रूपेरी वाळूत - ३९

"डॉक्टर, मला नाकाने श्वास घेताना खूप त्रास होतो आहे." नोरा मध्येच म्हणाली.

"हम्म, काही दिवस त्रास होईल. नाकातलं पॅकिंग तीन-चार दिवस असेल, ते काढलं की श्वास घेता येईल.

"मला डिस्चार्ज कधी मिळेल?" नोराने घाईत विचारले.

डॉक्टर हसले. "निघायची घाई झालीय का?"

"नाही, म्हणजे.."

"आय गेट इट. कंटाळा येईल पण बहुतेक हा आठवडाभर रहावं लागेल.  आपण मेंदूच्या खूप जवळ होतो त्यामुळे पॅकिंग असलं तरी इन्फेक्शन वर लक्ष ठेवावं लागेल."

"ओह, इन्फेक्शनची कितपत भीती आहे?" पलाशने विचारले.

"ह्या केसेसमध्ये इन्फेक्शनची भीती नेहमीच असते. त्यामुळेच आम्ही नीट लक्ष ठेवणार आहोत."

"जर पुन्हा लीक सुरू झालं तर? कसं कळेल?"

"पॅकिंग काढल्यावर आपण एक सीटी स्कॅन करायचा आहे आणि डिस्चार्ज नंतर काही आठवडयांनी एक एमाराय. तुझा फोबिया माहिती आहे, पण हा करावाच लागेल.

नोरा एकदम ताठ बसून मान हलवली. पलाशने तिचा हात हातात घेतला.

"ओके देन.. मी रोज राउंडला येणार आहेच. गोळ्या- रोज दुपारी आणि रात्री जेवणानंतर घ्यायच्या आहेत. कॉन्स्टिपेशनसाठी सिरप आहे ते दिवसातून दोनदा घ्यायचं आहे. बॉडीवर कुठलाही स्ट्रेन यायला नको. डोकं अजिबात वाकवायचं नाही. नो खोकणं, शिंकणं. घरी गेल्यावरसुद्धा डोक्याखाली दोन तीन उश्या घेऊन झोप. वाकायचं नाही, कायम ताठ मानेने रहायचं! उद्या भेटू." ते शेवटी हसत म्हणाले.

थोड्या वेळात बीपी आणि ताप चेक झाल्यावर जेवण आलं. पातळ वरणभात, तिखट लिंबू लोणचं, दोन केळी आणि ताकाची वाटी. बरोबर पलाशचं वेगळं साधं जेवण. "मला नकोय काहीच.. भूक नाही." नोराने तोंड वाकडं केलं.

"गोळ्या घ्यायच्या तर खावं लागेल."

"मग थोडंसंच, एवढं नाही जाणार."

त्याने मागे उश्या लावून तिला नीट बसवलं. स्वतः बेडच्या कडेला बसून वरणभातात मीठ, लिंबू घालून चमच्याने कालवला आणि तिला दोन तीन चमचे भरवले. "आता कसं वाटतंय तुला?"

"अजून थोडं गरगरतंय. तोंडाने श्वास घेऊन खूप दमलेय."

"हम्म, अजून दोन दिवस थोडं सहन कर.." तो चमचा पुढे करून म्हणाला.

"आय एम सॉरी.." ती खाली बघत म्हणाली.

"का?"

"तू माझ्यासाठी खूप जास्त करतो आहेस, आपण ठरवल्यापेक्षा खूप जास्त."

तो रिऍक्ट न करता तिला दोन तीन घास भरवत राहिला. "आय थिंक आपण प्रिटेंडिंग बंद केलं. की तू विसरलीस?"

"ऑफ कोर्स, माझ्या लक्षात आहे. पण.."

"मग ह्या फालतू गोष्टी बंद कर आणि आ कर."

"ओके." त्याच्या रागामुळे तिच्या ओठांचे कोपरे किंचित वर उचलले गेले.

नर्सच्या शेवटच्या राऊंडनंतर त्याने दिवे बंद केले.

---

हॉस्पिटलमधील पुढचे काही दिवस कठीण होते. सारख्या वेगवेगळ्या टेस्टस, चेकअप्स, कडवट औषधे, बिनमसाल्याचे मऊ जेवण, डॉक्टर आणि नर्सेसचे राऊंडस.. नोरा सगळ्याला खूप कंटाळली होती.  बाहेर नुसतं एकटं भटकण्यातही किती मजा होती ते आता हॉस्पिटलमध्ये बंदिस्त झाल्यावर लक्षात येत होतं.

तिला छान वाटू देणारे क्षण फक्त रात्री होते, पलाश बरोबरचे.

ममाला तिला अश्या अवस्थेत बघू द्यायचे नव्हते म्हणून मध्येच एक दिवस फक्त माया आणि डॅडी येऊन भेटून गेले. एकदा दादा वहिनी येऊन गेले. तिला नक्की कळत नव्हतं की आजारपणामुळे एवढी हळवी झालीय की अजून कशामुळे.. पण हॉस्पिटलमध्ये पलाशबरोबर घालवलेले अख्खेच्या अख्खे दिवस तिच्यावर खूप परिणाम करत होते. दिवसेंदिवस ती त्याच्या अजून खोल प्रेमात पडत होती.

सर्जरीनंतर तिसऱ्याच रात्री तिला झोप येत नव्हती. दिवे बंद होते, फक्त बाहेर ये जा करणाऱ्या नर्सेसच्या पावलांचा आवाज येत होता. "तू झोपली नाहीस." पलाश हळू आवाजात म्हणाला. हा प्रश्न नव्हताच. तिने उशीवर सरळ ठेवून आखडलेली मान किंचित त्याच्याकडे वळवली.

अंधार असला तरी बाहेरच्या दिव्यांचा थोडा उजेड खोलीत येत होता. तो पलीकडच्या भिंतीलगतच्या लहान बेडवर अवघडून, निम्मा वर निम्मा बाहेर असा झोपला होता.

"झोपायचा प्रयत्न करते आहे." तिने उत्तर दिले.

"काही हवंय?"

"नाही. तुला तो बेड पुरतोय का?"

"मी ठीक आहे, तू झोप लवकर."

बराच वेळ शांतता होती. ती छताकडे बघत राहिली.

"बाहेर पाऊस पडतोय." तो अचानक म्हणाला.

तिने थोडं सरकून खिडकीकडे नजर टाकली. काचेवर पाण्याची चादर ओघळत होती. त्यातून बाहेरच्या दिव्यांचा पिवळा आणि आवारातल्या पामच्या झाडांचा हिरवा रंग अजूनच ओघळता मऊ दिसत होता. 

"आत्ता बाहेर फिरायला काय मजा येईल!"

"पावसाळा अजून संपला नाही."

"पलाश?"

"हं?"

ती पुढे बोलण्यापूर्वीच तो उठून तिच्याशेजारी येऊन उभा राहिला. तिने काळोखात त्याच्या चेहऱ्याकडे बघितले. चेहरा नीट दिसत नव्हता पण तो हँडसमच दिसत असणार. अर्थात नेहमीप्रमाणे. नेहमी तो इतका प्रेझेन्टेबल, शांत आणि त्याचवेळी इतका अलर्ट कसा असतो हे तिला कोडंच होतं. त्याच्या वागण्यातील आत्मविश्वास आणि त्याचवेळी खोल अलिप्तपणा हे काहीतरी वेगळंच कॉम्बो होतं. एकाच वेळी खेचून घेणारं आणि धरून ठेवणारं.. आणि त्याचे रॉकस्टार लुक्स हा बोनस!

"पाणी देऊ?" त्याने तिच्या केसांतून हात फिरवत विचारले.

"माझ्या शेजारी झोपशील? आय नो तुला कम्फर्टेबल नाहीये, पण फक्त थोडा वेळ?"

"तुला थंडी वाजतेय का?

"नाही."

त्याने नाही म्हणायच्या आधीच तिने सरकून त्याच्यासाठी जागा केली. थँक् गॉड, प्रायव्हेट रूम मधले बेड जरा मोठे आहेत म्हणून बरं. तो काही न बोलता शेजारी आडवा झाला.

तिने कुशीवर वळून त्याच्याकडे तोंड केले.

"तुला सरळ झोपायचं आहे, कुशीवर नको झोपू."

"थँक्स डॉक्टर! पण सरळ झोपून माझी पाठ दुखतेय आणि मानेला मुंग्या येतायत. थोडाच वेळ पोझिशन बदलून बरं वाटेल."

तो जरा हसला. "आता बरीच बरी दिसते आहेस!"

"हम्म बरीच. आता डोकं जास्त दुखत नाही, नाक डोळेपण ठीक आहेत. घरी जायला हरकत नाही."

"इतक्या लवकर नाही. अजून थोडे दिवस आपण इथेच आहोत." त्याच्या ओठांचे कोपरे वर वळले.

हम्म, नो यूज! नोरा, दुसरी ट्रिक वापर.. तिने विचार केला.

"तुला एवढे दिवस सुट्टी घेऊन चालेल?"

"मी मला हवं ते करू शकतो."

"पण.."

"नोरा डिक्रूझ! तू मला इथून हाकलायला बघते आहेस का?"

तिने त्याच्या जवळ सरकून स्वतःच्या हातावर डोकं ठेवलं. "नोप!" तिला अजिबातच त्याला हाकलायचं नव्हतं. एका हाताने तिची पातळ रजई वर ओढून तिने त्याच्या पायांवर सरकवली.

"व्हॉटस् गोइंग ऑन हिअर?"

"काहीच नाही, तुला थंडी वाजू नये म्हणून." ती पुटपुटली. मोर लाईक तू इथून उठू नये म्हणून! हे मनात.

त्याने कुशीवर वळून तिच्या काळ्याभोर करवंदी डोळ्यात आरपार पाहिले.

"व्हॉटस् गोइंग ऑन?" त्याने पुन्हा मऊ आवाजात विचारले.

"प्लीज टेल मी, हे खरं आहे. मी जे फील करते आहे ते.. आपल्यात जे काही घडतंय ते.. सांग हे खरं आहे, मी फक्त इमॅजिन करत नाहीये." ती कुजबुजली.

त्याने रजईवरचा तिचा हात उचलून छातीपाशी घट्ट धरून ठेवला. "इट इज रिअल."

"बट इज इट स्मार्ट?"

"काय? तू आणि मी?"

तिने मान हलवली.

"हू केअर्स! आपलं ऑलरेडी लग्न झालंय.. सो नॅचरल आहे."

"येस. राईट?" ती तरतरीत होत म्हणाली.

"जर हे वर्क नाही झालं किंवा मी तुला हवा तसा नाही वाटलो तर वी कॅन ऑल्वेज गो बॅक."

"सेम! कधी कधी तू मला 'आवडून' घ्यावं लागेल, पण ठीक आहे."

तो खळखळून हसला आणि तिच्या अंगात ऊब पसरत गेली. त्याने तिच्या गालावर हात ठेवला.

"ह्या रिलेशनशिपमध्ये 'तू' मला जास्त सहन करायला लागेल."

"बघून घेईन." तिने पुढे होऊन त्याचे केस विस्कटले.

"गुड! झोप आता."

"हे मला आवडतंय" चेहरा शक्य तितका त्याच्या कुशीत ठेवत ती म्हणाली.

"आणि आवडत राहील. आय प्रॉमिस!" तो कुजबुजल्यावर तिच्या चेहऱ्यावरचं हसू अजून पसरलं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle