रूपेरी वाळूत - २३

सगळीकडे अंधार दाटला होता. तिच्या अंगावर शाईसारखा पाऊस कोसळत होता. कुठेतरी वीज कडाडली आणि पावसाचे थेंब सुईसारखे टोचू लागले. तिच्या तोंडावर एक पंजा दाबला गेला आणि पाठ मागच्या ओल्या खरखरीत दगडी भिंतीला चिकटली. तोंडावरचा हात बाजूला होऊन त्याचा चेहरा तिच्यासमोर आला आणि तिने किंचाळायला तोंड उघडले. तिच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता तरीही तशीच मुक्याने किंचाळत राहिली.

खाडकन तिचे डोळे उघडले. समोरच्या भिंतीवर घड्याळात साडेतीन वाजले होते. काही क्षण ती धापा टाकत छताकडे बघत राहिली, ती कुठे आहे ते तिला आठवत नव्हते. कपाळावर जमलेले घामाचे थेंब पुसत तिने शेजारी पाहिले. खाली फरशीवर ब्लॅंकेट पसरून पलाश झोपला होता. ज्या पद्धतीने हातपाय छातीशी घेऊन अंगाचे मुटकुळे करून तो झोपला होता त्यावरून नक्कीच फरशी गार पडली असणार. तिला एकीकडे वर एकटं झोपण्याची भीती वाटत होती आणि इतका वेळ तिला आरामात झोपू देण्यासाठी तो खाली झोपल्याचा गिल्टही होता.

ती बेडवर उठून बसली आणि शेजारची बाटली उचलून घटाघट पाणी प्यायली. उतरून पलीकडे जाऊन तिने त्याच्या अंगावरून खाली घसरलेले ब्लॅंकेट उचलून अलगद त्याला जाग न येण्याची काळजी घेत पुन्हा घातले. पुन्हा बेडवर स्वतःचे ब्लॅंकेट गळ्यापर्यंत ओढून घेत पलीकडे सरकून, खाली गाढ झोपेत त्याच्या नेहमीच्या ऍटीट्यूडची झलकही नसणाऱ्या, लहान मुलासारख्या चेहऱ्याकडे बघत झोपायचा प्रयत्न करू लागली.

अलार्म बंद असूनही पलाशला नेहमीप्रमाणे सहाच्या ठोक्याला जाग आली. लगोलग आखडलेली पाठ आणि मणक्यातून डोक्याकडे येणारी बारीक कळ जाणवली. उठून बसत लगेच त्याने मान आणि खांदे वाकडे तिकडे करून अडकलेल्या स्नायूंना थोडी चालना दिली. ब्लॅंकेट्सची घडी करून बेडवर ठेवली. ब्लॅंकेट गळ्यापर्यंत गुरगुटून, डोक्याखाली हात घेऊन, कुशीवर झोपलेल्या नोराकडे बघून किंचित हसला. तिच्याशेजारी बसून त्याने विस्कटून तिच्या तोंडावर आलेले केस बोटांनी अलगद बाजूला केले. नकळत तिची जॉ लाईन बोटाने ट्रेस करताना त्याचं लक्ष तिच्या डोळ्यांकडे गेलं. पाणी सुकून तिच्या पापण्या चिकटल्या होत्या, खाली उशीवरही ओले डाग दिसत होते. शिट! करंट बसल्यासारखा त्याने हात काढून घेतला. काल मी खूप जास्त वहावत गेलो का? किस केल्यामुळे ती हर्ट झाली असणार ऑर दोझ पंचेस! त्याने हेडबोर्डवरच्या क्रॅकवर हलकेच हात फिरवला. पलाश, कीप डिस्टन्स! शेवटचं स्वतःला बजावून तो उठला आणि पटकन आवरून पळायला निघून गेला.

खिडकीबाहेर पक्ष्यांच्या गोंगाटाने तिला जाग आली तेव्हा आठ वाजले होते. लालसर झालेले डोळे चोळत शेजारी पाहिले तर पलाश नव्हता. तिने उठून पर्समधला मोबाईल बाहेर काढला. दोन तीन दिवसांच्या शुभेच्छांच्या वर्षावात वरच पलाशचा लेटेस्ट टेक्स्ट होता.

6.15 am
Out running. Then have some work at the resort. Be back in the evening.

7. 37 am
Please feed the fish.

आं? फिश? कुठला फिश?? ती घाईघाईत खाली उतरली. लिव्हिंग रूम, स्टडी कुठेच कोणी फिश दिसत नव्हता. ती पुन्हा वर बेडरूममध्ये बघून आली पण नोप. नो फिश! शेवटी दमून सोफ्यावर पडत तिने पलाशला कॉल केला.

हॅलो!

"हम्म?" काल बरा होता हा!

"यू? यू हॅव अ फिश! ऍज इन अ पेट फिश!" तिचा विश्वासच बसत नव्हता.

"येस. अ पेट फिश. गार्गीने कालच गिफ्ट दिलाय आपल्याला."

"ओह. पण आहे कुठे तो?"

"किचनमध्ये. फ्रिजच्या शेजारी. ओके? आय एम रिअली बिझी.." तो केसांतून हात फिरवत म्हणाला.

"ओके. तेवढंच विचारायला कॉल केला होता." ती जरा रुसून म्हणाली.

"बाय." त्याने फोन ठेवलाही.

तिने च्यक करून मान हलवली आणि किचनमध्ये शिरली. म्हटल्याप्रमाणे फ्रिजशेजारच्या कॅबिनेटवर चार पाच लिटरचा गोल फिशटॅन्क ठेवलेला होता. त्याच्या शेजारीच फिश फुडचा डबा होता. टॅन्कच्या तळाशी काळ्या दगड वाळूतून एक दोन पोपटी झाडे, पाणगवत वगैरे कुस्ती खेळल्यासारखं उपटून अस्ताव्यस्त पडलं होतं. पण मासा कुठे दिसत नव्हता. "हम्म.. लेट्स सी.." म्हणून तिने फिश स्टिक्सचा डबा उघडला. प्लास्टिकच्या चमच्यात चार पाच तुकडे उचलून झाकण बाजूला करत तिने हळूच पाण्यात टाकल्या.

ते पाण्यावर तरंगताच गवतातून एक तीनेक इंच लांबीचा निळसर काळा, अंगावर वाघासारखे सोनेरी नारिंगी पट्टे असलेला गब्बू मासा लुटकन वर आला आणि त्याने काही सेकंदात सगळं खाणं गपागप मटकावलं. खाणं संपवून तरंगत तो तिच्या दिशेला आला आणि काचेमागून मोठमोठ्या गोल डोळ्यांनी तिच्याकडे बघत दोन तीन वेळा तोंडाचा ओ करून दाखवला. मोठ्याने हसत तिने अजून चार स्टिक्स टाकल्यावर त्या खाऊन पुन्हा त्याने सॅड स्मायलीसारखं तोंड पाडलं आणि सुळकन तळाशी गवतात जाऊन लपला.

"पलाशसारखंच पात्राव दिसतां ह्यां!" म्हणून डबा बंद करून ती बाहेर आली.

आज सुट्टीचा शेवटचा दिवस. किचनमध्ये गॅस आणि भांडीकुंडी होती पण बेसिक दूध, ब्रेड, चहा, कॉफी, साखर इ. गोष्टी सोडता बाकी काहीच दिसत नव्हतं. हम्म बाजारात जावं लागेल.. म्हणून ती कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली. आंघोळ वगैरे आटपून नेहमीची ब्लू जीन्स आणि पांढरा पेझंट टॉप घालून गळ्यापासच्या टॅझल्सची लूज गाठ बांधली.

कंटाळून खाली जाऊन रिमोट उचलून टीव्ही सुरू करणार एवढ्यात डोअरबेल किणकीणली. दारात ब्लू लगूनचा वेटर हातात पार्सल घेऊन उभा होता. "पलाश सरने ब्रेकफास्ट भेजा है. मैं एक बजे लंच ले कर आता हूं. ये मेन्यू है, आप रिसेप्शनपर कॉल करके लंच ऑर्डर बोल दिजीए." एक पँप्लेट तिच्या हातात देत त्याने भराभर पाठ केल्यासारखं बोलून टाकलं.

"एक मिनीट! पार्सल के लिये थॅंक्यू. मुझे लंच नही चाहीये. मै बाहर जा रही हूँ. और तुम्हारे पलाश सरसे कहो की जब वो फ्री हो तब मुझे कॉल करे." तिने खोटं हसून सांगितलं.

"ओके मॅडम. थॅंक्यू मॅडम." म्हणत वेटरने अक्षरशः धूम ठोकली.

तोंड दाबून हसत तिने दार लावले. ब्लू लगून चा लोगो असलेल्या ज्यूटच्या पिशवीत तीन एअरटाईट काचेचे डबे होते. एकात चार गरमागरम इडल्या आणि दोन डब्यात सांबार आणि चटणी होती. तिने इम्प्रेस होऊन मान हलवली आणि किचनमधून ताटली आणि चमचे घेऊन आली. आरामात खात खात एकीकडे तिने फेसबुकवर कॉंग्रॅट्सच्या फुटणाऱ्या फुग्यांना उत्तरं दिली. मेल्स चेक केल्या. मिनूची एक भली मोठी मेल होती, तिला नंतर आरामात लिहू म्हणून तिने फोनमधून डोकं काढलं. सगळी भांडी घासून वाळत ठेवली आणि ती सॅक घेऊन बाहेर पडली. मायाने पार्टीच्या आधीच तिची बुलेट आणून अंगणात कडेला पार्क केली होती. खटकन दरवाजा बंद झाल्यावर तिने डोक्याला हात लावला. घराची किल्ली नव्हतीच. एनिवे.. पलाश आल्यावर परत येईन म्हणत तिने बुलेटला किक मारली.

बाजारात पोचल्यावर किराणा दुकानात तिने लिस्ट देऊन सामान बेकरीत पोचवायला सांगितले. भाजीवाल्याकडून गरजेची भाजी घेऊन ती बेकरीसमोर थांबली. आत जाऊन तिने ममाला मिठी मारली. ममा आणि आत काम करणाऱ्या दोन बायका येऊन तिची चौकशी करून गप्पा मारत बसल्या. काही वेळाने डॅडी आल्यावर त्यांच्याशी बोलून झालं. दुपारी घरी जाऊन तिने ममा डॅडींबरोबर तिच्यासाठी खास केलेली बांगड्याची मच्छी कढी ओरपली आणि खोलीत जाऊन तासभर झोप काढली. चहा घेऊन सगळ्यांचा निरोप घेऊन ती बाहेर पडली. पिशव्या टॉप बॉक्समध्ये कोंबून बुलेट सुरू केली. गावाबाहेर पडून घर येईपर्यंत वाटेत बरोबर पावसाने गाठले. हेल्मेट काढताच केसही चिप्प भिजले. भिजतच पिशव्या काढून ती घराच्या पागोळीच्या आत जाऊन थांबली. घर अजूनही बंदच होते. ओघळणारे फुल स्लिव्हज पिळून थोडे कोरडे केले आणि फोन बाहेर काढला. पाण्याने इथेही काम करून ठेवलं होतं, फोन बंद. स्वतःवरच वैतागत ती पायरीवर बसून राहिली.

तिने क्लचर ओढून काढून पोनिटेल मोकळी केली आणि केसांतून पाणी झटकले. साधारण तासाभराने समोर थार येऊन थांबली आणि उडी मारून पलाश उतरला. आज तो फॉर्मल ग्रे ट्रावझर्स आणि प्लेन नेव्ही शर्टमध्ये होता. "नोरा? काय झालं?" म्हणून तिच्याकडे भराभर चालत येऊन त्याने पायरीवर घरंगळलेले टोमॅटो, बटाटे आणि भिजलेली कोथिंबीर परत पिशवीत भरले. त्याला उत्तर देण्याआधीच तिला फटाफट दोन शिंका आल्या. "किल्ली नव्हती" ती नाक पुसता पुसता म्हणाली. त्याने तिच्याकडे बघून काहीतरी पुटपुटत मान हलवली. दार उघडून त्याने पिशव्या आत भिंतीजवळ ठेवल्या तोवर ती उठून उभी राहिली. पण इतक्याश्या वेळात पाणी ओघळून तिच्या पायाशी थारोळे साचले. त्याने तिच्याकडे वरपासून खालपर्यंत बघितले आणि सरळ तिला उचलून आत नेऊन लाथेने दार बंद केले.

क्रमशः

शब्दार्थ- पात्राव = साहेब

नोराचा OOTD
images (4)~2.jpeg

मासा
InShot_20210808_083455300.jpg

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle