ऐल पैल 24 - Sway again! (शेवट)

सकाळी उठल्यानंतर त्रिशाने पुन्हा एकदा नकुल ला कॉल करून पाहिला. उत्तर नाहीच. त्यांचं बोलणं झाल्यापासून ती अस्वस्थ झाली होती. रात्री उशिरा कधीतरी तिचा डोळा लागला आणि दोन तासानेच रोजच्या अलार्म ने तिला जागं केलं. रिजाईन केल्यामुळे पुढचे दोन महिने ऑफीसला दांडी मारणे ही शक्य नव्हते. कपाटातून तिचा ब्लॅक टी शर्ट आणि डेनीम जीन्स काढताना तिला तिच्या क्रोशे जॅकेट चा गोंडा खाली लटकताना दिसला. तिने तेही बाहेर काढून ठेवलं.
नकुल कडून निर्वाणीची वाक्ये आल्यामुळे त्रिशा एकदम खडबडून जागी झाली होती. काहीही करून त्याच्याशी लवकरात लवकर बोलणं गरजेचं होतं. ऑफिसला जाताना बस मध्ये बसल्यावर तिने तिच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवलेला त्याचा पत्ता उघडून पाहीला.

दिवसभर तशीच कामं उरकल्यानंतर निघायला अर्धा तास बाकी राहीला होता. डेस्कवर बसल्या बसल्या ती इकडे तिकडे बघत डाव्या पायाची जोरजोरात हालचाल करत होती, मधूनच घड्याळाकडे बघत होती. मिनिट काटा एकेका तासानंतर सरकतोय असं तिला वाटत होतं.
"इनफ.." स्वतःशीच म्हणत तिची पर्स घेत ती उठली. तिला अशी धडाधड चालताना तिची कलीग बघतच राहिली. कॉर्नरवर जाऊन उभ्या असलेल्या रिक्षांपैकी एका रिक्षात जाऊन बसली.

पंधरा मिनिटांनी रिक्षावाल्याने लँडमार्क पाहून रिक्षा थांबवली. तिथून पुढचा घराचा पत्ता तिने चालता चालता भेटलेल्या माणसाला विचारून घेतला.त्याने सांगितल्याप्रमाणे ती बंगल्यांची रांग असलेल्या एका गल्लीत शिरली. पाट्यांवरची नावं वाचत "श्री. जगन्नाथ गोळे" नाव असलेल्या एका लोखंडी गेटसमोर जाऊन थांबली. गेटवर अडकवलेली अर्धगोल कडी दुसऱ्या बाजूला टाकत एक दार उघडून ती आत गेली. मागे पाहून गेट पुन्हा लोटून दिले. दोन्ही बाजूंनी डोकावत, कानोसा घेत ती हळूहळू चालायला लागली. त्या वाटेच्या दुतर्फा सीताफळ, पेरू, डाळींबाची झाडे होती. घराच्या डाव्या बाजूला पारिजात, आंबा, नारळ असलेली घरगुती छोटीशी बाग होती. बागेच्या कडेकडेने गुलाब, शेवंती, अबोली अशी लहान लहान फुलझाडे होती. पानांच्या आणि फुलांच्या मिश्र सुगंधाने तिला प्रसन्न वाटलं. सात वाजून गेले होते तरी बराच उजेड होता. दोन तीन पायऱ्या चढून तिने दाराची बेल वाजवली.
मरून, छोट्या त्रिकोनांची किनार असलेल्या पिवळ्या कॉटन च्या साडीतल्या एक गोऱ्यापान आजी बाहेर आल्या.
"कोण?" नाकातल्या आवाजात बोलल्या.
" नकुल ठाकूर इथेच राहतो का? मला त्याने हाच पत्ता दिला."
"अगं पण तू कोण?" त्या अजूनच किनऱ्या आवाजात बोलल्या.
"मी त्रिशा. तो अजून आला नसेल ऑफिसातून, मी तोवर बाहेरच थांबते. "
त्रिशा चं नाव ऐकून त्यांना काहीतरी आठवल्यासारखं झालं.
"त्रिशा म्हणजे त्याची गर्लफ्रेंड त्रिशा?" त्यांनी भुवया गोळा करत विचारलं.
गर्लफ्रेंड? त्रिशा आश्चर्याने बघत राहिली.
तेवढ्यात आतून निळा,कॉलर असलेला टी शर्ट आणि बिज बर्म्युडा घातलेले आजोबा बाहेर आले.
"कोण तू?"
त्रिशा बोलण्याआधी आजीच बोलल्या.
"अहो, ही म्हणतेय ही त्रिशा आहे, नकुल ला भेटायचं म्हणतेय."
" तीच का ही?" आजोबा आजींकडे बघत म्हणाले.
"तीच दिसतेय."
त्यांच्या आपापसात काय सूचक खाणाखुणा चालल्या होत्या, त्रिशाला काही कळेना , ती नुसतीच आलटून पालटून दोघांकडे पहात राहिली.
"त्याला अजून अर्धा तास तरी लागेल यायला, तोवर तू इथे घरात थांब. ये." आजोबा म्हणाले.
"नाही नको, मी बाहेर थांबते. तो नक्की कुठे राहतो ते कळेल का?" त्रिशा अवघडत म्हणाली.
"डावीकडच्या बागेतुन वर जिना जातो, तिथेच राहतो तो. बाहेर बसण्यापेक्षा तू आतच बस जरा, चल." आजी आग्रह करत म्हणाल्या.
"बरं,थॅंक्यु आजी."
" काकू, काकू म्हणायचं मला." आत जाता जाता त्या म्हणाल्या.
"ओह,सॉरी." त्रिशा परत अवघडली.

आजी आजोबांनी थोडी इकडची तिकडची चौकशी केली.
नकुल आणि तिच्याबाबत प्रश्न विचारले. त्रिशाने अगदी थोडक्यात , काही वेळेस अगदी हो, नाही अशीच उत्तरं दिली. दोघे जास्तच भोचकपणा करताहेत असं तिला वाटलं. ती जास्त बोलत नाहीये पाहून दोघांनी प्रश्न विचारणे बंद केले.
अर्धा तास झाला, एक तास झाला नकुलचा पत्ता नव्हता. त्रिशाने मध्येच उठून दारापाशी जात त्याला कॉल केला. त्याने उचलला नाही. आजी आजोबांनी टिव्हीत मराठी मालिका लावल्या होत्या. तसे ते प्रेमळ वाटत होते, पण त्रिशाला त्या अनोळखी लोकांमध्ये थांबण्याचा मनस्वी वैताग आला होता. त्यात ते दोघे मधूनच तिचं निरीक्षण करत होते. नकुलच्या ऑफिसबाहेर जाऊन थांबले असते तर बरं झालं असतं तिला वाटलं.
"काकू, मला एक कॉल करायचाय, मी जरा बाहेर जाते." त्रिशा तिथून सटकण्याच्या बेताने म्हणाली.
"बरं." त्या म्हणाल्या.
ती तिथून बाहेर पडली. बाहेर आता पूर्ण अंधार पडला होता. घराच्या बाहेरच्या बाजूने लावलेल्या दिव्यांमुळे दुतर्फा झाडांच्या लांब , तिरप्या सावल्या त्या पायवाटेवर पडल्या होत्या.
तिने तिथेच दोन तीन फेऱ्या मारल्या. फिरताना नकळत ती तिच्या जॅकेट च्या गोंडयांशी खेळत होती. तिच्या लक्षात आल्यावर हसून तिने त्या लोकराच्या दोऱ्यांचं बटरफ्लाय बनवलं.
गेट उघडण्याच्या आवाज आला तसं तिने पटकन मागे बघितलं. एका खांद्यावरची बॅग सांभाळत नकुल गेट लावत मघाशीची अर्धगोल कडी पुन्हा पहिल्या जागेवर टाकत होता. तिने भुवया गोळा करून नीट पाहिलं. त्याचा क्रू कट परत आला होता. सगळं काही ठीक असल्याची खात्री होऊन ती हसली.

तो वळाला आणि समोर त्रिशाला पाहून किंचित थबकला. परत चालायला लागला. तिच्याकडे न बघता तिच्या शेजारून जात तसाच घराच्या डावीकडे वळाला. त्रिशाने त्याला एकदा आवाज दिला, त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही तशी ती त्याच्या मागे गेली.

तशीच मागे जात तिने जिना चढला. काहीच न बोलता त्याच्या प्रत्येक हालचाली चं निरीक्षण करायला लागली. त्याने शूज काढले, दार उघडलं. आत जाऊन लाईट लावला. किल्ली खिडकीतल्या बाउल मध्ये ठेऊन दिली. आत जाऊन बाहेर आला, खांद्यावर आता बॅग नव्हती. फॉर्मल ग्रे पॅन्टला लावलेल्या ब्राऊन लेदर बेल्ट चं बक्कल मोकळं करून बेल्ट ओढून काढून सोफ्यावर टाकला. ती आपल्याकडे एकटक बघतेय हे त्याला जाणवत होतं. त्याने टक केलेला प्लेन ऑलिव्ह शर्ट बाहेर काढत मोकळा केला, दोन्ही बाह्यांची बटणं काढत त्या कोपरापर्यंत फोल्ड केल्या. ते सगळं दृश्य ती हातांची घडी घालून मन लावून पहात होती.
त्याचं तिच्याकडे लक्ष जाताच ती त्यातून बाहेर आली.
"नकुल.." ती काही म्हणणार तोच तो म्हणाला.
"का आली आहेस तू इथे? "
"तुला भेटायला.." म्हणत ती पुढे येऊ लागली तसा तो पटकन म्हणाला.
"तिथेच थांब, पुढे येण्याची गरज नाहीये. तिथूनच, त्या खुर्चीत बसून काय बोलायचंय ते बोल."
ती अजून जवळ आली की संपलं! त्याला माहीत होतं. ती निमूट खुर्चीत बसली.
"मी कालच जे आहे ते तुला स्पष्ट सांगितलंय." नकुल म्हणाला.
"तुला माझा खूप राग आला आहे , दॅटस् इट. नकुल, मी समजू शकते. मी तुला खरंच कॉल किंवा टेक्स्ट करायला हवा होता."
तिने एकदमच सगळं मान्य करून टाकल्यामुळे त्याला बोलायला काहीच राहिलं नाही. तो आत गेला. बाथरूम मध्ये जाऊन चेहऱ्यावर पाणी मारलं. किचनमध्ये जाऊन कॉफीच्या तयारीला लागला.
थोड्यावेळ कोणीच काही बोललं नाही. त्रिशा आजूबाजूचं निरीक्षण करत बसली.
"आज उशीर झाला तुला.." त्याला आत ऐकू येईल अशा आवाजात म्हणाली.
आतून काहीच आवाज आला नाही.
"ऑफिस? की मित्रांबरोबर?" त्याला बोलतं करण्यासाठी ती मुद्दाम हलकेफुलके विषय काढत होती. तोवर तो कॉफीचे दोन मग घेऊन बाहेर आला. एक मग तिच्या जवळच्या टेबलवर आदळला. कॉफीचे दोन तीन थेंब टेबलवर उडाले. हॉलच्या दुसऱ्या टोकाला सोफ्यावर जाऊन बसला.
"तू पाहुण्यांसारखं वागवणार आहेस का आता मला?" ती म्हणाली. तो शांतच. " बाय द वे काकूंकडे चहा झाला होता माझा"
"फेकून दे मग ती कॉफी." तो पटकन म्हणाला. तिने मग हातात घेतला. कॉफी सिप केली.
"तू सांगितलं नाहीस तुला का उशीर झाला ते."
"दीपिकाबरोबर होतो." तो तिच्याकडे बघत म्हणाला.
क्लब मधली बारटेंडर दीपिका.. तिला आठवलं.
"क्लब मध्ये? एवढ्या लवकर ?"
"बाहेर."
"ओह! का पण?"
"आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्तीबरोबर वेळ चांगला जातो."
ते ऐकून त्रिशाने भुवया गोळा केल्या. मग टेबलवर ठेवून ती खुर्चीतून उठली. त्याच्या दिशेने गेली.
"तुला तिथेच थांब म्हणलोय ना मी?"
"आय डोन्ट केअर." म्हणत त्याच्या शेजारी सोफ्यावर अंतर ठेवून बसली.
"नकुल, माझा निर्णय झालाय, काल तुला भेटून ऑफिसला निघाले तेव्हाच मी तिथवर आले होते."
त्याची काहीच प्रतिक्रिया नाही आली.
"तुला सांगून टाकण्याचं मी ठरवलंच होतं. घरी यायला उशीर झाला, नुकतीच सगळं आटोपून बसले होते, तेवढ्यात तुझा कॉल आला आणि तू प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. मला काहीच सुचलं नाही."
"म्हणजे तुझा निर्णय शंभर टक्के झालेलाच नव्हता. " तो कॉफीचा मग खाली ठेवत शांत आवाजात म्हणाला. "कशासाठी एवढा त्रास देतेयस स्वतःला? "
त्याच्या त्या वाक्याकडे दुर्लक्ष करून ती थोडं जवळ सरकून त्याच्याकडे वळून बसली.
"पायल भेटली होती मला."
त्याने तिच्याकडे पाहीलं.
"आशिषकडे आली होती तेव्हा. "
"आशिष कसा आहे?" त्याने तिच्याकडे न पाहता मध्येच विचारलं.
"ठीक. तिला भेटून मला दोन गोष्टी समजल्या" ती पुढे म्हणाली. "एकतर तिला तुझ्याबरोबर, तुझ्या आईबरोबर जे घडलं, त्याबद्दल काहीही सहानुभूती नव्हती. दुसरं, तिच्यापेक्षा तू, तुझी बाजू माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. तिला सहानुभूती दाखवताना काहीही गरज नसताना तू तिला, मला सगळं सांगून टाकलं त्याकडे मी साफ दुर्लक्ष केलं. दुसऱ्यांची काळजी करत तुला दूर केलं. आता नाही, हा, तू असं काही करायला निघालास तर भांडेन जरूर.."
तो ऐकत होता. तिने त्याचा मांडीवर ठेवलेला हात सरळ करून, तिचा हात हातात सरकवून त्याच्या बोटांत बोटे अडकवली. त्याने यावेळी प्रतिसाद दिला.
" झालं ते झालं, ते आपण पुसून टाकू शकत नाही. काल आपण भेटलो तेव्हापासून त्या गोष्टी आता मला महत्वाच्या देखील वाटत नाहीयेत. त्या भूतकाळातल्या अर्धवट गोष्टींमुळे आपल्यात आता जे आहे ते बिघडवायचं नाहीये मला. मलाही मुव्ह ऑन व्हायचंय."
तिने त्याच्या गालावर हात ठेवला.
"नकुल, तुझ्यापासून लांब राहून दुसऱ्यांकडून बरंच जाणून घेतलं तुझ्याबद्दल, आता तुझ्या जवळ राहून जाणून घ्यायचंय."
त्याने काही क्षण तिच्या एकेका डोळ्यांत आलटून पालटून बघितलं.
"तू खूप वाट पहायला लावलीस मला." म्हणत त्याने तिच्या गालावर एक हात ठेवत, तिला अजून जवळ आणत तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिने हाताने त्याचा शर्ट ओढून धरला. त्याने ओठ हळुहळु आणखी खोलवर नेले.
काही क्षणांनंतर तो बाजूला झाला तसं तिने त्याच्याकडे हसून बघत त्याच्या गालावर किस केलं.
"माय प्रिटी बॉय इज बॅक..." त्याच्या परत आलेल्या क्रू कट कडे पाहात म्हणाली.
"प्रिटी?"तो तोंड वाकडं करत म्हणाला.
"येस प्रिटी..विथ धिस स्माईल अँड प्रिटी हॉट..विथ धिस लूक" ती नजर खाली वर करत म्हणाली.
"प्रिटी कनविंसिंग.. पण ते तर माझ्या नावातच आहे! " तो मान वर करत म्हणाला. "न -कूल"
"ते तुझ्या स्वभावात पण आहे. बाय द वे, हे कधी आणि?" ती त्याच्या शिल्लक आहे तेवढ्या केसांना विस्कटण्याचा असफल प्रयत्न करत म्हणाली. "मी जोरजोरात हसले पाहून त्यानंतर?"
"नाही, मी इट्स ओव्हर म्हणालो त्यानंतर."
ती तशीच मनमोकळी हसली.
"म्हणजे ओव्हर वगैरे नाटकं होती."
"राग अगदी खरा होता. बट इट वर्कड्, डीडन्ट इट? "
त्रिशाने ओठ आवळून मान हलवली.

"तुझ्या त्या आजी कम काकू आणि आजोबांचा काय मॅटर आहे? त्यांना कसं माहीत आपलं?" तिने एकदम आठवत विचारलं.
तो हसायला लागला.
"झाली दिसतेय तुझी भेट. हो त्यांना आजी म्हणलेलं आवडत नाही. फार कूल आहेत पण ते दोघे. आपली सगळी स्टोरी, रोज त्यांच्याकडे माझी एक सहज चक्कर होते तेव्हा माझ्याकडून एपिसोड सांगितल्यासारखी सांगायला लावली होती त्यांनी. त्या निमित्ताने मलाही जुन्या आठवणींमध्ये जाता यायचं." तो म्हणाला.
"ओह, तरीच मला पाहून त्यांच्या इतक्या खाणाखुणा चालल्या होत्या."
"आत्तापर्यंत फक्त तुझं नावच माहीत होतं ना त्यांना."

बोलता बोलता तिच्याकडे हसून पहात त्याने तिच्या बटरफ्लाय ची नॉट घट्ट केली. "हे बांधत असताना पाहीलं मी तुला बाय द वे."
तिने त्याच्या हातावर चापट मारली.
"डोन्ट टच इट, नाजूक आहेत ते."
"मला नाजूक गोष्टींबरोबरही डील करता येतं." तो तसाच हसून म्हणाला.
"रियली? दीपिकाबरोबर काय करत होतास?" त्रिशाने भुवया गोळा करत विचारले.
त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं.
"तिची पुन्हा भेट होईल की नाही म्हणून आज भेटलो.."
"का? काय झालं?"
"क्लब बंद झाला."
त्रिशाला हे अगदीच अनपेक्षित होतं.
"काय? कसा काय बंद झाला"?
"इल लीगल! कोणीतरी जाऊन बातमी दिली, बंद करावा लागला. अर्थात ओनर्स काही शांत बसणारे नसतात पण पुन्हा सुरू करण्याच्या आधी बराच काळ जाईल आता."
"मला तुझ्याबरोबर अजून एकदा तरी तिथे जायचं होतं." ती म्हणाली. त्याला तो क्लब किती प्रिय होता हे तिला माहीत होतं. तिने त्याचा हात धरून दाबला.
"दॅटस् फाईन, आय ऍम फाईन. तू आली आहेस ना आता."
एनिवेज, एवढ्या दिवसांत तुझ्या आयुष्यात काय विशेष घडलं?" त्याने विचारलं.
"काहीच नाही. हो, आज माझ्या साल्सा चा शेवटचा दिवस होता, मी गेलेच नाही! पण नो वरीज" ती सोफ्यावरून उठत म्हणाली.
"माझ्याकडे पार्टनर आहे, इथे मी प्रॅक्टिस करू शकते." खाली वाकत तिने नकुलचा हात धरून त्याला उठवलं.
नकुलने लाईट बंद करून टाकला.
"मच बेटर" त्रिशा भुवया उडवत म्हणाली. कॉलनीतल्या स्ट्रीट लाईट चा मंद पिवळसर उजेड खिडकीतून आत येत होता. वाऱ्याने मध्येच झाडांची पाने सळसळत होती.
नकुलने त्याचा अमेझॉन एको लावला, त्याच्या निळ्या हिरव्या लाईट्स चा उजेड मंद उजेडात मिसळून गेला.
जरासा विचार करून ती म्हणाली,
"अलेक्सा प्ले 'स्वे बाय मायकल बबल'."
गाणं सुरू झालं तसं दोघे बॉलरूम डान्स च्या पोज मध्ये उभे राहीले.नकुलने तिचा एक हात वर घेउन खाली वाकत, स्माईल करत तिच्या कपाळावर डोकं टेकवलं. दोघे गाण्याच्या रिदम वर मूव्ह होऊ लागले.
गाण्याची चाल बदलली तशी त्रिशा त्याचा हात धरत लांब जाऊन गाणं लीप सिंक करत साल्सा वॉक करत पुन्हा त्याच्या जवळ आली. तो तिच्याकडे बघतच राहीला. त्याने तिचा हात वर धरून तिला गोल फिरवत तसाच हवेत सोडून दिला. तिचे दोन्ही खांदे धरून तिला काही कळायच्या उलटं चालवत नेऊन सोफ्याच्या हातावर टेकवलं.
"युसलेस.." तिच्या जवळ जाऊन म्हणत क्रोशे जॅकेट च्या बटर फ्लायचा एक पाय धरून हळूच ओढला. तिची स्माईल पूर्ण होण्याआधीच तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला या जगातून बाहेर घेऊन गेला....

...........
"बघा, मी म्हणाले होतं ना, तिच येईल म्हणून? काढा शंभर रुपये." खाली आजी आजोबांना म्हणत होत्या."पुढची बेट...येत्या तीन- चार महिन्यात दोघे एंगेजमेंट करतील."
"शक्य च नाही." आजोबा म्हणाले.
"तेही शंभर रुपये आताच देऊन ठेवा मग."
टिव्हीत पुढच्या मालिकेचं शीर्षक गीत सुरू झालं तसा दोघांचा वाद त्यात विरुन गेला...

(समाप्त)

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle