रूपेरी वाळूत - ३५

"दॅट वॉज अ बॅड आयडिया." पलाश कुलूप उघडताना म्हणाला. तिने नाकावर धरलेल्या टिश्यूवरून त्याच्याकडे पाहिले. "बाहेर नको जायला, तुला त्रास होईल. तू फ्रेश हो, आरामात कपडे बदलून खाली ये, मग बोलू."

त्याने तिची बॅग उचलून आत भिंतीपाशी ठेवली. नोरा भराभर जिना चढून तिच्या खोलीत गेली. गरम पाण्याने अंग शेकत आंघोळ केल्यावर तिला थोडा उत्साह वाटायला लागला. तिने कपाट उघडून क्वचित घातलेली व्हाईट जीन्स बाहेर काढली. जीन्सवर व्हाईट लेसचा टॉप घालून त्यावर क्रॉप टॉपसारखा बेबी ब्लू निटेड कार्डिगन अडकवला. पायात रोजच्या गुबगुबीत सपाता सरकवून ती जिन्यातून हळूहळू खाली उतरली.

किचनमधल्या भांड्यांच्या आवाजाने तिची पावलं तिकडे वळली. ती दारात उभी राहून बघतच राहिली. पलाश त्याच्या परफेक्ट व्हाईट शर्टच्या बाह्या दुमडून चक्क मोबाईलमधली रेसिपी वाचत गॅसपाशी खुडबुड करत होता. ती काही न बोलता पुढे जाऊन त्याच्या शेजारी ओट्यावर चढून बसली आणि त्याच्या काळ्या एप्रनकडे लक्ष जाताच आजारपण विसरून जुन्या नोरासारखी खो खो हसायला लागली. It's no sin to get my sauce on your chin!

"व्हॉट? सिरियसली! मी पास्ता करतोय." तो डोळा मारत म्हणाला. ती तरीही हसत राहिली. "थँक गॉड. मला आत्ता बरं वाटलं!" पलाश तिच्याकडे हसून बघत म्हणाला. पटकन वळून त्याने पॅनमध्ये लोण्यावर परतत असलेल्या भाज्यांमध्ये कोळंबी उलटली.

"गुलाबी होईपर्यंत थांब." नोरा पटकन बोललीच.

"काय?" तो डोळे बारीक करून नजर तिच्या ओठांकडे नेत म्हणाला.

"ते.. प्रॉन्स.." ती ओठ चावत म्हणाली.

तो गालात हसून पुन्हा कोळंबी परतू लागला. व्यवस्थित परतून झाल्यावर त्याने शेजारच्या पातेल्यातला तयार लिंग्विनी पास्ता त्यात टॉस केला आणि वर लिंबू पिळलं. गप्पा मारता मारता त्याने दोन प्लेटमध्ये पास्ता वाढला. "पाच मिनिटं इथेच थांब." म्हणून तो पटकन बाहेर गेला. थोड्या वेळाने त्याची हाक ऐकून ती बाहेर दाराजवळ गेली आणि पुन्हा एकदा थक्क होऊन बघत बसली.

अंगणात फेअरी लाईट्सच्या दोन माळा चमकत होत्या. गुलमोहोराच्या पसरलेल्या फांद्यांखाली टेबलावर प्लेट्स ठेऊन पलाश तिची वाट बघत होता. ती पुढे जाऊन खुर्चीत बसली. प्लेटमध्ये श्रिम्प गार्लिक पास्ता, शेजारी एका बोलमध्ये गार्लिक ब्रेड, साईड डिशमध्ये टोमॅटोच्या चकत्या, सॉल्टी ग्रिल्ड चीज आणि हर्ब्जच्या सॅलडमध्ये पपनसाचे टपोरे, गुलबट दाणे पेरले होते. टेबलच्या मधोमध तेवणाऱ्या जाडजूड मेणबत्तीशेजारी लहानसा चोको लावा केक होता.

"सॉरी, घरात जे काही सापडलं त्यात एवढंच करता आलं." तो हसत म्हणाला.

"धिस इज अमेझिंग पलाश! माझ्यासाठी एवढे कष्ट अजूनपर्यंत कोणीच घेतले नव्हते. थॅंक्यू!" तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर सगळ्या दिव्यांचे तेज एकवटले होते.

खाता खाता त्याच्या कॉलेज आणि जॉबमधले वेगवेगळे मजेशीर प्रसंग, गोष्टी सांगून तो तिचा मूड हलका ठेवायचा प्रयत्न करत होता.

"पलाश, तू माझी सगळी गोष्ट ऐकलीस पण अजून तुझी गोष्ट बाकी आहे." ती खाता खाता सहज म्हणाली आणि त्याला ठसका लागला.

"हम्म, ती गोष्ट सांगायची आहे पण आज नाही. नंतर कधीतरी." तो पाणी पिता पिता गंभीर झाला.

"ओके." तिने हसून चीजचा तुकडा उचलला.

गोव्याचा सेमिनार तिने जेवढा अटेंड केला तेवढ्याचे डिटेल्स त्याला रंगवून सांगतासांगता त्यांचं जेवण झालं.

---

तिच्या मोबाईलच्या कर्कश्श अलार्मने दोघांनाही जाग आली. रात्री ती झोपल्यावर उठून न जाता, तिचं डोकं हलू नये म्हणून शेजारी उशी लावून पलाश तसाच पडून राहिला होता. पटापट आवरून नऊ वाजताच्या अपॉइंटमेंटसाठी ते हॉस्पिटलच्या दारात होते. डॉक्टरांनी टेस्टसाठी सॅम्पल मागितल्यामुळे, नोरा खालमानेने प्लास्टिकची डबी नाकाखाली धरून कॉरिडॉरमधल्या सोफ्यावर बसली. पलाश आतली खळबळ चेहऱ्यावर दिसू न देता कोऱ्या चेहऱ्याने येरझाऱ्या घालत होता. पाच मिनिटांनी तो तिच्या शेजारी जाऊन बसला. "माझं डोकं दुखतंय आणि मान हलवली तर आजूबाजूला सगळं फिरतंय.." ती मान वर करत म्हणाली.

"अजून थोडाच वेळ.. सहा एम एल व्हायला हवंय." त्याने तिच्या पाठीवर हळूच हात फिरवत सांगितले.

हम्म.. आठ्या पाडून तिने पुन्हा मान खाली केली.

"असा एकेक ड्रॉप जमा व्हायला किती वेळ लागेल.. अर्धा तास मी असं बसू नाही शकत. चक्कर येईल. मी जर दुसऱ्या नाकपुडीवर किंचित दाबलं तर ते लिक्वीड जरा फास्ट येतंय." ती प्रयोग करून दाखवत म्हणाली.

तो मांडीवर कोपर रुतवून तळहातावर चेहरा ठेऊन तिच्याकडे बघत बसला होता. तिला इतकं व्हल्नरेबल झालेलं बघवत नव्हतं तरीही. आपल्याच विचारात तो इतका गर्क होता की दोन क्षण ती काय सांगतेय तेही त्याला कळले नाही. काही मिनिटात त्याला जेव्हा कळलं तेव्हा त्याने लगेच तिचा नाक दाबणारा हात पकडून खाली ठेवला. "स्टॉप इट नोरा, तुला अजून त्रास होईल."

त्याने हात अजून घट्ट धरून ठेवला. तिने त्याच्याकडे पाहिले. "मला त्रास होतोय! हे लवकर संपवायचं आहे."

"मला माहिती आहे. कितीही त्रास झाला तरी अजून थोडा वेळ. प्लीज.. दे मी ती डबी धरतो हवी तर." त्याने हात पुढे करून डबी तिच्या नाकाखाली धरून ठेवली.

"आय एम सॉरी पलाश, मी लहान मुलांसारखं करतेय.." 

त्याने उत्तरादाखल डोळे मिटून फक्त लांब श्वास सोडला. त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा किती राग आला होता हे तिला कळले नसते. आत्ता इतकं हेल्पलेस आणि यूसलेस त्याला कधी वाटलं नव्हतं. इथे बसून रहाण्यापालिकडे त्याच्या हातात काही नव्हतं. काहीही झालं तरी तो तिच्या बरोबर असेल हे तिला समजावून सांगू शकत नव्हता.

तिने हळूच डोळे तिरके करून त्याच्याकडे पाहिले. "पलाश.. फक्त दोन मिनिटं ब्रेक घेऊ?"

तिचे क्लचरमधून निसटलेले केस त्याने कानामागे सरकवले. "अजून थोडंसं, मग निघू आपण." हातातली डबी पुढे करत त्याने डोळ्यांनी इशारा केला.

"वाईट आहेस तू!" तिने तोंड वाकडं केलं.

"दॅटस् मी!" तो हसला.

तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या बोटात चमकणाऱ्या वेडिंग बँडकडे गेलं. "तू रिंग अजूनही काढली नाहीस!" ती कुजबुजली.

त्याने डोळे मिटले आणि जे काही वाटत होते ते विसरण्याचा प्रयत्न केला. नाही. मी रिंग काढली नाही आणि काढणारही नाहीये.

---

सँपल देऊन झाल्यावर डॉक्टरांनी लगेच एमआरआय शेड्यूल्ड आहे म्हटल्यावर नोरा हबकलीच. लिफ्टने वरच्या मजल्यावर जाताना त्याने तिचा हात धरून ठेवला होता. वर पोहोचताच तिथली अटेंडन्ट तिला लहानश्या खोलीत घेऊन गेली. सांगितल्याप्रमाणे शूज, ब्रा, ज्यूलरी, बेल्ट आणि मेटल असलेल्या सगळ्या वस्तू तिने काढून कपाटात ठेवल्या. आता अंगावर फक्त ती घालून आलेला मस्टर्डवर बारीक काळ्या रेषांचा गुढघ्याएवढा ओव्हरलॅप सुती ड्रेस होता. त्याचा कापडी बेल्ट कंबरेशी परत बांधून ती बाहेर आली.

पलाश समोरच उभा होता. बाहेर येताना तिचा पांढरा पडलेला चेहरा बघून त्याच्या काळजात लकाकलं. केसांचा क्लचर काढून ठेवल्यामुळे पोनिटेलमधले केस आता खांद्यावर पसरले होते. त्याचे लक्ष तिच्या किंचित थरथरणाऱ्या हातांकडे जाताच तिने हात पाठीमागे घेतले.

टेक्निशियन मागोमाग ते दुसऱ्या थोड्या मोठ्या खोलीत शिरले. समोर ते बोगद्यासारखं मशीन बघून नोरा जरा थबकली. तिला खोटं धाडस दाखवताना बघून त्याच्या छातीत तुटत होतं. टेक्निशियनने तिला हातातली हेल्मेटसारखी विचित्र पांढरी कॉईल दाखवली. "हे डोक्यात घालून झोपायचं आहे."

नोराचे डोळे विस्फारले. "मला क्लॉस्ट्रोफोबिया आहे. प्लीज हे नाही घातलं तर चालेल का? आय प्रॉमिस, मी डोकं अजिबात हलवणार नाही.."

"मॅडम, सगळ्या प्रोसिजरला फक्त पंधरा मिनिटं लागतील. हे घालावं लागेल, त्याशिवाय आम्हाला डिटेल इमेजेस दिसत नाहीत." तिने नोराच्या हातावर थोपटत मशिनकडे नेले.

पण नोरा जागची हलत नव्हती. आता त्या मुलीने वायरला जोडलेले एक लहानसे बटन दाखवले. "घाबरू नका, आत गेल्यावर खूप पॅनिक वाटलं तर हे बटन दाबा, मग तुम्हाला बाहेर काढू."

"पण मग आधीचा वेळ फुकट जाईल, परत पहिल्यापासून सुरू करायला लागेल." नोरा पडलेल्या चेहऱ्याने म्हणाली.

"हम्म." ती मुलगी जराशी हसली.

त्याने ओठ घट्ट मिटून घेतले होते. "मी तिच्यासोबत इथे थांबू शकतो का?" त्याने शेवटी विचारलंच. तो तिच्यासाठी काहीच करू शकत नाही याचा त्याला राग येत होता. त्याच्या थांबण्याने तिला काही फायदा नाही झाला तरी निदान त्याला स्वतःला बरं वाटेल म्हणून तो थांबलाच.

क्रमशः

डेट नाईट

Screenshot_20210905-123935~2.png

हॉस्पिटल

Screenshot_20210905-150236~2.png

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle