रूपेरी वाळूत - २०

सात वाजताच्या अलार्मने नोरा खडबडून जागी झाली, शेजारी पाहिले तर शर्वरी जागेवर नव्हती. तिने उठून ब्रश वगैरे करून खोलीचं लोटलेलं दार उघडलं तर नुकतीच झोपेतून उठलेली गार्गी डोळे चोळत येऊन एकदम तिला चिकटली. "नोराकाकू तुला मम्मा बोलावते.. चल चल.." म्हणत हात ओढत तिला किचनमध्ये घेऊन गेली. शर्वरी आंघोळ वगैरे आटपून पूजेच्या तयारीत बिझी होती. तिने पटकन नोराच्या हातात चहाचा कप दिला. "नोरा, आंघोळ बिंघोळ पटापट आवर. गुरुजी नऊ वाजता येणार आहेत. साडी, दागिने सगळं बेडवर ठेव तोपर्यंत मी येते नेसवायला."

मागच्या अंगणात चिरे बसवून मोठ्या चुली तयार करणे सुरू होते. आई आणि अप्पा काम करणाऱ्या गड्यांना सूचना देत उभे होते. तिला खिडकीबाहेर संगी केळीचे डांबे खांद्यावर उचलून आणताना दिसली. काही माणसे मोठमोठी पातेली, तपेली धुवत होती. दोन बायका दहा बारा नारळ विळीवर खवत होत्या. एवढी सगळी तयारी बघून ती पटकन चहा पिऊन आवरायला पळाली.

आंघोळ झाल्यावर तिने ओटी भरताना रमाकाकींनी दिलेली साडी बेडवर काढून ठेवली आणि इव्हाने घाईत शिवलेला ब्लाउज जरा घाबरतच ट्राय करून बघितला. पण इव्हाचं टेलरिंग परफेक्ट होतं. फ्यूश्या प्लेन सिल्कच्या ब्लाउजला कोपरापर्यंत घट्ट बाह्या शिवून दोन्ही दंडावर मोठया कोयरीचे डिझाइन सोनेरी धाग्याने विणलेले होते. पाठीवर डीप टीअर ड्रॉप शेप गळा सोनेरी लटकनने बांधला होता. तेवढ्यात शर्वरी आलीच. तिने पटकन बेडवरची साडी उचलून नोराला पाच मिनिटात चापून चोपून नेसवली. "परफेक्ट! मला वाटलंच होतं तुला खूप गोड दिसेल ही साडी." शर्वरी खूष होत म्हणाली. मऊ कॉटन सिल्कच्या गडद हिरव्या साडीला पसरट सोनेरी वेलबुट्टीच्या जॅक्वार्डचे काठ आणि पदर होता. आदल्या रात्री रमा काकींनी तिला दिलेला जाडजूड सोन्याची ठुशी आणि तश्याच सोन्याच्या कुड्यांचा सेट आणि हिरवा चुडा तिने आरश्याजवळ उघडून ठेवला. किंचित मेकअप आणि दागिने घालून ती तयार होपर्यंत बाहेर गुरुजी आले, गुरुजी आले म्हणून गडबड सुरू झाली होती. शर्वरीच्या ड्रॉवरमधल्या टिकल्या बघून त्यातली बारीकशी लाल टिकली तिने लावली.

ती बाहेर आली तेव्हा माजघराच्या एका टोकाला काचेच्या बरणीत उभे केले केळीचे हिरवेगार डांबे आणि जोडलेल्या केळीच्या पानांखाली चौरंगावर मांडलेली तांदळाची रास, त्यापुढच्या मूर्ती, विड्याची पानं, नारळ, सुपाऱ्या, फळं, फुलं, रांगोळी, पाट सगळं मांडून तयार होतं. तेवढ्यात गुरुजींशी बोलत पलाश दारातून आत आला आणि पाटावर जाऊन बसला. ती ब्लॅंक होऊन त्याच्याकडे बघतच राहिली. व्हॉट इज दिस हॉटनेस!! त्याने फक्त जांभळ्या रंगाचा सोवळ्याचा कद नेसला होता, त्यामुळे त्याच्या शरीरातले एकूण एक रेखीव मसल्स लक्ष वेधून घेत होते. त्याचे ब्रॉड खांदे आणि छातीवर रुळणारी  सोनसाखळी.. ऊफ! शर्वरीने मारलेल्या कोपराने ती भानावर आली. ती हसून हसून "जा, जा त्याच्या शेजारी बस" म्हणून सांगत होती. नोरा पलाशच्या मागून चालत त्याच्या डाव्या बाजूच्या पाटापाशी गेली. पाटावर बसताना तिने हलकेच वर उचललेल्या निऱ्यांमधून चांदीचे पैंजण आणि मेहंदी रंगलेले पाय दिसताच त्याने मान वर करून तिच्याकडे पाहिले आणि पहातच राहिला.

तिने पटकन नजर चोरली आणि गडबडीने पाटावर बसली. गुरुजींनी घसा खाकरून बोलायला सुरुवात केल्यावर त्याने पूजेकडे लक्ष दिले. दोघेही शक्य तितका वेळ एकमेकांकडे न बघण्याचा प्रयत्न करत होते पण गुरुजींनी जेव्हा त्याच्या हाताला हात लावायला सांगितले तेव्हा तिने त्याच्याकडे झुकून उजवा हात त्याच्या उजव्या हातावर हलकेच ठेवला. एव्हाना तिच्या कानातून गरम वाफा येऊ लागल्या. त्याच्या हातावर ठेवलेल्या तिच्या मेहंदी रंगलेल्या बोटातली त्याची रिंग, नाजूक मनगटातल्या हिरव्या बांगड्या आणि त्याच मनगटावर तिने चोळलेल्या केवडा अत्तराचा मेहंदी मिश्रित गंध त्याच्या श्वासांची लय बिघडवून टाकत होते. पुढची सगळी पूजा कधी संपली ते त्याला कळलंही नाही.

पूजा संपताच गुरुजींना नमस्कार करून ती शक्य तितक्या लवकर स्वयंपाकघरात मदतीला पळून गेली. तोपर्यंत जवळचे काही नातेवाईक येऊन घर भरून गेले होते. बाहेर मोठ्या चुलीवर भलीमोठी पातेली मांडून आचाऱ्यांची गडबड सुरू होती.  नवीन लोकांच्या ओळखी, वयस्कर काकवा आणि आज्यांनी तिला चिडवणे हे सगळे सुरू असताना तिचा वेळ पटकन गेला. तोपर्यंत माजघरात आणि बाहेर हॉलमध्ये केळीच्या पानावर पंगती वाढून झाल्या. नारळाची चटणी, कोवळ्या तवश्याची खमंग काकडी, काळ्या वाटाण्याचं सांबारं, बटाट्याची भाजी, टम्म फुगलेले मालवणी वडे, चपात्या, मसालेभात, साधा वरणभात, प्रसादाच्या केळं, बेदाणे घातलेल्या शिऱ्याची मूद आणि गोड म्हणून पानाशेजारी ताटलीत गुळनारळाचा घट्टसर रस ओतलेल्या लहान लहान गुबगुबीत खापरोळ्या.

तिने हळूच बाहेर येऊन गर्दीत पलाशकडे पाहिले तर त्याने कपडे बदलून कुर्ता पायजमा घातला होता. थँक् गॉड! म्हणून तिने निःश्वास सोडला.

"आज आपली केमिस्ट्री सिझलिंग दिसतेय!"

शेजारी बसून जेवायला सुरुवात केल्यावर तो तिच्या कानात म्हणाला. ती फक्त हसली.

"तुझं तोंड बंद असल्यामुळे असेल." तो पुढे तिला चिडवत म्हणाला. तिने काहीच रिऍक्ट केलं नाही. खापरोळीचा तुकडा एकमेकांना भरवत असताना दादाने फोटो काढून झाले. लगेच कोणीतरी काकी नाव घ्या, नाव घ्या करत पुढे आली. हा काय चीजी प्रकार म्हणून बरंच होय, नाही करून पलाशने शेवटी तोंड उघडलं.

निरागस डोळे पण नाकावर तोरा
झाली माझी बायको, नाव तिचं नोरा!

नोरा उत्तर द्यायचं काही सोडणार नव्हतीच.

फणस आतून मऊ, बाहेर काटेरी साल
पलाश आहे बरा पण खातो खूपच भाव.

तिने म्हटल्यावर अप्पांसकट सगळी पंगत हसायला लागली.

दुपारपासून रात्रीपर्यंतचा वेळ तीर्थ प्रसादाला आलेले लोक, पलाशच्या काकवा, माम्यांमध्ये घालवून ती कंटाळली होती. शेवटी रात्रीच्या जेवणांनंतर सगळी गर्दी पांगल्यावर आवरून गादीला पाठ टेकताच तिला गाढ झोप लागली.

---

सकाळी उठून नाश्ता उरकल्यावर सगळे आपापल्या कामाला लागले. पलाशसुद्धा रिसॉर्टवर एक चक्कर टाकून येतो म्हणून बाहेर पडून गेला. रात्रीपासून गार्गीचा दात दुखू लागला म्हणून दादा आणि वहिनी तिला घेऊन शेजारच्या गावातल्या डेंटिस्टकडे गेले. ती किचनमध्ये बारीकसारीक मदत करत राहिली. रमा काकींनी तिच्याशी गप्पा मारत तिची न थांबणारी कामं बघून शेवटी तिला "आता आराम कर ग, मुली" म्हणत किचनच्या बाहेर काढलं. शेवटी सासूबाई आज्ञा प्रमाण मानून तिने बराचसा वेळ बेडरूममध्ये लोळत घालवला. दुपारी जेवताना काकींनी तिला, "आता पलाश आला की तुम्हाला घरी जाता येईल" असं म्हटलं होतं म्हणून रिसॉर्टवर रहायला जाण्यासाठी तिने बॅग पुन्हा पॅक करून ठेवली.

पलाश पाचच्या सुमारास परत आला. आल्यावर लगेच आई अप्पांना नमस्कार करून ते निघालेही. गोंधळातून एकदम शांतता झाल्यामुळे ती किंचित उदास होती. पलाशही शांतपणे गाडी चालवत होता. रिसॉर्टच्या रस्त्यावर जाता जाता त्याने अचानक गाडी उजवीकडच्या लहान रस्त्यावर वळवली. मावळतीच्या शेंदरी उन्हात आजूबाजूच्या झाडांच्या लांबलेल्या सावल्या रस्त्याभर पसरल्या होत्या. दहा मिनिटात तो निळ्या गोकर्णीच्या फुलांनी लदबदलेल्या हिरवट पोपटी वेलाने वेढलेल्या पांढऱ्या कंपाउंड वॉलसमोर थांबला. समोर नक्षीदार राऊट आयर्नचं फाटक होतं आणि आत उभ्या केलेल्या छोट्याश्या फळ्यावर पांढऱ्या पिवळ्या खडूने

Hurrah! Congratulations!
May your married life be filled with fun, love, joy & laughter!

स्वर्लिंग लेटर्समध्ये लिहिले होते. आत आंगण आणि त्याच्या पुढे सांटोरिनी स्टाईलचं निळं-पांढरं लहानसं क्यूट घर उभं होतं. कंपाउंड वॉलवर आणि अंगणात छोट्या फेरी लाईट्सच्या माळा चमकत होत्या. अंगणात माया आणि त्याचे मित्रमंडळ, रॉब आणि इव्हा, गार्गीला घेऊन शिरीष - शर्वरी आणि त्यांच्या ओळखीची काही मुलं उभी होती. नोरा आणि पलाश गाडीतून उतरताच त्यांचा एकच गलका सुरू झाला. "वेलकम होम!" पलाश गाडी लॉक करून येत तिच्या खांद्यावर हात ठेवून कानात म्हणाला. तिने आ वासून त्याच्याकडे पाहिले. तेवढ्यात इव्हा पटकन पुढे येऊन तिचा हात धरून तिला घरात ओढत घेऊन गेली.

क्रमशः

नोराची साडी

2021-07-28-22-33-57-770.jpg

गेटसमोरचा फळा

images (1)_3.jpeg

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle