रूपेरी वाळूत - १०

"हम्म... कपडे! ते मी रात्रीच धुवायला दिले. ड्रेस थोडा फाटला होता तोही नीट करून येईल. इतक्यात यायला हवे." तो सहज म्हणाला.

"व्हॉट?!" ती उडालीच. "म्हणजे.. तू.." तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. शिट! म्हणजे... इनर्सपण! विचारानेच ती लालेलाल झाली.

"डोन्ट वरी, मी नाही. तूच ते काढून दिले आणि रोब घातलास." तो हसत म्हणाला.

ओह, थँक गॉड! तिने निःश्वास टाकला आणि त्याच्याकडे बघून हसली.

"ओके तू आता शांतपणे नाश्ता कर, कपडे आले की थोड्या वेळात आपण निघू. मी आलोच.." म्हणून टॉवेल उचलून तो बाथरूममध्ये गेला.

तिने खायला सुरुवात केली. हळूहळू रात्रीच्या सगळ्या घटनांचा कोलाज तिच्या नजरेसमोर आला. आठवणीनेच तिचा मेंदू शिणून गेला होता. असे काही आपल्याबरोबर होईल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. पलाश वेळीच आला म्हणून, नाहीतर... ती कल्पनेनेही हादरली होती. इतक्या वेळानंतर अचानक तिला त्याचा चेहरा आठवला. घाबरून नकळत तिने रोबचा पट्टा आवळला. तिची खाण्याची इच्छाच निघून गेली. फक्त पलाशला वाईट वाटायला नको म्हणून तिने कसाबसा अर्धा उपमा संपवला.

तेवढ्यात इंटरकॉम वाजला आणि तिच्या विचारांची साखळी तुटली. ती फोन उचलायचा विचारच करत होती तेवढ्यात बाथरूममधून घाईघाईने पलाश बाहेर आला आणि त्याने रिसीव्हर उचलला. त्याने फक्त जीन्स कशीबशी चढवली होती. ओल्या केसांतून पाण्याचे थेंब त्याच्या उघड्या खांद्यांवर टपकत होते. त्याचे पिळदार दंड, छाती, वॉशबोर्ड ऍब्स, सपाट पोट. ती त्याच्या मागे असली तरी आरशात तो तिला पूर्ण दिसत होता. अचानक तिची नजर त्याच्या चेहऱ्याकडे गेली आणि त्याने आरश्यातूनच तिच्याकडे बघून भुवया उंचावल्या. शिट! त्याने रंगेहाथ पकडल्यामुळे तिने काही विशेष न बघितल्यासारखं तोंड वळवलं.

"हां, ओके." म्हणून त्याने लगेच फोन ठेवला. वॉर्डरोब उघडून हँगरवरचा टीशर्ट काढून घातला. तेवढ्यात बेल वाजली, टॉवेलने डोकं पुसत जाऊन त्याने कागदात गुंडाळून आलेले कपडे घेतले.

"सो.. हिअर कम्स युअर ड्रेस! गेट रेडी." म्हणून त्याने कपडे तिच्या हातात दिले. तो मोबाईलवर काहीतरी करत बाहेर टेरेसमध्ये गेला.

तिने मधले दार लावले आणि कागदावरचा दोरा सोडून कपडे उघडले. तिचा खांद्यावर फाटलेला ड्रेस शिवून, धुवून व्यवस्थित इस्त्री करून आला होता तिच्या इनर्ससहीत! होली शिट! आजचा अख्खा दिवस तिच्या आयुष्यातला मोस्ट एम्बरासिंग डे झाला होता. ती ड्रेस घालून तयार झाली. केसांचा रबरबॅण्ड कालच तुटून गेल्यामुळे दाट, खांद्याखाली लेयर्स असणारे नॅचरली सरळ केस विंचरून तिने तसेच मोकळे ठेवले. पार्टीचा ड्रेस ह्या वेळी घालून खाली जायची तिला थोडी लाज वाटत होती, नेमके कव्हर अप करायला जॅकेटही नव्हते. तरीही तिने उठून खांदे ताठ केले आणि टेरेसचे दार उघडले.

तो टेरेसमध्ये फेऱ्या मारत कुठल्यातरी सप्लायरशी फोनवर बोलत होता. त्याने हातानेच पाच मिनिटं म्हणून इशारा केला. ती पुन्हा बेडवर जाऊन बसली. थोड्या वेळात बोलणं संपवून तो आत आला. "अरे हो, मी विसरलोच होतो." म्हणत त्याने साईड टेबलच्या कप्प्यातून एक लहान प्लास्टिक पिशवी बाहेर काढली. "ही तुझी पर्स आणि सेलफोन! हा बदलावाच लागेल." तो फुटलेल्या स्क्रीनकडे बघत म्हणाला. "पण तुला सिम आणि बॅकअप हवा असेल म्हणून मी ठेऊन दिला."

"ओह थॅंक्यू! मला खरंच बॅकअप खूप महत्त्वाचा आहे." ती पटकन पिशवी घेत म्हणाली. तिच्या आवडत्या, पहिल्या पगारातून घेतलेल्या आणि पाच वर्षे जपून वापरलेल्या आयफोनकडे ती भरलेल्या डोळ्यांनी बघत राहिली.

"Obviously मी हा रिप्लेस करून देणार आहे. ह्याच्याबदली तुला लेटेस्ट कुठला फोन हवा ते सांग." तो तिच्यासमोरच्या खुर्चीत बसून तिच्याकडे बघत म्हणाला.

"यू कान्ट रिप्लेस द फीलिंग्स!" ती डोळे पुसून रागाने मान वर करून त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली.

"ट्रू!" तो शांतपणे म्हणाला, ही तिला चिडवण्याची वेळ नव्हती.

"इतका पॅम्पर करूची गरज नाय! मोबाईल माझ्या चुकीने फुटला, माझा मी घेईन" ती नाक फुगवून म्हणाली.

"ओके, ऍज यू विश!" त्याला मनातून हसायला आलं तरी तो खांदे उडवून म्हणाला.

"हुं! निघूया?" तिने उठून विचारले. तिचे खांदे आणि बरीचशी पाठ उघडी असल्यामुळे एसीच्या हवेने अंगावर काटा आला होता. हाताची घडी घालून दंडावर तळहात फिरवत ती उभी राहिली.

"एक मिनीट" म्हणून तो टेरेसमध्ये गेला. सोफ्यावर घडी घालून ठेवलेली क्रोशाची पांढरी शाल आणून त्याने तिच्या खांद्याभोवती लपेटली. "इट्स नॉट पँपरिंग, इट इज कॉल्ड शिवल्री!" तिच्या कानापाशी म्हणून तो दार उघडून बाहेर पडला.

ती चुपचाप त्याच्या मागोमाग गेली. लिफ्टचे दार उघडून पार्किंगमधल्या थारपाशी पोहोचेपर्यंत लोकांच्या नजरा तिला जाणवत होत्या पण तिकडे दुर्लक्ष करून ती सरळ गाडीत जाऊन बसली. गाडी सुरू करताच त्याने नेहमीप्रमाणे त्याचा रेबॅन नाकावर वर करून म्युझिक चालू केलं. जुबीन नौटीयाल 'तेरे जाने का गम, और ना आने का गम, फिर जमाने का गम... क्या करे...' म्हणून विव्हळायला लागल्यावर तिने आश्चर्यमिश्रित बोर होऊन त्याच्याकडे पाहिले. तिने बघण्याआधीच त्याने घाईघाईत प्लेयर बंद करून टाकला होता.

"काल किचन हेल्पर्सनी बऱ्याच वेळा गाडी किराणा दुकानात नेली होती. कान्ट हेल्प इट!" तो म्हणाला.

नंतर घर येईपर्यंतची पंधरा वीस मिनिटे ती शांत बसून होती म्हणून तोही रस्त्यावर नजर ठेवून शांतपणे गाडी चालवत राहिला. तिचा मूड बघून त्यालाही काही बोलावेसे वाटले नाही. उघड्या खिडकीतून तिच्या केसांवर येणारा उन्हाचा कवडसा आणि ती बाहेर बघत असल्यामुळे उडून त्याच्या गालापर्यंत येऊन टेकणारे तिचे केस त्याचे लक्ष विचलित करत होते. मध्यान्हीला चौकात पारावर टाईमपास करत बसलेली दोन चार मुले त्याच्या गाडीकडे वाकून वाकून बघत होती. तिला घरासमोर सोडल्यावर तिने थँक्स म्हणत गाडीचे दार ढकलले आणि नो प्रॉब्लेम म्हणून तो निघून गेला.

रस्त्यातला पाणी भरलेला खड्डा चुकवून तिने पलीकडे उडी मारली. लोखंडी गेट बंद करून कडी लावताना तिला समोरच्या अंगणातून वर्षाकाकी तिच्याकडे एकटक बघताना दिसली तेव्हा नोराने तिला हसून हात केला. ती पटकन हात दाखवल्यासारखं करून आत निघून गेली. आता हिला काय झालं म्हणून नोराने खालचा ओठ बाहेर काढून खांदे उडवले.

घराला कुलूप होते. तिने पर्समधून किल्ली काढून कुलूप उघडले आणि जिना चढून वर तिच्या खोलीत गेली. पिवळ्या रंगाचे दार बंद केल्यावर तिला एकदम आपल्या विश्वात आल्यासारखं वाटलं. दारामागे टीनेजमध्ये कधीतरी लावलेले हृतिकचे पोस्टर, खाली छोट्याश्या रॅकमधले दोन तीन फ्लॅट चपलांचे जोड, आत्ता काढलेले सँडल्स आणि एक स्नीकर्स, हलक्या पिस्ता शेडच्या भिंती, खिडकीकडे तोंड करून ठेवलेलं तिचं जुनं लाकडी स्टडी टेबल, खिडकीबाहेर उन्हाळ्यात लालभडक बहरणारा आणि सध्या मऊ बारीक पोपटी पालवीने भरलेला गुलमोहोर, शेजारी पुस्तकं कशीही भरून ठेवलेलं काचेचं कपाट, एक कपड्यांचं लाकडी कपाट, कपड्यांचा ढीग ठेवलेली एकदोन दोरे तुटलेली, विणलेल्या पांढऱ्या जाळीची खुर्ची. डॅडीनी तिच्या सातवीच्या रिझल्टचं बक्षीस म्हणून आणलेला पिवळा टेबललॅम्प, टेबलवर एक आल्बम भरून तिने बऱ्या केलेल्या गाई, म्हशी, कुत्रे, मांजरं, घोडे, ससे, मोर, हत्ती वगैरेंचे तिने काढलेले इन्स्टंट फोटोज, भिंतीवर स्कुटर चालवणारे डॅडी त्यांच्या पायाशी उभा माया, मागे बसलेली ममा आणि तिच्या मांडीवर बॉयकट मधली ती असा लहानपणीचा एक फोटो आणि तीच्या केरळ ट्रिपमधली डंगरी घालून डोक्याला बंडाना बांधून हत्तीला आंघोळ घालतानाची एक मोठी पोस्टरसाईज फोटोप्रिंट होते, पलीकडच्या भिंतीलगत तिची लोळण्याची सवय लक्षात घेऊन केलेला डबल बेड.

बेडवर इकडेतिकडे पडलेले तिचे कपडे, पेन्सील, पेन, इअरफोन्स, अर्धवट लिहिलेले केस पेपर्स, जर्नल्स, जमिनीवर उडालेली दोन तीन कागदांवरची डूडल्स वगैरे आवरण्याबद्दल आणि फक्त आजचाच दिवस सुट्टी असण्याबद्दल तिने पुन्हा एकदा स्वतःला बजावले आणि हातातली पिशवी टेबलवर ठेवली. लगेच ड्रेस काढून तिने रोजचा लूज टीशर्ट आणि शॉर्ट्स घातल्या. ड्रेस काढताना तिने जीभ चावली, थँक गॉड काल ड्रेसखाली ब्रा आणि पॅन्टीज मॅचिंग व्हाइट लेसच्या होत्या. परत रात्रीच्या बाकी आठवणी सुरू होण्याआधी तिने दोन इबुप्रोफेन घेतल्या आणि ब्लॅंकेट ओढून झोपून गेली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle