रूपेरी वाळूत - ११

दाराबाहेरून येणाऱ्या माया आणि ममाच्या मोठ्या आवाजाने तिला जाग आली. लगेचच तो नोराss नोराss म्हणून जोरात हाका मारत तिचा दरवाजा ठोकू लागला. "अरे एवढ्यात लंच टाईम झाला पण!" म्हणत ती आळस देत उठली.

"येतंssय" म्हणून जोरात ओरडून तिने मनगटाचा फिक्सर काढून केस उंच पोनिटेलमध्ये अडकवले आणि दार उघडले. माया हाताची घडी घालून समोर फेऱ्या मारत होता. ममा डायनिंग टेबलपाशी तळहातावर चेहरा टेकून बसली होती. मायाच्या खवळलेल्या चेहऱ्याकडे बघून हे रोजच्यासारखं भांडण नाही अशी काहीतरी जाणीव तिला झाली.
"हम्म, आता काय?" तिने त्याच्यासमोर उभी राहून विचारले. तो नुसताच तिच्याकडे रागाने धुमसत बघत राहिला. "डॅडी?" तिने ममाकडे बघून विचारले. "ते बेकरीतच र्‍हवले. जेवायला नका उलौले." ममापण रागावलेली दिसत होती.

"काय झाला काय, माका कोण सांगात काय?" तिने कंबरेवर हात ठेवून विचारले. "तूच उलव" ममाकडे बघून माया म्हणाला आणि नोराकडे न बघता निघून गेला. नोराला काय चाललंय ते समजेनासे झाले होते. ममाने खोल श्वास घेऊन तिला हातातला मोबाईल दाखवला. स्क्रीनवर दाराच्या फटीतून काढल्यासारखे काही फोटो होते. फोटोत पलाश बाथरोब घातलेल्या तिला उचलून बेडवर ठेवत होता, दुसऱ्या फोटोत त्याचा हात तिच्या गुढघ्यावर दिसत होता, अजून एका फोटोत तो तिचे ओले केस चेहऱ्यावरून बाजूला करत होता. हे सगळे फोटो त्यांच्या गल्लीच्या व्हाट्सऍप ग्रुपवर फॉरवर्ड आले होते आणि कॅप्शन होतं one night or turu lub?!! आणि दात दाखवत हसणारे साताठ स्मायली.

ती डोळे फाडून फोटोंकडे बघत राहिली. तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. डोळ्यात अचानक पाणी जमायला लागलं.

"नोरा, माका जरा समजाऊन सांग हो प्रकार काय? काल दिसभर पाऊस लागलो नि जय थय पाणी भरला. माया तुका आणूक गेल्ललो तो सांदीतल्या पुलाथय अडाकलो. पाणी उतारल्यावर रात्री तीन वास्ता घरान पावलो." ममा तिच्या पाठीवर हात फिरवून म्हणाली.

तिने ममाला केतनचा अटॅक सोडून पलाशच्या अंगावर चक्कर येऊन पडल्यापासून पुढची बाकी सगळी गोष्ट सांगितली. ममाने जरी ऐकून घेतले तरी तिला हे सगळे काही पटले नव्हते. "गो, माका काय्येक समज पडना नायासा. तुमच्या दोघांचा काय चालू असला तर सांग. हे फोटो गावभर लोकांनी बघल्यानी. लोकांक चघळाक विषय व्हयो. एक तर तू आपल्यातल्या सगळ्या चांगल्या पोरांकणी रिजेक्ट केलास, आता तीशीक पोचलं तरी वेडिंग नको म्हणतं. हे फोटो बघून आता अजूनच कोण येवचे नाय. आम्ही तुझा सगळा ऐकला, तुका पायजे तितक्या शिकवलवं, पण आता पुरो झाली तुझा स्पेस नि फ्रीडम!" ममाचा आवाज वाढला होता.

"ओ गॉड ममा! इतक्या काय होऊक नाय.. तू सगळ्यात माझा वेडिंग कित्यां हाडतं? तुझ्याशी बोलून काय उपेग नाय, मी डॅडी आयले की बोलतंय त्यांच्याशी." म्हणून ती उठून किचनमध्ये निघाली.

माया फ्रिजमधली बॉटल काढून गार पाणी घटाघट पीत होता. "नोरग्या, मी चार पोरांक सांगून ठेवलय, जर त्या नायकानं असला केला झाला मी त्येका बघून घेईन. तू फक्त बोट दाखयं." तो थांबून म्हणाला.

"माया, तुया हेच्यात पडू नको हां. पलाशान काय्येक वावग्या करूक नाय." ती ताटात चपाती आणि बिरड्याच्या बाजूला सुकटाची लालभडक चटणी वाढुन घेत म्हणाली.

एकदम त्याचा चेहरा बदलला. "मग अफेअर करूक तुका आपल्यातलो कोण गांवाक नाय? तुझ्याकडसून ह्या एक्सपेक्ट नव्हता."

"माझ्याकडसून एक्सपेक्ट नव्हता नि तू टेन्थमधे असतेवेळा सावताच्या दीपाक काजीच्या बागेत काय काजी खाउक घेऊन जात होतंस?" ती एकदम उसळून म्हणाली.

"ता काय सिरीयस नव्हता आणि तुका गावात काय्येक वायट कोणी बोल्लला माका चालूचा नाय." तो बारीक आवाजात म्हणाला.

"जा, तू जेव जा." म्हणून ती ताट घेऊन तिच्या खोलीत निघून गेली. गॉड डॅम इट! म्हणत तिने धाडकन दार लावलं. कालचा दिवस तिच्या आयुष्यातला सगळ्यात वर्स्ट दिवस असेल. ताट टेबलवर ठेऊन ती भांडं भरून पाणी प्यायली. ब्लड प्रेशर जरा खाली आल्यावर ती खुर्चीत मांडी घालून बसली आणि हे फोटो प्रकरण कुणी केलं असेल याचा विचार करू लागली. तिला थोडाफार अंदाज होताच.

----

नोराला सोडून निघताच त्याचा सेलफोन वाजला म्हणून त्याने गाडी कडेला घेतली. शिरीषचा कॉल होता. "हॅलो दादा, बोल.."

"पलाश! नक्की काय चाललंय हे? तुझे फोटो गावभर सगळ्या ग्रुप्सवर फॉरवर्ड झालेत. मी पाठवलेत बघ तुला व्हॉटस्ऍपवर. अप्पा जाम चिडलेत. असशील तसा सरळ घरी ये आणि त्यांच्याशी बोल आधी." तो बोलतच सुटला होता.

"हे अरे ऐक.. ऐक.. दादा, कसले फोटो? काय म्हणतोस मला काही कळत नाहीये." पलाश गडबडून गेला होता.

"तू फोटो बघ आणि घरी ये." म्हणून त्याने फोन ठेवूनच दिला. पलाशने व्हॉटस्ऍप उघडून कॅप्शनसकट फोटो बघितले. संतापाने त्याच्या मस्तकात कळ गेली. त्याने स्टेअरिंगवर एक जोरदार बुक्का मारला आणि गाडी सुरू केली. घरी पोहोचताच तो अंगणात गाडी पार्क करून उतरला. दरवाजातून आत शिरताच त्याला झोपाळ्यावर बसलेले अप्पा दिसले.

"या!आपलीच वाट बघत होतो." अप्पा जोरात म्हणाले.

पलाश खालमानेने त्यांच्या शेजारच्या खुर्चीत जाऊन बसला. "ते फोटो खरे आहेत?" अप्पांची भेदक नजर त्याच्यावर रोखलेली होती.

"हो, खरे आहेत. पण.."

"पण बिण मला काही ऐकायचं नाही. हे खरे की खोटे एवढंच हवं होतं. आतापर्यंत मी या गावात आपल्या घराचं जे नाव राखून आहे ते आपल्या चांगल्या वागण्यामुळे आहे. आपल्या घराच्या संस्कारांमुळे आहे. हे असले उद्योग करून ते मातीत घालवू नका."

"मला मान्य आहे, अहो पण हे दिसतं तसं नाहीये काहीच. माझं ऐकून तरी घ्या." तो विनवत म्हणाला.

"पलाश! बास! मी तुला रिसॉर्टसाठी परवानगी दिली ते टुरिझममुळे इथे गावात थोडा पैसा येईल, चार लोकांचे संसार चालतील म्हणून. हे असले उद्योग करण्यासाठी नव्हे. नोरा आपल्यातली नसली तरी चांगली मुलगी आहे. ती असं करेल असंही मला कधी वाटलं नव्हतं." ते जरा हळू आवाजात म्हणाले.

"हा! म्हणजे मी करेन असं वाटलं होतं तुम्हाला." तो रागाने मुठी आवळत म्हणाला.

"मी तुझा बाप आहे, तुला ओळखतो." ते शांतपणे म्हणाले."असो! मी संध्याकाळी अंतोनला मुलीला बरोबर घेऊन इथे बोलावलाय. तेव्हा काय ते कळेलच."

"काssय!!" तो ओरडलाच.

"ओरडू नको. तुलाही तोपर्यंत इथेच थांबायचं आहे. अजून एक, आपल्या नावाला जे काही काळं तू आज फासलं आहेस ते तुलाच साफ करावं लागेल. जर ते नाही केलं तर रिसॉर्टची जमीन अजूनही माझी आहे हे लक्षात ठेव. चला जेवायला बसू.." म्हणून ते झोपाळा थांबवून उठले.

पलाश त्यांच्याबरोबर उठून आत गेला खरा पण पुढे नक्की काय करायचे ते त्याला अजिबात सुचत नव्हते. जोपर्यंत तो अप्पांना पटेल असं सोल्युशन देत नाही तोवर रिसॉर्ट पूर्णपणे त्याचं होणार नव्हतं.

जेवताना सगळे अप्पांना घाबरून शांतपणाचा देखावा करत जेवत होते. दादा आज शेतावरच होता. वहिनीने त्याच्या पानात आणखी एक कुरकुरीत तळलेला बोंबील वाढला आणि काळजी नको करू, सगळं ठीक होईल म्हणून हाताने इशारा केला. त्याची आई गार्गीला मांडीत बसवून भरवत असली तरी तिचा एक डोळा पलाशवर होता.

पटापट जेवण संपवून तो माडीवर त्याच्या खोलीत गेला आणि दाराला कडी लावली. हल्ली ही खोली वापरात नसली तरी आईने ती पहिल्यासारखीच लख्ख ठेवली होती. भिंतींचा हलका आकाशी रंग, गुळगुळीत पॉलिशच्या थंड काळ्या फरश्या, पातळ पांढरे पडदे असलेला मोठा शिसवी पलंग, वर नक्षीदार पांढऱ्या काचेची शेड असलेले दोन दिवे, स्टडी टेबल आणि खुर्ची, टेबलवर पेन पेन्सिल्स भरलेला एक कॉफी मग, एक मोठं पेपरपॅड, एक रिकामा लोखंडी रॅक आणि त्यातली पुस्तकं सध्या भरून ठेवलेलं कपड्यांचं लाकडी कपाट, त्यानेच मागे कधीतरी आणून ठेवलेल्या दोन लेदर बीन बॅग्स, भिंतीवर पावसाळी शेतावरची तीन लहानशी वॉटरकलर लँडस्केप्स, भिंतीच्या कोनाड्यात त्याने बनवलेलं नऊ पांढऱ्या शिडांचं लाकडी गलबत, घराच्या समोरच्या बाजूला उघडणाऱ्या दोन मोठ्या फ्रेंच विंडोज.

आत येताच तो पाय पसरून बीन बॅगवर बसला. कालपासूनच्या घटना आठवून तो विचार करू लागला. हे ज्याने कोणी केलं त्याला शोधून तो पहिलं चोपणार होता. अचानक त्याला नोरा आठवली, शिट! या सगळ्यात तिला किती ऐकून घ्यावं लागलं असेल आणि सगळ्याचा मनःस्ताप त्याच्याहून जास्त तिला होणार होता. त्याने वहिनीला कॉल करून नोराचा नंबर घेतला. त्याच्याकडे नंबर नाही म्हटल्यावर वहिनीला खरं तर शॉकच बसला होता.

नावाच्या रकान्यात त्याने Animal Planet लिहून नंबर सेव्ह केला आणि तिला पिंग केलं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle