रूपेरी वाळूत - ३

भाग - २

करड्या वळणांचा रस्ता आणि दोन्हीबाजूंची हिरवीगार घनदाट झाडी भराभर मागे पडत होती. वायपरने कंट्रोल न होणारे धुके आणि पावसाच्या धारा समोर काचेवर ओघळत होत्या. पाणी पुसले गेल्यावर फुंकर मारल्यासारखे धुके काचेला चिकटत होते. सूर्यप्रकाश कुठल्यातरी पानांच्या बेचक्यातून जरासा चमकून जात होता. समोरच्या धुरकट झालेल्या काचेमुळे त्याला वेग आपोआप कमी करावा लागला. एसीच्या गारव्याने त्याच्या अंगावर जरासा काटा आला होता. गाडी थांबवून त्याने शेजारच्या सीटवर पडलेले जॅकेट चढवले आणि म्युझिक प्लेयर सुरू केला. SYML च्या मिस्टर सँडमॅन.. ब्रिन्ग मी अ ड्रीम... च्या सुरुवातीच्या डिप्रेसिंग, शांत नोट्स सुरू झाल्या आणि त्याला अचानक त्याच्या डोळ्यात बघणारे तिचे बावरलेल्या हरणासारखे टपोरे काळेभोर डोळे आठवले. आधी कॉन्फिडंटली त्याला चिडवणारी ती आणि आत्ता त्याच्याजवळून पळून गेलेली ती दोन्ही आठवून तो नकळत हसला.

---

तीन दिवसांनंतर

रिसॉर्टवर सेमिनारवाल्यांचा ग्रुप सोडता फार वर्दळ नव्हती. तेही तीन दिवसांचा सेमिनार संपवून निघून गेल्यावर रिसॉर्टची साफसफाई करून झाली. बऱ्याच दिवसांनी आज उघडीप आली होती. समुद्राचाही मातकट रंग जाऊन जरा स्वच्छ दिसत होता. ऊन कमी झाल्यावर पलाश बरेच दिवस त्याच्या रिडींग लिस्टवर असलेलं सेपियन्स घेऊन बाहेर हॅमकमध्ये आडवा झाला.

थड! फुटबॉल जोरात येऊन हॅमकच्या टोकाला आपटला आणि त्याला जाग आली. त्याने हात वर करून घड्याळ बघितलं तर त्याला चक्क तासभर डुलकी लागली होती. कुंपणापलीकडे वाळूतून "पलाशदादा, बॉल बॉलss"  म्हणून तीन चार टीनेज मुलं आरडाओरडा करत होती. त्याने बॉल दोन्ही हातात उचलला.

"नाही मिळणार." तो थंड चेहऱ्याने म्हणाला.

"अरे यार! प्लीज दादा.. परत नाही येऊ देणार.." म्हणत मुलांचे चेहरे पडले.

"एक अट आहे, ऐकलं तरच बॉल मिळेल." लगेच मुलं उत्सुकतेने ऐकायला लागली. "मला टीममध्ये घेतलं, तरंच!" तो हसत उद्गारला.

" येय! अरे लगेच चल दादा." तो आधीच टीशर्ट आणि शॉर्ट्सवर होता, फक्त शूज चढवून तो पळत गेटबाहेर गेला. ओल्या वाळूत नेहमीप्रमाणे काठीने फिल्ड आखले होते आणि गोलपोस्ट म्हणून दोन बाजूना किनाऱ्यावरचे दगड मांडले होते.जवळ गेल्यावर त्याला बाकीचे प्लेयर्स दिसायला लागले. कडेला लावलेल्या बाईक्स आणि सायकल्स त्याला आताच दिसल्या. वरच्या आळीतले माया, रोहन आणि बाकी ओळखीची बरीच मुलं दिसत होती. सगळ्यांशी हाय हॅलो करून झाल्यावर कुणीतरी टीम अनइव्हन झाली म्हणून ओरडला. तितक्यात बाजूच्या वाळूच्या टेकाडावर मॅच बघत बसलेल्या ग्रुपमधून ब्लॅक जीन्स, पातळ स्लबचा स्लीवलेस बेबी पिंक टॉप आणि उंच पोनीटेलवर कॅप घातलेली नोरा उठून पुढे आली.

"आय एम इन!" एक हात वर करून ओरडत ती पुढे आली. खेळणाऱ्या कंपूत पलाशला बघून तिला थोडा धक्का बसला पण लगेच भानावर येऊन तिचा कूल ऍटीट्यूड परत आला.

"कित्यांक?" माया वैतागून म्हणाला.

"वी डोन्ट वॉन्ट अ चीअरगर्ल!" पलाश तिरकं हसत म्हणाला.

"नॉट चीअरगर्ल, आय एम अ प्लेयर!" म्हणत ती त्याच्यासारखंच तिरकं हसली.

"ए पलाश माझ्याकडे पायजे, नोरा नको" म्हणत माया पलाशला त्याच्या टीमकडे घेऊन गेला.

रोहनने "कमॉन नोरा! लेट्स रॉक!" म्हणत हात पुढे करत तिला फीस्ट बम्प दिला. तिने मायाला खुन्नस देत कॅप काढून टेकडीकडे भिरकावली. गेम ऑन!

माया त्याच्या टीमचा गोली होता. रोहनच्या टीमने कितीही गोल करायचे प्रयत्न केले तरी माया कुठल्याही दिशेने आलेला बॉल चपळाईने सटासट अडवत होता. पंचेचाळीस मिनिटे पळून पळून सगळे थकले आणि पंचाने हाफ टाईमचा इशारा केला. पलाश ह्या नव्या मुलांना फार ओळखत नसल्याने दम खात बाजूला उभा राहिला तर नोरा तिच्या टीमबरोबर मस्ती करण्यात बिझी होती. एका छोट्या मुलाबरोबर बॉल ड्रिबल करत ती पळत असताना नकळत त्याची नजर तिच्यावर खिळून राहिली.

ब्रेक संपल्यावर खेळ पुन्हा सुरू झाला. आता नोरा इरेला पेटली. एकदा बॉल तिच्याकडे आल्यावर बॉल न सोडता पूर्ण फिल्ड ती चपळाईने ड्रिबल करत होती. बाकी टीम तिला पास पास ओरडत असतानाही ती हट्टाने पास देत नव्हती. तिला डिफेन्ड करायला पलाश मध्ये आला तेव्हा त्याच्या डोळ्यात डोळे मिसळून ती हळूच म्हणाली "डोन्ट फर्गेट द रुल!" "व्हॉट?" त्याची नजर एकच क्षण हलली तेवढ्यात त्याला चकवा देत त्याच्या पायांमधून बॉल पास करत त्याच्यामागे जाऊन तिने बरोबर गोलपोस्टवर मायाच्या उलट टोकाकडे किक मारली आणि कोणाला दिसेपर्यंत गोल झालाही. तो इम्प्रेस होऊन तिच्याकडे बघत असताना तिने मागे वळून पाहिले आणि ओरडली, "टॅकल द बॉल, नॉट युअर ऑपोनंट!" आता गाल लाल व्हायची पाळी त्याची होती.

तरी अजून दहा मिनिटांचा गेम बाकी होता. एव्हाना भरती सुरू होऊन लाटा त्यांच्या फिल्डपर्यंत आल्या होत्या. सूर्य अस्ताला जाऊन काळोख पडायला सुरुवात झाल्यामुळे बॉल अंधुक दिसत होता. चुरशीचा सामना सुरू होता. शेवटच्या पाच मिनिटात बॉल नोराकडे पास झाला. तिच्या जवळच असणारा पलाश आता काही करून बॉल मिळवायचाच म्हणून तिच्या अगदी जवळ जाऊन डिफेन्ड करू लागला, इतका की त्यांचे श्वास एकमेकांच्यात मिसळत होते, डोळे आधीच एकमेकांवर रोखलेले होते. स्पर्श न करण्याच्या नियमामुळे एकमेकांच्या डोळ्यात बुडून जाण्याशिवाय ते बाकी काही करू शकत नव्हते. त्याने कंट्रोल मिळवायला पायाने बॉल ओढून घेतला पण ड्रिबल करतानाच पायाखालचा बॉल निसटल्यामुळे ती अडखळली. एका झटक्यात ती त्याच्या अंगावर आणि शेवटी दोघेही पाण्यात पडले.

प्रॅक्टिकली एकमेकांवर पडल्यामुळे दोघांची हृदये एकत्र धडधडत होती. तिचे ओठ त्याच्या भिजलेल्या खारट गळ्यावर टेकले आणि टोकदार हनुवटी त्याची मान संपून खांदा सुरू होतानाच्या मऊ जागेत रुतली होती. समुद्राच्या दिवसभर तापलेल्या कोमट खाऱ्या पाण्याने जी आग लावली होती तिच्या ठिणग्या त्यांच्या नसानसात दौडत होत्या. तिने मान उचलून त्याच्या विस्फारलेल्या डोळ्यात बघितले आणि नकळत त्याच्या गालाला लागलेली वाळू बोटांनी पुसून बाजूला केली. त्याच क्षणी पुढची लाट येऊन त्यांना पूर्ण भिजवून गेली. भानावर येत तिने काळोखात त्याच्या चेहऱ्याजवळ जाऊन पाहिले. त्याने हात उचलून पाण्याने तिच्या कपाळावर, गालावर ओघळून चिकटलेले बँग्स बाजूला करायचा प्रयत्न केला. तिने लगेच बाजूला होत त्याच्या दंडाला जोरदार चिमटा काढला. हेय! तो कळवळून ओरडला. तिने पटकन हात लांबवून बाजूला तरंगणारा बॉल उचलला आणि पाण्यातून निथळत शक्य तितक्या लवकर बाहेर निघाली. "रिव्हेंज!" ती मागे वळून म्हणाली आणि हसत तिच्या विनिंग टीमला हाय फाईव्ह द्यायला गेली.

त्याने उठून दोन्ही हात मागे ओल्या वाळूत टेकून आळस दिला आणि मान उभी आडवी फिरवून सरळ केली. ती जर बाजूला झाली नसती तर कदाचित त्या क्षणी त्याचे ओठ तिच्या ओठांवर असते. नुसती ही शक्यता आठवून त्याच्या ओठांवर अजूनच हसू पसरलं आणि तो काळोखात अंधूक दिसणारी तिची आकृती शोधू लागला.

---

तिला सकाळी आठ वाजता जाग आली. कालच्या पळापळीमुळे पायांनी पूर्ण असहकार पुकारला होता. ती उठून उशीला टेकून बसली आणि  पोटऱ्याना मसाज सुरू केला. पाय चेपता चेपता तिला संध्याकाळी तिच्या चेहऱ्यावर फिरणाऱ्या त्याच्या ओल्या बोटांचा स्पर्श आठवला आणि ती शहारली. स्टॉप डे ड्रीमिंग! तिने स्वतःलाच चिमटा घेत बजावले. जरा वेळाने उठून आळस देत ती किचनमध्ये गेली. गॅसवर झाकलेल्या पातेल्यात चहा होता. ओह आज संडे! सगळे चर्चमध्ये गेले असणार. ममा तिला उठवून उठवून वैतागली असेल सकाळी. खांदे उडवत तिने चहा गरम केला आणि बरणीतल्या तीन नानकटाया घेऊन तिच्या आवडत्या खिडकीत जाऊन बसली. तिला कधीतरी बक्षीस मिळालेलं मनीप्लान्ट आता खिडकीचं ग्रील भरून पसरलं होतं. एका नानकटाईचे तुकडे करून तिने ग्रीलमधल्या ताटलीत ठेवले. पाचच मिनिटात माया म्हणतो तसा तिचा पेट कावळा येऊन टॅप टूप आवाज करत खुषीत नानकटाई मटकावायला लागला. त्याच्याकडे बघत तिने चहाचा कप उचलला आणि  बेडरूममधून मोबाईल खणखणला. तोंड वाकडं करत कप खाली ठेवून ती आत गेली.

ओह मिनूचा कॉल! तिने लगेच फोन उचलला. पलीकडे मिनू उत्साहाने ओसंडून जात होती. मिनू मुंबईला पीजीमध्ये तिची रूमी होती. जमनालाल बजाज मधून एमबीए करून ती पुढे काहीतरी शिकायला जर्मनीत गेली होती, तिथेच तिला वरुण भेटला आणि आता पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यावर त्याने तिला प्रपोज केले होते. त्यांना इंडियात कुठेतरी डेस्टिनेशन वेडिंग पण त्याच्या आजीच्या इच्छेनुसार टिपिकल मराठी असे करायचे होते. वरुणच्या एका मित्राचे जांभूळवाडीत इको रिसॉर्ट आहे कळल्यावर त्यांनी इंस्टावर रिसॉर्टचे फोटो बघून ते बुक करून टाकले. एका आठवड्याने लग्नाचा मुहूर्त होता त्यामुळे सगळे दोन दिवस आधी रिसॉर्टवर येणार होते. ओह माय गॉड! नोराच्या पोटात खड्डाच पडला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle