वेडींग ड्रेस - 11

व्हिक्टोरीयाने डोळे किलकिले करून पाहीले तेव्हा ती कुठल्याशा घरात होती. जाग आली तशी ती पटकन उठून उभा राहीली. आजूबाजूला पाहु लागली. ते एक लहानसे, जुनाट पण मजबूत दगडी घर वाटत होते. भिंतीतल्या एका कोनाड्यात कंदील ठेवलेला. चौकोनी आकाराचा, काचेच्या भिंती असलेला. त्याचाच मंद, मरगळलेला प्रकाश त्या खोलीत पसरलेला होता. तिच्या लक्षात आलं की घरात सामान असं काही नाहीच. एका भिंतीत जमिनीलगत जळून राख झालेली लाकडं असलेली अगदी लहानशी फायरप्लेस होती एवढंच. नक्की कोणती वेळ असावी ही? रानातला रस्ता लागला तेव्हा रात्र झाली होती हे तिला आठवले, आपण कोसळून खाली पडलो होतो हेही आठवले. आता काय आहे? सकाळ? रात्र? हे घर जणू काळाच्या परिघाच्या बाहेर होतं. जिथे काळ एकाच जागी थांबलेला असतो किंवा अस्तित्वातच नसतो. घरात कसलीशी विचित्र, अस्वस्थ, कोंदट, गुदमरून टाकणारी जाणीव होती. कालचे डेझीच्या घरचे पवित्र , प्रसन्न वातावरण तिला आठवले. कुठल्या गूढ, अनोळखी, अभद्र घरात आलो आहोत, कसे आलो? कोणी आणले असावे? व्हिक्टोरीया ला विचार करून धडकी भरली. तेवढ्यात तिला जवळच्या गाठोड्याची आठवण आली. तिने खाली पाहीले, तिच्या शेजारीच ते पडून होते. तिने ते चटकन उचलले आणि इथून आता लवकरात लवकर काढता पाय घ्यावा असा विचार करत ती बाहेर पडण्यासाठी दरवाजा शोधू लागली. तिला दरवाजा दिसेनाच, साधी खिडकीही नाही. ती गोंधळून गेली. तिच्या श्वासांची गती वाढली, ह्रदयाचे ठोके कानापर्यंत ऐकु येऊ लागले.
" आय होप यु स्लेप्ट नाईस अँड वेल"
अचानक आलेला किनरा, घोगरा आवाज ऐकून व्हिक्टोरीया चे हृदय एका क्षणासाठी छातीतून बाहेर पडले.
तिने झटकन मागे वळून पाहीले.
ती अत्यंत कृश म्हातारी बाई होती. वय सहज नव्वदीच्या पुढे असावे. अंगकाठीच्या मानाने जरा जास्तच उंच पण कंबरेत काहीशी वाकलेली होती. अंगात गुडघ्यांच्या खालपर्यंत आलेला , खालच्या घोळापाशी लेस असलेला जुनाट , काळा गाऊन आणि कोपरापर्यंत असलेल्या त्याच्या बाह्यांतून बाहेर आलेले सुरकूतलेले, लांबसडक हात म्हणजे जणू लांबलचक हाडंच खांद्यापासून लटकत होती. तशाच लांबसडक बोटांची , मंद हालचाल करताना बोटं प्रत्येक पेरांत वाकत होती. नखे बरीच वाढलेली, काहीशी तुटलेली, पिवळी काळी पडलेली दिसत होती. निस्तेज, पांढऱ्याफटक चेहऱ्यावर गालांची हाडं वर आलेली, मंद हसताना विलग झालेल्या काळसर ओठांतून दिसणारे नखांच्याच रंगाचे दातांचे तुकडे. डोक्यांवर जवळजवळ टक्कलच पण जेवढे शाबूत आहेत तेवढया, कंबरेपर्यंत रुळणाऱ्या पांढऱ्या केसांच्या पातळ दोऱ्या. तिच्याशी पुन्हा नजरानजर होताच खोबणीत बसवलेले करडे भेदक डोळे पाहून व्हिक्टोरीया च्या अंगावर काटा आला. आजूबाजूला काहीसा अंधार आणि कंदिलाच्या प्रकाशाची एक तिरीप म्हातारीच्या चेहऱ्यावर पडून ती अजूनच भयानक दिसत होती.
व्हिक्टोरीयाने मनातली भीती दाबत ओढून ताणून आवाजात कठोरपणा आणला.
"कोण तुम्ही? आणि मी इथे कशी आले"?
ते ऐकताच म्हातारी पुन्हा मंद हसत दोन पावले पुढे आली तशी व्हिक्टोरीया मागे सरकली.
" अरे, मला बघून तू घाबरली दिसतेयस. घाबरू नको. म्हातारपण प्रत्येकवेळी दयाळू असतंच असं नाही. "
व्हिक्टोरीया तिच्याकडे बघत राहीली.
"ही तर माझी नेहमीची जागा आहे. तू काय करतेस इथे? "
म्हातारी बोलता बोलता व्हिक्टोरीयाच्या आणखी जवळ आली.
"तुझ्यासारख्या सुंदर तरुण मुलीने असं रानावनात एकटं फिरू नये" असं म्हणत आपल्या किडकिडीत हाताचा पंजा व्हिक्टोरीयाच्या विस्कटलेल्या, मातीने काहीश्या मळलेल्या सोनेरी , रेशमी केसांवर फिरवत, केसांचा एक भाग हातात घेऊन दीर्घ श्वास घेत त्याचा सुगंध नाकात भरून घेतला.
व्हिक्टोरीयाला म्हातारीच्या अंगातुन येणाऱ्या दर्पाने भडभडून आले.
ती झटकन मागे सरकली.
" म्हातारी आहे गं. रोज रोज कुठे जाणार अंघोळ करायला, फार श्रम होत नाहीत मला आता. " म्हातारीने जणू काही तिच्या मनात डोकावून पाहीले होते.
" काही वेळापूर्वीच तू माझ्या घरासमोरच पडलेली दिसली. मी तुला हलवून जागं करण्याचा प्रयत्न केला. तू डोळे उघडलेस. मी कसाबसा आधार देत तुला उठवले पण तू ग्लानीतच होतीस. तशीच इकडं चालवत तुला घेऊन आले. आल्यानंतर तू झोपूनच राहीली. आता कुठे मध्यरात्र उलटून गेली आहे. तू पहाटेपर्यंत इथेच थांब, उजाडलं की जा. रात्री या रानातून एकट्याने जाणं धोक्याचं आहे" म्हातारी किनऱ्या, गूढ आवाजात बोलली.
" नाही, मला लांब जायचं आहे, माझे काका राहतात शेजारच्या गावात, तिकडेच निघाले आहे" व्हिक्टोरीयाने मनाला येईल ते सांगितले.
म्हातारी तिला खालपासून वरपर्यंत न्याहाळत म्हणाली
" चांगल्या घरातली दिसतेयस. घरातून पळून तर आलेली नाहीस ना?" म्हातारी मिश्किलपणे म्हणाली.
व्हिक्टोरीया यावर गप्प राहीली. पण तिच्या पोटाने मोठ्याने गुरगुरल्याचा आवाज केला.
" आह, उपाशी दिसतेस. थांब मी काहीतरी खायला आणते. " म्हणत म्हातारी आतल्या खोलीच्या दाराकडे वळाली.
"नको नको. मला काहीच नकोय"
" माझ्याकडे फार काही नाही, इथे रानात काही फळं मिळतात, त्याचं सूप बनवून देते" म्हातारीचा अवतार बघून व्हिक्टोरीया ला तिच्या हातचं काहीच खाण्याची इच्छा नव्हती. पण तिला आसरा दिल्यामुळे म्हातारीबद्दल तिला थोडीशी आस्था वाटू लागली होती. ही दिसते भयानक पण मायाळू वाटते. पोटातही प्रचंड खड्डा पडला होता. थोडं काहीतरी पोटात ढकलावं आणि निघावं असं तिला वाटलं.
म्हातारी तिच्या शांत बसण्याला होकार समजून आत निघून गेली. व्हिक्टोरीया सहज इकडे तिकडे बघू लागली तर तिला चक्क तिच्या मागच्या भिंतीवर दार दिसले. हे कसं शक्य आहे? आता थोड्यावेळापूर्वीच मी शोधलं तर हे कसं दिसलं नाही? मीच नीट पाहीलं नसावं कदाचित. तिने दारापाशी जाऊन कडी उघडली. दार करकरत उघडले आणि आतल्या शांततेला छेदत बाहेरच्या धो धो पावसाचा आवाज आत शिरला. बाहेर एवढा काळोख की कुठे जमीन कुठे संपतेय नि आकाश कुठे सुरू होतंय हेच कळत नव्हतं. तिने पटकन दार लावून घेतले तशी पुन्हा सगळं शांत झालं. दार लावून मागे वळून पाहते तोच ती पुन्हा जोरदार दचकली.
एक लाकडी वाडगा हातात घेऊन म्हातारी एकटक तिच्याकडे पाहत उभी होती. तिने पाहताच म्हातारीच्या चेहऱ्यावर हास्य पसरले.
" तूला पाहून मला माझ्या तरूणपणाची आठवण येते. बरं घे, हे पिऊन घे"
वाडग्याच्या गरम स्पर्शाने व्हिक्टोरीयाला बरे वाटले. लालसर रंगाचे घट्ट सूप होते ते. पिण्याआधी तिने त्याचा वास घेतला. काहीसा कडवट, काहीसा चमचमीत असा वास होता. व्हिक्टोरीयाच्या पोटातला अग्नी भडकला. वाडगा तोंडाला लावून ती ते घटाघट पिऊ लागली. ही चव तिला पूर्णपणे अनोळखी, विचित्र होती पण भुकेच्या सपाट्यात तिला ते रुचकर लागत होते. तिला अजून थोडंसं मागून घेण्याचा मोह झाला पण तिने तो विचार तिने टाळला. व्हिक्टोरीया थोडीशी रिलॅक्स झाली होती. तिने म्हातारीला तिच्याबद्दल विचारले.
" हे बघ, माझं कोणीच नाही. आणि एक सांगते, जगात कोणीच आपलं नसतं. आपण जगतो ते आपल्या इच्छांसाठी, महत्वकांक्षेसाठी. मी इथवर कशी आले? याच दोन गोष्टींमुळे. "
नुकत्याच आपल्यासोबत घडून गेलेल्या घटना आणि म्हातारीचे शब्द दोन्हींवर व्हिक्टोरिया विचार करू लागली. तिला अजून काही विचारायचे होते पण तिला आता झोप अनावर होऊ लागली होती. तिने म्हातारीची परवानगी घेऊन तिथंच जमिनीवर अंग टाकले आणि थोड्या वेळात तिला गाढ झोप लागली.

व्हिक्टोरीयाची झोप चाळवली तेव्हा तिच्या हाताला प्रचंड आग होत होती. तिने डोळे चोळत हात उपडा करून पाहीला. मनगटाच्या खाली कुठल्याशा तीक्ष्ण वस्तूने कोरलेले काहीतरी कोरलेले होते. एक गोल आणि त्यात गोलाला टोकांनी स्पर्श करणारी चांदणी असे ते चिन्ह होते . त्यातून अजूनही थोडेसे रक्त ओघळत होते. तिच्या डोळ्यावरची झोप खाडकन उडाली. तेवढ्यात तिला हळुवार गुणगुणन्याचा आवाज ऐकू आला. वर पाहीले तर कोणीतरी बाई पाठमोरी उभी होती. तिच्या अंगात स्वच्छ पांढरा, सोनेरी फुलांची दाट एम्ब्रॉयडरी असलेला, पाठीवर खोल गळा असलेला सुंदर गाऊन होता. त्या गळ्यातून त्या कृश बाईच्या दोन्ही खांद्याची त्रिकोणी हाडं आणि कंबरेपर्यंत पोहोचलेली मणक्याची गोल गोल हाडांची माळ स्पष्ट दिसत होती. तिने आजूबाजूला पाहीले. तिचे गाठोडे उलगडलेले होते. त्यातली लाकडी पेटी रिकामी होती. त्या कृश म्हातारीने घातलेला गाऊन म्हणजे तिचा वेडींग ड्रेस होता. तिला प्रचंड संताप आला. ती जागेवर उठून उभा राहीली.
" तुझी हिम्मत कशी झाली माझ्या वस्तूला हात लावायची? काढ तो ड्रेस. आत्ताच्या आता मी इथून निघून जाते. आणि हे काय आहे माझ्या हातावर? तू केलंस हे?"
तो ड्रेस म्हातारीच्या उंचीला थोडाफार व्यवस्थित झाला असला तरी रुंदीला सगळ्या बाजुंनी सैल होता. दोन्ही खांद्यावरच्या बाह्या त्या त्या हातांनी वर ओढत ती पुढे पाय टाकू लागली.
" काढू म्हणतेस . हे घे"
म्हातारीने हातांनी खांद्यावर ओढून धरलेला ड्रेस खाली सोडून दिला. तो जड ड्रेस म्हातारीच्या अंगावरून घरंगळत जमिनीवर पडला. म्हातारी आता पूर्ण नग्न होती. व्हिक्टोरीयाला काहीच सुचेना. तिने तिची नजर दुसरीकडे वळवली. म्हातारी चालत तिच्या जवळ आली.
" खूप वर्ष उलटली. पाचशे, सहाशे? मी मोजनंच सोडून दिलंय. आता बास . मी थकून गेलेय.. मला आता शांती हवी आहे. या कामातून मला कायमची मुक्तता हवी आहे. "
" कसलं काम? काय बरळतेस तू?"
म्हातारी आता गंभीर झाली होती. तिचे करडे भेदक तिने डोळे व्हिक्टोरीयावर रोखले.
" तुझ्या हातावर ते काय आहे माहीत आहे? सेटन्स साइन. सैतानाचा महामहिम, पाताळाचा राजा त्याने निवडले आहे तुला आणि त्याबदल्यात मला स्वातंत्र्य बहाल केले आहे त्याने."
" यु डॅम डिसगस्टिंग वुमन. डोकं फिरलंय का तुझं" व्हिक्टोरीया चा संताप अनावर झाला. तिने म्हातारीला जोरात ढकलले. खाली जमिनीवर पडलेला तिचा ड्रेस उचलला. गोळा करून पेटीत ठेवला . पेटी पुन्हा गाठोड्यात बांधली आणि दाराच्या दिशेने वळाली. पण पुन्हा तिथे दारच नव्हतं. तिने म्हातारीकडे पाहीले. म्हातारीने तिच्या पांढऱ्या विरी गेलेल्या भुवया उंचावल्या आणि जोरजोरात भेसूर हसू लागली. व्हिक्टोरीया चे हातपाय गळाले. उसनं अवसान आणून ती म्हातारीच्या दिशेने गेली , तिचा गळा धरला.
" यु ब्लडी विच. हे तू काय चालवलंयस ?. कुठेय दरवाजा? सांग, नाहीतर मी तुला मारून टाकेन"
म्हातारी तरीही हसतच होती. व्हिक्टोरीया ने गळ्यावर धरलेली पकड अजूनच मजबूत केली. मग दोन्ही हातांनी आवळू लागली. तरीही म्हातारीवर त्याचा परिणाम झाला नाही. तिने आता हसणे थांबवून व्हिक्टोरियाला जोरात ढकलले. व्हिक्टोरीया खाली पडली. धडपडत उठून ज्या भिंतीच्या जागी दरवाजा होता तिथे जाऊन भिंतीवर थपड्या मारू लागली. मोठ्यामोठ्याने मदतीसाठी हाका मारू लागली . रडू, ओरडू लागली. शेवटी कोलमडून त्याच भिंतीला पाठ घासत पायांना पोटाशी आवळत खाली बसली.
म्हातारी तिच्या जवळ आली.
" मूर्ख आहेस तू . ही खुश होण्याची गोष्ट आहे, आनंद साजरा कर. काय ठेवलंय त्या माणसाच्या जन्मात? काय करणार होतीस तू पळून जाऊन? वाटेत संपवलं असतं तुला एखाद्या हिंस्र प्राण्याने. किंवा एखादया क्रूर माणसाने स्वतःची भूक भागवण्यासाठी वापरून फेकून दिलं असतं तुला, शरीरावर असंख्य ओरखडे ओढून. तुझं प्रेम होतं ना त्या मुलावर? कुठेय तो आता? आणि झालं असता तुमचा संसार यशस्वी, नंतर काय? तू देऊ शकली असतीस खात्री की पुढे काहीही वाईट न घडता तो टिकुनच राहीला असता? "
व्हिक्टोरीया म्हातारीला दूर ढकलत जमिनीवर अंग टाकून रडू लागली .
" तुझा तो जन्मदाता बाप. स्वतः गळा घोटला ना त्याने तुझ्या सुखाचा, तुझ्या आयुष्याचा ? "
व्हिक्टोरीयाने रडतच कुतूहलाने म्हातारीकडे पाहीले
" एवढं सगळं होऊन तुला प्रश्न पडलाय की मला हे कसं कळलं? तू रानात बेशुद्ध पडली होती ती तुझी नियती होती आणि हे होणार हे मला पूर्वीपासून माहीत होतं. तुला काय वाटलं ? तुझे वडील वागले तसा माणूस अचानक का वागतो? त्याच्या मनात एवढं क्रौर्य कसं निर्माण होतं? " म्हातारीने तिच्या हातावर कोरलेल्या लालभडक चिन्हावर बोट ठेवले. "हा आहे या सगळ्या खड्ड्यात लोटणाऱ्या भावनांचा निर्माता. तो तुम्हाला भाग पाडत नाही पण संधी देतो. कसं वागायचं ते तुम्ही ठरवता. विचार कर हे असं बाहुलं बनून राहायचंय तुला ? "
मी तुला ओळखलय. तुझ्यात ती क्षमता आहे. माझा, याचा वारसदार होण्याची. माझ्यावर विश्वास ठेव. "
म्हातारी आता उठली
" नसेलच मान्य तरी तुला पर्याय नाही. तुझी निवड झालेली आहे. हीच तुझी नियती आहे आता. या मर्त्य, कमजोर , कमनशिबी माणसांच्या आत्म्यांचा सौदा करायचाय तुला आणि बदल्यात मिळवायचंय भरपूर आयुष्य, अदभुत शक्ती. तुला कोणाला कायमचं उध्वस्त करायचंय? कोणाचा सूड घ्यायचाय? बेशक कर. तुला अडवणारं, अडवू शकणारं आता कोणी नाही. तू जे प्यायलंस ना मघाशी सूप म्हणून?दॅट वज पार्ट ऑफ द रिच्युअल. त्याने त्याचं काम केव्हाच सुरू केलंय"
हे सगळं ऐकून मघापासून अखंड रडणाऱ्या व्हिक्टोरीयाला भडभडून आलं. ती पळत आतल्या घरात गेली, दोनदा , तीनदा उलटी केली. तिथेच बाजूला काही वेळ ती स्तब्ध बसून राहीली.
तिला आता एकाएकी शांत वाटू लागलं होतं.
तिच्या शरीरात, मनस्थितीत, स्वभावात होऊ लागलेले बदल तिला जाणवू लागले होते. तिने डोळे पुसले. बाहेरच्या घरात आली. ती कृश म्हातारी आता तिथे नव्हती. तिचं गाठोडं आणि लाकडी पेटी तशीच खाली पडलेली होती. समोरच्या भिंतीत पुन्हा दार दिसु लागलं होतं. पण तिला आता त्याचा काही फरक पडणार नव्हता. हळवी, नाजूक, vulnerable व्हिक्टोरीया आता पूर्ण बदलली होती.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle