रूपेरी वाळूत - ३६

नोराने जरा बावचळून त्याच्याकडे बघितले. "यू डोन्ट हॅव टू डू धिस पलाश!"

"इज इट सेफ?" तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याने टेक्निशियनला विचारले.

तीही थोडी गोंधळली पण पलाशच्या रागीट चेहऱ्याकडे बघून बोलू लागली. "अम्म.. सेफ आहे, पण तुम्हाला.."

"आय नो." तो लगेच चेंजिंग रूमकडे गेला. पटकन बेल्ट, घड्याळ, रिंग आणि शूज काढून परत आला.

अजूनही नोरा त्या टेबलपर्यंत पोचली नव्हती. "आता चालेल?" त्याने तिच्या शेजारी उभं राहून विचारले. नोराने घामेजले ओलसर तळहात ड्रेसवर वरखाली चोळले आणि लांब श्वास घेत मान हलवली. पलाशचा हात धरून ती टेबलवर चढली आणि आडवी व्हायला लागली. "नाही नाही, असं नाही. पोटावर झोपा." पटकन टेक्निशियन मुलगी म्हणाली.

"काय?"

"हो, पोटावर झोपायचं आहे. स्पाईन आणि ब्रेन नीट दिसायला हवा."

"पण.. पण माझ्या नाकातून पाणी येतंय. उलटं झोपून मला श्वासच घेता येणार नाही." नोरा आता खूपच घाबरली होती."

"असंच करावं लागेल. आपण नाकाखाली एक पेपर ठेवू" ती मुलगी मान हलवत म्हणाली.

नोराने पलाशकडे मान वर करून पाहिले. "आय.. कान्ट.." त्याने तिच्या हातावरची पकड घट्ट केली आणि तिच्या डोळ्यात ठामपणे बघत राहिला. "आम्हाला फक्त पाच मिनिटं प्रायव्हसी द्या. प्लीज." तो नजर न हटवता टेक्निशियनला म्हणाला.

ती मुलगी नाकावरचा चष्मा नीट करत बाहेर गेली.

"आपल्याला हे करावंच लागेल नोरा, बाकी काही उपाय नाही. मला तू लवकर बरी व्हायला हवी आहेस. आय कान्ट सी यू लाईक धिस. तू स्वतःचा, तुझ्या स्वप्नांचा, फ्यूचरचा विचार कर.." तो दोन्ही तळहात तिच्या गालांवर ठेवत म्हणाला. ती अजूनही कुठेतरी लांबच्या ग्रहावर होती.

"बघ, तुला काही झालं तर ऍनिमल प्लॅनेटचं किती नुकसान होईल? तुझी गुरंढोरं तळमळत माना टाकतील.." आता तिच्या ओठांचे कोपरे किंचित वर उचलले.

तिने पाय टेबलावर घेऊन मान हलवली.

"ओके, रेडी?" त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

"तू खरंच इथे पूर्णवेळ थांबणार आहेस?" तिने बारीक आवाजात विचारले.

"ऑफ कोर्स!"

"जर तू इथे नसतास किंवा तू माझ्याबद्दल काय विचार करशील याची पर्वा नसती तर या क्षणी मी बाहेर पळाले असते."

"पण मी तुझ्याहून फास्ट पळू शकतो. मी आता त्या मुलीला आत बोलावतोय." तो जुन्या ऍटीट्यूडने म्हणाला.

त्याने हाक मारल्यावर मुलगी आत आली. "रेडी?" नोराच्या तोंडून शब्द फुटला नाही. त्याने फक्त जोरात मान हलवली.

"नाकाखाली हा सोकिंग पेपर ठेवा. आणि ह्या मशीनचा खूप मोठा आवाज होतो त्यामुळे हे इअरप्लग्ज दोघांनाही घालावे लागतील. हे आवाज होणं एकदम नॉर्मल आहे, त्यांनी घाबरून जाऊ नका."

नोराने चुपचाप कानात प्लग्ज कोंबले. त्या मुलीने तिच्या डोक्यात ते विचित्र हेल्मेट चढवले आणि पोटावर झोपायला मदत केली. नोराने डोळे घट्ट बंद केले.

ती मुलगी बाहेर जाताना पलाशने अचानक बोलला. "मी तिला टच करून चालेल का?"

"चालेल, पण त्यांना जराही हलवू नका."

बंद दाराआड तो आणि नोरा एकटे होते आणि पलीकडच्या काचेमागे टेक्निशियन मुलगी. काही सेकंदात माईकवरून तिचा आवाज खोलीभर घुमला. "मॅडम, आपण प्रोसिजर सुरू करत  आहोत. मी मध्ये मध्ये किती वेळ झाला ते सांगत राहीन. त्रास वाटला तर ते पॅनिक बटन दाबा."

मशीन सुरू होताच त्याने टनलमध्ये हात जाऊ न देता तिच्या पायाची टाच धरून ठेवली. सुरुवातीला तिच्या जोरजोराने घेतलेल्या श्वासांचा आवाज येत होता पण मग मशीनच्या मोठमोठ्या होत गेलेल्या आवाजांनी तिचा आवाज दाबून टाकला. जसजशी मिनिटे जात होती त्याला अधिक काळजी वाटत होती. तो हळूच तिच्या घोट्याभोवती गोलाकार अंगठा फिरवत, तो जवळ असल्याची जाणीव तिला करून देत होता. त्याने डोळे मिटून स्वतःला शांत करायचा प्रयत्न केला. हा एक साधा पंधरा मिनिटांचा एम आर आय आहे. पण तरीही तिची भीती त्याच्याही मनात उतरली. त्याला तिथे उभं राहणं मुश्किल झालं. एका क्षणी तर तिला पटकन ओढून बाहेर काढावं आणि तिची सगळी भीती संपवून टाकावी असंही वाटलं, पण त्याने काहीच साध्य होणार नव्हतं.

मशीनचे मेटॅलिक कर्रर्र कटक आवाज एकदा खूपच जोरात आले आणि माईकमधून आवाज आला. "आता अगदी थोडाच वेळ बाकी आहे. तुम्ही छान करताय."

"नोरा, संपलंच आता." तो नेहमीच्या आवाजात म्हणाला. तिला त्या मशीनच्या घरघर आवाजात आणि कानातल्या प्लग्जमधून ऐकू आलं नसेल पण तरीही जर ऐकू आलंच तर तो बोलत राहिला. एकच गोष्ट तो पुनःपुन्हा सांगत होता. "नोरा, इट्स ऑलमोस्ट ओव्हर. मी आहे इथे. मी आहे तुझ्याबरोबर."

"अँड फिनिश!" त्या मुलीचा उत्साहात आवाज आला. "मी आत येऊन तुम्हाला मदत करते."

त्याच्या डोक्यात घुमणारा थड थड आवाज थांबला त्याचवेळी खोलीतला आवाज शांत झाला. टेक्निशियन आत आल्यावर त्याने नोराची टाच सोडून हात दोन तीन वेळा उघडबंद केला. त्याने बाजूला होत त्या मुलीला जागा करून दिली. टेबल सरकत टनेलबाहेर येताच नोरा हालचाल करू लागली. तीचे डोळे सताड उघडे होते आणि डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. टेक्निशियनचे शब्द तिच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हते. तिने धडपडत उठून चाचपडत डोक्यातले हेल्मेट काढून बाजूला ठेवले. तिचे सगळे शरीर थरथरत होते आणि अर्धवट वरवर घेतलेल्या श्वासांचा आवाज येत होता. खाली उतरायला तिने पायरीवर पाय ठेवला आणि धडपडली. पलाशने पटकन पुढे होत तिला तोंडावर पडण्यापासून वाचवले. तिने मुठीत त्याचा जितका शर्ट मावला तेवढा धरून ठेवला. तिला तो धड दिसतही नव्हता.

त्याने सरळ तिच्या पायांखाली हात घालून तिला उचलले आणि टेक्निशियनकडे लक्ष न देता भराभर चेंजिंग रूममध्ये घेऊन गेला. तीही काही विरोध न करता, त्याच्या मानेत हात टाकून, त्याला चिकटून रडत त्याचा शर्ट भिजवत राहिली. आत शिरताच खांद्याने दरवाजा ढकलून तो तिच्यासकट अलगद बेंचवर बसला. तिचा श्वास नॉर्मलला येईपर्यंत तो गप्प राहिला. "संपलं सगळं. शांत हो."

तिचं डोकं किंचित हललं पण ती तशीच त्याला चिकटून राहिली. त्याने तिच्याभोवतीचे हात अजून आवळत तिला जास्त जवळ घेतले. "श्श.. फक्त श्वास घेत रहा."

हळूहळू तिच्या अंगाची थरथर थांबली. "पलाश आय एम सॉरी, मी तुला खूप त्रास दिला. इव्हन आत्ता डोळ्यातल्या आणि नाकातल्या पाण्याने तुझा शर्ट खराब केला." ती डोकं किंचित मागे करून त्याच्याकडे बघत म्हणाली. त्याने मिटल्या डोळ्यांनी डोकं भिंतीला टेकलं. स्टॉप किलिंग मी.. "सुरुवातीला थोडा वेळ मी ठीक होते पण नंतर इतकं गरगरायला लागलं आणि डोळ्यातून पाणी, अंग थरथरत होतं. काहीच समजत नव्हतं. मला वाटलं आता ते मला बाहेर काढणार आणि पुन्हा पहिल्यापासून सुरू करणार.." ती पुटपुटत होती. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकले. "तू सगळं नीट केलं आहेस. संपलं आता."

"हम्म, मला उठायला हवं." ती हलली, तितक्यात दारावर टकटक झाली. "शी'ज ओके. एक मिनीट." पलाश किंचित आवाज वाढवत म्हणाला.

ती हळूहळू बाजूला झाली. अडखळत उभी रहात कपाटाकडे गेली. कपाटात ठेवलेले टिश्यू काढून तिने चेहरा आणि नाक पुसलं. तो टेबलावर ठेवलेला त्याचा बेल्ट, घड्याळ, रिंग आणि शूज घ्यायला वळला. तेवढ्यात तिची हाक आली. त्याने मान वळवून पाहिले. ती तिची ब्रा, श्रग, बॅग वगैरे सगळ्या वस्तू छातीशी धरून उभी होती. पहिल्यांदाच त्याला ती इतकी आजारी आणि एकटी, कुठेतरी हरवलेली वाटली. त्याचा घसा दाटून आला. तो तिला असं कधीच बघू शकत नव्हता.

"हे नुसतं सांगणं पुरेसं नाही, पण थॅंक यू! तू माझ्यासाठी जे काही करतो आहेस ते सगळं.. रिअली.. आय मीन इट."

"मी विशेष काहीच केलं नाही." त्याला वाटल्यापेक्षा आवाज जरा जास्त खरखरीत आला. थोडीशी मान हलवून तो खोलीबाहेर पडला. थोड्या वेळात तयार होऊन ती बाहेर आल्यावर बरीच बरी दिसत होती. पलाशने तिचा हात हातात घेतला आणि दोघे दाराबाहेर पडले.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle