रूपेरी वाळूत - ४३

अनोळखी नंबर बघून तिच्या कपाळावर आठ्या आल्या. स्पॅम समजून तिने कॉल कट केला, तरीही पुन्हा वाजला म्हणून शेवटी उचललाच.

"हॅलो?" ती नेहमीच्या सौम्य प्रोफेशनल सुरात म्हणाली.

"हाय डार्लिंग!" आवाज ऐकताच तिच्या मस्तकात कळ गेली. " वेट, वेट..  कट करू नको. आय वॉन्ट टू अपॉलजाइझ फॉर माय बिहेवीअर."

तिने सरळ कॉल कट केला.

परत रिंग वाजली. ब्लॉक केला तर हा पुन्हा कुठला तरी नंबर वापरेल. असा त्रास सहन करण्यापेक्षा ऐकून घेऊ म्हणून तिने शेवटी फोन घेतला.

"हम्म. लिसनिंग!"

"नोरा, लूक आय एम रिअली सॉरी. तेव्हा पार्टी नंतर तुला शोधून मी सॉरी म्हणायला येत होतो. तू चुकीचं समजलीस. तू आधी अटॅक केलास माझ्यावर.."

"हे तुझं सॉरी आहे?"

"ओके, सॉरी मी माझं एक्स्प्लेन नाही करत. जे झालं ते झालं. हाऊ आर यू?"

"ओके, झालं बोलून? माझा नंबर कुठून मिळाला?"

"तुझ्या क्लिनिकमध्ये मी फोन केला होता, तिथल्या माणसाने तुझा नंबर दिला."

"हम्म." तिने ओठ आवळून घेतले.

"तू आजारी होतीस असं कळलं, आता बरी आहेस ना?"

"केतन, स्टॉप इट. मला तुझ्याशी बोलायची काडीचीही इच्छा नाही."

"हे! माझं ऐकून तर घे."

"फोन ठेव आणि परत कधीही कॉल करू नको. आय हेट यू! रादर आय डोन्ट फील एनिथींग फॉर यू."

"पण मी जे सांगतोय ते ऐकून..

"मला ऐकायचंच नाही. हे नाही आणि काहीच नाही. फोन ठेव."

"तुझ्या नवऱ्याबद्दल एक दोन गोष्टी सांगाणार होतो."

"नको सांगू!" ती ओरडली.

न थांबता तो बोलत राहिला. "आपण रिलेशनशिपमध्ये असताना पलाश माझा मित्र होता." हुं! मित्र! तिने नाक उडवले.

"त्याला आपल्याबद्दल सगळं माहीत होतं. तरी तो मला तुझ्याशी ब्रेकअप करायला इन्सिस्ट करत होता. बरेच दिवस. शेवटी त्याने माझ्याशी बेट लावली की मी तुला सोडलं तर तो मला त्याची दोन महिन्याची सॅलरी देईल. यू नो हाऊ मच? दोन लाख. आय वॉन्टेड द इझी मनी! ही पेड मी फॉर द ब्रेक अप."

ती तोंड बंद ठेऊन ऐकत होती.

"वरूणच्या कॉकटेल पार्टीत तू त्याच्याबरोबर दिसल्यावर मला राग आला. ऑब्वीअसली त्याने तुला पटवली होती म्हणून मी शोधत तुला वॉर्न करायला आलो होतो. त्याने तुला स्टॉक करता करता लग्नपण केलं? आय गॉट टू नो इट टुडे. लुक आउट नोरा.. आयम विथ यू, इफ यू वॉन्ट.."

"शट अप. तू काय करायला आला होतास, ते मला माहिती आहे. आय नो व्हॉट यू डिड आफ्टर ही पंच्ड यू. डोन्ट ट्राय टू बी स्मार्ट. जर तू पुन्हा कॉल केलास तर मी काय करेन ते बघच तू. गॉट इट?"  ती चिडून ओरडत म्हणाली. तिचं डोकं बधिर झालं, पायातली शक्ती नाहीशी झाली. टेबलाच्या आधाराने ती खुर्चीत बसली.

"ओके, ऍज यू विश!" मोठ्याने हसत त्याने कॉल कट केला. पुन्हा सुरू झालेल्या गाण्याचा आवाज तिच्या कानापर्यंत पोचत नव्हता. सगळा आनंद, सगळा उत्साह पाणी पाणी होऊन गेला. ओहोटी लागून पायाखालची वाळू खोल खोल निसटत चालली होती.

ही पेड फॉर द ब्रेक अप. एवढंच तिच्या कानात चरचरत होतं.

---

पलाश मीटिंग रूममध्ये क्लायंटला ग्रुप हॉलिडे पॅकेज समजावून सांगत असताना फोन वाजला. फोनवर रिसेप्शनिस्ट काही बोलेपर्यंत दारावर टकटक झाली.  त्याने फोन ठेवून दार उघडताच समोर नोरा उभी होती. नेहमीचा जीन्स टीशर्ट, करकचून बांधलेली पोनीटेल आणि विझलेले डोळे. सुरुवातीपासून त्याने पाहिलेलं तिच्या पाणीदार डोळ्यातलं तेज कुठेतरी विरून गेलं होतं. "सॉरी, मी मधेच आले." तो तिच्याकडे बघत राहिला. तिच्या आवाजातली वेदना त्याच्यापर्यंत पोचली. "आपण बोलू शकतो?"

"प्लीज एक्स्क्यूज मी.." तो दारातून आतल्या माणसाकडे मान वळवून म्हणाला. एव्हाना ती त्याच्याकडे पाठ करून चालू लागली. चार पावलं, फक्त चार पावलात तो तिच्यापाशी पोहोचला. त्याला मागे जाऊन वेळ थांबवता आली असती तरी त्याने ते केलं नसतं. तिच्याबरोबर घालवलेला वेळ त्याच्यासाठी अमूल्य होता.

ती त्याच्या केबिनसमोर उभी राहिली. सवयीने तिच्या खांद्यावर हात टाकून तो पुढे होणार तोच ती त्याच्यापासून लांब सरकली. त्याला तिच्याकडे असं पाहवत नव्हतं. अचानक त्याच्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं आणि तिच्या येण्याचं कारण डोळ्यासमोर आलं. कुठे ना कुठे पुढच्या सगळ्या घटनांना तो जबाबदार होता हे जाणवून त्याच्या छातीत एक बारीक कळ आली. हातांच्या वळलेल्या मुठी त्याने ट्रावझर्सच्या खिशात कोंबल्या.  "आत जाऊन बोलूया?" तिने मान हलवल्यावर त्याने दार उघडून तिला आत जाऊ दिलं आणि मागोमाग जाऊन दार बंद केलं.

खुर्चीत न बसता ती केबिनच्या मध्यभागी हाताची घडी घालून उभी राहिली. तेवढ्यात रिसेप्शनिस्टने दारावर नॉक केलं. "तुमच्यासाठी काही आणू मॅम, टी ऑर कॉफी? सर?"  नकारार्थी मान हलवून त्याने दार पुन्हा बंद केलं. फायनली ते एकटे समोरासमोर होते. तो तिच्या समोर जाऊन उभा राहिला. "तुला बरं वाटत नाहीये का?"

"मी ठीक आहे."

"मग, काय झालं?"

बराच वेळ ती काहीच बोलू शकली नाही. शेवटी तिने रोखून त्याच्या डोळ्यात पाहिले. "मला सांग हे खोटं आहे. मला तुझ्या तोंडून ऐकायचंय."

"नक्की कशाबद्दल?" त्याने डोळे मिटले आणि पुन्हा उघडत म्हणाला.

तिने हातांची घडी अजून आवळली. " मला सांग की तू केतनला पैसे दिले नाहीस. मला सोडून जाण्यासाठी." तिचे डोळे आता पाणावले. "प्लीज सांग पुढचं सगळं खोटं नाहीये."

त्याने खोल श्वास घेतला. "असं मी नाही सांगू शकत." चेहरा कोरा ठेवायचा प्रयत्न करत तो म्हणाला.

एखाद्या अनोळखी माणसाकडे बघितल्यासारखी ती त्याच्या तोंडाकडे बघत राहिली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. काही वेळ ती तशीच गप्प उभी राहिली.

"मग मजा आली?"

"काय बोलते आहेस नोरा?"

"तुला मजा आली का, हा खेळ खेळताना?

"तुला काय म्हणायचंय मला क.."

तिने ताठ होत डोळे पुसले. पटकन त्याच्या जवळ येत तिने छातीवर दोन्ही हात ठेऊन त्याला ढकलले.
"राईट पलाश! मला कळत नाहीये. मला काहीच कळत नाहीये. तू माझ्या बॉयफ्रेंडला मला सोडण्यासाठी पैसे दिलेस!" तिने अजून एक धक्का दिला. "तू स्वतःला समजतोस कोण?" त्याने मागे घेतलेला पाय डेस्कला लागला.

तिने पुन्हा मारायला उचललेला हात त्याने दंडाला धरून थांबवला. तो कितीही वेळ तिचा मार खायला तयार होता पण त्याने भूतकाळ बदलणार नव्हता.

"शांत हो, प्लीज.."

"शांत?" ती रागाने त्याच्या पकडीतून सुटायचा प्रयत्न करत बोलत होती. "तू पहिल्यापासून माझ्याशी खोटं बोलतो आहेस. तुझ्यासाठी हा फक्त एक गेम आहे, हो ना?"

त्याने तिचा दंड घट्ट धरून तिला जवळ ओढली. "मी तुला वाचवलं! त्याच्यापासून." तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.

"वाचवलं? तू मला वाचवलं! हां!" ती जोरजोरात श्वास घेत होती. "मला सोड पलाश." तिने हालचाल थांबवली. 

"आणि तू माझं म्हणणं ऐकून न घेता निघून जाशील."

"ओss तुझं म्हणणं ऐकल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये." तिने जळजळीत नजरेने रोखून पाहिले.

त्याने हळूच तिचा दंड सोडला. दुसऱ्या हाताने ती दंड चोळू लागली.

"तुला लागलं नाही ना?" जास्तच जोरात धरलं की काय, विचाराने घाबरून तो म्हणाला.

"नथिंग." ती अजून थोडी मागे सरकली. त्याला हे अंतर नकोसं होतं. "काळजीचा आव आणणं बंद कर. गो ऑन.. अजून सांग गोष्टी.. सांग, मी ऐकतेय."

त्याने दात चावले. तो हेच डिझर्व करत होता पण तरी त्याला आतून दुखत होतं. "त्याने तुला काय सांगितलं माहीत नाही पण तो सगळं रंगवून सांगतोय. मी तुझ्याशी खोटं बोललो नाही. फक्त काही गोष्टी सांगितल्या नाही आणि आता खूप उशीर झालाय."

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle