रूपेरी वाळूत - ४५

उजाडताच गाडी काढून तो गावात पोहोचला. घरात शिरल्याबरोबर आई समोर आली. "पलाश, मी हे काय ऐकतेय? संगीची बहीण म्हणाली नोरा काल रिसॉर्टवरून रडत गेली म्हणून.. काय चाललंय काय?"

"आई, प्लीज आत्ता नको. मी सांगतो नंतर. मला आधी अप्पांशी बोलायचंय."

हम्म म्हणून आईने दीर्घ श्वास सोडला आणि "खोलीत आहेत." म्हणून बाजूला झाली. तो झोपाळ्याला वळसा घालून मागच्या खोलीत गेला. अप्पा चष्मा लावून आरामखुर्चीत काहीतरी वाचत बसले होते. "अप्पा.."

"हम्म, बसा.." अप्पा पुस्तकातून वर बघत त्यांच्या खर्जातल्या आवाजात म्हणाले. टेबलाजवळची लाकडी खुर्ची ओढून तो बसला.

"मला काहीतरी सांगायचंय.. म्हणजे कबूल करायचंय." नर्व्हस होत त्याने केसांत हात फिरवला.

त्यांनी भुवया उंचावल्या.

"मी खूप मोठी चूक केलीय."

ते आता डोळे बारीक करून त्याचे निरीक्षण करत होते.

"म्हणजे... मी केलेल्या गोष्टीबद्दल मला वाईट वाटतंच आहे आणि उशिरा का होईना तुम्हाला सगळं उघडपणे सांगून टाकणार आहे."

"हूं, ऐकतोय." अप्पांनी चष्मा काढून मांडीवरच्या 'पुन्हा तुकाराम'वर ठेवला.

त्याने लग्न, पैज आणि नोराच्या निघून जाण्याबद्दल सगळे भराभर सांगून टाकले. अप्पा गप्प राहून फक्त ऐकत होते. "मी रिसॉर्टच्या जमिनीसाठी लग्न केले. तुम्ही माझ्याकडून ते काढून घेऊ नये म्हणून." त्याने दोन क्षण डोळे मिटून पुन्हा उघडले. "मी खूप चुकीचं वागलो, आय एम सॉरी!"

अप्पा अजूनही काही बोलत नव्हते. पलाशने त्यांच्या नजरेला नजर मिळवली. "माझ्याकडून खोटेपणा आणि लबाडी झाली पण मी तसा माणूस नाहीये. तुम्ही मला तसं वाढवलं नाहीये."

"नक्कीच."

"मी चुकीचा वागलो. तुम्हाला ब्लू लगून दादाला द्यायचं असेल तर द्या, मी वकिलाची अपॉइंटमेंट घेतो. मला चालेल. मी दादाला मदत करेन."

"मी तुला कधीतरी 'रिसॉर्ट शिरीषला देईन', असं म्हटलंय का? शिरीषच्या डोक्यावर आधीच कामांचा एवढा लोड आहे, तो तुझं हॉटेल कधी बघायचा!"

"म्हणजे? लग्न करून सेटल झाल्यावर तुमची खात्री पटेल की मी रिस्पॉन्सीबल आहे, असं तुम्हीच म्हणाला होतात." तो आता कोड्यात पडला.

"नाही. लग्न करून कोणीतरी तुझ्याबरोबर आयुष्यभर तुझी साथ देणं ह्याची तुला गरज होती. तुझ्यावर दबाव टाकल्याशिवाय काही तू त्या वाटेला जाशील असं मला वाटत नव्हतं. तुला स्वतंत्र राहायला आवडतं नि त्यातून आणखी हट्टीपणा! कोण मुलगी तुला पसंत पडणार होती?" त्यांनी मान हलवली. "ही संधी आपोआपच चालून आली. नोरा शांत, हुशार, कष्टाळू मुलगी आहे, त्याचवेळी तुझे फुकट नखरे ऐकून घेणार नाही, तुला शिस्तीत ठेवेल म्हणून मला आवडली. तुला बरोबर दिशेला एक धक्का द्यायला हवा होता, तो मी दिला." अप्पा गालातल्या गालात हसले.

पलाश आ वासून त्यांच्याकडे बघतच राहिला. "म्हणजे हे सगळं मी उगीचंच केलं?"

"मी काय म्हणालो ते ऐकलंस का? तू हे केलंस कारण मनापासून तुला हेच हवं होतं. तू एकटेपणाला कंटाळला होतास. तुला बायको, कुटुंब हवंच होतं पण त्या दिशेने फक्त एक धक्का हवा होता, तो मी दिला."

त्याने खाली आपल्या हातांकडे पाहिलं, बोटातली अंगठी चमकली. त्यांचं खरंच तर आहे, फेक रिलेशनशिप तिच्याबरोबर कधीच फेक वाटली नव्हती. "हे बरोबर वाटतंय.."

"बरोबर आहेच. तुला काय वाटलं होतं, तुम्ही जे वागताय ते मला कळत नाही? मी बाप आहे तुझा, हे केस उन्हात नाही पांढरे झाले!" त्यांनी चष्मा पुन्हा डोळ्यावर चढवला.

पलाश ओठ चावून हसला.

"आता उशीर करू नकोस. तिला मनातलं सगळं सांग. काय बिनसलंय ते सगळं बोलून सोडव आणि घरी घेऊन ये. जा, पळ."

तो आ वासून बघतच राहिला. त्याला भीती वाटणारे, रागीट, कडक अप्पा कुठे गेले? "अप्पा तुम्ही एवढे मऊ कधी झालात!" तो उठून जवळ जात म्हणाला. "हाहा! आता वाघ म्हतारो झालो." त्याच्या पाठीवर थाप मारत अप्पा मोठ्याने हसले.

"तिला घेऊनच येतो अप्पा!" म्हणून तो भराभर बाहेर पडला.

आई दारातून चहा घेऊन खोलीत जाईपर्यंत तो घराबाहेर पडला होता. अप्पांच्या हातात कप देताना आईने मानेनेच काय झालं म्हणून विचारलं. "झिलगो लायनीर आयलो!" मिशीतल्या मिशीत हसत अप्पांनी चहाचा भुरका मारला.

--

ज्याअर्थी माया किंवा ममाचा फोन आला नाही म्हणजे नक्कीच ती घरी नाहीये... ड्राइव्ह करता करता तो विचार करत होता. तो दवाखान्यासमोर थांबला, दाराला कुलूप होतं. हम्म. ती सापडण्याचं एक्झॅक्ट ठिकाण त्याच्या डोळ्यासमोर आलं. सात वाजत आले होते, तुरळक माणसं वगळता रस्ते अजून रिकामे होते.

तो इव्हाच्या कवाडीत पोचला तेव्हा ती ओल्या वाळूत बरबटलेल्या सॅमला कडेवर आणि ओल्या, अनवाणी कॅरनला हाताने धरून आत शिरत होती. "पलाश अंकल!" थारकडे वळून बघत कॅरन ओरडली. इव्हा कडेवरचं गब्दूल सांभाळत वळून गाडीजवळ आली. "वेळेर ऱ्हवली हां, बेगीन जाय." तिला ओरडून थँक्स म्हणत त्याने गाडी वळवली आणि घरापासून दहा पावलावर असलेल्या पुळणीत गाडी पार्क केली.

कोवळ्या उन्हात फेसाळत्या लाटा किनाऱ्याकडे झेपावत होत्या. रस्त्यालगत कोरड्या वाळूच्या उंचवट्यांवर पसरलेल्या हिरव्याकंच काटेरी वेलींमध्ये लहान जांभळी फुले उमलली होती. पाण्याजवळ पकडापकडी खेळणारी दोनतीन भटकी कुत्री सोडता किनारा रिकामा होता. तो वाळूत पाय बुडवत चालत राहिला. थोडं पुढे गेल्यावर समुद्राकडे तोंड करून बसलेली नोरा दिसली. पुढे गेल्यावर तिचे बाजूला काढून ठेवलेले शूज नजरेच्या टप्प्यात आले आणि वाऱ्याने चेहऱ्यावर फडफडणारे केस बाजूला सारताना तिने त्याच्याकडे पाहिले. दोन्ही हात स्वेटशर्टच्या खिशात घालत तिने पुन्हा समोर लाट विरून पाणथळ ओल्या वाळूत पडलेल्या आकाशाच्या प्रतिबिंबाकडे पाहिले.

"गुड मॉर्निंग!" तो तिच्याशेजारी वाळूत टेकत म्हणाला.

"मॉर्निंग!" तिच्या किंचित सुजवट, लालसर डोळ्यांवर त्याची नजर थबकली.

"नोरा, यू हॅव एव्हरी राईट टू डिसाईड. पण प्लीज एकदा मी काय सांगतोय ते पूर्ण ऐक आणि मग ठरव."

"तू अजून काय काय लपवलं आहेस माझ्यापासून? अँड व्हाय एम आय नॉट सरप्राईज्ड?!" तिने भुवया वर करत विचारले.

"हे तुझ्यापासूनच नाही, मी माझ्यापासूनही लपवायला बघतोय गेली कित्येक वर्षं. ती बेट म्हणजे खरंच विचित्र गोष्ट होती. कुणालाही मी सायको स्टॉकर वगैरे वाटू शकतो. पण माझ्या अश्या वागण्यामागे एक कारण होतं." त्याचा चेहरा गंभीर झाला.

तिलाही त्याच्या आवाजात काही वेगळं जाणवल्यामुळे ती लक्ष देऊन ऐकायला लागली.

"सो! मी टाळत होतो ती पलाशची गोष्ट! माझं इथलं लहानपण तर तुला माहितीच आहे. माझे काका मुंबईला कस्टम्समध्ये मोठ्या पोस्टवर होते. माझी चुलत बहीण म्हणजे त्यांची एकच मुलगी. ती तेव्हाच लग्न होऊन दुबईला गेली होती. मी तेव्हा सहावीत होतो, माझी शाळेतली हुशारी बघून त्यांनी शिक्षणासाठी मला मुंबईला नेलं. तिथे कॉन्व्हेंट स्कुलमध्ये ऍडमिशन झाली. गावात मी खूपच लाडाकोडात वाढलो होतो. सगळ्या गोष्टी आई हातात आणून देणार, बाकी सगळ्या कामांना गडी. अगदी पांघरुणांची घडी घालायलासुद्धा गडी असायचा.

मुंबईत आल्यावर काका तर कामामुळे बाहेरच असायचे आणि माझी काकी खूप कडक शिस्तीची होती. म्हणजे वाईट वागवायची नाही पण तिचे खूप नियम होते. घरातली कामं करणं, आवराआवरी, साफसफाई, होमवर्क करताना चुकल्यावर पट्टीचे फटके वगैरे नेहमीच. नवीन शाळा, फ्लॅटमुळे बंद जागा आणि काकीच्या रोजच्या टेन्शनमुळे माझा जीव उबून गेला. एकदा काकांनी स्वतः बघितल्यावर त्यांनी माझं घरात होमवर्क बंद करून, मला वरच्या मजल्यावर सेठनांच्या घरी पाठवायला सुरुवात केली."

नोरा आता उत्सुकतेने ऐकत होती.

"बमनअंकल आणि पिनारआंटी! ते पारसी होते. खूप छान, मोकळं आणि स्वीट कपल! मी त्यांच्याकडे पहिल्यांदा गेलो तेव्हा मेहेरने दार उघडलं. तेव्हा कळलं की ती माझ्याच वर्गात होती, फक्त आमच्याच कॅम्पसमधल्या गर्ल्स हायस्कूलमध्ये. मेहेरचा जन्म खूप उशिरा झाला होता म्हणून अंकलआंटी तिला चमत्कारच समजायचे. ती खरंच एखाद्या एंजलसारखी होती. गोड चेहरा, नाजूक, गोरी, पिंगट डोळे, सिल्की केस...

आंटी मेहेरबरोबर माझाही अभ्यास करून घ्यायच्या. मेहेरबरोबर हळूहळू माझी गट्टी जमली. सगळ्या रखरखीत शहरात तीच माझं ओऍसिस होती. वी शेअर्ड एव्हरीथींग! शाळेतल्या गॉसिपपासून अभ्यासापर्यंत सगळं. कॉलेजलाही दोघांनी एकत्र ऍडमिशन घेतली. आठ नऊ वर्ष एकत्र घालवून एव्हाना ती माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली होती. एकमेकांवरचं प्रेम सांगायचीही गरज नव्हती इतके आम्ही मनापासून एकमेकांना ओळखत होतो. आम्हाला एकत्र बांधून ठेवणारा काहीतरी नाजूक धागा तयार झाला होता. आम्ही लास्ट इयरला असताना, एकदा अचानक मेहेर आणि तिचे पेरेन्ट्स आठवडाभर कुठेतरी गेले. त्यांचा फोनही बंद होता." त्याचे ओठ थरथरत होते.

तेवढ्यात एक समुद्रपक्षी तोंडात मासा धरून त्यांच्या डोक्यावरून फडफडत उडाला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle