नभ उतरू आलं - ३२ - The End

समर

"अब तक हमने जितनी भी मेहनत की, जितना भी जोर लगाया, सब इसी के लिये हैं! लेट्स शो देम!!" भरपूर वॉर्म अप करून, ड्रेसिंग रूममध्ये शेवटच्या हडलसाठी सगळ्यांची डोकी गोलाकार करून जवळ येताच मी म्हणालो आणि प्रत्येकाला त्यांचा रोल आणि जबाबदारी समजावून सांगितली. आयपीएल फायनल!! थोड्या वेळापूर्वी दहा नंबरची निळी जर्सी चढवतानाच कदाचित ही माझी शेवटची मॅच असू शकते हे डोक्यात आलं होतं. ध्यानीमनी नसताना आम्ही फायनलमध्ये पोचलो होतो. पूर्ण सीझन पलोमाने प्रत्येकावर खूप मेहनत घेतली होती. माईंड मॅपिंग, वेगवेगळे एक्सरसायझेस, फोकस वाढण्यासाठीच्या वेगवेगळ्या टेक्निक्स... आम्ही खूप काही करत होतो, जोडीला फिजिकल ट्रेनर्स होतेच. गेले दोन महिने आम्ही दोघेही दिवसाचे दहा बारा तास टीमबरोबर काम करत होतो आणि घरी गेल्यावर काहीतरी खाऊन मेल्यासारखे झोपत होतो. अगदी 'करो या मरो' सिच्युएशन!

क्वालिफायर वनमध्ये मला अजिबात सूर गवसला नाही, फक्त दोन रन्सवर माझ्या बेल्स उडाल्या आणि पुढच्यांनी फक्त एकशेचार रन्समध्ये कारभार आटपला. तरीही बोलर्सनी अक्षरशः जादू करून सूपर किंग्जना सोळाव्या ओव्हरमध्येच ऑल आऊट केलं आणि आम्ही अवघ्या सहा रन्सने जिंकलो. अनबिलीव्हेबल!! आता आम्ही आमच्यापेक्षाही डार्क हॉर्स म्हणून सेकंड क्वालिफायरमधून फायनलला आलेल्या नाईट रायडर्सना भिडणार होतो.

आमची टीम तरुण आहे, अनुभव कमी आहे पण तितकीच मजबूत आहे आणि आता आम्हाला समजून, आमच्यावर विश्वास दाखवून, लीड करणाऱ्या कोचच्या हाताखाली आहे. घोरपडेच्या हकालपट्टीनंतर सगळी टीम एकमेकांच्या जास्त जवळ आली. नवा कोचिंग स्टाफ, जास्त वर्कआऊट आणि नवी सायकॉलॉजीस्ट ह्या सगळ्याचा खूप फायदा झाला. पलोमाच्या माईंड एक्सरसायझेसची आम्हा सगळ्यांनाच तिच्या कल्पनेपेक्षाही जास्त मदत झाली. अँड, वी हॅव मेड इट!

हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट सीझन आहे. कदाचित हा शेवटचा असू शकतो हे माहीत असल्याने असेल. कदाचित मी ज्यांचा खरंच आदर करतो असा कोच मिळाल्यामुळे असेल. आणि खरं सांगायचं तर, माझं जिच्यावर प्रेम आहे ती मुलगी आता माझ्याबरोबर आहे, हे असेल.  माझ्या आयुष्यातली एवढी वर्षे मी पलोमाशिवाय घालवली होती. एव्हरीथिंग'ज जस्ट बेटर नाव.

"थॅन्क्स फॉर लीडिंग अस हिअर, मॅन" अश्विन नायर म्हणाला. त्याच्या शब्दात थोडा ओलावा जाणवत होता. ऑल राऊंडर होता, आम्ही माझ्यानंतर कॅप्टन म्हणून इतके दिवस त्यालाच तयार करत होतो पण बराच काळ घोरपडेच्या लावालावीमुळे आमच्यात दुरावा आला होता. थोडी गरमागरमीही झाली होती, पण आता आमच्यातले मळभ हटून आभाळ स्वच्छ झाले होते.

"इट्स नॉट लाईक दॅट, ब्रो! 'वी' डीड धिस. एव्हरी सिंगल वन ऑफ अस. अब चलो, उनकी बजाते है!" मी हसून त्याला फीस्ट बंप देत म्हणालो.

"यू रेडी?" वेन्डीने माझ्या खांद्यावर थोपटत विचारलं. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. नक्की बीपी वाढलं असणार.

"रिलॅक्स मॅन.. सब कंट्रोल मे है. जो हार्ड वर्क किया, वो अभी एन्जॉय करना हैं. तुमने हमे यहाँ तक आने मे हेल्प की है, अभी एन्जॉय करो." मी त्याच्या पाठीवर थोपटत म्हणालो. "अबे, कितना स्ट्रेस लोगे यार!" जस्सी डोकं खाजवत म्हणाला. "लास्ट मॅच की बात सुनो, अपने सब विकेट गिर गये तो लास्ट मे पांडेजी का नंबर आया. वो फील्डपर गया और इधर उसकी मम्मीजी का कॉल आया. वे पूछती है, अंशू है? मैने बोला, 'आंटीजी वो तो जस्ट फील्ड पर गया'.. तो कहती है, 'ठीक है बेटा मैं बाद में कॉल करती हू.' मैने कहा, 'अरे रुकीये आंटी, वो तो अभी दो मिनिटमे वापस आ जाएगा!!" आणि  त्याच्याबरोबर सगळेच जोरजोरात हसायला लागले. ठरलेली वेळ होताच मी टॉससाठी बाहेर फील्डवर आलो.

डी वाय पाटील स्टेडियमच्या हाऊसफुल्ल झालेल्या स्टँडसमधून जोरदार 'दुनिया हिला देंगे' आणि प्रत्यूत्तर म्हणून 'कोरबो, लोरबो' ऐकू येत होतं. "ना जीतबो!" मी मनात म्हणालो. निळे, जांभळे टीशर्ट डोळ्यात भरत होते. लोक दोन्ही टीमचे झेंडे फडकवत नाचत होते. एका सुरात इंडियन्स, इंडियन्सचा घोष ऐकू येत होता. 

फील्डवर ताज्या कापलेल्या गवताचा रानवट गंध नाकात शिरत होता. मी डोळ्यावर हात घेऊन आकाशात नजर टाकली. निरभ्र निळे आकाश आणि डोळ्यावर येणारे सूर्यकिरण. समोरचा समरss समरss ओरडत आवाजाच्या लहरी उठवणारा जनसमुदाय. कदाचित हे सगळं शेवटचं. हेच खूप मिस करेन मी.

अंपायरनी मला आणि दुसऱ्या कॅप्टनला समोर उभं केलं. टॉस झाला आणि आम्ही हरलो. त्यांनी बॅटिंग घेतली. अर्थात! हे स्टेडियम बॅटिंग पॅराडाईज आहे. पोटातला टेन्शनचा गोळा अजून थोडा मोठा झाला. मी परत जाऊन सगळ्यांना थोडं चीअरअप केलं आणि एकेक करून सगळे फील्डवर आलो. इम्बाने जाऊन बॉल सिलेक्ट केला. फिल्डर्सनी आपापल्या पोझिशन्स घेतल्या आणि मॅच सुरू झाली.

सलामीला कीथ पीटरसन आणि रोहन शर्मा होते. दोघांनी मिळून आमच्या बोलर्सना पार धूळ चारली. चौकार, षटकारांची बरसात करत कीथने सहज सेंच्यूरी केली. रोह्यापण साठवर पोचला. शेवटी पांडेच्या फास्ट बॉलने काम केलं आणि कीथचा स्ट्रेट ड्राईव्ह सरळ अश्विनच्या हातात सापडला. पुढच्या विकेट्स तश्या लवकर पडल्या पण तरीही भरपूरच स्कोर झाला. 201/8.

ब्रेकमध्ये कोच आणि पलोमाने हडल घेतली. पुन्हा एकदा गेम प्लॅन डिस्कस केला. आज मी ओपनिंग ऐवजी मिडलला जाणार होतो. ओपनिंग जाडू आणि साई करणार होते. ते तयार होऊन बाहेर गेले. पलोमा माझ्या खांद्यावर थोपटून पुन्हा बॉक्समध्ये गेली. तिने ब्लॅक स्किनी जीन्सवर इंडियन्सची जर्सी टकइन करून घातली होती. टीम कलर्स! आता तीसुद्धा आमच्या फॅमिलीचा भाग होती! फायनल बघायला माझे आई-पप्पा आणि पलोमाचे पप्पा जाई-जुईसकट आले होते. दिदीचं बाळ फक्त वीस दिवसांचं असल्यामुळे ती आणि अजय घरीच थांबले होते.

मॅच सुरू झाली. जाडूने पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला, तूफान जल्लोष झाला आणि पुढच्याच बॉलने स्टंप उडवत त्याचं काम तमाम केलं. सगळीकडे प्रचंड शांतता पसरली. पुढे शॉन होता, तो टिकेल असं वाटलं होतं पण तोही घाई करत बत्तीसवर रनआऊट झाला. मी ग्लव आणि पॅडस् बांधून तयार होतो. एका हाताने हेल्मेट घातलं आणि फील्डवर उतरलो. माझ्यासाठी फिल्डींग थोडी जवळ आणून टाईट केली होती. डोळे मिटले, डोक्यात कुठेतरी शहनाईवर मियां की तोडी वाजायला लागला आणि डोळे उघडून मी फिल्डिंग प्लेसमेंट तपासली. हा पलोमाने शिकवलेला मल्टी सेन्सरी वर्कआऊट होता. हव्या त्या जागा सापडल्यावर मी हसलो. डोकं शांत झालं आणि मी बॉलवर लक्ष केंद्रित केलं. अग्रेशन कमी करून हळू पण स्टेडी रन करत राहिलो. पन्नास क्रॉस झाल्यावर हळूहळू बॉल उचलायला सुरुवात केली आणि चौकार, षटकार गोळा होऊ लागले. साईपण चांगली साथ देत होता. माझी सेंच्यूरी आणि त्याच्या साठ रन्स एकदम झाल्या. आता 19 ओव्हर्स आणि टोटल 198 होती.

पुढच्या बॉलवर फोर मारायच्या नादात साई कॅच देऊन बसला आणि जस्सी फील्डवर आला. मी त्याला थोडी स्ट्रॅटेजी समजावून सांगितली. त्याने एक रन काढून मला स्ट्राइक दिला. पण माझ्यासमोर फिल्डर्सनी अजून कोंडी केली होती, त्यामुळे एकच रन घेता आली. पुढचा बॉल जस्सीने डड घालवला. जिंकण्यासाठी आता दोन बॉल आणि तीन रन. माझे कान गरम झाले. हातातोंडाशी आलेला घास निसटत होता. समोर जस्सी डोळे मिटून काहीतरी पुटपुटत होता. पुढची गुगली होती. कमॉन.. कमॉन.. कमॉन...  त्याने एक रन घेतली आणि मी पुन्हा स्ट्राइकवर आलो.

मी VIP बॉक्सकडे पाहिलं. सगळे सुम्म गपचूप बसले होते. पलोमाने माझ्याकडे बघून डोळे काही सेकंद मिटून उघडले. मी मान हलवली. समोर कलिंगा त्याचे रंगवलेले कर्ली केस उडवत आला आणि त्याने गुगली टाकली, माझं त्याच्या हातावर व्यवस्थित लक्ष होतं. बॉल नक्की ऑफ स्टंपकडे येत होता. मी उजवा पाय पुढे रोवला आणि मनगट वळवून बॉल जोरकस कव्हर ड्राईव्हमध्ये ठोकला. फील्डर मागे पळेपर्यंत बॉल बाऊंड्रीपार गेला. "अँsss ड इट्स अ फोरsss" अंपायरने उजवा हात समोर स्वीप केला आणि मी हेल्मेट काढून बॅट उंचावली. जस्सीने धावत येऊन मला मिठी मारली आणि अख्खी टीमच येऊन ग्रुप हग सुरू झाला. आकाशात फटाके उडत होते. म्युझिक सुरू झालं, लोक नाचू लागले. बॉक्समध्ये जाई-जुई नाचत होत्या, पलो उभी राहून हसत होती.

सेरेमनी सुरू झाली. भलीमोठी विनिंग ट्रॉफी स्वीकारताना माझ्या डोळ्यात थोडं पाणीच आलं. ग्लिटर आणि कन्फेटी बॉम्ब उधळले गेले. फोटोसेशन झालं. सगळ्यांचे कुटुंबीय आले, त्यांच्या ओळखी, ट्रॉफीबरोबर फोटोज झाले. आमच्या डोक्यावर मोठमोठे फ्लड लाइट्स होते. पलोमा माझ्याजवळ असताना जस्सीने माझ्या हातात बॉक्स सरकवत, मला इशारा केला आणि सगळे लोक आमच्यापासून दूर झाले. जाई जुई डोळे विस्फारून काय चाललंय ते बघत होत्या. आई, पप्पांचे चेहरे उजळले होते.

"लेडीज अँड जेंटलमेन, लेट्स वेलकम द लव्हली लेडी ऑन द फील्ड.." कोणीतरी माईकवर म्हणालं. पब्लिक काही न कळून टाळ्या वाजवू लागलं. पलोमा गोंधळून माझ्याकडे बघत राहिली. मी फील्डवर गवतात तिच्यासमोर एक गुढघा टेकून खाली बसलो आणि पब्लिक वेडं होऊन कल्ला करू लागलं. टाळ्या-शिट्ट्यांचा गजरात मी बोलायला सुरुवात केली.  "आय लव्ह यू, पलोमा फुलसुंदर. चौथीत फुटबॉल प्रॅक्टिसमध्ये तू रोज माझ्यासाठी एक्स्ट्रा लिमलेटच्या गोळ्या लपवून आणायचीस तेव्हापासूनच. तू आठवीत डिस्ट्रिक्टसाठी सिलेक्ट झालीस तेव्हा आणि बारावीत मला पहिला किस केलास तेव्हा आणि नंतर कायमच. विल यू मेक मी द हॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड अँड मॅरी मी? लेट्स मेक लॉटस् ऑफ स्पोर्टी बेबीज!!" मी हसत खिशातून रिंग बाहेर काढली.

"हे, हमने बेबीज वाला पार्ट प्रॅक्टिस नहीं किया था!" मागून जस्सी ओरडला आणि बाकी सगळे खिदळत हसले. माझा माईक बंद होता त्यामुळे पब्लिकला आम्ही काय बोलतोय ते ऐकू येत नव्हते. तरीही सगळे श्वास रोखून, शांतपणे बघत होते.

पलोमा तोंडावर हात घेऊन हसत होती. "तुला कुठलीही गोष्ट गुपचूप नाही करता येत ना, समर सावंत!!" तिने जवळ येऊन माझ्या दोन्ही खांद्यावर हात ठेवले. "हे विचारायची काही गरज आहे का? येस! इट्स ऑल्वेज बीन येस!!"

मी तिचा हात धरून बोटात रिंग घातली आणि जोरात म्युझिक सुरू झालं. पब्लिक मॅडसारखं नाचायला लागलं. मी तिला मिठी मारुन वर उचलून परत खाली ठेवली आणि तिच्या कपाळावर ओठ टेकले. "थॅन्क्स फॉर सेइंग येस."

तिने हसून गालावर आलेले केस बाजूला सारले. तिचे डोळे डबडबले होते. "थॅन्क्स फॉर वेटींग फॉर मी."

आणि लगेच सगळे आमच्याभोवती गोळा होऊन अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. जाई शिट्ट्या वाजवत होती. आई, पप्पा सगळे खुषीत हसत होते. वेंडीने हसत येऊन "congrats गाईज, मैं तुम्हारा फर्स्ट विटनेस हूं" म्हणत दोघांशी हात मिळवले. जुईने येऊन आम्हाला एकत्र मिठी मारली. पुन्हा आकाशात फटाके उधळले. जाई दिदीला व्हिडिओ कॉलवर सगळं दाखवून, लाईव्ह रिपोर्टिंग करत होती. सगळी टीम हसत, नाचत आम्हाला चिडवत होती. सगळ्या केऑसमध्ये मी पलोमाकडे पाहिलं. तिचे मधाळ डोळे माझ्यात मिसळले आणि मी श्वास सोडून हसलो.

माझा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य.

माझं आयुष्य, घर आणि प्रेम सगळं मला परत मिळालं होतं.

कायमचं.

समाप्त.

कोल्हापूरची लव्ह स्टोरी लिहायची कल्पना एक गाणं कानावर पडल्यामुळे सुचली. गाणं लोकल टाइमपासच आहे पण त्यात जो एक गावठी गुलाबाचा फ्रेशनेस, गोडवा आहे तो मला आवडला. म्हणून हे समर पलोमाचे थीम साँग!!

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle