रूपेरी वाळूत - ४०

सर्जरीपासून चार दिवसांनी नाकातले पॅकिंग काढल्यावर ते ऑलमोस्ट कपाळापर्यंत आत होते हे कळून, इतके दिवस कडकपणाचा आव आणणारी नोरा ढासळली. पलाशने खांदे धरून ठेऊनसुद्धा तिचे हुंदके थांबत नव्हते. पण इतक्या दिवसांचा सगळा त्रास डोळ्यांवाटे वाहून गेल्यावर तिला मोकळं वाटलं.

पलाशबरोबरची रात्र हा अजूनही तिच्या प्रत्येक दिवसाचा हायलाईट होता. लग्न झाल्यापासून ती त्याला जितका अलिप्त, थंड माणूस समजत होती त्यापेक्षा तो वेगळाच होता. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वळणावर त्याने तिला सरप्राईज केले होते. सगळं समजूनही डिस्चार्जबद्दल तिची द्विधा मनस्थिती झाली. एवढे दिवस हॉस्पिटल हा त्या दोघांचाच एक कोष बनला होता. पलाश आणि ती! त्यांचं जग हॉस्पिटलमधल्या रात्रीनी बनत होतं.  एकमेकांपाशी कुजबुजलेली स्वप्नं, गुपितं, लहानपणीचे, आपल्या माणसांचे किस्से.. ते एकमेकांना जवळ घट्ट धरून ठेवत होते, जसं काही ते जो काही बंध तयार करत होते तो दिवसाच्या सूर्यप्रकाशात विरून जाईल.

बाहेरच्या जगात गेल्यावर हे असंच सुरू राहील की काय होईल याची हळूहळू तिला भीती वाटायला लागली. शेवटी तो दिवस उगवला आणि निघता निघता डॉक्टरांनी बॉम्ब टाकला.

"घरी गेल्यावर पंधरा दिवस तुला पूर्ण बेड रेस्टवर रहायचं आहे."

"ओके, त्यानंतर मी क्लिनिकमध्ये जाऊ शकते ना? "
"हम्म, तू व्हेट आहेस ना?"

"सरकारी! पण मी स्वतः काम करणार नाही, असिस्टंट करेल. मी फक्त लक्ष ठेवणार आहे. आय प्रॉमिस!"

"डोक्यावर प्रेशर येईल असं काही करायचं नाही. वाकायचं नाही, शिंका आणि खोकला अलाऊड नाही. जड उचलायचं नाही. आपल्या शरीराचं ऐक, दमल्यासारखं वाटलं तर लगेच थांब आणि आराम कर. नो सेक्स, नो अल्कोहोल. टेक इट इझी.."

"नो सेक्स?!" पटकन तिच्या तोंडून निघून गेलं. तिला पलाशची तिच्यावर सरकून थांबलेली नजर जाणवली पण तिने लक्ष फक्त डॉक्टरांकडे ठेवलं.

"हम्म अजून काही वेळ तरी नाहीच."

"काही वेळ म्हणजे exactly किती?" आता पलाश त्याचं हसू दाबत होता. तिने चेहरा निर्विकार ठेवला.

"कमीत कमी तीन महिने. तीन महिने विमान प्रवास नको आणि अल्कोहोलसुद्धा नको. डोक्यावर कसलंही प्रेशर यायला नको, नाहीतर आपली सर्जरी फेल होईल."

"ओके."

डॉक्टर जरा हसून पुढे बोलू लागले. "पुढच्या आठवड्यात तुमच्या गावातल्या डॉक्टरांकडे एकदा चेकअप करा आणि दोन आठवड्यानी मला येऊन भेटा. पोटाचे टाके काढून टाकू." त्यांनी पलाशकडे पाहिले."माझा मोबाईल नंबर आहेच तुमच्याकडे, कधीही गरज वाटली तर कॉल करा. काळजी घ्या. सी यू इन टू वीक्स!"

"सॉरी पलाश!" ते दाराबाहेर पडताच पलाशला बोलायचा चान्स न देता ती मिश्कीलपणे उद्गारली. "आय नो, यू कान्ट रेझिस्ट मी, आपल्यासाठी हे खूप टफ असणारे. तीन महिने!! आय होप यू कॅन सर्वाइव!" तिने हसत डोळा मारला.

"स्मार्टमाऊथ!" पुटपुटत त्याने कपाट उघडून बॅगेत कपडे भरायला घेतले. ती बेडवरून सरकून उतरली आणि पाठीमागे जाऊन त्याच्या गळ्यात हात टाकून हळूच मानेवर किस केलं.

"खोकायचं नाही, ओके. पण शिंकायचं नाही म्हणजे काय? शिंक कशी थांबवू शकतो? त्याने केलेल्या घड्या बॅगेत ठेवता ठेवता ती म्हणाली.

"नो आयडिया! शिंक येईल तेव्हा कळेल."

अजून तासभर आवराआवरी, वेगवेगळे पेपर्स साइन करून, बिल भरून झाल्यावर फायनली ते बाहेर पडले. नुकतीच पावसाची सर येऊन गेल्याने पार्किंगमधल्या शिरीषावरून पाण्याचे जाडजूड थेंब टपकत होते. खाली साचलेलं पाणी आणि रपरपीत चिखल असला तरी ती मोकळी हवा! बाहेरच्या थंड, नितळ, ताज्या हवेत तिने छाती भरून खोल श्वास घेतला. तिची बडबड, त्याने लावलेली गाणी, हायवेच्या एका धाब्यावर थांबून खाल्लेले दाल तडका - चावल आणि अधून मधून डुलकी घेताघेता ते गावात कधी पोहोचले तिला कळलंही नाही. गावात शिरल्या शिरल्या दवाखान्यात फेरी मारून यायचा तिचा आग्रह पलाशने मोडीत काढला. घरासमोर उतरताच चकाचक, स्वच्छ अंगण पाहून तिने पलाशकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.

"हाऊसकीपिंग स्टाफ!" तो बॅग्ज उचलून पुढे जात म्हणाला.

"ओह, मी कसं विसरले. फाईव्ह स्टार!" हसत ती त्याने उघडलेल्या दारातून आत शिरली.

बॅग भिंतीपाशी ठेऊन त्याने दार बंद केले. जराही वेळ न घालवता त्याने तिच्या कंबरेवर हात ठेवून अलगद स्वतःकडे ओढले. तिने दोन्ही हात त्याच्या छातीवर ठेवले पण मागे ढकलले नाही. "हाय!" तो मान झुकवून, लांब पापण्यांमधून तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.

"हाय!" ती ओठांचा कोपरा वाकडा करत म्हणाली. "मला राग आलाय तुझा."

"आय नो." दवाखान्यात न नेल्यामुळे ती वैतागली असणार. तिच्या ओठांवर पुढचे शब्द येण्यापूर्वीच त्याने तिचे ओठ ताब्यात घेतले, शक्य तितक्या हळुवारपणे.. तिच्या मुठीत हळूहळू त्याचा स्वेटर जमा झाल्यावर, तिला श्वास मिळावा म्हणून त्याने चेहरा बाजूला केला. ती अजूनही नाकाने नीट श्वास घेऊ शकत नाही हे तो जाणून होता.

"तू माझ्यावर चिडतेस तेव्हा मला जास्त आवडतेस." तो हसत म्हणाला.

"किस करून माझा राग जाणार नाही!" तिने नाक उडवले.

अचानक तिचं शरीर ताठ झालं, तोंड उघडून जोराने श्वास घेतला आणि डोळे विस्फारले. त्याने घाबरून तिचे खांदे धरले. "काय होतंय नोरा?" तिने फक्त हाताचा तळवा समोर धरून त्याला काही सेकंद थांबवलं आणि तिचा चेहरा पूर्ववत झाला.

"मी न शिंकायला शिकले!" ती हसून उद्गारली.

त्याचे वाढलेले ठोके जागेवर आले. "हुश्श, तू जाम कठीण पेशंट आहेस."

"ओ हेलो! ह्या घरात एकच डॉक्टर राहू शकतो." तिने डोळे बारीक करत त्याच्याकडे पाहिले.

"हम्म, तुला उचलायची वेळ आहे आता! की जिना चढशील?" तो जवळ येत म्हणाला.

"प्लीज.." ती हात पुढे करून म्हणाली.

"ओके तू वर झोप काढ. माझं खूप दिवसांचं काम पेंडिंग आहे, मी खाली स्टडीत बसतो. काही हवं असेल तर हाक मार."

"ओह, मग वर नको, मी स्टडीतल्या सोफ्यावर बसते, तू काम कर."

त्याने आतल्या सोफ्यावर डोक्याखाली दोन तीन कुशन ठेऊन तिला झोपवलं.

"फक्त पार्किंग आणि घरात चालूनसुद्धा मला दमायला झालंय.. एवढी वीक मी कधीच नव्हते." ती आश्चर्याने म्हणाली.

"तू गेले दहा दिवस तुझी खोली आणि कॉरिडॉर सोडून कुठे हलली नाहीस. चालली नाहीस. तुला वाटलं नाही तरी ही सर्जरी मोठी होती. एवढा वीकनेस येणारच. आता मस्त खा, पी, आराम कर. थांब, अंगावर घालायला काहीतरी आणतो." त्याने वरून एक हलकी शाल आणून तिच्या अंगावर पांघरली आणि सोफ्याच्या पायाशी पाण्याची बाटली ठेवली.

"थॅंक्यू" ती हसून त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. तिच्या हातावर थोपटून डेस्कपाशी जात त्याने लॅपटॉप उघडला. तिने काही वेळ इकडम तिकडम बडबड केली. बोलता बोलता नकळत तिला झोप लागली आणि तिच्याकडे बघत बघत तो त्याचं काम करत राहिला.

---

पुढचा आठवडाभर ममा घरी राहायला आली, पलाश पुन्हा ब्लू लगूनला जाऊ लागला. आठवड्याच्या शेवटी चेकअपमध्ये थोडं ब्लीडिंग दिसलं तरी नोरा पटापट बरी होत होती. पुढचा आठवडा तिने शक्यतो खालीच सोफ्यावर झोपून पुस्तकं वाचत घालवला, संध्याकाळी पलाश परत आल्यावर तिला उचलून वर नेत होता. दोन आठवड्यात आई-अप्पा, दादा-वहिनी, माया, डॅडी, नोराचे नातेवाईक, मित्रमंडळी सगळे येऊन भेटून जात होते. दोन आठवडे संपता संपता ती जिना हळूहळू चढायला लागली. एव्हाना ती बेड रेस्टला प्रचंड कंटाळली होती. "पलाश, मला बाहेर जायचंय.. प्लीज.." म्हणून रोज एकदा तरी रडत होती.

"असं सारखं रडून तू मला किती हर्ट करते आहेस, ते तुला कळतंय का नोरा?" त्याने शेजारी बसून तिच्या पाठीवर हात फिरवत विचारलं. त्यावर उत्तर म्हणून तिने त्याच्या गालांवर दोन्ही हात ठेवून किस केलं. बराच वेळ.

तिसरा आठवडा सुरू होताच ती दवाखान्यात जाण्यासाठी भुणभुण करायला लागली. "पलाश, डॉक्टरांनीच सांगितलं आहे फक्त दोन आठवडे बेडरेस्ट म्हणून. आता मी जाऊ शकते. रमेश काम करेल, मी फक्त त्याला गाईड करेन."

"ओके, पण तुला सोडायला, आणायला मी येईन. बुलेटचं नाव काढू नको आता." तो नाखुषीनेच तयार झाला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle