या दु ... कानात उ

बॅंकेत काम होतं म्हणून भर पावसात चाकंतोड करत दीपक टॉकीजजवळच्या बॅंकेत गेले होते. नेहमीप्रमाणे एका दगडात अनेक पक्षी मारायचे म्हणून त्या त्या एरीयातली दोन्-चार कामं असतातच बरोबर. म्हणून कालच आणलेल्या चिनी बनावटीच्या टेबललँपच्या प्लगला अ‍ॅटॅचमेंट, बॅटरीवर चालणार्‍या मेणबत्त्यांकरता छोट्या बॅटर्‍या असे इलेक्ट्रीकच्या दुकानाशी संबधित कामं होती. बँकेशेजारीच एक इलेक्ट्रीक आणि हार्डवेअरचे दुकान दिसले. हे कॉम्बिनेशनमध्ये दुकान का बरं चालवत असतील? हा मला नेहमीच पडणारा सनातन प्रश्न आहे. तो पुन्हा डोक्यात पिंगा घालायला लागला. इलेक्ट्रीक आणि हार्डवेअर, सोप अँड ऑईल डेपो, त्या वरताण असं सोप, ऑईल अ‍ॅंड टी डेपो .... हे असंच विकायचं हे कोण आणि कोणत्या बेसिसवर ठरवतं देव जाणे.

रस्त्यावर एका ओळीत ढीगाने असणारी ज्वेलर्सची दुकानंही माझ्या अचंब्याचे शिकारी ठरतात. कधीही कोणीही गिर्‍हाईकं न दिसणारी, तुरळक चांदीचे दागिने ठेवलेली ही दुकानं केवळ गरीब लोकांना छोट्या रकमांची कर्ज देऊन चालतात? असा कितीसा धंदा होणार? आणि त्यांच्या चेहर्‍यावर जग विकत घेतल्याचा माज दिसण्यामागचं कारण काय असू शकतं?

मान्य आहे, प्रत्येकाची गरज वेगळी असते आणि कोणीतरी त्या गोष्टी विकल्याच पाहिजेत. पण तरीही केवळ नाड्या विकणारे, केवळ लिंबं विकणारे, खुर्च्यांच्या पायांचे आवाज होऊ नयेत म्हणून त्यांना लागणारे रबरी बफर विकणारे अशा अतिफोकस्ड वस्तु विकणार्‍या लोकांबद्दल मला नेहमीच महदाश्चर्य वाटत आलंय.

शिवाय जनरल स्टोरवाले किंवा वाणी त्यांच्या नावाच्या पाटीखाली पेंट करून काही ठळक वस्तु लिहितात. उदा. महावीर जनरल स्टोर आणि खाली आमच्याकडे वह्या, रंगित कागद, फेविकॉल मिळतील. तर या नेमक्या तीनच गोष्टी ते काय लॉजिक लावून निवडत असतील ही भाबडी शंका मला नेहमीच सतावते. वाणीही इथे तेल, शेंगदाणे, चहा, गूळ मिळेल असं लिहितात ते का? का? हे सगळं त्या दुकानात मिळतं / मिळणारच हे गिर्‍हाईकाला माहित असतं की. मग? बरं दुकानातल्या असंख्य वस्तुंतून याच ठळकपणे लिहिण्याचं कारणं. बरं या खडूने वेगळ्या पाटीवर लिहिलेल्या नसतात. ते जिन्नस आणखीन वेगळे. या गोष्टी पेंटने कायमच्या अमर केलेल्या असतात.

..... वर उल्लेख केलेल्या इ आणि हा स्टोर्समध्ये माझं अर्धंच काम झालं. दिव्यांकरता छोट्या बॅटर्‍या त्यांच्याकडे नव्हत्या. बरोबर, दोन वेगवेगळ्या क्षेत्रातली प्रॉडक्टस विकताना कुठेतरी मर्यादा येणारच की. तर, मी त्यांनाच विचारलं की इथे आसपास या बॅटर्‍या कुठे मिळतील? तर त्यांनी सांगितलं की असंच पुढे गेल्यावर तीन दुकानांनंतर हरीष कटलरी नावाचं दुकान लागेल. तिथे मिळतील. माझा कानावर विश्वासच बसेना. कटलरीच्या दुकानात बॅटर्‍या? तरीही उत्सुकतेने गेले. तर तिथे गेल्यावर मला जो आश्चर्याचा भलामोठ्ठा धक्का बसलाय म्हणता! त्या अजब दुकानात काय नव्हतं ते विचारा.

बॅटर्‍या असणार असं गृहित धरूयात. तर त्या जोडीला विविध प्रकारचे बॉल्स (पिवळ्या स्मायलीवाल्या स्ट्रेसबॉल्ससकट), फेविकॉल, वह्यांना कव्हरं घालण्याचे ब्राऊन पेपर्स, इअरबड्स, वरती मोठमोठ्या रीळांना गुंडाळलेले प्लॅस्टीकच्या जाड दोर्‍या, स्टीकर्स, गोट्या, बबलगम, डेकोरेशनची रंगिबेरंगी फुलं, झुरळाच्या गोळ्या, शाळा नुकत्याच सुरू झाल्यात म्हणून वह्या (या सिझनल होत्या कारण जमिनीवरच ठेवल्या होत्या). अक्षरश: काहीही होतं. कटलरी सोडून सर्व काही. कोणी मागत आलाच तर गरमागरम बटाटेवडेही मिळतील अस मला वाटायला लागलं. त्यातून एकच एक म्हातारा सगळ्यांना टॅकल करत होता. माझे दिवे बघून 'कोणत्या प्रकारच्या बॅटर्‍या लागतील ते उघडून बघावं लागेल. थोडं थांबा." म्हणाला. पण मला वेळ नव्हता म्हणून निघून आले.

घरी आले तर थोड्यावेळात बेल वाजवून कोणी एक स्त्रीयांकरता काही प्रॉडक्ट्स विकायला आलेली बाई. आमच्या बिल्डींगमध्ये सेल्समन किंवा बाया अजिबात बंद आहेत. त्यामुळे तिला पाहून आश्चर्यचकीत होऊन मी तिलाच यामागचं रहस्य विचारलं. तर तिने सांगितलं की ती पोलिओचे डोसही घरोघर जाऊन देते. मग त्यासरशी या गोष्टीही विकते. शिवाय हेडमसाज, फूटमसाज ही करून देते. या तिन्ही गोष्टी एकत्र केल्यामुळे प्रत्येक घरात एकतरी गोष्ट अपील होते. शिवाय पोलिओमुळे आमच्या बंदिस्त सोसायटीचे दारही तिच्याकरता उघडे होते. एकीकडे तिचे कौतुकच वाटले.

म्हणजे एकाचवेळी अतिमर्यादित वस्तु विकणारी दुकानं आहेत तशीच अति डायव्हर्सीफाईड दुकानंही गुण्यागोविंदानं नांदतायत की! सगळे आलबेल आहेत. आपापल्या कामावर निष्ठा ठेऊन आहेत. हेही नसे थोडके.

मात्र या सगळ्या सगळ्या दुकानांवर कडी असं 'परकर आणि ओले काजू' विकणारं दुकान मला पुण्यात दिसलं होतं ते मी जन्मात विसरणार नाही. :)

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle