ऐल पैल -21 बु नसल वेदा! (व्हॉट काइंड ऑफ फेअरवेल इज धिस?)

सकाळी त्रिशा ऑफिसला निघण्यासाठी बाहेर पडली तेव्हा समोरचं दार उघडंच होतं. तिने जवळ जाऊन पाहीलं. नकुल त्याच्या बॅग्स एकत्र आणून ठेवत होता. तो जाणार हे तो म्हणाला होता तरी रात्रीतूनच त्याचं ठरेल हे त्रिशाला अजिबातच अपेक्षित नव्हतं. तिला आलेली पाहून त्याने वर पाहीलं.
"तू निघालास? " त्रिशा आश्चर्यचकित होऊन म्हणाली.
बॅगेची चेन लावून तो उभा राहीला.
"हो. तुझीच वाट पहात होतो."
"रात्रीतूनच ठरलं? आशिष म्हणाला तसं? "
" त्याने मला दुसरी जागा सापडेपर्यंतची मुदत दिली. ही इज काइंडेस्ट मॅन. त्याच्याजागी मी असतो तर मला इतकं शांत राहणं जमलं नसतं."
"तुम्ही दोघे जुने मित्र आहात, तो काही वेगळं वागला नाही." त्रिशा म्हणाली.
तू ही असाच वागला असता हे वाक्य त्याच्याकडे बघत तिने मुद्दामच गिळून टाकलं.
त्रिशाला नकळत मध्येच त्याच्या आत डोकावून बघण्याचा प्रयत्न करत असल्यासारखं त्याचं निरीक्षण करायची सवय लागली होती. नकुलला ते माहीत होतं. तिचं होईपर्यंत तो पण तसाच तिच्याकडे बघत थांबला. दोघांना आता घाई होती, पण निघावंसं वाटत नव्हतं.
"पण तू एवढ्या ऐन वेळी जाणार कुठे? राहण्याची व्यवस्था?" त्रिशाने विचारलं
"ते मी मॅनेज करू शकतो. माझे भरपूर मित्र आहेत, जागेचा इश्यू नाहीये. मधल्या वेळेत मी दुसरं पर्मनंट ठिकाण शोधेन."
थोडं थांबून तो म्हणाला,
"इश्यू आपल्यात आहे आणि आय होप तो इश्यूच असावा."
तो पुन्हा त्याच्या सामनाकडे गेला. नकुल कालपेक्षा खूपच स्थिर होता. गेले दोन दिवस त्याच्या चेहऱ्यावर जी अनिश्चितता, काळजीचं सावट होतं ते आज पूर्ण हटलेलं होतं. उलट तो आज सगळ्या गोष्टी ताब्यात असल्यासारखा आत्मविश्वासाने वावरत होता.
त्याला स्थिर पाहून त्रिशाचा शांतपणा ढळत होता.
"करूच शकतो तू मॅनेज. नवी जागा, नवे लोक, नवं वातावरण. सगळ्या गोष्टी सोप्या होतील तुझ्या त्याच्यामुळे. उलट आनंदी राहशील तू आणखीनच." त्रिशा उपरोधिक स्वरात म्हणाली.
तिचं बोलणं ऐकून तो मागे वळाला.
" तुला काय हवंय नक्की त्रिशा? मी सतत गिल्ट मध्ये, दुःखी दिसावं अशी इच्छा आहे का तुझी?"
"तू स्वतःला गिल्टी मानत नाहीस हे तू काल अगदी स्पष्ट सांगितलं आहेस, मग विषयच मिटला."
"मी सांगितलं पण तुला ते पचत नाहीये बरोबर?" म्हणत तो झपकन तिच्यासमोर आला. "वेल, मी तुला माझी बाजू, माझी कारणं सांगितली आहेत. त्यावर हवा तेवढा विचार कर, एवढं करून जर नाहीच पटलं तर मोकळी हो. डोन्ट वरी, मी तुला ब्लेम करणार नाही, वी आर नॉट मेंट टू बी, असं आपण समजू अणि पुढे जाऊ."
म्हणत तो पुन्हा वळून निघून गेला.
त्रिशाला ते खोलवर लागलं. तिच्या मनात नसताना ती भांडण उकरून काढत होती. काही क्षण तशीच थांबून ती त्याच्या मागे गेली. इतक्या तडकाफडकी त्याला जावं लागताना पाहून तिला वाईट वाटत होतं. या परिस्थितीत त्याला एकट्याला सोडून जाण्याची तिची इच्छा होत नव्हती.
"नकुल, तुला शिफ्टिंग मध्ये काही मदत हवीये? मी ऑफिसला उशिरा जाऊ शकते." मदत केल्याने असं काय होणार आहे, ती स्वतःला समजावत म्हणाली.
तो तिच्याकडे वळाला. तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याच्या हृदयाचे तुकडे होताहेत असं त्याला वाटलं. त्याचा मघाशीचा राग एकदम खाली आला.
"नाही. हे बघ, एवढंच सामान आहे माझं." तो त्याच्या कपड्यांच्या दोन मोठ्या बॅग आणि दोन बाकी वस्तूंची मोठी खोकी दाखवत म्हणाला."लिफ्टमधून एकाच फेरीत खाली नेता येईल.आता नेतोच आहे मी खाली सगळं."
"ठीक आहे, या दोन बॅग्ज मी घेऊन जाते. तू बाकी घेऊन ये, तोवर मी कॅब कॉल करते." त्रिशा म्हणाली.
"त्याची गरज नाहीये त्रिशा."
"पत्ता काय टाकू?" ती त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाली.
ती ऐकणारच नाहीये पाहून त्याने पत्ता सांगितला.
खांद्याला अडकवलेली पर्स सांभाळत तिने त्याच्या दोन्ही बॅगज् बंदांना धरून तिच्याकडे ओढल्या. उचलून पाहिल्या, थोड्या जड होत्याच.
तो काहीतरी म्हणणार तेवढ्यात ती म्हणाली.
"काही विशेष नाही, लिफ्ट मध्ये तर न्यायच्या आहेत."
त्याला तिच्याकडे पाहून हसू आलं, तिला आपली मदत करावीशी वाटतेय पाहून भरूनही आलं. ते सगळे विचार त्याने बळच बाजूला केले.
"ठिकेय, चाललीच आहेस तर, " तो त्याची लॅपटॉप ची बॅग आणत म्हणाला. " ही पण घेऊन जा. मी अडकवतो थांब." तिची प्रतिक्रिया न पाहता त्याने तिच्या मागे जाऊन कोट घालायला मदत करतात तशी बॅग तिच्या खांद्याना अडकवून दिली.
" गुड टू गो." बॅगवर एक धपाटा मारत तो म्हणाला. तिला हसू आलं.
ती त्याच्या दोन्ही बॅग उचलत, तोल सांभाळत लिफ्टकडे निघाली.
"डाव्या हातातली बॅग, त्यात इस्त्री केलेले कपडे आहेत, एकदम सरळ ठेव." मागून तो आवाज देत म्हणाला. त्रिशाने ऐकून त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
नंतर नकुल कॅबमधून जाईपर्यंत ती तिथेच थांबली. मागच्या खिडकीतून बाहेर पहात त्याने हात वर करून तिला बाय केलं. ती तसंच बघत राहीली.

संध्याकाळी त्रिशा ऑफिसमधून आली, जिने चढत तिसऱ्या मजल्यावर आली. चप्पल स्टँड समोर उभी राहून एकेक सँडल काढताना तिचं लक्ष समोरच्या दाराकडे गेलं. बऱ्याच दिवसांपूर्वी जेव्हा सुमंत कुटुंब निघून गेलं होती तेव्हा ऑफिसमधून आल्यावर तिला असंच एकटं वाटलं होतं. त्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा परत घडताहेत असं तिला वाटलं. दाराची बेल वाजवताना तिला पुन्हा कायम नॉक करणारा नकुल आठवला. मीनाक्षीने दार उघडलं, नकुल गेल्याचं तिला नंतर कळलं होतं. ती त्रिशाचा मूड तपासू लागली. त्रिशा नेहमीप्रमाणे आल्या आल्या आत जाऊन फ्रेश न होता तशीच पर्स जमिनीवर ठेवून खुर्चीत बसली. तिला पाहून मीनाक्षी ती बसलेल्या खुर्चीच्या हातावर टेकून तिच्या खांद्यावर हात टाकून बसली.
"डोन्ट वरी त्रिशा, तुम्ही सॉल्व्ह करताल हे सगळं."
"मी त्याच्याबाबत शंभर टक्के श्योर नाहीये मीनू. आमच्याबाबतीत कुठलाही निर्णय घेण्याची भीती वाटते आता मला."
"गिव्ह इट टाईम, आताच सगळा विचार करु नको" मीनाक्षी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
"ऐक, एक छान कल्पना आहे. तू, मी आणि ओम आपण तिघे आज डिनर ला जाऊ."
त्रिशा तिचं ऐकून खुर्चीतून उठत म्हणाली.
"नको मीनू, मला आता बाहेर कुठंच जाण्याची इच्छा नाहीये. खूप कंटाळले आहे मी."
" अहं , उलट तुला बाहेर पडण्याची, माणसांमध्ये मिसळण्याची, गर्दीची, आवाजाची गरज आहे. तुला जे काही डीप, अलोन थिंकिंग करायचंय ते छान भरपेट खाऊन आल्यावर कर ओके? उलट आणखी एनर्जी येईल तुला." मीनाक्षी तिच्या मागे जात म्हणाली.
"प्लिज मीनू, तुम्ही दोघे जा" त्रिशा चेहऱ्यावर पाणी मारत म्हणाली. " तुमची डेट बिघडवायची नाहीये मला."
"हजारवेळा डेट ला जातो आम्ही ठिके? कधीकधी बोलायला सुद्धा विषय नसतो, गप्प बसून खात असतो फक्त. तू आलीस म्हणजे आपल्याला जरा वेगळ्या गप्पा मारता येतील. मी करतेय ओम ला कॉल."
डिनरला निघण्यासाठी मध्ये एक तास शिल्लक होता. तोवर त्रिशाने रोजचे कपडे काढून घेण्यासाठी कपाट उघडलं. सगळ्यात खालच्या एका कप्प्यात कपड्यांच्या शेजारी शेजारी असलेल्या दोन थरांची उंची खालीवर झाली होती. त्रिशाने ते पाहून तो पूर्ण कप्पा बाहेर काढला. नीट असलेल्या घड्या विस्कटून पुन्हा घड्या घालत बसली. मीनक्षीने तिला डिस्टर्ब केले नाही.

डिनर च्या निमित्ताने ओम आणि मीनाक्षीला एकमेकांच्या चुगल्या करायला त्रिशा आयतीच मिळाली होती. मीनाक्षी म्हणाली तसंच झालं. तिचा वेळ नवीन गप्पा, चेष्टा मस्करीत चांगला गेला. पण कुठल्याही कामात, विचारात असताना मागे अस्तित्व जाणवू न देता माणसाचा श्वासोच्छ्वास जसा सुरूच असतो, तसा नकुल चा वावर तिच्या मनांत होता. गेल्या दोन वर्षांपासून एकत्र असणाऱ्या ओम मीनक्षीला पाहून तिला त्यांचं कौतुक वाटलं. इतकं साधं, सरळ, एफर्टलेस रिलेशन आपल्या नशिबात असेल का, त्रिशाला वाटून गेलं. रेस्टॉरंट मधल्या रँडम प्लेलिस्ट मध्ये तुर्की भाषेतलं ' बु नसल वेदा' सुरू झालं तसं ओम, मीनाक्षी आणि आजूबाजूचे आवाजकमी कमी होत जाऊन त्रिशाला कधीतरी गुगल करून पाहिलेले त्याचे इंग्लिश शब्द आठवले.
Believe, I want to believe in you
Explain everything from the beginning
Even if you love again, you must go
I think you are a liar!
What kind, what kind of a farewell is this?

रात्रीचे साडे दहा वाजले होते. नकुल क्लब मध्ये बार काउंटरवर एकटाच बसून आजूबाजूचं निरीक्षण करत होता. तिकडे डान्सर्स चे राउंड सुरू झाल्यामुळे सगळी गर्दी तिकडेच लोटली होती. क्लब म्युजिक आणि गर्दीच्या आवाजाने दणाणून उठला होता. नकुलचा पूर्ण दिवस शिफ्टिंग, ऑफिस आणि नंतर पुन्हा दुसऱ्या जागेचा शोध असा धावपळीत गेला होता. त्यांच्या या परिस्थितीत जास्त इनसेक्युर नकुलच होता. पहिला स्टँड घेण्याचा हक्क त्रिशाला देऊन टाकल्यामुळे तोवर तिच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्याशी तो कॉन्टॅक्टही करू शकत नव्हता. त्यांची प्रश्नोत्तरे चालू असताना त्रिशा ' तुला यातून सहज बाहेर पडता येणार नाही' असं म्हणाली होती, या वाक्याचा तेवढा त्याला दिलासा होता.
बारटेंडर दीपिका तिचा स्टंट करून पुन्हा तिच्या कामाला लागली होती. नकुलला एकटाच विचारात बसलेला पाहून ती म्हणाली,
"हेय, आज एकटाच? मित्र नाही, गर्लफ्रेंड नाही."
गर्लफ्रेंड ऐकून तो बळच हसला.
"सध्या ते सगळे मला सोडून गेलेत."
दीपिका ला drunk लोकांच्या स्टोरीज ऐकण्याची सवय होती, पण नकुलने आल्यापासून ड्रिंक ला हातही लावला नव्हता.
"यु वॉन्ट समथींग? फ्री..ऑन द हाउस" तिने ग्लास पुसता पुसता सहानुभूतीने विचारलं.
"थँक यु." दीपिकाला हवी असलेली त्याची स्माईल करत तो म्हणाला. "सम अदर टाईम."
म्हणून नकुल पुन्हा गर्दीच्या आवाजाशी समरूप होत त्याच्या विचारात गढून गेला.

नकुल-त्रिशात आता समज-गैरसमजाला जागा राहिली नव्हती. नकुलचा निर्णय आहे तसाच होता. सगळ्या घटना आणि त्यांची कारणं त्रिशालाही आधीच माहीत झालेली होती. आता फक्त त्यावर निष्कर्ष काढणं बाकी होतं, जे त्रिशावर अवलंबून असणार होतं. तोपर्यंत त्यांनी अप्रत्यक्षरित्या ठरवल्याप्रमाणे त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा संपर्क असणार नव्हता.

एका आठवड्यानंतर रात्री नकुलकडून त्याच्या नवीन पर्मनंट जागेचा पत्ता असलेला मेसेज त्रिशाला आला. पत्ता सोडून त्यात दुसरं काहीच नव्हतं. त्रिशाने काहीच रिप्लाय न करता तो सेव्ह करून ठेवला.

बु नसल वेदा गाण्याची लिंक
क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle