मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने

कालच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने बरंच काही वाचलं, त्यावरून आपसूकच माझी भाषेची जडणघडण कशी झाली ते आता काय वाटतं, मराठी भाषेवरचं प्रेम असं बरंच काही मनात आलं, म्हणून त्यात माझ्याही या लेखाची भर.

लहानपणच्या काही मराठी भाषे संदर्भातल्या गमती जमती आठवल्या तर त्यात दोन मुख्य आठवत आहेत. एक म्हणजे मी कोणत्या तरी पुस्तकात वाचून आईला दुःखभोग म्हणजे काय असं विचारलं होतं, वय असेल पाच वर्ष. आणि दुसरं म्हणजे एक शिबीर झालं होतं आमच्या शाळेत, मी तिसरीत होते. त्यात एका कागदावर आपल्या आवडी लिहायच्या होत्या त्यावर मी आवडते कवी कुसुमाग्रज असं लिहिलं होतं आणि आवडते लेखक साने गुरुजी.
काय वाचलं असेन मी तेव्हा त्यांचं, हा प्रश्न मला आता पडतो, पण स्वतः बरंच वाचून लिहिलेलं होतं हे नक्की. निदान हे एक कवी आहेत हे तेव्हा त्या वयात माहीत होतं हे आता मलाच विशेष वाटतं. आई बाबांनी लहानपणी भरपूर पुस्तकं नेहमीच घेऊन दिली आणि मीही त्यांचा फडशा पाडला. त्याचे हे फोटो म्हणजे आपलं बालपण किती समृद्ध होतं याची साक्ष देणारे आहेत. तेव्हाच्या त्या माझा आताच्या मला हेवा वाटतो. सगळं आई बाबांनी जपून ठेवलं आहे, म्हणून आज त्यांना फोटो पाठवायला सांगितले. त्यात बाकीही काय काय लिहिलं आहे, गुलाबजामू हे फारच विनोदी आहे, वर्तमानपत्र रोज वाचत होते त्यामुळे ते उत्तर चपखल वाटतं आहे, शिक्षिका व्हायचं होतं हे आईकडे बघून वाटत असेल तेव्हा, पण आवडती व्यक्ती बाबा लिहिलं आहे याचा आईने आज विशेष उल्लेख केला आहे. Mosking तर असो हे अवांतर झालं.

IMG-20230228-WA0000.jpg

IMG-20230228-WA0002.jpg

IMG-20230228-WA0003.jpg

बाकी लहानपण गेलं सगळं बुलढाण्यात, विदर्भात, त्यातही पुन्हा बुलढाणा खान्देश आणि मराठवाडा दोन्हीना जवळ, त्यामुळे त्याही प्रादेशिक भाषांचा प्रभाव असलेली अशी तिथली भाषा. आई बाबांची थोडी वर्धा नागपूर कडची, आजी मध्य प्रदेशातली त्यामुळे तिच्या आणि बाबांच्याही बोलण्यात बरेच तिकडचे शब्द, तरीही घरात बोलली जाणारी मराठी ही मुख्य प्रमाण भाषा आणि त्याला बोली भाषेतल्या अनेक शब्दांची आणि लहेजाची जोड अशी होती. मी बारावी नंतर पुण्यात आले आणि चार महिन्यात तिथल्या लहेजा प्रमाणे बोलायला लागले असं घरच्या सगळ्यांना वाटायचं. माझ्या वापरात येणारे काही शब्द वेगळे वाटले तरी एकूण मी बुलढाण्याची आहे यावर काहींचा विश्वास बसायचा नाही, कारण बहुधा माझा कल जास्त प्रमाण भाषेकडे होता. अर्थात तरीही मला विदर्भातले अनेक बोली भाषेतले शब्द अत्यंत प्रिय आहेत आणि साबुदाणा उसळीपासून ते बऱ्याच वाक्यांमध्ये ऊन हुन प्रत्यय वापरून बोलली जाणारी वाक्य, काही खास स्थानिक शब्द हे मी ठरवून आवर्जून वापरते. अर्थात लेख लिहिताना प्रमाण भाषाच जास्त वापरली जाते आणि ओढून ताणून बोली भाषा वापरत नाही कारण ते माझ्या सवयीचं नाही एवढंच. रोजच्या बोलण्यात सुद्धा तेच होतं.अजूनही आई बाबा इथे आले की पुढचे काही दिवस माझ्यावर वैदर्भीय बोलीचा प्रभाव वाढतो आणि नंतर कमी होतो. विदर्भात काही हिंदी शब्द जास्त वापरले जातात, पण बाबांच्या बोलण्यात अजूनही जोडे घालून येतो असे शब्द येतात. फ्लॉवरच्या भाजीला उलट फुलकोबी हा शब्द विदर्भात वापरला जातो. व्हॉट्सऍप वर बाबा माझ्याशी देवनागरीत टाईप करून गप्पा मारायला लागले तेव्हा मी तातडीने मराठी कीबोर्ड इन्स्टॉल करून देवनागरीतून लिहायला सुरुवात केली.

मधल्या काळात अभ्यास, शिक्षण नोकरी यात मराठी वाचन तसं बंदच झालं होतं. पण जर्मनीत येऊन ब्लॉग लिहायला सुरुवात केली, बऱ्याच मराठी वेबसाईट सापडल्या, व्हर्चुअल मराठी जग खुलं झालं आणि मराठी प्रेम होतंच, ते पुन्हा बहरलं. सुरुवातीला लेख लिहिताना बरेच मराठी शब्द आठवायचे नाहीत, एक दोन वेळा मी गुगलचा आधार घेऊन काही सोपे मराठी शब्द शोधले तेव्हा वाईट वाटलं होतं, ते आता दहा वर्षात पुन्हा अगदी सवयीचे झाले आहेत आणि दिवसेंदिवस असे अनेक शब्द अधिकाधिक वापरायचे असा प्रयत्न पण करते आहे. आता अपवाद वगळता जवळपास रोज मराठीतून काहीतरी लिखाण होतं. मराठीतून रोज संवाद होतो. आजही मी दर भारतवारीत किमान तीन चार मराठी पुस्तकं घेऊन येते. जमेल तेव्हा इथे ती मंडळींना सुद्धा ती वाचायला देते.

सृजन सोबत मराठीच बोलायचं असं ठरवावं लागलं नाही इतकं आम्ही ते गृहीत धरलं होतं. इथे बाहेरही मातृभाषेतून बोला यासाठीच प्रोत्साहन देतात, पण नुसती तोंडओळख नाही, तर साध्या साध्या अनेक शब्दांना मी घरी नेहमीच मराठी शब्द वापरात असल्या मुळे ते त्याच्याही बोलण्यात रुळले. म्हणजे एरोप्लेन नाही तर विमान, कलर नाही तर रंग, स्कुल नाही तर शाळा, बटरफ्लाय नाही तर फुलपाखरू असे अनेक. मराठी आकडे बोलायला शिकवले म्हणण्यापेक्षा तेच आपोआप होत गेलं. लपाछपी खेळत असताना सृजन "एक दोन तीन चार" म्हणायला सुरुवात करतो, तेव्हा हमखास कुणाचे तरी कान टवकरतात आणि मराठीतून कोण म्हणतं असं विचारलं जातं हा अनुभव अनेक वेळा घेतला आहे. इथे काही 'विशेष' खेळणी नाहीत, हे 'प्रतिबिंब' बघ, मला 'खात्री' नाही हे बरोबर आहे का पण मला असं वाटतंय, 'हनुवटी'ला रंग लागला असे शब्द त्याच्या बोलण्यात आले की बरेचदा ऐकणाऱ्याला आश्चर्य वाटतं. त्याच वेळी चांदोबाला फुटले पाय या गाण्यात फुटले म्हणजे तुटणे असा अर्थ नाही, हे समजावून सांगताना माझा कस लागतो. असे इतरही मराठीत बरेच शब्द आहेत जे आपण गृहीत धरतो, पण ते समजावून सांगायला अवघड वाटतात. त्याच्या रोजच्या बोलण्यात थोडं जर्मनाळलेलं मराठी असलं, त्यात काही इंग्रजी शब्द असले तरी प्रामुख्याने मराठीच बोललं जातं. त्याच्या वाक्यात येणाऱ्या काही शब्दांना मराठीत काय म्हणतात असं विचारलं तर तो उत्तर देऊ शकतो. तो पहिल्या वर्गात गेला मागच्या वर्षी, तेव्हा पहिल्यांदा जर्मन भाषा हा विषय सुरु झाला. त्या आधी तो जर्मन मधून बोलायचाच, पण शालेय अभ्यासक्रम आणि लिखाण तेव्हा सुरु झालं. मी मराठी बरेच वेळा लिहिते हेही तो बघतो. मध्यंतरी त्याने स्वतःहून एकदा 'मला मराठी शिकव' असं सांगितलं. त्याला समजेल अश्या पद्धतीने मराठी लिहायला आणि वाचायला शिकवणं हे माझ्यासाठी सोपं नाही, ते बरंच सोपं करून सांगावं लागेल, पण आम्ही एक दोन वेळा सुरुवात केली आणि त्यात सातत्य राहिलं नाही, तरी त्या दिशेने मी थोडं वाचन लिखाण सुरु केलं, जेणेकरून जमेल तेव्हा पुढे शिकवू शकेन.

अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेले अनेक लोक जे आजही मराठी टिकवून आहेत त्यांचं मला बरेचदा कौतुक वाटतं, कारण तेव्हा ना इंटरनेट होतं ना इतर कोणतीही साधनं होती. इंदोरकडचे आमचे नातलग जी मराठी बोलतात त्यातले काही शब्द गमतीशीर वाटतात, पण इतकी वर्ष हिंदीचा प्रभाव असून सुद्धा आवर्जून मराठी बोलणे, जमेल तसं वाचणे हे विशेष आहे. गुजरात मध्येच जन्मापासून असलेली एक मैत्रीण, त्यांचे कुटुंबीय, मुलं सुद्धा उत्तम मराठी बोलतात. माझी एक जाऊ मूळ युपी मधली आहे, पण प्रयत्नपूर्वक मराठी चित्रपट बघते, भाषा समजून घेते, माझे लेख आवर्जून वाचते, अशीही उदाहरणे आहेत.

सध्याचा विचार केला तर बऱ्याच मराठी मालिका, वर्तमान पत्र, जाहिराती यात वापरली जाणारी भाषा दिवसेंदिवस दयनीय अवस्थेकडे वाटचाल करते आहे असं वाटतं. त्यात बचकभर इंग्रजी शब्द असतातच आणि लिखाणात सुद्धा अनेक चुका असतात. सांडग्याची भाजी ऐवजी सांगाड्याची भाजी हे वाचून मी हतबल झाले होते. अशी अनेक उदाहरणे वरचे वर दिसत राहतात. बोली भाषेत येणारे शब्द, तो लहेजा हे मला खटकत नाही, पण गुढी पाडव्याला गुडीपाडवा म्हणणे हे खटकतं. लहान मुलांसाठी बरीच मराठी गाणी, गोष्टी युट्युब वर आहेत, पण त्यातले ऍनिमेशन, बोलणं हे इतके कंटाळवाणे आहेत की ते काही वेळा नको वाटतात, त्यात निवडक गोष्टी शोधाव्या लागतात. याबाबत लहान मुलांसाठी अजून चांगले आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम असायला हवेत. मराठी टाइपिंग ही अजिबात अवघड गोष्ट नाही, पण अजूनही या बाबतीत खूप उदासीनता जाणवते. मुलांच्या शिक्षणाचं माध्यम कोणतंही असेल तरी घरी मराठीतून संवाद साधणे हे जमवता येऊ शकतं.

आमच्या आणि पुढच्या पिढीला निदान ऑनलाईन सुद्धा माध्यमं उपलब्ध आहेत खूप, त्यामुळे आम्ही तर आमची भाषा पुढे न्यायलाच हवी. घरात मराठी बोलणं, पुस्तकं वाचणे हे तर आहेच, पुस्तक घेऊन वाचन कमी झालं असेल तरी ऑनलाईन सुद्धा विविध ब्लॉग्स आणि ब्लॉगर्स यातून वाचन भरपूर जमू शकतं. त्यातून भाषेची उजळणी होत राहते. युट्युब आणि ओटीटी वर येणारे मराठी कार्यक्रम, चित्रपट आपण बघू शकतो, त्यात चांगले कार्यक्रम शोधणे हे सोपं नाही पण ते आहेत हे नक्की. या सगळ्याचा अर्थ इंग्रजीची किंवा इतर कोणत्याही भाषेची हेटाळणी असा मात्र होत नाही, त्याही भाषा आजच्या काळात अत्यावश्यक आहेत. पण आपली मातृभाषा आपल्याला यायला हवी याबाबत मात्र आग्रही असावं असं मला नक्की वाटतं.

भाषा ही प्रवाही असते असं म्हणतात, पुढेही त्यात बदल होत जातील, पण तो प्रवाह टिकून राहावा म्हणून आपण सगळ्यांनी मिळून शक्य तेवढे प्रयत्न करायला हवेत. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने हे पुन्हा पुन्हा जाणवत राहील आणि आपली मराठी जगभर पसरत राहील या सदिच्छा !

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle