चांदणचुरा : वादी के उस पार - २

भाग १

'आपल्यामधली मौनाची दरी पसरतच चालली आहे आणि मी त्या गर्तेत खोल खोल जातोय.'

आदित्यने डायरीचे पहिलेच पान उघडले होते. दुपारचा चहा झाल्यावर बाबांच्या कपाटातली पुस्तके खालीवर करून बघताना मध्येच त्यांची डायरी त्याच्या हाती लागली होती. त्यांच्या वैयक्तीक गोष्टी वाचू नये असा एक विचार एकवार त्याच्या मनात चमकून गेला पण आता बाबा नाहीत तर काय हरकत आहे म्हणून त्याने डायरी बाहेर काढलीच. बाबांच्याच आरामखुर्चीत बसून त्याने डायरी उघडली.

आई मुंबईला निघून गेली त्यानंतरच्या दिवसांपासून डायरी सुरू झाली होती. सुरुवातीचा प्रचंड संताप, एकटेपणाची भावना, आदित्यला एकट्याने वाढवण्याचा ताण, फॉरेस्ट गार्डस् ची लाचखोरी, जंगलात वाढलेल्या लाकूडचोऱ्या आणि शिकारी, अधेमधे लिहिलेले फॅक्टरीतले हिशेब ह्या सगळ्या आठवणी त्याला त्या फिकुटलेल्या पिवळसर जाड कागदावरच्या काळ्या ठळक अक्षरात लिहीलेल्या नोंदींमध्ये विखुरलेल्या सापडत होत्या. आई निघून गेल्यामुळे त्यांच्या रागाचा पारा भयंकर होताच पण तो जसजशी पाने उलटून पुढे गेला तसतसा त्यांचा रागही निवळत गेलेला वाटत होता. कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतरच्या एकटेपणात तर त्यांना आईची आठवण येत होती पण आपल्या इगोपायी त्यांनी तसे आदित्यला कधीच जाणवू दिले नव्हते.

तुरळक दोन चार ओळी लिहिताना मध्येच एक पान भरून लिहिलेले दिसले म्हणून आदित्य उत्सुकतेने वाचू लागला.

१० मार्च २०१०

ह्या काजव्यांनी भरलेल्या रात्री तुझी आठवण माझ्या मनात एखाद्या झगझगीत दिव्यासारखी चमकते आहे. तू मला दिसतेस.. नेहमीच. जशी तू मला पहिल्यांदा दिसली होतीस. कॉलेजच्या ट्रिपमध्ये सगळे घोरत असताना मी नेहमीप्रमाणे लवकर जाग येऊन बाहेर आलो आणि लांबवर उगवतीच्या कोवळ्या प्रकाशात, नदीच्या स्तब्ध भासणाऱ्या पाण्यात पाय बुडवून तू बसली होतीस. तुझ्या बॉयकट केलेल्या धिटूकल्या केसांवर सूर्यकिरण चमकत होते. गुलाबी ओढणीचे एक टोक पाण्यात बुडाले होते. वरचे निरभ्र आकाशसुद्धा त्या शांततेत तुझ्यासोबतीने ध्यान लावून बसले होते. अचानक तू वळून पाहिलेस आणि तुझ्या चमकत्या घाऱ्या डोळ्यांसकट खळखळून हसलीस. वाऱ्याच्या लकेरींवर ते हास्य माझ्यापर्यंत पोहोचले आणि त्या उबदार ताजेपणात मला जिवंतपणा सापडला.  I came alive in that moment!'

पण तू नाहीस. आता फक्त कधीतरी पाठ केलेल्या बोरकरांच्या कवितेतल्या ह्या ओळीच माझ्या असतात.

लाडके श्वानसे दुःख माझे मुके
फिरता घोटाळे आगे नि मागे
लागता झापड होऊन लाकूड
पाळत करीत बसते जागे

असता चौघांत सुखांच्या ओघात
पडून राहते मिटून डोळे
डोळस परी तो उरता एकटा
टाकीत राहते कटाक्ष ओले

स्मृतींच्या घळीत स्वप्नांचे चांदणे
दाटून जेधवां लाविते लळा
वेगात धावून दूरात जाऊन
पिसाट होऊन काढिते गळा...

वाचता वाचता आदित्यने दाटून आलेला आवंढा गिळला. आईबाबांची ऍनिवर्सरी..

आजारपणात अशाच एका वेळी त्यांनी आईला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल त्यांना समजले. चिडून ते अजूनच आपल्या कोषात गेले आणि तेव्हाच त्यांनी ती अंगठी आईला पाठवून दिली. तरीही शेवटी शेवटी ते खूप हळवे होत गेले होते. रिटायरमेंट पर्यंत आदित्य आणि त्यांच्यात वेळेअभावी जो दुरावा निर्माण झाला होता तो भरून काढायचा हे ठरवून आदित्यबरोबर शक्य तेवढा वेळ त्यांनी घालवला होता. तरीसुद्धा बाबांनी जाण्यापूर्वी अनुत्तरित ठेवलेल्या आईबाबांच्या कितीतरी गोष्टी त्याला आत्ताच कळत होत्या.

डायरीच्या तळाशी एका मोठ्या लिफाफ्यात त्याला आईने पाठवलेली पत्रे ठेवली होती. न उघडलेली. लहानपणी पहिल्यांदा जेव्हा तिचे पत्र आले, ते वाचायला नकार देऊन, रुसून तो आपल्या खोलीचे दार लावून बसला होता. तेव्हापासून पुढली पत्रे बाबांनी कधी दिलीच नाहीत. त्याने ती उघडून वाचायला सुरुवात केली. त्याचे उत्तर आले नाही तरी आईने त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी त्याला पत्र लिहिले होते. प्रत्येक वाढदिवस, परीक्षा, निकाल, दहावीत हिंदी आणि इंग्लिशमध्ये सेंट्रल बोर्डात मेरिट मिळवल्याबद्दल कौतुक. कितीतरी पत्रं. आपल्या वागण्याची त्याला आता लाज वाटायला लागली. आपण तरी आईला वर्षानुवर्षे शिक्षा का देत आहोत? ती वागली ते योग्य नसेलही पण तिचं प्रेम तर होतेच ना कायम..

वाचता वाचता सहज त्याने खिडकीबाहेर पाहिले तर चांगलाच अंधार झाला होता. आकाशात पिठूर चांदण्याचा सडा होता. रात्र कधी झाली तेच समजले नव्हते. आईच्या बाजूने विचार करायला लागल्यावर त्याला हळूच तिची बाजू पटायला लागली होती तरीही त्याचे मन अजूनही तिला माफ करायला तयार नव्हते. पण उर्वी? उर्वी आईपेक्षा खूप वेगळी आहे आणि मीही बाबांपेक्षा वेगळा माणूस आहे. आम्ही मिळून कधी भविष्याचा विचार केला नाही पण अजूनही करायला काय हरकत आहे? जर आम्ही एकत्र असणं बाकी गोष्टींपेक्षा महत्वाचे असेल तर मिळून काहीतरी उत्तर शोधता येईल. तिच्याबरोबर असतानाचा प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यांसमोर तरळून गेला. विचार करतच त्याला भुकेची जाणीव झाली म्हणून त्याने फ्रिजमधला डुबका आणि भात गरम करायला ठेवला. टेबलावर पडलेला फोन उचलून त्याने रँडम प्लेलिस्ट सुरू केल्यावर अर्धवट थांबलेली गजल सुरू झाली.

नए परिंदो को उड़ने में वक़्त तो लगता है
प्यार का पहला खत लिखने में वक़्त तो लगता है

जिस्म की बात नही थी, उनके दिल तक जाना था
लंबी दूरी तै करने में वक़्त तो लगता है

गाँठ अगर लग जाए तो फिर रिश्ते हो या डोरी
लाख करे कोशिश खुलने में वक़्त तो लगता है..

गॅसवरचा डुबका ढवळताना मध्येच गाणं बंद होऊन मेसेज पिंग झाला म्हणून त्याने टेबलापाशी जाऊन फोन उचलला.

U: Look at the stars tonight. Merry Xmas!

आश्चर्याने डोळे विस्फारून तो बघतच राहिला आणि मागून डुबका चुररर जळल्याचा वास आल्यावर गॅस बंद करायला पळाला.

---

पहाटेच्या गच्च धुक्यात तो पळायला बाहेर पडला होता. थंड हवा, पायाखाली दवाने भिजलेला मातीचा रस्ता, आजूबाजूची दवाने भिजलेली हिरवीगार झाडी आणि बऱ्याच दिवसांनी शरीरात वाहणाऱ्या अड्रेनलिन मुळे त्याच्यात एकदम उत्साह संचारला होता. चार किमी पळून झाल्यावर तो बागेजवळच्या झऱ्यापाशी पोहोचला होता. जरा दम खाल्ल्यावर वाकून ते बर्फासारखे थंडगार नितळ पाणी ओंजळीने तोंडावर, हातापायांवर सपासप मारल्यावर तो तरतरीत झाला. पाणी पिऊन परत गावात शिरल्यावर त्याने घरी जाऊन टिफिन घेतला आणि सरळ फतेच्या घराकडे निघाला.

घराभोवतीच्या मातीने लिंपलेल्या भल्यामोठ्या भिंतीतलं लहानसं लाकडी दार नुसतंच लोटून ठेवलेलं होतं. कडी न वाजवता दार ढकलून तो सरळ आत गेला. सारवलेल्या मोठ्या अंगणात दोरखंडाच्या चारपाईवर म्हातारी बीजी गोधडी लपेटून बसली होती, समोरच मोठ्या चुल्ह्यावर भरभक्कम तपेल्यात पाणी तापत होते. डोक्यावर केसांची पुरचुंडी बांधून अंगात रंगीबेरंगी ऊनी स्वेटर घातलेला पाच सहा वर्षांचा गुटगुटीत गुरप्रीत चुलीसमोर उकिडवा बसून जोर लावून लावून फुंकणीने चूल्हा फुंकत होता. आदित्य दिसताच "बीजीss आदित्य अंकल!" म्हणून ओरडत येऊन त्याने आदित्यच्या पायाला मिठी मारली. त्याचे गाल ओढत सोडवून आदित्य बिजीच्या पायाला हात लावून "बीजी पाय लागू" म्हणत शेजारी जाऊन बसला.

"आदित्य? खोत्ते इत्ते दिन बाद बीजी याद आयी तुझे?" त्याचा कान धरत बीजी म्हणाली.

"सॉरी बीजी, बडे दिनो बाद सांगला आया हूं इसलीए मिल नही पाया." आदित्य हसत म्हणाला. "की हाल? अब घुटनोंमे दर्द नही है ना?"

"अब ठीक हूँ बेटा, तुमने पिछले साल जो मरहम दिया था उससे काफी ठीक हो गया. अभी फते नई बोतल भी ले आया."

इतक्यात बाहेरून पम्मी आंटी सीडरला घेऊन अंगणात आल्या. आल्याआल्या आनंदातिशयाने त्यांना हिसडा मारून सीडर भुंकत येऊन आदित्यच्या खांद्यावर पाय ठेऊन उड्या मारायला लागला. त्याचे मनसोक्त लाड करून झाल्यावर गुरप्रीत बॉल घेऊन सीडरला खेळायला घेऊन गेला.

"आदी बेटा, कब वापस आए? सब ठीक? पम्मी आंटीने हसत विचारले.

"हां आंटी दो हफ्ते पहलेही वापस आया, लेकीन चितकुल मे था. बस दो तीन दिन पहलेही यहा आया हूँ. सीडर ने ज्यादा तंग तो नही किया?" त्याने काळजीने विचारले.

"तंग किथे? हमे तो पसंद है सीडर. ये बच्चे तो उसे अकेला छोडते ही नही. पडोस के भी सब बच्चे खेलने आ जाते है. मै उसको सिर्फ अपने साथ सुबह घुमाने ले जाती हूँ" चून्नीने कपाळावरचा घाम टिपत त्या म्हणाल्या.

"अच्छा है, नही तो फते तो आठ बजे से पहले कभी उठेगा नही. मॉर्निंग वॉक तो भूलही जाओ" तो हसत म्हणाला. त्या दोघीही मान डोलवत हसल्या. "वैसे है किधर? दिख नही रहा?" त्याने विचारले.

"अरे वो हमारे शिमलावाले तायाजी की बेटी याद है? डिंपल? उसकी शादी है, लडका दिल्ली का है तो उनको शादी भी वही पर करानी थी. हम तो जा नही सके, सिर्फ प्रितो के ममीपापा और फते गये है. बैठो, मै चाय लाती हूँ" म्हणून त्या आत गेल्या.

"ओ पम्मी, चाय नही वो बादामवाला दूध भेज. मेरा बच्चा कैसा सूख गया है!" बीजी ओरडून म्हणाल्या. बीजी बरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना आतून गुरप्रीत मसाला दुधाचा मोठा स्टीलचा ग्लास दोन्ही हातानी धरून सांभाळून घेऊन आला. "प्रित्तो! देख तो, तेरे लिए कुछ है उस टिफिन मे.." आदित्य त्याचे गाल ओढत म्हणाला. "येय! चॉकलेटss" म्हणत टिफिन घेऊन तो आत पळाला.

"और बेटा, मैने कुछ सुना तेरे बारे मे. कुडी दी गल! होर दस्स, सच है क्या?" बीजी मिश्कीलपणे भुवया उडवत म्हणाल्या.

"हां है तो सही बीजी.. अब आपसे क्या छुपाना! लेकीन वो बॉम्बे मे पलीबडी है. यहां नही रह पाएगी." तो नजर चोरत म्हणाला.

"धत तेरे की! कैसा पहाडी मुंडा है तू, यहां रहना है या नही ये उसको सोचने दे. तू क्यूँ बोल रहा है वो नही रहेगी?" त्याच्या पाठीवर थाप मारत त्या म्हणाल्या.

"लेकीन.. मेरे मम्मीपापा जैसा भी हो सकता है इसलीए मैने सोचा दूर ही रहेंगे तो अच्छा."

"देख!" समोरच्या धुराळलेल्या चुल्ह्याकडे बघत त्या म्हणाल्या. "दूरीयां हवा जैसी है! लकडीमे जरासी आग होगी तो हवासे कुछ नही होगा, बुझ जाएगी. लेकीन लकडी का दिल अगर जल रहा होगा तो हवा लगतेही आग झट से जलने लगती है."

समोर धडाडून पेटलेल्या आगीत बघत त्याने ग्लास खाली ठेवला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle