रूपेरी वाळूत - १३

दार उघडून तो आत शिरला आणि मागोमाग ती आल्यावर त्याने दार लावून घेतले.

हां! रिलॅक्स होऊन तो धप्पकन बीन बॅगवर बसला. ती हळूच एकेक पाऊल टाकत त्याच्या आणि तिच्या खोलीतला कॉन्ट्रास्ट नजरेखाली घालत होती.

"हॅव अ सीट!" तो त्याच्यासमोरच्या बीन बॅगकडे हात दाखवून म्हणाला. ती शांतपणे तिथे जाऊन बसली. "सो.. अप्पांबद्दल माझा अंदाज बरोबर होता. आपण ठरवलं तसं पुढे जायचं की तुला ते कठीण वाटतंय?" त्याने आपल्या मनातली खळबळ लपवून विचारलं.

मनात विचार करणं वेगळं आणि खरंच असं लगेच लग्नाची बोलणी वगैरे करणं वेगळं. तिला आता तिने काढलेलं सोल्युशन अंमल करायला थोडं कठीणच वाटू लागलं होतं. "माका हा अजून काय खरा नाय वाटू ऱ्हायला. काय सुचत नाय नि वेगळा काय सोल्युशनपण समोर दिसत नाय." ती करंगळीचे नख कुरतडत म्हणाली.

"बघ तुला पटत नसेल तर अजूनही आपण हे सगळं थांबवू शकतो. फक्त पुढे जे होईल ते सहन करावं लागेल." तो गंभीर होत म्हणाला.

"नो! मला थोडे डाऊट आहेत पण मी आता मागे नाही फिरणार." तिने त्याला सांगता सांगता स्वतःलाच समजावले.

"गुड. सेम हिअर! आपण जर असं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करणार असू तर आपल्यापुरते क्लॉजेस आपण ठरवून घेऊ. लीगल पेपर नाही पण आपल्यापुरेसं, पुढे आपल्याला आठवण करून देण्यासाठी." तो म्हणाला.

तिने होकारार्थी मान हलवली.

"एक मिनीट" म्हणत तो उठला आणि टेबलावरचे नोटपॅड आणि पेन घेऊन आला. "अर्थातच आपला पहिला पॉईंट आहे सीक्रसी. आपण ही गोष्ट आपल्या दोघातच ठेवू. कुणाही तिसऱ्या व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीत हे सांगणार नाही."

"ऑफ कोर्स." ती म्हणाली. तो लिहीत होता.

"आय होप वी बोथ आर सिंगल!" ती त्याच्याकडे रोखून म्हणाली.

"का?" त्याच्या ओठांवर बारीक हसू होतं.

"एकदा वेडिंग झाला की आपल्याला एकमेकांशी लॉयल राहायला लागेल. म्हणून क्लिअर असलेलं बरं. बाकी काही नाही" ती नाक आक्रसून म्हणाली.

"ओके, सो लग्न झाल्यापासून संपेपर्यंत आपण एकमेकांशी लॉयल राहू." तो म्हणाला.

"अँड नो सेक्स!" ती सहजपणे म्हणाली.

"व्हॉट??" त्याने पपी फेस करून तिच्याकडे पाहिलं. तिने भुवया उंचावल्यावर obviously! म्हणून तो हसला.

"ह्या पूर्ण एक वर्षभर जे काही वाटत असेल ते एकमेकांशी ओपनली बोलायचं. दुसरा माणूस आपल्या मनातलं समजून घेईल अशी अपेक्षा ठेवायची नाही. नो पर्सनल सीक्रेटस बिटवीन अस." तो गंभीर होत म्हणाला.

"होय तर! हा काय टीवी सिरीयल नाय हां." तिने मान डोलावली. "हां आणि लग्नानंतर मी नेम सरनेम काय्येक बदलणार नाय हां."

"नो प्रॉब्लेम. तसंही वर्षभराने तुझं तेच नाव असेल."
तो खांदे उडवत म्हणाला.

हे ऐकून तिच्या हृदयात किंचितशी कळ का आली ते तिला समजलं नाही. तेवढ्यात बाहेरून "दादांनूss" म्हणून हाक मारून दार ढकलून चंदू आत आला. "चाय आणली हां" म्हणून लाजत त्यांच्या हातात कप देऊन पसार झाला. ते बघून दोघेही एकाच वेळी हसू लागले आणि एकमेकांकडे बघून गप्प झाले. डॅम! हा ऍटीट्यूड विसरून मनापासून हसला तर कसला हंक दिसतो.. नोराच्या मनात विचार चमकून गेला.

ती चहाचा कप हातात घेत फ्रेंच विंडोच्या काचेच्या दाराला टेकून उभी राहिली. बाहेर थेंब थेंब अंधार पसरणाऱ्या लालभगव्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उंच हिरव्यागार नारळीपोफळी आणि घरांची तांबड्या मंगलोरी कौलांची छपरे लांबपर्यंत दिसत होती. "नाईस व्ह्यू! इथून खाडीचा डेड एंडपण दिसतोय." तो उठून तिच्या समोरच्या दाराला टेकून उभा राहिला.

"हम्म.. लहानपणी हा माझा फेवरीट स्पॉट होता. मी तासनतास खाडीतून पलीकडे जाणाऱ्या होड्या बघत असे." तो दूरवर बघत म्हणाला.

तिला लहानपणीचा तो आठवला आणि तिने त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिले. "होय, जेव्हा लहान मुलांना पकडून फटकवत नसशील तेव्हा!" ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली.

"काही म्हणालीस?" त्याने भुवया आक्रसून विचारले.

ती नकारार्थी मान हलवून खोटंच हसली. तिच्या चमकदार रेशमी केसांवर आणि चेहऱ्यावर कलत्या सुर्याच्या संधीप्रकाशाची लालसर छटा पडली होती. क्लचर चुकवून तिच्या गालांवर उडणाऱ्या एकदोन बटा त्याला हाताने बाजूला सरकवाव्या वाटल्या पण त्याने स्वतःला कंट्रोल केले आणि बोलायला सुरुवात केली.

"ओ.. के मग पॉईंट नंबर सिक्स. नो नॅगिंग! अप्पा आणि आई एकमेकांना प्रत्येक गोष्टीत नाक खुपसून सल्ले देत राहतात, ते बघूनच मी इतका पकलोय की बस. सो प्लीज.." तो म्हणाला.

"हां, अडलाय माजा खेटर. मी काय तुझ्या कुठल्या गोष्टीत किटकीट करायला येणार नाही, तू माझ्यावांगडा करू नको बस." ती म्हणाली आणि पुढे आपला मुद्दा सांगितला. "आणि आपण एकमेकांशी अजिबात खोटं बोलायचं नाही. आपला एकमेकांवर पूर्ण विश्वास हवा."

"डन!" तो लिहिता लिहिता उद्गारला. "ह्यातला कुठलाही क्लॉज बदलायचा असेल तर आपल्या दोघांच्या परवानगीनेच बदलला जाईल."

"ओके." ती त्याच्या खांद्यावर वाकून त्याच्या रेखीव अक्षराकडे बघत म्हणाली. अचानक त्याने मान वळवून तिला बघताना पकडलं.

"आणि लास्ट रुल! माझ्या प्रेमात पडायचं नाही." तो गंभीर चेहऱ्याने म्हणून लिहायला लागला.

"ऍज इफ!!" तिने रागाने लाल होत त्याच्या हातातून नोटपॅड ओढून घेतलं. "पलाशसारख्या खडूस, माजोरड्या आणि रागीट माणसाच्या प्रेमात मी कधीच पडणार नाही." लिहून तिने खाली सही केली आणि पेन पुन्हा त्याच्याकडे दिलं.

त्याने गालात हसत सही केली. "प्राण्यांच्या आणि माणसांच्या डॉक्टरांच्या अक्षरात काहीच फरक दिसत नाही!" तो डोळा मारून हसला.

"का? मनुष्य प्राणी नाही का?" म्हणून ती नाक फेंदारून दाराकडे निघाली. "आय थिंक आपलं बोलून झालंय."

"पण लग्न कसं करायचं हे बोललो नाही आपण." तो मागून म्हणाला.

"कोर्ट मॅरेज! लेट्स नॉट ब्रिन्ग गॉड इंटू दिस." ती दार उघडताना म्हणाली आणि तो तिच्या मागोमाग खाली गेला.

जिन्यातून खाली उतरताच आई आणि शर्वरी वहिनीने तिला थांबवलं. "बाय आता शुभ कार्य ठरता हां, तर तुझी ओटी भरांदे." म्हणून आईने तिला देवासमोर पाटावर बसवलं. तिने भुवया उंचावून जिन्याच्या पायरीवर बसलेल्या पलाशकडे पाहिलं. त्याने खांदे उडवले. शर्वरी वहिनीने पटकन तिला कुंकू लावून, मांडीवरच्या ओढणीत आणि डोक्यावर तांदूळ घातले आणि खणा नारळाने ओटी भरली. गोंधळलेल्या नोराला वहिनीने इशाऱ्यानेच नमस्कार दाखवल्यावर नोरा ओटीतलं सगळं बाजूला ठेवून उठली आणि दोघींना वाकून नमस्कार केला. "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव." आईने  तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. नोराने कसंनुसं तोंड करून पलाशकडे कटाक्ष टाकला. तो तोंडावर हात धरून खो खो हसत होता.

पडवीत एव्हाना अप्पा आणि अंतोन अंकल पान खात बसले होते. "या, काय ठरलं मग?" त्या दोघांना आतून येताना पाहून अप्पांनी मोठ्याने विचारले. "आम्ही लग्न करायचे ठरवले आहे." पलाश म्हणाला. नोरानेही मान डोलावली. "पण रजिस्टर्ड मॅरेज!आम्हाला त्यात दोघांचेही देवधर्म यायला नको आहेत." त्याने लगेच पुस्ती जोडली.
अप्पांचा चेहरा जरा पडला पण त्यांनी मान हलवली. डॅडीनी पण "बरा आसा" म्हणून नोराकडे बघितले.

"आपल्याला लवकरात लवकर रजिस्ट्रारकडे नाव नोंदवायला लागेल. म्हणजे तो तीस दिवसाची नोटीस देईल." शिरिषदादा म्हणाला. अप्पांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. "म्हणजे.. मी विटनेस म्हणून गेलोय एका लग्नाला." त्याने 'विटनेस'वर जोर देऊन हसत अप्पांना सांगितले.

"ठरलं मग. अंतू, तू काय काळजी करू नको. नोराला आम्ही आमच्या मुलींसारखंच वागवू, तिला काही कमी पडणार नाही. बाकी आपल्यात देणं घेणं काय नको, लवकर लग्न पार पडू दे." अप्पा डॅडींकडे बघून म्हणाले.

"अप्पा, तेवढा विश्वास आहे तुमच्या घरावर म्हणून तर बोलायला आलो." डॅडी रिलॅक्स होऊन हसले.
नोराने पटकन पुढे होऊन सगळ्यांना मघासारखा वाकून नमस्कार केल्यावर पलाशलाही वाकणे भाग पडले.

"बघा आत्ताच सुधारलाय हिने आमच्या मुलाला!" त्यांना निरोप देतादेता अप्पा खुषीत येऊन म्हणाले.

दाराबाहेर पडणाऱ्या नोराने केस खांद्यावरून मागे सारताना वळून त्याच्या चिडक्या चेहऱ्याकडे बघितले आणि इतरांना न दिसेलसा डोळा मारला. ती बाईकवर बसून दिसेनाशी होईपर्यंत तो रस्त्याकडे बघत होता.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle