ऐल पैल 19 - सो कॉल्ड ध्येय

"काय?एवढी प्रस्तावना करतोयस म्हणजे काहीतरी विशेष दिसतंय" त्रिशा हसत म्हणाली.
"लेट्स जस्ट गो समव्हेर." नकुल म्हणाला.
त्याने बाईक स्टार्ट करून बाजूला घेतली.
"काही सरप्राईज असेल तर राखून ठेवलं तरी चालेल. एक महिन्यांचा सरप्राईज कोटा भरलाय आता माझा." त्रिशा मागे बसत म्हणाली.
नकुलने काहीच उत्तर न देता बाईक त्या आतल्या एरियातून बाहेर मुख्य रस्त्यावर आणली. एव्हाना साडे अकरा झाले होते. जरा पुढे जाऊन त्याने बाईक फुटपाथला लागून उभ्या असलेल्या एक गाड्याजवळ थांबवली. पांढऱ्या शर्टातले काका डावाने चहाचं आधण ढवळत होते. ते दोघे आत होते तोवर बाहेरच्या जगात पाऊस पडून गेलेला दिसत होता. डांबरी रस्त्याला पडलेल्या छोट्या मोठ्या अमिबा खड्ड्यांत पाणी साठलेलं होतं. काही वाहने, काही त्यांच्यासारखे निशाचर सोडले तर बाकी शांतता होती.
"परफेक्ट" त्रिशा गाड्याकडे बघत म्हणाली. "एसी ने कान बधीर झाले होते माझे."
"आह, कितीतरी दिवसांनंतर या वेळेला मी बाहेर आहे" त्रिशा गोल फिरत आजूबाजूला बघत म्हणाली." असलेच कधी तर प्रवासाच्या निमित्तानेच फक्त!"
नकुल काकांकडून दोन कटिंग घेऊन आला. दोघे चांगली जागा पाहून खाली फुटपाथवरच टेकले. त्रिशा नकुलचं निरीक्षण करत होती. क्लब मधून बाहेर पडल्यापासून ती एकटीच बोलत होती हे तिला कळत होतं.
"आय डोन्ट लाईक धिस नकुल, जेव्हा जेव्हा तू असा शांत असतो, काहीतरी घडलेलं असतं" दोन्ही पंज्यात ग्लास धरून चहाचा घोट घेत त्रिशा म्हणाली.
" त्रिशा, मला तुला बऱ्याच दिवसांपासून काहीतरी सांगायचंय" नकुल म्हणाला.
"सांगशील का आता प्लिज? उगीच टेन्शन देऊ नको मला" ती त्याच्याकडे पाहून टेन्शनमध्ये आलीच होती.
"आपली भेट होण्याआधी मी पायल ला होकार देण्याचं ठरवलं होतं. त्याही पुढे जाऊन भविष्यात तिच्याबरोबर सेटलच व्हायचं ठरवलं होतं" तो तिच्या दिशेने लांब कुठेतरी बघत म्हणाला.
"काय? तू तर म्हणाला होतास की तुला तिच्यात इंटरेस्ट नाही म्हणून?" त्रिशा अर्धवट संपलेला ग्लास ठेवत म्हणाली.
"ते खरंच आहे, ती मैत्रिणीच आहे फक्त." नकुल तिच्याकडे बघत म्हणाला.
"ओके, आता अजून घोळ न घालता स्पष्ट सांग. आणि आता ही पायल कुठून आली मध्येच?"
नकुल थेट मुद्द्यावर आला.
"माझं कॉलेज चं लास्ट इयर होतं. पायल पण तेव्हा सुट्टीसाठी घरी होती. तुला मी सांगितलंच होतं की कॉलेज संपलं की मी त्यांच्याकडे जाऊन काम करायचो."
त्रिशाने मान खालीवर डोलवली.
"तर त्या दिवशी पायलचा वाढदिवस होता. पार्टी घरगुतीच होती. तिच्या तिथल्याच काही मैत्रिणी आणि तिच्या आईच्या ओळखीच्या म्हणून त्यांच्या आया एवढ्याच बोलावलेल्या होत्या. एकंदरीत फक्त बायकांचं गेट टुगेदर होतं. आम्ही त्याच गल्लीत राहतो, माझ्या आईची ओळख म्हणून तिलाही बोलावलं होतं. मी तेव्हा खाली दुकानात होतो. गौतम काकांकडे कोणीतरी गेस्ट आले म्हणून त्यांनी चहाचं सांगायला मला वर पाठवलं. मी गेलो तेव्हा पार्टी उरकत आल्याचं दिसत होतं. मी आलेलो काकूंनी पाहीलं होतं की नाही ते माहीत नाही पण मला हा प्रकार दिसला"
नकुल काही क्षण थांबत म्हणाला.
"मला अजूनही याबद्दल बोलायला आवडत नाही."
राग, दुःख असे सगळे भाव त्याच्या चेहऱ्यावर एकत्र दिसत होते.
" त्यांनी माझ्या आईला तिथल्या सगळ्या खरकट्या दिशेस, कप बशा आत नेऊन ठेवायला सांगितलं. मी दोन मिनिटं शॉक झालो, जागेवरच थांबलो. ते सांगणंही अगदी गोड शब्दांत, सहज, पोलाईटली, घरच्या माणसाला मदतीसाठी विचारतो तसं. त्याचा मला आणखीनच राग येत होता.माझी आई म्हणजे आईच. तिने काही एक न बोलता,दाखवता ते सगळं उचललं आणि आत ठेवायला लागली. पायलने त्यावर आक्षेप घेतला, काकूंना सांगायचा प्रयत्न केला. पण काकूंनी तिकडे दुर्लक्ष केलं. आता मला राहवलं नाही म्हणून मी अजून आत गेलो. काकूंनी मला पाहून आईला 'ती भांडी लगेच धुवून ठेवली तरी चालेल' म्हणाल्या. माझा प्रचंड संताप झाला. मी तसाही ओझ्याखाली होतोच, कुठलंही काम करतच होतो. आईने भांडी घासायला सुरुवात केली तसं मी आईला बाजूला करत ते मी करतो म्हणालो. तिने माझं ऐकलंच नाही, मला अडवलं. काय वाईट काम नाहीये हे, करूदेत मला म्हणाली. माझ्यासाठी ते जर एवढं करताहेत तर आपल्याला ही थोडा कमीपणा घेणं भाग आहे असं तिच्या मनात असावं.
"काकूंना मी कधीच आवडत नव्हतो हे मला आधीपासूनच माहीत होतं. माझी एकंदरीत ख्याती पाहून लहानपणापासूनच मी आशिष, पायल मध्ये मिसळलेलं त्यांना अजिबात चालायचं नाही. पण आम्हा मुलांना वेगळं करणं त्यांना शक्य नव्हतं. नंतर काकांनी मला शिक्षणासाठी सपोर्ट करायचं ठरवलं, त्यात आता मी उरलेला दिवस त्यांच्याच घरात असणार होतो. त्यावरून त्यांच्यात किती आणि काय वाद झाले असतील हे मला माहीत नाही, पण काकूंना हे अजिबातच मान्य नव्हतं हे मला कळत होतं"
"मी तिथे जाऊ लागलो, तेव्हापासून त्या माझ्याशी फक्त कामापुरतंच बोलायच्या आणि उरलेल्या वेळेत माझ्याकडे तिरस्काराने पहात असायच्या. तुला मागे म्हणालो तसं, त्या मला त्यांची घरातली कामं पण बऱ्याचदा सांगायच्या. कदाचित मी ते करणार नाही आणि त्यांना काकांजवळ वाढवून माझी तक्रार करता येईल असं वाटत असावं. पण मी कशाला नाही म्हणायचं ठरवलेलं होतंच. ट्रस्ट मी, मला या गोष्टीचा कधीच काडीचाही फरक पडला नाही. शिवाय, मला माझ्याबद्दल त्यांचं मत कधी बदलायचं नव्हतं किंवा त्यांच्याकडून कसलं अप्रुवलही नको होतं. पण त्यांनी त्यावरून माझ्या आईचा असा अपमान करायला नको होता. ह्या गोष्टीबद्दल विचार न करणं ही माझ्यासाठी सगळ्यात कठीण गोष्ट होती"

त्रिशाला हे सगळं ऐकून वाईट वाटलं. ती शांत बसून ऐकत राहिली.

"पायलला मी आवडतो हे मला चांगलं माहीत होतं. त्या प्रसंगापासून पायलने कधी स्वतःहून मला विचारलंच तर लगेच हो म्हणून टाकायचं मी ठरवलं. ती मला तसं विचारणार याबद्दल मला खात्री होतीच, उलट मध्ये जेवढा वेळ जाईल तेवढं चांगलंच होतं. मी सेटल झाल्यावर तिच्याशी लग्न करायचं इथपर्यंत ठरवून टाकलं. आपल्या डोळ्यात खुपणारा मुलगा आपल्या मुलीबरोबर पाहून त्यांना किती त्रास होईल याचा विचार करून मला खूप बरं वाटत होतं. अर्थात, आईच्या अपमानावरून मला जेवढा त्रास झाला मानाने त्यांना होणारा त्रास कमीच होता. पायल आशिष नाहीये, तिच्या मेडिकलला जाण्यावरही तिच्या आईचा आक्षेप होता. इथेच राहून जे करता येईल ते कर असं त्यांचं म्हणणं होतं. पायलने बंड केलं. शेवटी त्यांना तिचं ऐकावंच लागलं. पायल माझ्यासाठीसुद्धा घरच्यांशी भांडू शकते हे मला माहित होतं.

पायल हा नको असलेला विषयच आज हेडलाईन झालेला होता आणि त्रिशाला त्याचा मनस्वी राग येत होता.

"पण तू म्हणाला होतास, तू तिला तुझ्याकडून कधीही एनकरेज केलं नाहीस." त्रिशा म्हणाली.
"नाहीच केलं, पण मी तिला दूर ही लोटलं नाही."
"तू असंही म्हणाला होतास की ती तुझी जुनी मैत्रीण आहे आणि म्हणून तुला तिचं मन दुखवायचं नाहीये."
"तेही एक कारण होतंच." नकुल म्हणाला. त्रिशाच्या चेहऱ्यावर धोक्याचं निशाण त्याला दिसायला लागला तसं तो पुढे म्हणाला.
"नंतर तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मी माझं सो कॉल्ड ध्येय आणि तुझ्यात पूर्ण कन्फ्युज झालो. आधीपासून मी जे थांबू, वाट पाहू म्हणत आलो ते एवढ्यासाठीच. एवढ्या दिवसांपासून मनाने पक्की केलेली गोष्ट एकदम सोडून देणं मला जमत नव्हतं आणि थांबणं ही जमत नव्हतं"
"हे पायलला माहीत आहे?" त्रिशाने विचारलं.
"आधी नव्हतं, आता मी घरी गेलो होतो तेव्हा सगळं सांगितलं."
"पायल तिकडे कशी काय होती तेव्हा?"
"योगायोग."
"तिला जर माहीत नव्हतं तर तुला तिला हे सांगावंसं का वाटलं? तिला दुसरीकडून कळायला मार्ग ही नव्हता, कधीच कळालं नसतं तिला."
"तिला मला आपल्याबद्दलही सांगायचं होतं. एवढे दिवस मी तिला नाही ही म्हणत नव्हतो, हो ही म्हणत नव्हतो, हे तिच्या लक्षात येतच होतं. दोन्ही गोष्टी सांगून मला हा चाप्टर क्लोज करायचा होता.
त्रिशाला ती घरी असताना नकुलने केलेला फोन तिला आठवला. त्याच्या एकेक वाक्यावर ती विचार करत होती.
"आणि आता तू हे मला का सांगतो आहेस? मलाही नसतंच कळालं कधी." आणि तेच चांगलं झालं असतं, त्रिशाला वाटलं.
"तुला सांगण्यामागे हे तुला माहीत असावं एवढाच उद्देश्य होता. एनिवेज पायल तुझ्याही आयुष्यात आलीच होती. ही गोष्ट डोक्यातून कायमची काढून टाकण्यासाठी मला मदतच होणार होती यामुळे."
"आणि पायल मला भेटली नसती तर?"
नकुल विचार करत म्हणाला.
"माहीत नाही, तसा विचारच नाही केला."
त्या दिवशी पायल भेटल्यांनंतर तो नंतर एवढा अस्वस्थ का होता आणि त्रिशाला घालवून द्यायला का बघत होता ते तिला आता कळत होतं.
"पण मग तुझ्या सो कॉल्ड ध्येयाचं काय?" त्रिशा हळूहळू अस्वस्थ होत चालली होती.
"मी ती गोष्ट कधीच विसरू शकत नाही, ना मी साधना समदरियांना त्याबद्दल माफ करू शकत. पण आता मला पायलशी संबंध जोडणं शक्य नाही. त्यावेळी माझ्या आयुष्यात कोणीच नव्हतं म्हणून मी हे ठरवू शकलो." नकुल तिच्याकडे बघत म्हणाला.

त्रिशा एक मोठा श्वास सोडून दोन्ही हात केसांतून फिरवत, हात पुन्हा गुडघ्यावर ठेवून बसली. एकदम कळलेली एवढी सगळी माहीती प्रोसेस करणं तिला कठीण झालं. दिवसभराचं ऑफिस, नंतर क्लब, तिथला एनर्जीटिक वेळ, एसी, थंड ड्रिंकस्, आताचं पाऊस पडून गेल्यानंतरचं कोंदट, दमट वातावरण आणि वर सगळ्यात कहर म्हणजे तिला कधी चुकूनही वाटल्या नव्हत्या अशा गोष्टी तिच्या कानांवर पडल्या होत्या. ती जागेवरून उठली. फुटपाथवर तशाच इकडून तिकडे फेऱ्या मारायला लागली. एव्हाना तीन चार लोकांना चहा सर्व्ह करून काकाही रिकामे झाले होते. तेही तिच्याकडं पहायला लागले.दोनेक फेऱ्या झाल्या तसा नकुल तिच्याजवळ गेला.
"त्रिशा, तू काहीच बोलत नाहीयेस."
"मला काहीच सुचत नाहीये. "
"डोन्ट थिंक नाऊ, आपण निघुया आता.उद्या बोलू."
त्रिशाने एक दोन फेऱ्या अजुन मारल्या. मग सरळ ते बसले होते तिथे गेली, त्यांचे अर्धवट संपलेले दोन्ही ग्लास उचलले, तिची स्लिंग पर्स उचलली आणि गाड्याजवळ गेली. काका आता दिवस संपवण्याच्याच बेतात होते.
"चहा खूप छान होता काका" ग्लास गाड्यावर ठेवत ती म्हणाली. पर्समधून पैसे काढले ,त्यांना दिले. तोवर नकुल तिथे आलाच. तिचा एकंदर राग रंग पाहून तो "इथेच थांब, मी बाईक काढतो." एवढंच म्हणाला.
तो वळाला तसं ती त्याला आवाज देत म्हणाली,
"नकुल, मी रिक्षाने जाण्याचं ठरवलंय,"
"त्रिशा, प्लिज. आलोच मी. " नकुल असं म्हणत पुन्हा वळाला. त्रिशा म्हणाली,
" मला आता या वेळेला एकटीला राहायचंय, या सगळ्या गोष्टींवर नीट विचार करायचाय. तू बरोबर असताना ते अजिबात शक्य नाही. मी जाईन."
"मूर्खासारखं बोलू नको त्रिशा, मी तुला आणलं होतं, पोहोचवून मला माझं काम पूर्ण करू दे." एवढ्या रात्री तिला एकटीला जाऊ देणं त्याला पटत नव्हतं. त्याने तसं म्हणताच तिने त्याच्याकडे रागाने पाहीलं.
"मी मॅनेज करू शकते." ती म्हणाली.
नकुलचं पुढचं वाक्य न ऐकताच ती काकांकडे पहात म्हणाली.
"काका, मला रिक्षा मिळेल का इथे कुठे?"
नकुल पुढे आला.
"तू का ओव्हर रिऍक्ट करतेयस एवढी? तू घरी जाऊन मग विचार करू शकतेस ना?"तो वैतागत म्हणाला.
"सगळं तूच ठरवणार का ?" त्रिशा त्याच्याकडे बघत म्हणाली.
आता तिला अजून पुश करण्यात काहीच अर्थ नव्हता हे त्याला कळलं.
"ठीक आहे. मी पाहतो रिक्षा."
"मी पण येतेय." ती म्हणाली.
दहा मिनिटे दोघे काहीच न बोलता रिक्षा शोधत राहिले. शेवटी त्यांना रिक्षा मिळाली, त्यातही ठिकाण संगितल्यावर त्याच्याशी हुज्जत घालावी लागली. सगळं ठरल्यावर ती रिक्षात बसली.रिक्षावाल्याला चालू करायला सांगून नकुलकडे बघत "बाय" एवढंच म्हणाली.
क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle