहो बाबा, असे लगेच नसतात द्यायचे पैसे. आधी म्हणायचं," नहीं भैय्या..ठीक ठीक लगाओ।" नंदिनीचं बोलणं ऐकून संग्राम आणि नम्रता दोघांनाही एकदमच हसू फुटलं. त्यांना दोघांना असं जोरजोरात हसताना बघून नंदिनी गोंधळून गेली आणि म्हणाली," खरंच ...आई नेहेमी असंच म्हणते..हो ना गं आई ?"

आपलं हसू कसंबसं आवरत नम्रता म्हणाली,"सकाळी सकाळी हा सगळा पसारा काढायची काय गरज होती तुम्हांला?" संग्रामकडे बघत,त्याला दटावत ती पुढे म्हणाली," आणि तू सुद्धा त्यांना सामील झालास !"

"अगं, मी फक्त विचारलं की - आज अंगदच्या घरी जाताना कोणते कपडे घालणार- तर त्यांनी दुकानच मांडलं.." आपली बाजू मांडत संग्राम म्हणाला. आता आई रागवेल की काय - या भीतीनी पांढरं निशाण फडकवत नंदिनी अनुजाला म्हणाली," अनुजा, चल, आपण दोघी मिळून सगळा पसारा आवरू पटापट." अनुजाला पण संभावित धोक्याची कल्पना आल्यामुळे ती पण काही न बोलता नंदिनीला मदत करायला लागली. 'आईला खुश करायला' म्हणून चाललेली त्यांची ती लगबग बघून नम्रताची मात्र करमणूक होत होती. एकीकडे त्यांना मदत करत ती म्हणाली," आता तुमचं हे दुकान बंद करा आणि लवकर तयार व्हा. आत्ताच मनप्रीत आंटीचा फोन आला होता. आंटी, अंकल आणि अंगद सकाळी गुरुद्वारामधे जाणार आहेत - आज अंगदचा वाढदिवस आहे ना म्हणून. तुम्हांला दोघींना पण बोलावलं आहे त्यांनी. जाणार आहात का दोघी? जर जाणार असाल तर अंघोळ करून लवकर तयार व्हा."

"गुरुद्वारा ? Wow !!" दोघी मुली एकदम म्हणाल्या. त्यांना दोघींना गुरुद्वारा मधे जायला खूप आवडायचं, आणि त्याच्यामागचं खरं कारण होतं- तिथे मिळणारा 'कडा प्रशाद'- साजूक तुपात बनलेला प्रसादाचा शिरा. एकदा सहज बोलता बोलता नम्रतानी हे मनप्रीतला सांगितलं होतं आणि तेव्हापासून दर वेळी गुरुद्वाराला जाताना मनप्रीत अगदी आठवणीनी दोघी मुलींना घेऊन जायची.

गुरुद्वाराला जायचं म्हणून मुली सुपरफास्ट स्पीडनी तयार झाल्या. तोपर्यंत संग्राम सुद्धा ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन ब्रेकफास्ट करायला आला. डायनिंग टेबल वर कॅसेरोल मधे उपमा बघून मुलींनी नाकं मुरडली. पण आईसमोर खाण्याच्या बाबतीतले कोणतेही नखरे चालत नाहीत हे माहीत असल्यामुळे त्यांचा नाईलाज होता. तेवढ्यात नंदिनीच्या सुपीक डोक्यात एक भन्नाट आयडिया आली.. आणि -"आत्ता खाल्लं तर मग प्रशाद खायला भूक नाही राहणार"- हे कारण सांगून दोघी फक्त दूध पिऊन बाहेर बागेत पळाल्या.

"कसं सुचतं ना ह्यांना!" त्या गेल्यावर नम्रता म्हणाली. एकीकडे गाडीची किल्ली उचलत संग्राम म्हणाला,"हो ना,...अवघड situation मधून काढता पाय कसा घ्यायचा हे अगदी बरोब्बर जमतं त्यांना.. या बाबतीत अगदी त्यांच्या आईवर गेल्याएत दोघी." त्याच्या या टोमण्याचा रोख कुठे आहे हे नम्रताला कळत होतं. ती काही बोलणार तेवढ्यात तोच पुढे म्हणाला," आत्ता मी घाईत आहे म्हणून ..पण दुपारी मात्र मला तुझ्याकडून पुण्यात न राहायचं खरं कारण हवं आहे."

त्याला दारातच थांबवत नम्रता म्हणाली," मी अजिबात 'काढता पाय' वगैरे घेत नाहीये. फक्त माझी कारणं तुला कितपत पटतील याबद्दल मला जरा शंका आहे.. बाकी काही नाही." संग्रामनी मारलेला टोमणा तिला जरा जास्तच बोचला होता. तिची हळवी नजर बघून संग्रामला ते जाणवलं. 'आपण जरा जास्तच बोललो की काय' असं वाटून तो भांबावला. नम्रताच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला," मला तसं नव्हतं गं म्हणायचं. पण कालपासून तुझ्या मनात खूप काहीतरी चाललं आहे हे मला जाणवतंय. पण ते नक्की काय आहे हे तू सांगत नाहीयेस,म्हणून मी वैतागून तसं बोलून गेलो.आणि राहता राहिला मला 'पटण्याचा' प्रश्न... तू सांगून तर बघ. कदाचित मला पटेल तुझं म्हणणं." त्याचं बोलणं ऐकून नम्रताला धीर आला. कालपासून विचारांच्या वावटळीत भरकटणारं मन थोडं शांत झालं. ती संग्रामला म्हणाली "ठीक आहे, आज दुपारी आपण नक्की बोलू या विषयावर."

"Good, आता जरा हसून बाय करा या पामराला" तिचा मूड ठीक व्हावा म्हणून तिच्यासमोर हात जोडून उभा राहात संग्राम म्हणाला. त्याची ती नौटंकी बघून नम्रताही खुदकन हसली आणि त्याला 'बाय' करून आत वळली. संग्रामनी पण एक सुटकेचा निःश्वास सोडला आणि बागेत खेळणाऱ्या मुलींना 'बाय बाय' म्हणत ऑफिसला जायला निघाला.

ठरल्याप्रमाणे नम्रता मुलींना मनप्रीतच्या घरी सोडून आली. अंगद वाटच बघत होता मुलींची. मुलींना रिकाम्या हाती आलेलं बघून त्यानी पहिला प्रश्न केला," मेरा बर्थडे गिफ्ट कहाँ है ? " त्याचं गिफ्ट संध्याकाळी पार्टीमधे देऊ, असं आश्वासन दिल्यानंतर मगच तो शांत झाला आणि ते सगळे गुरुद्वाराला जायला निघाले.संध्याकाळच्या पार्टीत मुलांना द्यायची रिटर्न गिफ्ट्स पॅक करायची राहिली होती. 'तेवढीच आपली मदत होईल' असा विचार करून नम्रता ती सगळी गिफ्ट्स घरी घेऊन आली. मुली आणि संग्राम घरी नसल्यामुळे घर कसं शांत शांत होतं. एकीकडे स्वैपाक करता करता नम्रतानी घरातली बाकी रुटीन कामं उरकून घेतली. आज त्यांचा दोघांचाच स्वैपाक होता त्यामुळे नेहेमीपेक्षा लवकरच ती किचनमधून बाहेर पडली. संग्राम यायला अजून अवकाश होता. नम्रतानी स्वतःसाठी मस्त आलं घातलेला चहा बनवून घेतला आणि एकीकडे चहा पिता पिता रिटर्न गिफ्ट्स पॅक करायला बसली. हात सफाईनी काम करत होते पण मनात विचार चालूच होते. गेल्या चोवीस तासांत तिचं मन कुठे कुठे जाऊन फिरून आलं होतं. अगदी गणपतीपुळ्याच्या त्यांच्या घरापासून ते डेहराडून च्या लिचीच्या झाडापर्यंत!

पण इतक्या भराऱ्या घेऊन सुद्धा आता पुन्हा पुन्हा संग्रामनी सकाळी विचारलेल्या त्या एकाच प्रश्नाभोवती ते रुंजी घालत होतं...अगदी बहिणाबाईंच्या कवितेत म्हटल्यासारखं....

मन वढाय वढाय उभ्या पिकांतलं ढोर

किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर

आणि संग्रामचा तो प्रश्न होता..'तुला पुण्यात का नाही राहायचं?'

प्रश्न जितका सोपा होता तितकंच त्याचं उत्तर अवघड होतं.....अवघड होतं म्हणण्यापेक्षा थोडक्या, मोजक्या शब्दांत सांगता येणं कठीण होतं. पण नम्रताच्या दृष्टीनी खरा प्रॉब्लेम हा नव्हताच मुळी. तिच्या पुण्यात न राहण्याच्या निर्णयाचं समाधानकारक स्पष्टीकरण होतं तिच्याकडे...पण तिला एकाच गोष्टीची काळजी होती..आणि ती म्हणजे...तिच्यासाठी इतकी महत्वाची असलेली ही सगळी कारणं संग्रामला पटतील का नाही?

कारण ती जितकी इमोशनल होती, संग्राम तितकाच प्रॅक्टिकल होता. संग्रामला अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या घटना नम्रताच्या मनाला मात्र चटका लावून जायच्या. आणि मग नंतर कितीतरी दिवस ती त्याच घटनेचा, त्यातल्या पात्रांचा विचार करत बसायची..त्यांच्यासाठी हळवी व्हायची. आणि तिचा हा स्वभावाच संग्रामला नेहेमी कोड्यात टाकायचा.

आणि म्हणूनच आजही नम्रताचा पुण्याला न राहण्याचा निर्णय ऐकून संग्राम विचारात पडला होता. ऑफिसमधे पोचेपर्यंत त्याच्या मनात हेच सगळे विचार घोळत होते.

पाच वर्षांपूर्वी जेव्हा तो फील्डवर गेला होता तेव्हा पूर्ण विचाराअंती त्यांनी दोघांनी मिळून पुण्यात SFA घ्यायचा निर्णय घेतला होता. त्यावेळी, नुसत्या त्या कल्पनेनीच नम्रता किती खुश झाली होती. किती किती प्लॅन्स बनवले होते तिनी- पुण्यातल्या त्या दोन अडीच वर्षांत काय काय करायचं त्याचे. तेव्हाचा तिच्या चेहेऱ्यावरचा तो आनंद, ती excitement आज राहून राहून संग्रामला आठवत होती. असं असताना आज अचानक तिनी पुण्यात न राहण्याचा निर्णय का घेतला असावा - हा प्रश्न संग्रामला सतावत होता. तिचा हळवा स्वभाव तो ओळखून होता. अगदी नॉर्मल वाटणाऱ्या घटना, प्रसंगही तिला इमोशनली डिस्टर्ब करुन जायचे.आणि त्यामुळे तिची होणारी भावनिक ओढाताण, मनःस्ताप हे सगळं काही संग्रामनी अगदी जवळून बघितलं होतं.इतर वेळी बोलघेवडी असलेली नम्रता अशावेळी मात्र अगदी अंतर्मुख होऊन जायची. तिच्या या अशा स्वभावामुळेच त्याला काळजी वाटत होती.. असं काय झालं असावं की ज्यामुळे नम्रता आता पुण्यात राहायला तयार नाहीये? कधी एकदा ऑफिसमधून घरी जातोय आणि नम्रताशी बोलतोय असं झालं होतं त्याला.

शेवटी एकदाची ती वेळ आली. दुपारी दोघांची जेवणं आटोपल्यानंतर नम्रतानी स्वतःच तो विषय काढला."तुला माझ्या निर्णयामागचं कारण हवं आहे ना.. तसं एक स्पेसिफिक कारण नाहीये सांगता येण्यासारखं.. In general, त्या दोन वर्षांत मला जे काही अनुभव आले, किंवा मी जे काही observe केलं त्यावरून आता मला असं वाटतंय की पुण्यात नको राहायला."

नम्रताचं हे असं vague बोलणं ऐकून संग्राम अजूनच गोंधळला. "अगं, पण मागच्या वेळी तूच तर म्हणाली होतीस ना की - जर तू पुण्यात राहिलीस तर नातेवाईकांच्या, मित्र मैत्रिणीच्या सहवासात माझा दुरावा तुला जास्त जाणवणार नाही म्हणून.... आणि तसंही आपण कायम घरापासून लांब राहिल्यामुळे आपल्या घरचे, तुझ्या माहेरचे कितीतरी इव्हेंट्स तुला अटेंड नाही करता येत..पुण्यात राहिल्यामुळे तुझी ती खंत पण दूर झाली होती ना तेव्हा! मग असं काय झालं त्या दोन वर्षांत की तू आता तिथे राहायचं नाही असं ठरवलंस ?" संग्राम भरभरून बोलत होता.."आणि नेहेमी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तू माझ्याबरोबर शेअर करतेस ना, मग गेली पाच वर्षं तू या सगळ्या बद्दल मला काहीच नाही बोललीस ? नक्की काय चाललंय तुझ्या मनात.....I am clueless ! प्लीज यार, आता तरी सगळं सविस्तर सांग. This suspense is killing me now."

एरवी अगदी मोजून मापून बोलणाऱ्या संग्रामला असं घडाघडा बोलताना ऐकून नम्रता क्षणभर अवाक् झाली. त्याच्या मनातली चलबिचल त्याच्या चेहेऱ्यावर दिसत होती- त्याच्या शब्दांतून तिच्यापर्यंत पोचत होती. त्याला मधेच थांबवत ती म्हणाली," तू समजतोयस तसं सिरीयस काही नाहीये रे...आणि कदाचित तुला माझी कारणं अगदीच क्षुल्लक वाटतील, म्हणून मी इतके दिवस तुला काही नाही सांगितलं. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे...पुण्यात राहायच्या नुसत्या कल्पनेनीच मी खूप खुश झाले होते. केवढे प्लॅन्स बनवले होते. आणि खरंच सुरुवातीचे काही दिवस मी खूप एन्जॉय ही केले. नातेवाईक, मित्र मैत्रिणी सगळ्यांबरोबर राहायची संधी मिळाली. पण मग हळूहळू मला असं जाणवायला लागलं की कुठेतरी काहीतरी बदललंय. सगळी माणसं तीच, नातीही तीच, नात्यांमधलं प्रेम ही तेवढंच... एकमेकांबरोबरची धमाल, मजा सगळं सगळं अगदी तसंच.... आधीसारखं...पण आधी त्यांच्या त्या साच्यात अगदी फिट बसणारी मी...आता बदलले होते."

तिचं असं काहीसं विस्कळीत बोलणं ऐकून संग्राम अजूनच कन्फ्यूज झाला."तुला नक्की काय म्हणायचं आहे..प्लीज, मला समजेल अशा भाषेत सांगतेस का?" संग्रामचा पेशन्स हळूहळू कमी होत होता.

पण त्याचा तो प्रश्न नम्रतापर्यंत पोचलाच नव्हता बहुतेक...ती तिच्याच तंद्रीत बोलत होती..."आम्ही- म्हणजे मी आणि नंदिनी- खूप उत्साहानी त्यांना भेटायला जायचो, सगळ्या इव्हेंट्स मधे हजर राहायचो....खूप मजा यायची.. पण ते सगळं करत असताना मनात कुठेतरी सतत जाणवत राहायचं की "Everything is not the same now. कधी कधी वाटायचं, I don't belong here anymore. पण त्या अनुभवाला नक्की नाव नव्हते देऊ शकत मी !

एकदा नंदिनी होमवर्क करत होती, तेव्हा मधेच तिनी विचारलं,"आई, Odd Man Out कसा शोधायचा? आमच्या टीचरनी आज आम्हांला शिकवलं होतं..पण मी poem competition करता गेले होते ना म्हणून मला नाही कळलं. प्लीज, तू शिकव ना." तेव्हा मी तिला समजावून सांगत होते, "odd man म्हणजे जो ग्रुप मधल्या बाकीच्या वर्ड्स किंवा पिक्चर्स पेक्षा वेगळा असतो ना तो!" "पण मला तर या ग्रुप मधले सगळेच वर्ड्स सेम वाटतायत.." आपली होमवर्क ची वही मला दाखवत ती म्हणाली होती. त्यावर तिला अजून समजावत मी पुढे म्हणाले,"हो गं बाळा... तसं बघितलं तर सगळे वर्ड्स एकसारखेच असतात पण फक्त एक वर्ड इतरांपेक्षा थोडासा वेगळा असतो आणि म्हणून तो त्या ग्रुप मधे फिट बसत नाही..त्याला म्हणतात 'Odd Man Out' ...

शेवटी एकदाचं तिला समजलं..पण त्याचवेळी मलाही काहीतरी लक्षात आलं....मी आणि नंदिनी दोघीजणी 'Odd Man Out' होतो....आमच्या आजूबाजूच्या लोकांसारख्या पण तरीही काही बाबतीत त्यांच्या पेक्षा वेगळ्या......

आणि आमचं हे वेगळेपण इतरांना सुद्धा जाणवलं असावं. कारण त्या दोन वर्षांत- "नम्रता आता बद्दललीये बरं का!"- हे आणि अशा अर्थाची वाक्यं मी सगळ्यांच्या तोंडून बऱ्याचदा ऐकली आहेत." नम्रता तिच्या मनातली खळबळ शब्दांत मांडायचा प्रयत्न करत होती.

"अगं, पण लग्नानंतर थोड्याफार प्रमाणात सगळेच बदलतात..मला पण तर म्हणतात सगळे..'नम्रता आली आणि आमचा संग्राम अगदी बदलून गेला' म्हणून !! हे सर्वमान्य सत्य आहे. त्याला इतकं सिरियसली नसतं घ्यायचं." संग्रामनी त्याच्या स्टाईल मधे तडकाफडकी निर्णय सुनावला.

"बघ, म्हणूनच मी नव्हते सांगत तुला काही.." नम्रता एवढासा चेहेरा करून म्हणाली."मला माहीत होतं की तुला हे सगळं पटणार नाही. जाऊ दे, तुला कधीच नाही कळणार मला काय वाटतं ते!" आपल्या डोळ्यांतलं पाणी संग्रामला दिसू नये म्हणून लगबगीनी त्याच्या समोरून उठून जात ती म्हणाली.

नम्रतानी कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी तिच्या गालांवर ओघळलेले अश्रू संग्रामच्या नजरेतून सुटले नाही.तिला इतकं भावुक झालेलं बघून तो खूप कासावीस झाला. 'असं एकदम सुनवायला नको होतं तिला...' संग्रामला उपरती झाली. 'पण आता लक्षात येऊन काय उपयोग? The damage is already been done .' संग्राम मनातल्या मनात स्वतःलाच दटावत म्हणाला -'And this is not the first time. आजपर्यंत कितीतरी वेळा असंच झालंय... झालंय म्हणण्यापेक्षा असंच 'केलंयस' तू संग्राम..ती बिचारी तिच्या मनातलं सगळं काही तुझ्याबरोबर शेअर करते..फक्त एकाच अपेक्षेनी- की तू तिला समजून घेशील, तिच्या वाभऱ्या मनाला दिलासा देशील... पण तू मात्र तिला धीर देण्याऐवजी आपलंच घोडं दामटत बसतोस.'

स्वतःला हजार शिव्या घालत संग्राम नम्रताच्या मागे गेला.त्यानी घरभर शोधलं पण नम्रता कुठेच नव्हती. तो काही क्षण संभ्रमात पडला.... पण मग लगेचच त्याला काहीतरी आठवलं आणि तो बागेतल्या कडुनिंबाच्या झाडाच्या दिशेनी निघाला. एकदा कधीतरी बोलता बोलता नम्रता म्हणाली होती ,"तुला माहितीये संग्राम, जेव्हा जेव्हा मी त्या झाडाला बघते ना, तेव्हा मला माझ्या आजीची आठवण येते...तीही अशीच होती..शांत, शीतल- कायम आपल्या प्रेमाची सावली देणारी- पण तरीही मनानी खंबीर ... त्या झाडाच्या सावलीत बसले ना की आजीच्या जवळ जाऊन बसल्यासारखं वाटतं मला ! एक वेगळंच मानसिक बळ मिळतं.."

नम्रताचं आणि तिच्या आजीचं नातं खूप घट्ट होतं.तिच्या बारशाच्या वेळी तिचं 'नम्रता' हे नाव पण तिच्या आजीनीच सुचवलं होतं. तान्ह्या नम्रताला कुशीत घेऊन त्या म्हणाल्या होत्या," खूप सालस आणि प्रेमळ स्वभाव असणार हिचा.... बघा तुम्ही...मी आत्ताच सांगून ठेवतीये."

नातीचं खूप कौतुक होतं आजीला.नम्रताच्या प्रत्येक वाढदिवसाला तिची आजी स्वतः तिच्यासाठी गुळाच्या पोळ्या बनवायची...नम्रताला आवडतात म्हणून ;नम्रताला पण रोज रात्री गोष्ट सांगायला आजीच हवी असायची. तिच्या आजीच्या शेवटच्या आजारपणात नम्रता कायम तिच्या उशा-पायथ्याशी असायची. सकाळी कॉलेजला जाण्याआधी निदान दोन मिनिटं का होईना पण आजीशी गप्पा मारायची..त्याशिवाय दोघींनाही चैन नाही पडायचं. आपल्या आजारपणाला कंटाळून कधी कधी तिची आजी काहीसं विचित्र वागायची...औषध नको, जेवण नको...अगदी एखाद्या लहान मुलासारखी हट्ट करायची ...घरातल्या सगळ्यांचं समजावणं, विनंती करणं फोल ठरायचं तिच्या हट्टापुढे. अशावेळी मग सगळ्यांना एकच आशा असायची..आणि ती म्हणजे नम्रता !आणि खरंच इतरांना पुरून उरणारी आजी नम्रताचं मात्र सगळं ऐकायची. आजीला मनवण्यासाठी कधी कुठला पवित्रा घ्यायचा हे नम्रताला बरोब्बर ठाऊक होतं.

जेव्हा तिची आजी औषध घ्यायला मना करायची तेव्हा नम्रता तिला एकच प्रश्न विचारायची," असं काय गं आजी ? माझ्या लग्नात तू माझ्या नवऱ्याबरोबर नाचणार आहेस ना? मला तसं प्रॉमिस केलंयस तू...मग त्यासाठी तब्येत ठणठणीत हवी ना तुझी ?" नम्रताची ही मात्रा बरोबर लागू पडायची आणि घरातले सगळे 'हुश्श' म्हणत आपापल्या कामाला लागायचे.

नम्रताचा होणारा नवरा आर्मी मधे आहे हे कळल्यावर तिच्या आजीला खूप आनंद झाला होता. एका भावुक क्षणी नम्रताला जवळ घेऊन ती म्हणाली," आता मला तुझी काळजी नाही हो! तुझ्यासारख्या हळव्या, नाजूक मनाच्या मुलीला सांभाळून घ्यायला, समजून घ्यायला संग्राम सारखा कणखर मनाचा मुलगाच हवा. आयुष्यभर सुखात ठेवेल तो तुला...माझी खात्री आहे." आपल्या लुगड्याच्या पदरानी आपले डोळे टिपत आजीनी नम्रताच्या डोक्यावर आशीर्वादाचा थरथरता हात ठेवला.

लग्नाआधी संग्राम जेव्हा पहिल्यांदा घरी येणार होता त्या दिवशी तर आजीची लगबग बघण्यासारखी होती. सकाळ पासूनच तिचा active mode ऑन झाला होता. बसल्या जागेवरून सगळ्यांना सूचना देणं चालू होतं.... "घर नीट आवरलेलं हवं बर का.. इथे तिथे पसारा नका करू. आणि खायला काय करणार आहात गं? नम्रता, काय आवडतं गं त्याला? चहा, कॉफी बरोबर लिंबाच्या सरबताची पण सोय करून ठेवा म्हणजे ऐनवेळी धावपळ नको.. नम्रता, तू ना तुझा तो निळ्या रंगाचा अनारकली का काय म्हणतात ना तो ड्रेस घाल...त्याच्यात खूप गोड दिसतेस बघ तू."

आजीच्या उत्साहाला जणू उधाण आलं होतं. नम्रताच्या आईला जवळ बोलावून हळूच तिला म्हणाली," कपाटातलं माझं अबोली रंगाचं लुगडं काढून दे मला." संग्राम यायच्या तासभर आधीच आजीला तयार होऊन बसलेली बघून नम्रता म्हणाली," अगं, अजून वेळ आहे त्याला यायला." त्यावर तिला जवळ बोलावत आजी म्हणाली होती," ते सगळं राहू दे, तू आधी सांग- मी व्यवस्थित तयार झालीये ना? म्हणजे तुझी आजी शोभतीये ना?" नम्रता काही बोलणार इतक्यात तिचा दादा म्हणाला," आजी, अगं आज तू असली खतरनाक सुंदर दिसतीयेस ना...तुला बघून संग्राम एकदम फ्लॅट होतो की नाही बघ," त्याच्या त्या मिश्किल वाक्यावर आजी मनोमन खुश झाली पण लटक्या रागानी त्याच्या गालावर हलकेच चापटी देत म्हणाली," गप रे ! तुझ्या जीभेला काही हाड आहे का ? चहाटळ कुठला!"

त्या दिवशी संग्राम जेव्हा आजीला भेटायला तिच्या खोलीत गेला तेव्हा त्याला भेटून, त्याच्याशी बोलून तिला खूप समाधान वाटलं. पहिल्या काही वाक्यांतच संग्रामनी आजीचं मन जिंकून घेतलं होतं. हळूहळू त्यांच्या दोघांच्या गप्पा इतक्या रंगल्या की त्या खोलीत त्यांच्याशिवाय नम्रता पण बसलीये हेसुद्धा विसरून गेले दोघं. जणू काही ती नम्रताची नव्हे तर संग्रामचीच आजी होती.. त्यावेळी एक क्षण नम्रताला संग्रामबद्दल असूया वाटली होती...आजपर्यंत आजीच्या मनात तिचं जे स्थान होतं त्यात आता संग्रामही वाटेकरी झाला होता. पण मग पुढच्याच क्षणी स्वतःच्या स्वार्थी मनाला दटावत तिनी मनातल्या मनात आजी आणि संग्रामची, त्यांच्यात निर्माण झालेल्या त्या खास ऋणानुबंधाची दृष्ट काढली.

आजीला नमस्कार करून संग्राम जेव्हा जायला निघाला तेव्हा आजीनी त्याला हाक मारून जवळ बोलावलं आणि विचारलं," बाकी सगळं ठीक आहे पण तुला नाचता येतं ना? तुझ्या बरोबर नाचता यावं म्हणून मी इतकी वर्षं नम्रता म्हणेल तसं सगळं करतीये!" तिचा हा प्रश्न ऐकून खोलीत मोठा हशा पिकला. आपलं हसू कसंबसं आवरत संग्राम म्हणाला," हो आजी, नम्रतानी सांगितलंय मला सगळं. तुमच्या इतकं छान नाचायला जमणार नाही कदाचित, पण माझी प्रॅक्टिस चालू आहे...." मधे थोडा pause घेऊन नम्रताकडे बघत, हलकेच एक डोळा मिटत तो मिश्कीलपणे म्हणाला," तसंही आता यापुढे आयुष्यभर तुमच्या नातीच्या तालावरच नाचायचं आहे ना मला!" त्याचं हे बोलणं ऐकून पुन्हा एकदा सगळं घर हास्यानी भरून गेलं आणि यावेळी आजी पण अगदी दिलखुलास हसली. पण सगळ्या लोकांसमोर संग्रामनी केलेली ही धिटाई बघून नम्रताचा जीव मात्र लाजून अर्धा झाला.

त्या दिवसानंतर नम्रताच्या आजीला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी फक्त संग्राम च दिसत होता. त्याच्या कौतुकानी तिचा दिवस सुरू व्हायचा आणि आपल्या नातीच्या सुखी संसाराची स्वप्नं बघत रात्र उलटायची. लग्नानंतरही जोपर्यंत आजी हयात होती तोपर्यंत रोज सकाळी नम्रता तिला फोन करून तिच्याशी गप्पा मारायची,पण संग्रामची खुशाली कळल्यानंतर मगच आजी फोन बंद करायची.

आत्ता बागेत जाता जाता संग्रामला हे सगळं आठवत होतं.आणि म्हणूनच नम्रता झाडापाशी असणार याची त्याला खात्री होती.

आणि त्याचा अंदाज खरा ठरला..नम्रता कडुनिंबाच्या झाडाखाली असलेल्या पारावर बसली होती....एकटक त्या झाडाकडे बघत!!! तिला तसं बघून संग्रामला अजूनच अपराधी वाटायला लागलं. तो झपाझप पावलं टाकत नम्रतापाशी जाऊन पोचला.

पण नम्रता तिच्या विचारांत इतकी गढून गेली होती की संग्राम तिथे आल्याचं तिला कळलंही नाही. तिच्याशेजारी बसून तिचा हात आपल्या हातात घेत संग्राम म्हणाला," I am sorry, Namrata. मी असं एकदम तुला सुनवायला नको होतं. खरं म्हणजे मीच तुझ्या मागे लागलो होतो की मला खरं कारण सांग म्हणून....आणि जेव्हा तू सांगायला लागलीस तेव्हा मी पुरतं ऐकून न घेताच तुला गप्प केलं. सॉरी !" त्याच्या या बोलण्यावर कुठलीही प्रतिक्रिया न देता नम्रता उठून आत जायला निघाली. तिला पुन्हा आपल्या शेजारी बसवत संग्राम म्हणाला," अशी गप्प नको ना बसू..काही तरी बोल ना... प्लीज गं!"

"It's okay संग्राम ! माझंच चुकलं.. मलाच लक्षात यायला हवं होतं... तसंही तू म्हणतोसच ना की मी जरा जास्तच विचार करते !! या बाबतीत पण तसंच असेल...मी उगीचच पराचा कावळा करतीये बहुतेक.. पण मी तरी काय करू ? मी माझ्याकडून खूप प्रयत्न करते रे जास्त इमोशनली विचार नाही करायचा म्हणून, पण नाही जमत मला तुझ्यासारखं प्रॅक्टिकल होणं..I am an emotional fool. "

"ए, माझ्या बायकोला fool वगैरे नाही म्हणायचं हं.. सांगून ठेवतोय." नम्रताचा मूड ठीक व्हावा म्हणून संग्राम तिला खोटं खोटं ओरडत म्हणाला.."हां, तशी ती जरा जास्तच हळवी आहे म्हणा..अगदी साध्या साध्य गोष्टींवर खूप विचार करत बसते आणि मग स्वतःलाच त्रास करून घेते...पण हे सगळं जरी खरं असलं तरी जेव्हा गरज असते तेव्हा तिचं हे हळवं मन वज्राहून ही कठीण होतं... त्यामुळे तिला काही नाही म्हणायचं.." संग्रामचं हे बोलणं ऐकून नम्रतानी आश्चर्यानी त्याच्याकडे पाहिलं. जणू काही त्याच्या त्या वाक्यातून तिला तिच्याच स्वभावाचा एक नवा पैलू समजला होता.

नम्रताच्या प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे बघून संग्राम पुढे म्हणाला,"अशी काय बघतीयेस माझ्याकडे? मी काही उगीच तुझी तारीफ करायला म्हणून नाही म्हणालो ..खरंच आहे ते. नॉर्मली जरी तू अगदी एखाद्या गरीब गाईसारखी असलीस ना तरी crisis situation मधे या गायीची शेरनी झालेली पाहिली आहे मी...तुझी आजी जेव्हा ICU मधे होती तेव्हा स्वतःचं दुःख बाजूला ठेवून तू तुझ्या बाबांचं घर आणि हॉस्पिटल या दोन्ही आघाड्या किती समर्थपणे सांभाळल्या होत्यास ते माहितीये मला." त्याचं हे वाक्य ऐकून नम्रता अजूनच बुचकळ्यात पडली. "पण तेव्हा तर तुला सुट्टी मिळाली नव्हती म्हणून तू येऊ शकला नव्हतास.. मग तुला..."

"हम फौजी हैं मॅडम।" नम्रताचं वाक्य मधेच तोडत संग्राम म्हणाला,"हमारे जासूस चारों तरफ फैले होते हैं।"

हे म्हणतानाचा त्याचा एकंदर हावभाव बघून नम्रताला खुदकन हसू आलं.आणि तिला तसं हसताना बघून संग्रामला हायसं झालं. पण आपलं बोलणं तसंच पुढे चालू ठेवत तो म्हणाला,"आजी गेल्यानंतर जेव्हा मी दोन दिवसांची सुट्टी घेऊन आलो होतो, तेव्हा मी स्वतः बघितलंय.. इतरांसमोर धीरानी उभे राहिलेले तुझे बाबा - तू समोर दिसताच तुझ्या कुशीत शिरून अक्षरशः एखाद्या लहान बाळासारखे रडत होते, आणि तू आपलं दुःख बाजूला ठेवून त्यांना धीर देत होतीस, त्यांचे डोळे पुसत होतीस. खरं सांगू का नम्रता ..त्या क्षणी मला तुझा इतका अभिमान वाटला होता ना....त्या वेळचं तुझं वागणं अगदी एका सैनिकाच्या पत्नीला साजेसं होतं. आणि माझ्या या अशा बायकोला तू इमोशनल फूल म्हणतीयेस ?? How dare you ?" संग्रामच्या तोंडून स्वतःची इतकी तारीफ ऐकताना नम्रताला खूपच अवघडल्यासारखं होत होतं. आजपर्यंत कधीच त्यानी आपल्या भावना इतक्या स्पष्ट शब्दांत व्यक्त नव्हत्या केल्या. त्याला मधेच थांबवत ती म्हणाली," पुढच्या दोन वर्षांची कसर आत्ताच भरून काढतोयस की काय ? एका दमात इतकी वाक्यं ? आता मला काय वाटतंय माहितीये...मी असं अधून मधून रुसून बसायला पाहिजे, म्हणजे मला मनवण्याच्या निमित्तानी का होईना तू असं खूप काही बोलशील तरी माझ्याशी !"

तिनी त्याला असं कोंडीत पकडलेलं बघून संग्राम गमतीनी म्हणाला," हो, आपल्यासाठीच लिहिलंय ते गाणं...तुम रुठी रहो , मैं मनाता रहूँ.... "

"विषय कसा बदलायचा हे तुझ्याकडून शिकावं," नम्रता म्हणाली. "पण तू मगाशी जे म्हणालास ना की जर गरज पडली तर मी माझं दुःख बाजूला ठेवून समोरच्या प्रसंगाला हँडल करते..!"

"क्यूँ ? कोई शक़ ?" संग्रामनी त्याचा ठेवणीतला आवाज काढत फौजी स्टाईल मधे तिला विचारलं. त्यावर नकारार्थी मान हलवत ती म्हणाली, "शक़ मला नाहीये, पण इतर बऱ्याच जणांना आहे.. मी मागच्या वेळी जेव्हा पुण्यात SFA मधे राहात होते ना, तेव्हा अथर्वची मुंज झाली होती ..आठवतंय ना तुला ? पण तू तेव्हा कारगिल मधे होतास आणि Operation Vijay चालू होतं, त्यामुळे तुला अजिबात सुट्टी नव्हती मिळाली. सुरुवातीला दादा आणि वहिनी थोडे खट्टू झाले होते,पण मग त्यांना बॉर्डर वरच्या परिस्थितीचं गांभीर्य कळल्यावर ते शांत झाले . त्या पूर्ण समारंभात मी आणि नंदिनीनी तुला इतकं मिस केलं होतं माहितीये ! पदोपदी मला तुझी आठवण येत होती, त्या दिवशी मी मुद्दाम तू मला गिफ्ट केलेली पैठणी नेसले होते. तुला आवडतं तशी तयार झाले होते.. तू जवळ नसतानाही तू असल्याचा भास होत होता.फॅमिली ग्रुप फोटोमधे बाकी सगळे होते, फक्त तूच नव्हतास. पण तरी माझी फीलिंग्ज् चेहेऱ्यावर दिसू नयेत याची मी पूर्ण खबरदारी घेतली होती. इतक्या आनंदाच्या प्रसंगी आपलं दुःख जगजाहीर कशाला करायचं म्हणून !! मी तोंडदेखलं सगळ्यांशी हसून बोलत होते पण मनात सतत एक प्रकारची धास्ती होती..'आत्ता तिकडे बॉर्डरवर काय चालू असेल ?' पंक्तीत बसून जेवताना, आमरस पुरी खाताना प्रत्येक घासाला तुझी आठवण येत होती- 'तिकडे त्याला जेवायला वेळ मिळाला असेल का?'

त्या दिवशी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचा एकच प्रश्न- 'हे काय! घरचं कार्य आणि संग्राम नाही आला ?' काही जण तेवढ्यावरच नाही थांबले..जेव्हा मी सुट्टी न मिळाल्याचं कारण सांगितलं तर म्हणाले," हे तर नवीनच ऐकतोय...घरातल्या इतक्या महत्वाच्या कार्यक्रमासाठी पण सुट्टी नाही ? अजबच आहे सगळं..." मला त्या लोकांना ओरडून सांगावंसं वाटत होतं की- 'जर आत्ता तो सुट्टी घेऊन इकडे आला तर आपल्याला सगळ्यांना या जगातून कायमची सुट्टी मिळेल.'

माझं तरी ठीक आहे पण नंदिनीला सुद्धा " काय गं, बाबा नाही आले का तुझे?" असं विचारत होते सगळे. आणि प्रत्येक वेळी तिचा तो कावराबावरा चेहेरा बघून मला अजूनच वाईट वाटत होतं. तिनी जेव्हा अथर्वला दादाच्या मांडीवर बसलेलं बघितलं ना तेव्हा मात्र तिला तुझी खूप आठवण आली आणि ती माझ्या कुशीत शिरून रडायला लागली. इथे मी एकीकडे तिला शांत करायचा प्रयत्न करतीये तेवढ्यात माझ्या शेजारी बसलेल्या वहिनीच्या एक काकू का मामी- ज्यांची आणि माझी धड ओळ्खसुद्धा नव्हती- मला म्हणाल्या,'फक्त मुलीलाच येतीये वाटतं बाबांची आठवण !!! आई तर खूप खुशीत दिसतीये सकाळपासून ...'

त्यांना काय अधिकार होता रे असं कुचकटपणे बोलायचा ? खरं सांगू संग्राम, त्या दिवशी तुझी आठवण येऊनही मला इतका त्रास नव्हता झाला जितका त्यांचं ते एक वाक्य ऐकून झाला. मनात आलं, चांगलं सुनवावं यांना.. तू म्हणतोस ना तसं अगदी 'left right and centre ' !! पण मी काहीच न बोलता गप्प बसले. उगीच समारंभात वाद विवाद नकोत ! आणि तसंही मी कितीही समजावून सांगितलं असतं तरी त्यांना ते कळलंच नसतं.. त्यासाठी जी तारतम्यबुद्धी लागते ती त्यांच्याकडे नाही हे दिसतच होतं."

हे सगळं सांगत असताना नम्रताच्या डोळ्यांत दिसणारी वेदना, तिच्या मनाची व्यथा संग्रामला सुन्न करून गेली. हे सगळं आज पहिल्यांदाच कळत होतं त्याला.. आपल्यामागे आपल्या बायकोला आणि मुलीला या अशा प्रसंगांनाही सामोरं जावं लागत असेल अशी कल्पनाही कधी त्याच्या मनात आली नव्हती. आता नम्रताच्या 'Odd Man Out ' या भावनेचा अर्थ त्याला लक्षात यायला लागला होता.त्याच्याही नकळत त्यानी शेजारी बसलेल्या नम्रताच्या खांद्याभोवती आपला हात टाकून तिला जवळ घेतलं. त्या हाताच्या विळख्यात नम्रता विसावली. इतका वेळ भिरभिरणारं तिचं व्यथित मन आता हळूहळू शांत होत होतं. पण हा सगळा प्रसंग ऐकून संग्राम मात्र खूप डिस्टर्ब झाला. त्याच्या मनात आलं,'हा तर एकच प्रसंग कळलाय आपल्याला..आणि तोही नम्रतानी सांगितला म्हणून. पण आत्तापर्यंत अजून बरंच काही झालं असेल जे मला माहीतच नाहीये.' नम्रताच्या खांद्यावरची त्याच्या हाताची पकड अजून थोडी घट्ट झाली. 'बिचारी, माझ्यामागे अजून कायकाय सहन केलं असेल हिनी !'

दोघंही आपापल्या विचारांत गुंग होऊन कितीतरी वेळ तसेच बसून होते...समोरचं कडुनिंबाचं झाड आपल्या फांद्यांनी त्यांच्यावर सावली धरून उभं होतं !!!

त्या कडुनिंबाच्या शांत, शीतल छायेखाली नम्रता आणि संग्राम काहीही न बोलता नुसतेच बसून होते. संग्राम जवळ आपलं मन थोडं मोकळं केल्यामुळे नम्रताला जरा हलकं वाटत होतं. पण संग्रामच्या मनात मात्र आता विचारांची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. त्यानी नम्रताला विचारलं,"हे तू मला तेव्हाच का नाही सांगितलंस? आणि असंच अजूनही बरंच काही झालंय ना तेव्हा? नक्कीच झालं असणार..पण यातलं काहीच तू आजपर्यंत मला कळू दिलं नाहीस. का नम्रता? तू तर नेहेमी सगळं सांगतेस ना मला.. अगदी क्षुल्लक गोष्टी सुद्धा. मग ज्या गोष्टींनी तुला आणि नंदिनीला इतका त्रास झाला त्या गोष्टी का नाही सांगितल्यास?"

"मुद्दामच नव्हतं सांगितलं," आपली बाजू मांडत नम्रता म्हणाली," आपला नवरा बॉर्डरवर शत्रूशी दोन हात करतोय हे माहित असताना कोणती बायको त्याला या अशा गोष्टी सांगेल ?"

"अगं, पण मग नंतर तरी सांगायचं होतंस. इतकी वर्षं काहीच नाही बोललीस!" संग्राम वैतागून म्हणाला.

"त्यानी काय फरक पडला असता? तू काय जाऊन जाब विचारणार होतास सगळ्यांना? आणि मी तुला जेवढं ओळखलंय ना त्यावरून मला माहित होतं की तू जरी बोलून दाखवलं नसतंस ना तरी तुला पण या सगळ्याचा खूप त्रास झाला असता .. नक्कीच ! आणि म्हणूनच मी नाही सांगितलं. खरं म्हणजे कधीच नसतं सांगितलं , पण तू आग्रह धरलास म्हणून सांगावं लागलं."

"मग आता मी आग्रह धरतोय म्हणून बाकी सगळं पण सांगून टाक ना! अजून काय काय झालं होतं त्या दोन वर्षांत?" संग्राम अक्षरशः विनवणीच्या सुरात म्हणाला.

"आत्ता एवढंच लक्षात आलं, बाकी मग जसं जसं आठवेल तसं सांगीन मी."त्याला उत्तर द्यायचं टाळत नम्रता म्हणाली.

"Come on Namrata...this is not fair. इतर वेळी तर अगदी छोटी छोटी डिटेल्स पण लक्षात असतात तुझ्या. आणि आता इतक्या महत्वाच्या घटना आठवत नाहीयेत का? उगीच काहीतरी कारणं नको सांगू... " संग्रामचा हा दावा अगदी योग्यच होता आणि खरं म्हणजे नम्रता काहीच नव्हती विसरली. छोट्या मोठ्या कितीतरी गोष्टी, अनेक प्रसंग होते सांगण्यासारखे आणि संग्राम म्हणाला तसे ते सगळे प्रसंग तिला आजही अगदी जसेच्या तसे आठवत होते. पण तरीही तिला ते सगळं संग्रामला सांगायचं नव्हतं. नुसता मुंजीच्या दिवसाचा तो एपिसोड कळल्यावरच त्याला झालेला मानसिक त्रास तिला जाणवला होता. मगाशी तिच्या खांद्यावरची अचानक घट्ट झालेली त्याच्या हाताची ती पकड तिला बरंच काही सांगून गेली होती.

पुढच्या काही दिवसांत त्याला बॉर्डरवर जायचं होतं. आणि अशा वेळी हे सगळे प्रॉब्लेम्स सांगून त्याला अजून टेन्शन देण्याइतकी नम्रता असमंजस नव्हती. तिकडे बॉर्डरवर आपली ड्युटी करताना त्याला घरची काळजी करावी लागणार नाही याची खबरदारी घेणं हे एका सैनिकाची पत्नी म्हणून कर्तव्यच होतं नम्रताचं.

पण संग्रामच्या या आत्ताच्या युक्तिवादाचं समाधानकारक उत्तर नम्रताकडे नव्हतं. ती काहीतरी पळवाट शोधत असतानाच बागेच्या बाहेरच्या रस्त्यावर एक मोटारसायकल थांबल्याचा आवाज झाला आणि पुढच्या काही क्षणांत दारावरची बेल वाजली. ही संधी साधत "कोण आलंय ते बघते" असं म्हणत नम्रता तिथून पळाली.

तिच्या मागोमाग संग्राम पण आत गेला." युनिट मधून फाईल्स घेऊन आला असेल कोणीतरी. तू थांब, मी बघतो," असं म्हणत त्यानी दार उघडलं. त्याला फाईल्सचा एक मोठा गठ्ठा घेऊन स्टडी रूम मधे जाताना बघून नम्रता म्हणाली," तरीच मी विचार करत होते की आज दुपारी ऑफिसला कसा काय नाही गेलास? आज रविवारची सुट्टी आहे म्हणून ऑफिसच आलंय वाटतं घरी ! काय घेणार आहेस- चहा की कॉफी?" कुठलंही महत्वाचं काम करताना संग्रामला चहा किंवा कॉफी हवी असायची. 'त्यामुळे बुद्धीला चालना मिळते आणि कामात नीट लक्ष लागतं.' असं सबळ कारण होतं त्याच्याकडे.

"तुला न सांगताच कसं कळतं गं सगळं?" संग्रामनी त्याचा million dollar प्रश्न विचारला.आणि त्याचा हा प्रश्न येणार हे माहीत असल्यामुळे नम्रतानी पण लगेच तिचं ठरलेलं उत्तर दिलं.." कारण माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे."

त्यावर "काहीही लॉजिक लावते" असं काहीसं पुटपुटत तो स्टडी रूम मधे गेला. "मस्तपैकी स्ट्रॉंग कॉफी कर" खोलीचं दार बंद करताना त्यानी नम्रताला सांगितलं. 'आज कॉफीची फर्माईश आहे म्हणजे खूप महत्वाच्या फाईल्स असणार...' एकीकडे त्याच्या मग मधे कॉफी आणि साखर घालून फेटता फेटता नम्रता विचार करत होती...' इतक्या वर्षांत तिच्या ही एक गोष्ट लक्षात आली होती- एखादं खूप महत्त्वाचं, अगदी जरुरी काम करताना संग्राम नेहेमी कॉफी प्यायचा- आणि तीदेखील एकदम स्ट्रॉंग. इतर वेळी मात्र तोही नम्रता सारखाच चहाचा शौकीन होता.

स्ट्रॉंग कॉफीचा मग संग्रामसमोर ठेवत नम्रता म्हणाली," अंगदच्या पार्टीची रिटर्न गिफ्ट्स घेऊन आले होते सकाळी- गिफ्ट रॅप करायला. आत्ता देऊन येते मनप्रीतला. आणि मुख्य म्हणजे अंगदचं बर्थडे गिफ्ट पण जाते घेऊन.नाहीतर काही खरं नाही."

सकाळी त्यांना रिकाम्या हाती आलेलं बघून हिरमुसलेला त्याचा चेहेरा आठवून दोघांनाही हसू आलं."माझ्याकडून पण 'happy birthday ' सांग त्याला" संग्राम म्हणाला.

"हो, सांगते...आणि जाताना बाहेरून कुलूप लावून जाते म्हणजे तुला डिस्टर्ब करायला कोणी येणार नाही. आणि तसंही मी लगेच येईन परत." घरातून निघताना नम्रता संग्रामला म्हणाली. पण त्याचं लक्षच नव्हतं तिच्या बोलण्याकडे तो केव्हाच त्याच्या कामात हरवून गेला होता.

नम्रताला या सगळ्याची पूर्ण कल्पना होती ....आणि तिच्या 'घराला बाहेरून कुलूप लावण्या'मागचं खरं कारण हेच होतं- तिच्या येण्या जाण्या मुळे त्याच्या कामात व्यत्यय नको.

कुलूप लावता लावता नकळत नम्रता गुणगुणायला लागली..' सुबह और शाम..काम ही काम...."

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle