परवा ६/६ म्हणजे ६ जून हा जागतिक इकेबाना दिवस आहे. म्हणून या दिवसाचं औचित्य साधून इथे हा लेख आणत्ये. माझ्या अंगात अजिबात कलाकुसर नाही. त्यामुळे माझ्या फोटोग्राफीच्या “कौशल्या”कडे दुर्लक्ष करा :) बरेचसे फोटो खूप जुने आहेत.
काहीतरी नवीन शिकायचं म्हणून मला वाटतं २०१२ च्या सुमारास इकेबाना शिकायचं ठरवलं. त्याआधी जपानमधे इतकी वर्षं घालवूनही, भाषा येत असूनही आणि झाडा-फुलांची आवड असूनही कधी इकेबानाविषयी फारशी माहिती मिळवायचा प्रयत्न केला नव्हता. योगायोगानी ४-५ समविचारी मराठी मुलींचा (हो हो... तेंव्हा आम्ही “मुली”च होतो) ग्रूप जमला. ओळखीतून ताकायामा नावाच्या जपानी शिक्षिका मिळाल्या आणि शिकण्यासाठी community हॉलचीही सोय झाली.
जपानमधे प्रत्यक्ष माणसाकडून काही शिकणं ही तशी महाग गोष्ट असते. त्यातून दरवेळी होणारा फुलांचा खर्चही तसा कमी नव्हता. पण ताकायामा बाईंच्या ओळखीतून थोड्या माफक दरात फुलं मिळण्याची सोय झाली. त्या स्वतःच क्लासला येताना त्या ठराविक दुकानातून आधी ऑर्डर देऊन फुलं घेऊन यायला लागल्या. रचना शिकण्यासाठी लागणार्या अनेक प्रकारच्या फुलदाण्याही आमच्याकडे नव्हत्या. बाईंनी त्यांच्या घरच्या अफाट संग्रहातल्या बेसिक रचनांसाठी लागणार्या प्रत्येकी २-२ फुलदाण्या आम्हाला क्लाससाठी वापरायला दिल्या.
बेसिक पुस्तकात २ लेवल्स मिळून ४० धडे आणि त्यानंतरच्या पुस्तकात अजून ४० धडे होते. एका वेळी एकच रचना शिकलो तर या गतीनी आम्ही पुस्तकातल्या सगळ्या शिकणार कधी, असाही विचार एकीने बोलून दाखवला. मग तिनी तिचं वाटाघाटीचं कौशल्य पणाला लावलं आणि बाईंनी आम्हाला एका दिवशी दोन रचना शिकवण्याचं कबूल केलं. (हे खरं तर जपानी शिक्षकांनी कबूल करणं तसं दुर्मिळच.) पुष्पपात्र/फुलदाणी जरी बाईंनी दिलेली असली तरी फुलं घरी नेण्यासाठीची खास पिशवी, फुलं/फांद्या कापायला खास कात्री, तारा, केनझान - म्हणजे फूलं खोचण्यासाठी वापरला जाणारा काटेरी साचा आणि पुस्तकं हे विकत घेतलं. अशा रितीनी माझं इकेबानाचं पहिलं शिक्षण सुरु झालं.

ताकायामा बाई अजून एका ठिकाणी community hall मधे शिकवत होत्या. तिथे येणार्या सगळ्या जणी पन्नाशी/साठीच्या पुढच्या होत्या. बाईंनी सांगितलं की या क्लासला येणार्या सर्वजणी जवळजवळ २५-३० वर्षं इकेबानाचा क्लास करतायत. हे ऐकून आम्ही सगळ्याजणी हक्काबक्का!! त्या महिन्यातून तीन मंगळवार जमतात त्यामुळे हळूहळू गतीनी का होईना, २-३ वर्षात व्हायला हवं शिक्षण. मग ह्या सगळ्याजणी करतात तरी काय इतकी वर्ष? हा प्रश्न सहाजिकच आम्हाला पडला.
कालांतरानी आम्ही करत असलेला क्लास काही कारणांनी बंद झाला. म्हणून ताकायामा बाईंच्या त्या दुसर्या क्लासमधे इतर जपानी बायकांबरोबर जाऊन मी इकेबाना शिकत राहिले. तिथे अनेक वर्ष या सर्वजणी जमत होत्या त्यामुळे फुलदाण्यांच अफाट collection होतं. माझी अभ्यासक्रमाची पुस्तकं संपल्यावर पुढे सरावासाठीही जाऊ लागले. आणि इतकी वर्षं या सगळ्याजणी मनोभावे महिन्यातून ३ दिवस येऊन हा क्लास का करत राहिल्या असतील? हा पडलेला प्रश्न यथावकाश सुटला. कसा? ते येईलच ओघानी.
तत्पूर्वी बघूया इकेबाना म्हणजे काय?
जपानी भाषेत ‘इकेरु’ या क्रियापदाचा अर्थ आहे जिवंत ठेवणे, टिकवणे किंवा पुनर्जीवन देणे. हाना म्हणजे फूल. इके(रु) + हाना एकत्र केलं की शब्द होतो इकेबाना. (जपानी भाषेत 'हा' हे मुळाक्षर कुठल्या शब्दाच्या जोडीने आले की त्या ‘हा’ चा ‘बा’ किंवा ‘पा’ होतो. म्हणून इके बरोबर हाना आलं की ते बाना होतं.) त्यामुळे "इकेबाना" ह्या जपानी शब्दाचा मराठी अर्थ जरी पुष्परचनाशास्त्र असा भक्कम वाटणारा असला तरी पुष्परचनेतून निसर्गाची प्रतिकृती जिवंत ठेवणे हा त्याचा अजून एक साधा अर्थ.
"इके-नो-बो" हे इकेबानाचं सर्वात जुनं घराणं समजलं जातं. क्योतो मधल्या रोक्काकुदो देवळातल्या तळ्याजवळ रहाणारा एक धर्मगुरु बुद्धाच्या पायाशी पारंपरिक रितीने फुलं वाहण्याऐवजी एखाद्या भांड्यात विविध पुष्परचना करुन बुद्धाला समर्पित करत असे. आसपासच्या इतर धर्मगुरुंनाही ही कल्पना आवडली आणि त्यांनी देखील अश्या पुष्परचना शिकण्यास सुरुवात केली. इकेनोबो पुष्परचनेविषयी त्या काळात अनेक कविता, लेख लिहिले गेले. अर्थात ही इतपत माहिती आपल्याला गुगलही देतंच.
पंधराव्या शतकापर्यंत इकेबानाच्या रचनेत अनेक बदल झाले. आपल्याकडच्या गायनाच्या/नृत्याच्या घराण्यांसारखीच इकेबानामधे देखील हळूहळू विविध शाळा/घराणी आली. मग नियम पक्के केले गेले. त्याची पुस्तकं तयार झाली. सोळाव्या शतकात इकेबानाचं धार्मिक महत्व कमी होऊन त्याला सुशोभिकरणाचं रुप आलं. इकेबाना ही कला सर्वसामान्यांपर्यंत पोचली आणि जपानी घराघरांमधे फक्त पारंपरिक सणांनाच नाही तर इकेबाना रोजच्या आयुष्यातला अपरिहार्य भाग बनून गेले. माझ्या आई/आजीच्या काळात (आणि काही प्रमाणात माझ्याही शालेय जीवनात) जसं शाळेत स्वयंपाकाचं तंत्र, विणकाम, शिवणकाम इत्यादी शिक्षण अनिवार्य असायचं, तसंच जपानमधे प्रत्येक जपानी मुलीला शालेय शिक्षणाच्या जोडीला इकेबाना शिकणं अनिवार्य होतं.
इकेबानाच्या अनेक शाळा/घराणी आहेत. प्रत्येक घराण्याची पुष्परचनेची मूळ संकल्पना साधारण सारखीच आहे. पण प्रत्येकाने स्वतःचं वेगळेपणही जपलं आहे. मी ज्या पद्धतीच्या इकेबानाचा अभ्यास करते ती पद्धत आहे "सोगेत्सु" पद्धत. सोगेत्सु पद्धतीचा किंवा इतर कुठल्या पद्धतीचा अभ्यास करायचा, हे काही मी ठरवलं नव्हतं. ताकायामा बाई सोगेत्सु पद्धत शिकवतात म्हणून आम्ही ती पद्धत शिकू लागलो.
तेशिगाहारा सोफु या गृहस्थांनी एप्रिल १९२७ मधे सोगेत्सु स्कूलची स्थापना केली. (म्हणजे आता त्याला तब्बल १०० वर्षं होतील!) तेशिगाहारा यांच्या वडलांनी विविध प्रकारच्या इकेबानाचं शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे सहाजिकच तेशिगाहारा यांनी सुरुवातीचे इकेबानाचे धडे वडलांकडून घेतले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की पारंपरिक पद्धतीच्या, साचेबद्ध इकेबानामधे आपण आपल्याला हवं तितकं मोकळेपणानी व्यक्त होऊ शकत नाही. फारच नियमात बांधलं गेल्यामुळे सगळ्या रचनांमधे तोचतोचपणा दिसतो. त्यांच्या मते इकेबानाचं साधं तत्व असावं. कोणालाही, कधीही, कुठेही आणि कोणतेही साधन वापरुन रचना करता यायला हवी. म्हणजेच थोडक्यात अमुकच प्रकारची महागडी फुलं, पानं, फांद्या हव्या, तमुकच प्रकारची फुलदाणी/ पुषपात्र (flower vase) हवी असं काहीही असता कामा नये. आपल्याकडे जे काही उपलब्ध साहित्य असेल, छोटी-मोठी जेवढी जागा असेल त्यात आपल्या अभिव्यक्तीनुसार, वकुबानुसार पुष्परचना करता यायला हवी. एखाद्या गोष्टीतून सौंदर्य निर्माण करायला दरवेळी ते खर्चिक हवं असं नाही. त्यामुळे सोगेत्सू स्कूलची सुरुवात "कोणीही, कुठेही, कधीही आणि काहीही वस्तू वापरुन" या तत्वावर सुरु झाली. अर्थात वरवर पाहता हे तत्व साधं वाटलं तरी तुम्हाला इकेबाना मधून व्यक्त होताना काही ठराविक नियम मात्र पाळावेच लागतात.
पाहूया काय आणि कसे असतात हे नियम -
सर्वात आधी बघायचं ते म्हणजे रचना करण्यासाठी आपल्याकडे कोणत्या प्रकारचं पुषपात्र आहे. म्हणजे पसरट पात्र आहे का उभट फुलदाणी आहे? पसरट पात्रात रचना करायची असेल तर त्याला म्हणायचं “मोरिबाना” आणि उभ्या फुलदाणीत करायची असेल तर “नागेइरे”.


त्यानंतर बघायचं की आपल्याकडे रचना करण्यासाठी साहित्य- म्हणजे कोणत्या प्रकारची फुलं, पानं, फांद्या आहेत. सर्व साहित्याची उंची, जाडी, त्याचा पसारा आणि पुष्पपात्राची खोली या तीन बाबींचा एकत्रित विचार करणं सर्वात महत्वाचे असते. मोरिबाना असो वा नागेइरे, सुरुवातीचा नियम सारखाच.
आपण जर पसरट पुष्पपात्रात इकेबाना (म्हणजेच मोरिबाना) करायचं ठरवलं तर आपल्याला लागतं केनझान - (वर लिहिल्याप्रमाणे फूलं खोचण्यासाठी वापरला जाणारा काटेरी साचा.)

जर उभट फुलदाणी असेल तर केनझान हवंच अशी अट नाही. त्याऐवजी गरज पडल्यास तोल सांभाळायला, एकमेकांना आधार द्यायला फांदीचा थोडा जाड तुकडा खोचून वापरला जातो.
खालच्या आकृतीमधे दाखवल्याप्रमाणे -


पुढचं थोडं वर्णन किंचित कंटाळवाणं वाटू शकेल -
आता रचनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात आधी आपल्या नजरेसमोर केनझान वर एक काल्पनिक अक्ष-axis (उभी सरळ रेघ) आणायचा. मग या अक्षाभोवती एक काल्पनिक विषमभुज त्रिकोण नजरेसमोर आणायचा. आपली रचना आपल्याकडे असलेली फुलंपानंफांद्या त्रिकोणात कशी दिसली पाहिजे ह्याचं एक ढोबळ चित्र डोळ्यासमोर तयार करायचं. यासाठी काल्पनिक अक्षाभोवती आपल्याला तीन मुख्य फांद्या/ फुलं त्या काल्पनिक त्रिकोणात खोचून घ्यायच्या आहेत. पहिली फांदी/फूल ही काल्पनिक अक्षापासून १० ते १५ अंशाच्या कोनात खोचायची. दुसरी फांदी/फूल काल्पनिक अक्षापासून ४५ अंशाच्या कोनात खोचायची. आणि तिसरी फांदी/फूल काल्पनिक अक्षापासून ७५ अंशाच्या कोनात खोचायची. पहिल्या फांदीला नाव आहे "शिन", दुसर्या फांदीला "सोए" आणि तिसरीला नाव आहे "हिकाए". शिन हा आकाशाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणून त्याचे तोंड नेहमी आकाशाकडे असते. पूर्ण रचना ह्या "शिन"भोवती गुंफलेली असायला हवी. त्यानंतर "सोए" असतो मनुष्य. ही फांदी मनुष्यासारखीच नेहमी नम्रतेने झुकलेली असावी. म्हणून सोएची उंची शिनच्या पाऊण पट असायला हवी. आणि तिसरी म्हणजे हिकाए - ही असते पृथ्वी. हिकाएची उंची सोएच्या पाऊण पट असायला हवी. "शिन" असते सृजनशिलता, "हिकाए" असते शिस्त आणि "सोए" म्हणजे सृजनशिलता आणि शिस्त यांच्यातला समन्वय असतो. वर्णन किचकट असलं तरी खालील आकृतीकडे बघून जास्त स्पष्ट होईल.

काल्पनिक अक्ष, कोन आणि अंश दाखवणारी आकृती
फांद्या-फुलांनी शिन, सोए आणि हिकाएचा त्रिकोण तयार झाला की मग उरलेल्या फांद्या किंवा फुलं कमी-अधिक उंचीची कापून त्या त्रिकोणाच्या बाजूंभोवती लावायला सुरुवात करायची. ही झाली आपल्या पुषपरचनेची सर्वात पहिली पायरी.


शिन-सोए-हिकाए भोवती उरलेली फुलं लावायची याचा अर्थ असतील ती सर्व फुलं, फांद्या, पानं वापरुन रचना करायची नाही. तर प्रत्येक फुलाचं, फांदीचं सौंदर्य कसं उठून दिसेल याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. कॅलिग्राफीमधे जशी दोन अक्षरांच्या मधे सोडलेली जागा महत्वाची असते तशीच इकेबाना मधे देखील. दोन फांद्या, फुलांमधे सोडलेली जागा तसंच वापरलेल्या प्रत्येक साहित्याला आपली स्वतःची "स्पेस" देणं हे इकेबानाचं मुख्य तत्व. याचं कारण प्रत्येक फुला-पानाचं आपापलं स्वतंत्र सौंदर्य आहे. सगळी रचना झाल्यावर जशी ते final product म्हणून सुंदर दिसायला हवं तसंच प्रत्येक साहित्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्वही उठून दिसायला हवं. वापरलेल्या साहित्याची रंगसंगती, नैसर्गिक आकार, डौलदार आकर्षक रेषा हे सगळं टिकवून ठेवणं आणि खुलवणं गरजेचं आहे. तेशिगाहारा म्हणतात की "प्रत्येक फूल हे सुंदरच असतं, पण म्हणून त्या फुलांपासून माणसानी निर्माण केलेली प्रत्येक रचना सुंदरच असेल असं नाही". आता हा मुख्य नियम पक्का झाला की मग पुढे जायचं.
त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे आपण इकेबाना "कुठे ठेवण्यासाठी" करतो आहोत -
पारंपरिक जपानी पद्धतीच्या तातामीच्या खोलीत तोकोनोमा मधे ठेवणार असू, तर ती रचना शक्यतो कमीत कमी साहित्य वापरुन, प्रत्येक साहित्यामधे भरपूर जागा सोडून करायला हवी. हेच आधुनिक घरात करताना घरातली रंगसंगती, घरातल्या वस्तूंचा आकार, येणारा प्रकाश आणि मुख्य म्हणजे लहान घरात ती अडचण वाटणार नाही या सगळ्यांचा विचार करुन करायला हवी. तर मोठ्या हॉटेलच्या लॉबी मधे करताना ती लांबूनही स्पष्ट दिसेल पण जवळून बटबटीत दिसणार नाही, ३६० अंशातून नीट दिसेल, three-dimensional असेल हे सगळे मुद्दे विचारात घ्यावे लागतात.
पुढचा मुद्दा म्हणजे आपण आपली रचना कुठून बघणार आहोत?
शहरातली जपानी घरं बरेचदा लहान असतात. इकेबानासाठी मोकळी जागा असेलच असं नाही. त्यावेळी एखाद्या कोनाड्यात किंवा कपाटावर, पुस्तकांच्या खणात जर आपण रचना ठेवणार असू तर सहाजिकच ती आपल्या नजरेच्या/डोळ्यांच्या पातळीपासून वर असेल. मग अशा वेळी फुलाचं तोंड वर छताकडे असेल तर ते फूल आपल्याला नीट दिसणार नाही. मग फूल अशा रितीने खोचायला हवं की ते आपल्याला खालून नीट दिसेल. यात पानांचा खालचा भाग दिसू शकतो. तो स्वच्छ आहे ना हे बघावं लागतं. आणि नजरेच्या पातळीपासून वर जाणार्या रचनेकडे बघून ही आकाशाकडे झेप घेत्ये असा काहीसा भास त्यातून निर्माण झाला तर सोन्याहून पिवळं!
जर आपल्या डोळ्याच्या पातळीच्या खाली, अगदी जमिनीवर देखील रचना ठेवणार असू तर तो विचार करायला हवा. कारण वरुन खाली बघताना आपली फुलदाणी किंवा पात्र आणि वापरलं गेलेलं साहित्य थोडं बुटकं दिसतं. मधे मधे सोडलेली जागा जर नीट नसेल तर ते अगदी स्पष्टपणे दिसून येतं. त्यामुळे अशी रचना करताना सरळ फुलदाणी जमिनीवर ठेवायची आणि खाली बसून रचना करताना मधेमधे उभं राहून सगळे angles कसे दिसतात हे बघायचं.
एरवी आपण पुष्परचना बघताना ती एखाद्या पेंटिंगसारखी समोरुन बघतो. पण कधी रचना एखाद्या शिल्पासारखी ती ३६० अंशातून चहूबाजूंनी दिसण्याची गरज असते. रचनेची कुठलीच बाजू लपून रहाणं शक्य नसतं. अशा वेळी वापरलेल्या साहित्यातलं काही वैगुण्य मागे-पुढे लपवायचं म्हटलं तरी शक्य नसतं. ३६० अंशातून रचना दिसायला हवी याचा अर्थ ती सगळीकडून सारखी दिसायला हवी असा नाही. मग अशी रचना करताना काय करायचं? छोटी रचना असेल तर ती दर ४५ अंशाच्या कोनातून फिरवून बघायची कशी दिसते (मोठी असेल तर आपण त्याभोवती फिरुन दर ४५ अंशाला थांबून ती कशी दिसते हे बघायचं.) प्रत्येक कोनातून बघताना आपल्याला जाणवतं की अरे मगाशी समोरुन बघताना या रचनेचं हे "शिन" होतं पण आता या "शिन" ची भूमिका इथे बदलेली आहे. एखादं फूल या कोनातून बघताना रचनेतली ठळक भूमिका बजावतंय असं वाटत होतं पण इथे ते वेगळ्या भुमिकेत गेलं आहे.
खरं तर एखाद्या घटनेकडे बघण्याचा एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन कसा प्रसंगानुसार किंवा जागेनुसार बदलत जातो, हेच आपण यातून शिकतो, नाही का?
तर... रचना कुठून बघायला करत आहोत हे एकदा ठरलं की त्याप्रमाणे आपल्या फुलांची उंची कमी-अधिक ठेवायला लागते. तसंच रचनेच्या आजूबाजूला मोकळी जागा आहे का इतर सामानाचा अडसर आहे, त्याप्रमाणे फुला-पानांची संख्या आणि पुष्पपात्राचा आकार निवडायचा.
सुरुवातीला काल्पनिक त्रिकोणात आणि लांबी-रुंदीच्या नियमात पुष्परचनेचा अभ्यास केल्यानंतर मात्र विद्यार्थ्यांना "फ्री-स्टाइल" इकेबानाचे दरवाजे खुले होतात.
नियमानुसार पुष्परचना करा अथवा फ्री स्टाइलमधे करा, इकेबाना करण्यात महत्वाचा वाटा असतो तो योग्य असं पुष्पपात्र निवडण्याचा. आपण वापरत असलेल्या फांदीची/फुलांची लांबी ही पुष्पपात्राच्या आकारानुसार ठरते. खोलीचा आकार, फुलांचा आकार-प्रकार आणि ऋतू विचारात घेऊन ही निवड करावी लागते. आपल्या रचनेचा "फोकस" जर फुलांवर, फुलांच्या रचनेवर ठेवायचा असेल तर पुष्पपात्र दुय्यम स्थानावर जायला हवं. म्हणजेच त्याचा रंग फार गडद नसावा, त्याचा आकार, ठेवण ही खूप नजरेत भरणारी नसावी. परंतू जर पुष्पपात्र हेच आपल्या रचनेचं वैशिष्ठ्य असेल, लोकांचं लक्ष त्याकडे वेधून घ्यायचं असेल तर वापरलं जाणारं साहित्य - फांद्या,फुलांना दुय्यम महत्व द्यायला हवं. आपण साडी-ब्लाउज किंवा सलवार-कुडता-ओढणीसाठी गडद आणि सौम्य जोडी निवडतो. किंवा साधी साडी/ड्रेस आणि statement jewellery निवडतो तसंच!

या वरच्या रचनेत मी फिकट हलक्या निळ्या रंगाचं पात्र वापरलं आहे. आणि त्याचा आकार वेगळा असल्यामुळे मला ते जास्त दिसायला हवं आहे. म्हणून फुलापानांची रंगसंगती गडद ठेवली आहे आणि एका कोपर्यात रचना केली आहे जेणेकरुन ते पात्रही नीट दिसेल. ही रचना मोठ्या जागेवर शोभून दिसेल. छोट्या जागेत करायची असेल तर फुलापानांची संख्या निम्म्यानी कमी करावी लागेल.(आता ही जुनी रचना बघताना लक्षात येतं की मी केनझान पूर्ण लपवलं नाहीये. सर्वात छोटं शेंदरी फूल अजून जरा बुटकं करुन मी ते लपवू शकले असते.)


वरच्या रचनेत माझा फोकस फुलापानांच्या रंगसंगतीवर आणि साहित्यावर आहे म्हणून पुष्पपात्र अगदी साधं आहे.

इथे फोकस दोनच रंगांत केलेल्या रचनेचं सौंदर्य दाखवण्यावर आहे म्हणून पुष्पपात्र पुन्हा एकदा साधं.
पुष्पपात्र/फुलदाणी आणि फुलं इत्यादी साहित्य कसं वापरायचं कळल्यावर ऋतूचा विचार करणं देखील आवश्यक ठरतं. जपानमधे चार ठळक ऋतु आहेत. सगळ्या ऋतुंमधे निसर्गाचे विविध अविष्कार बघायला मिळतात. जपानी समाज पूर्वीपासूनच कायावाचामने आपल्या सभोवतालच्या निसर्गाचं कौतुक करतो, त्याविषयी नेहमीच कृतज्ञही असतो. या कृतज्ञतेचं एक प्रतिक म्हणूनही ऋतुनुसार पुष्परचना केल्या जातात.
उदाहरणार्थ - कडाक्याच्या थंडीत फारशी फुलं मिळत नाहीत. त्यात बाहेर बघितल्यावर बरीचशी शुष्क झाडं, करडा रंग आणि भूभागानुसार बर्फाच्या पांढर्या रंगामुळे तयार होणारं उदास वातावरण घालवायला उपलब्ध असलेली हिरवी पानं आणि लाल फुलं वापरुन घरात रचना केल्या जातात.



तर वसंतऋतू मधे अनेक फुलं उपलब्ध असल्यामुळे तेंव्हाची रचना अनेक रंगाची उधळण असणारी असते. उन्हाळ्यातली रचना ही हिरव्या पिवळ्या रंगसंगतीची असेल तर हेमंत ॠतू मधे हिरवाई कमी होऊन पिवळ्या-लाल रंगानी नटणारा निसर्ग तुमच्या रचनेतही दिसायला हवा.





निसर्गाला अनुसरून रचना करण्यावरुन डॅफोडिल्स च्या फुलांचं उदाहरण आठवलं. पूर्वी डॅफोडिल्स ची फुलं फेब्रुवारीच्या मध्याशिवाय यायची नाहीत. फेब्रुवारीत अर्थातच त्या रोपांची उंची कमी असायची आणि मार्च मधे उंच दांड्यांची डॅफोडिल्स ची फुलं इकेबाना साठी वापरायचे. पण आता ग्लोबल वॉर्मिंग मुळे असेल कदाचित पण जानेवारीतच डॅफोडिल्स ची फुलं यायला लागतात. पण जर तुम्ही मार्च महिन्याच्या आधी डॅफोडिल्स वापरुन रचना करत असाल तर निसर्गाच्या नियमानुसार त्या महिन्यात फुलांच्या दांड्यांची उंची कमी असणं अपेक्षित असल्यामुळे रचना करताना अशी रचना करावी की डॅफोडिल्स ची उंची अगदी कमी आणि बाकी फांद्या, फुलं त्यापेक्षा उंच असायला हवी. पण हेच मार्च मधे ही फुलं वापरत असाल तर उंच दांडे वापरावे.
आपल्याकडे भारतात जसं काही विशिष्ठ फुलांचं/झाडांचं नातं हे सणांशी जोडलं गेलेले आहे, प्रत्येक सणांसाठी ऋतूनुसार देवाची फुलं ठरतात तसंच प्रत्येक सणाप्रमाणे आणि ऋतूनुसार जपानमधे इकेबानाचं साहित्य बदलत जाते.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुष्परचना करताना त्यात प्रामुख्याने पाइन, बांबू, प्लम ची फांदी, पिओनी आणि शेवंतीच्या फुलांचा समावेश असतो. पाइन किंवा बांबू हे तारुण्य आणि दिर्घायुष्याचं प्रतिक मानतात कारण ही झाडं सदाहरीत असतात. गुलाब किंवा पिओनी समृद्धीचं प्रतिक असतं तर शेवंती किंवा ऑर्किड हे आनंदाचं प्रतिक आहे. घराच्या प्रवेशद्वारातही पाइनची सजावट असते. चिरतारुण्याचं वरदान देणारी देवता या दिवशी पृथ्वीवर येतात म्हणून त्यांच्या स्वागतासाठी खास पाइन ची सजावट असते.

मार्च महिन्यापासून सुरु होणारा वसंत ऋतु म्हणजे सर्वत्र फुलांची आणि रंगांची उधळण असते. मार्च ३ ला "हिना मात्सुरी - doll festival" हा खास मुलींचा सण. मार्चमधे मुलींसाठी गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या पुष्परचना असतात. ह्यात प्रामुख्यानी पीचच्या अर्धोन्मिलित कळ्या नाजुकपणाचं प्रतीक म्हणून वापरत असले तरी खरं कारण साकुरा, पीच, ट्युलिप्स हीच फुलं तेंव्हा उपलब्ध असतात हे आहे.




मे ५ बालदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुलांसाठी करण्यात येणार्या पुष्परचनेत आइरिस ची फुलं असतात.
आयरिसच्या फुलांना खास महत्व आहे कारण ती फुले शौर्याचं प्रतीक आहेत. ह्या फुलांची लांब पानं तलवारीसारखी दिसतात. पुष्परचना करताना ही फुलं अगदी सरळ मांडली जातील ह्याचं भान ठेवणं आवश्यक असतं. ताठ मानेनी जगणार्या सामुराई सारखी मुलं असावीत, हा त्यामागचा विचार असतो.


आपण पाहिलं की इकेबाना मधे फुलांसोबतच गवत, कळ्या, पानं, फांद्या इत्यादीचा देखील समावेश असतो. पण इतकंच नाही तर फळं, भाज्या आणि कंद वापरुन देखील रचना करता येतात. अशा प्रकारच्या रचनांना "मोरीमोनो" म्हणतात. फळं, भाज्या, कंद-मूळं हे सुबत्तेशी निगडीत असल्यामुळे समृद्धीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ह्या रचना केल्या जातात. एखाद्या ट्रे मधे, ताटलीत किंवा कापडावर ही रचना केली जाते. अर्थात ही रचना करुन आपण फळं भाज्या वगैरे वाया नाही घालवत. तर त्यानिमित्तानी त्यांना प्रेमानी हाताळतो, त्यातली सौंदर्यस्थळ निरखून बघतो आणि निसर्गाच्या आविष्काराचं मनापासून कौतुक करतो.


सुरुवातीला आपण पाहिलं की सोगेत्सु च्या तत्वानुसार आपल्याला इकेबाना करताना कशासाठीही अडून रहावं लागत नाही. त्याची अतिशय रंजक उदाहरणं पाहूया - पहिलं म्हणजे आपल्याकडे केनझान नाहीये पण सुरेख फांद्या-फुलं-पानं आहेत आणि आपल्याला पसरट पात्रातच पुष्परचना करायची आहे (मोरिबाना). केनझान नसलं तरी अडून रहाण्याची गरज नाही. आपण फुलांच्या दांड्यांना अथवा फांद्यांना एकमेकांचा आधार देऊन रचना करु शकतो. इथे आपलं फुलं/फांद्या बॅलंस करण्याचं कौशल्य पणाला लागतं. एखाद्या वेळी हाताशी फुलं, फांद्या आहेत पण पुष्पपात्र नाही किंवा ते ठेवायला देखील पुरेशी जागा नाही. तरी आपलं काहीही अडत नाही. एखाद्या भिंतीवर किंवा कपाटाच्या कड्यांवरही आपण इकेबाना करु शकतो. आणि तिसरं म्हणजे कधीतरी आपल्याला एखादी छान रचना करण्याची इच्छा आहे पण हाताशी काहीही साहित्य उपलब्ध नाही (किंवा असलं तरी ते वापरायचं नाहीये). अशा वेळी चक्क निर्जीव साहित्य म्हणजे कागद, पुठ्ठा, पाणी प्यायचा स्ट्रॉ, तारा, बांगड्या इत्यादी असं अगदी काहीही वापरुन आपण आपल्याला हवी तशी रचना करु शकतो. या झाल्या अपारंपरिक रचना.

केनझान नसताना केलेली रचना. मी केनझान न वापरता केलेल्या रचनेचा फोटो माझ्याकडे नाहीये. त्यामुळे हा जालावरुन घेतला आहे.

कपाटाच्या कडीला अडकवून केलेली पुष्परचना. पुषपात्र असण्याचा अट्टहास नाही.

ही अपारंपरिक रचना सोगेत्सुच्या पुस्तकातून साभार
आता फुलांशिवाय या वस्तू वापरुन उगाचच कशाला इकेबाना इकेबाना खेळायचं? हा प्रश्न पडला तर तो अगदी रास्त आहे :)
पण म्हणून अशा अपारंपरिक रचना करण्यामागे सोगेत्सुचा उद्देश फुलं, पानं, फांद्यांच्या ऐवजी अशा वस्तू वापरण्याला प्रोत्साहन देणं हा नाहीये. तर - फुलापानात सौंदर्य आहे हे सगळ्या जगाला माहित्ये. आपण आपल्या रचनांतून ते वारंवार दाखवतही असतो. आपण निर्जीव गोष्टीत सौंदर्य शोधू शकतो का? एखाद्या गोष्टीत दडलेलं सौंदर्य खुलवू शकतो का? आणि आपल्यातल्या सर्जनशीलतेला किती चालना देऊ शकतो हे बघण्यासाठी आहे. आणि फक्त ठराविक साच्यातली फुलं पानं हाताशी नाहीत म्हणून काही अविष्कार घडला नाही, हे सोगेत्सुला मान्य नाही.
पुस्तकातून शिकताना एक धडा लवकर येऊच नये अशी मी प्रार्थना करत होते तो म्हणजे स्केचिंगचा. या धड्यामधे फ्री स्टाइलची रचना करायची होती आणि फुलपानांची लांबी-रुंदी-रेषा कोणताही नियम पाळायचा नव्हता. फक्त स्वतःला हवी तशी मुक्तछंदातली रचना करायची होती. आणि ती करुन झाली की नंतर त्याचं स्केच काढायचं होतं. पूर्ण रचनेचं एक स्केच आणि त्या रचनेतला आपल्याला आवडलेला किंवा नव्यानी सुंदर दिसलेला भाग (झूम करुन) दुसर्या चित्रात. आता माझ्यासारख्या चित्रकलेतल्या दगडाला हे कसं जमावं बरं?? पण तो धडा पूर्ण झाल्याशिवाय बाई अर्थातच पुढच्या धड्याकडे गेल्या नसत्या. क्लासमधे सगळ्यांसमोर मला माझा "ढ" पणा दाखवायचा नव्हता. पण सुदैवाने बाईंनी क्लासमधे केलेल्या रचनेचं घरी जाऊन चित्र काढायला सांगितलं. आता पुष्परचनेचा आणि स्केच काढायचा खरं म्हणजे काय संबध? याचं कारण असं की सतत फुलंपानं हाताळून आपण त्या सगळ्याचं सौंदर्य गृहितच धरायला लागतो. चित्र काढायच्या निमित्तानी कळ्या, फुलं, काटे, पानं, पानांवरच्या बारीक रेषा, निसर्गानी केलेली रंगसंगती या सगळ्याकडे आपण निरखून बघितलं तर आपल्याला काहीतरी नवीन गवसतं, जे आजवर कधी लक्षात आलं नव्हतं. तुम्ही कसं चित्र रेखाटता हे यात महत्वाचं नाहीच! तुम्ही तुमच्या रचनेकडे कसं बघता हे महत्वाचं. माणसानी आपली कला सर्वांगानी बहरेल याकडे लक्ष दिलं पाहिजे असं तेशिगाहारांचं म्हणणं होतं. मी ज्या काही रेघोट्या मारल्या असतील त्यात माझे बरेच तास गेले, पण झालं चित्र काढून! जे काही काम केलं त्याचा मनापासून आनंद झाला होता हे नक्की. आणि जे चित्र म्हणून तयार झालं असेल ते अर्थातच परिपूर्ण स्केच वगैरे काहीही नव्हतं पण मला त्यात काय गवसलं, हे बाईंपर्यंत पोचवण्यात मी यशस्वी झाले आणि मी तो धडा पूर्ण केल्याचा बाईंचा सहीशिक्का मिळाला. हुश्श!
ज्या व्यक्तीने पुष्परचना केली आहे त्या व्यक्तीचा स्वभाव, त्यावेळची मानसिक स्थिती इत्यादीचं प्रतिबिंब इकेबाना मधे उमटतं असं म्हणतात. स्वयंपाक करताना समजा "रुचिरा" मधे बघून एखादी पाककृती १० जणांनी अगदी तंतोतंत तशीच केली तरी त्या पदार्थाच्या चवीत, रंगरूपात किंचितसा फरक असतोच. मग तो अनुभवामुळे आलेला असेल किंवा पाककृती करणार्याच्या त्या वेळेच्या मनःस्थितीमुळे असेल. इकेबाना मधे पण तेच आहे. शिकवताना सर्व विद्यार्थ्यांना सारखीच सामुग्री दिली गेली तरी एकाचीही कलाकृती दुसर्यासारखी होत नाही. क्लासच्या पहिल्या दिवसापासून आमच्या बाईंनी हीच पद्धत ठेवली होती. क्लासमधल्या व्यक्तीची शिकण्याची level काहीही असो, सोयीसाठी सगळ्यांसाठी अर्थातच एकाच प्रकारचं साहित्य यायचं. बाई आम्हाला सांगायच्या की आधी साहित्याकडे बघून स्वतःच्या रचनेचा विचार करा (पुस्तकात बघून असो किंवा स्वतःच्या मनानी असो), ती रचना प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करा. त्यात कमी अधिक काय करायचं यासाठी त्यांचं मार्गदर्शन सगळ्यात शेवटी असायचं. मग आपापल्या रचनेवर काम करुन झालं की क्लासमधल्या इतरांच्या रचना बघायच्या. सुरुवातीला तर इतरांच्या रचना बघून मला असं वाटायचं की हे असं मला कधी सुचणार? मी कधी या बाळबोध रचनांच्या विचारातून बाहेर येणार? मला शास्त्रीय संगीतातलं फारसं काही कळत नाही पण वर्षानुवर्ष रियाज करणार्या अनुभवी गायकाची एखादी तान, एखादी जागा, एखादी हरकत ही एका शिकत असलेल्या अननुभवी गायकापेक्षा काही वेगळीच असते. तांत्रिक दृष्ट्या त्यात चूक नसली तरी त्या x factor ची कमतरता असते किंवा "वो बात" नसते तसं काहीसं मला वाटायचं. हळूहळू लक्षात यायला लागलं की नेमून दिलेल्या सगळ्या पुस्तकांमधलं, अभ्यासक्रमातलं शिक्षण झालं तरी वर्षानुवर्ष आपल्याच समवयस्क मैत्रिणीला गुरुस्थानी ठेवून या सर्वजणी इकेबानाचा सराव करत राहिल्यात. त्यामुळेच या सर्वांना इतकी वर्षं सतत काही ना काही नवीन हाती लागतच असणार. रचनेतली एखादी सुंदर रेष, रचनेचं silhouette, कधी जमलेला एखादा अचूक angle, कधी आपल्याला काय मांडायचंय ती अचूक अभिव्यक्ती जमणं आणि ते या हृदयीचे त्या हृदयीला अचूक कळणं याचं आकलन व्हायलाच मला अनेक वर्षं गेली. जपानी समाजाचा प्रत्येक गोष्टीत पराकोटीची परिपूर्णता आणण्याचा ध्यास असा सामान्य माणसातही दिसतो. एकमेकींच्या रचना त्रयस्थ नजरेनी बघून त्याचं कौतुक करणं, त्यातल्या एखाद्या सुंदर जागेला दाद देणं, कधीतरी ती जागा आपल्या रचनांमधे आणण्याचा प्रयत्न करत रहाणं हा त्यांचा प्रवास मला खूप काही शिकवून गेला. तेशिगाहारा यांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की - आपण फुलापानातून रचना साकारत नाही, तर आपण त्या-त्या वेळी साकारलेली रचना आपण माणूस म्हणून कसे आहोत हे दाखवते.
काही परंपरा कालपरत्वे नष्ट होतात, तर काही आधुनिक रुप घेतात. मात्र शेकडो वर्षं चालत आलेली इकेबानाची परंपरा आज आधुनिक काळातही आपलीशी का बरं वाटते? मला याचं हळूहळू कळत गेलेलं कारण माझ्या तोकड्या ज्ञानावर सांगायचं तर इकेबानाचा सराव करता करता त्या कामात सफाईदारपणा तर येतोच, पण सततच्या सरावानंतर माणसाला खोलवर कुठेतरी ही जाणीव होत रहाते की या इकेबाना मधल्या शिन, सोए आणि हिकाएच्या मांडणीसारखाच आपण प्रत्येक गोष्टीत समतोल शोधायला हवा. शिन सारखीच आपली सकारात्मकता न सोडता आकाशाकडे उंच झेप घ्यावी तर कधी गरज भासली तर सोए प्रमाणे आपला ताठपणा सोडून किंचित झुकावं. तर कधी हिकाए सारखं आपला सर्व अहंकार सोडून देऊन जी कुठली शक्ती आपण मानत असू त्या शक्तीच्या पायी लीन व्हावं. आकाशात झेप घेताना भूमीवरचे पाय घट्ट रोवलेलेच असावे. थोडं थांबून निसर्गात शताकानुशतके सतत उमलणार्या तरीही क्षणभंगूर असलेल्या या आविष्काराकडे बघावं. निसर्गाकडे एक लय आहे, एक ठेहेराव आहे, साधेपणा आहे, तो अशंतः तरी स्वत:मधे आणण्याचा प्रयत्न करावा.
सोगेत्सुचा अभ्यास केल्यापासून मला माझ्या संस्कृतीतल्या साध्या गोष्टी अधिकाधिक भावायला लागल्या आहेत.
यावरुन आपल्याकडे भारतभर प्रचलित असणारी रांगोळी रेखाटण्याची जुनी परंपरा आठवते. देवघरात देवासमोर किंवा सुरेख सारवलेल्या अंगणात तुळशीसमोर रांगोळी रेखाटताना तर्जनी आणि अंगठ्याच्या चिमटीने रांगोळीची रेघ काढली जाते. यामधे दोन बोटं आणि आपली नजर यातला समन्वय महत्वाचा असतो. घाई-गडबड न करता शांतपणानी करण्याचं हे काम आहे. चिमूटभर रांगोळी बोटात घेऊन, ती रेखाटणार्याच्या कल्पनेतून अल्पावधीत जे सुरेख चित्र तयार होतं, ते तन्मयता असल्याखेरीज होणारच नाही. अगदी हीच तन्मयता लागते इकेबाना करताना. तसंच रांगोळी रेखाटताना ठिपक्यांचीच रचना हवी, लहान हवी, मोठी हवी, पणत्यांनी, खूप रंगांनी सजवायलाच हवी अशी अट कुठे असते? एखादं साधं फूल, स्वस्तिक, गोपद्म, तुळशी वृंदावन रेखाटून एका हळदी-कुंकवाच्या चिमटीने देखील साध्याश्या रांगोळीचं सौंदर्य खुलतंच की! सोगेत्सु इकेबानाही कमीत कमी साहित्यात रचनेचं सौंदर्य खुलवायला शिकवतंच!
कवी केशवसुतांनी त्यांच्या ‘रांगोळी घालताना पाहून’ कवितेच्या शेवटी म्हटलं आहे
साध्याही विषयात आशय कधीं मोठा किती आढळे,
नित्याच्या अवलोकनें जन परी होती पहा आंधळे!
रांगोळी बघुनी इत:पर तरी होणें तयीं शाहणे,
कोंठें स्वर्गसमक्षता प्रगटते हें नेहमीं पाहणें!
साध्या सुरेख कलाकृती बघताना "त्यात काय मोठंसं!?" असं वाटून बरेचदा आपण पुढे निघून जातो. पण क्षणभर थांबून त्याचं भरभरुन कौतुक केलं तर तो साधेपणाही आपल्याला किती आनंद देऊन जातो, हे लक्षात येतं.
एखादी कलाकृती घडवणं आपल्या हातात नसेल पण तन्मयतेनी साकारलेल्या साध्या साध्या छोट्या कलाकृतीतून जिथे समक्ष स्वर्ग प्रगटतो ते सर्व डोळे भरून पहाणं तर आपल्या हातात आहे!
धार्मिक अवडंबर न माजवता "कोणीही-कुठेही-कधीही-कोणत्याही उपलब्ध साहित्यात" हे सोगेत्सुचं साधं तत्व मला इतरही अनेक बाबतीत माझ्या मूळांपर्यंत नेऊन पोचवतं - मग ती बागेतली चार फुलं पानं वेचून, उदबत्ती लावून मांडलेली साधी पूजा असो, फक्त चिमुटभर रांगोळी आणि हळदीकुंकू हातात घेऊन रेखाटलेलं स्वस्तिक असो, टाळ्या वाजवून डोळे मिटून म्हटलेली आरती असो, किंवा फक्त टाळ वाजवून ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ म्हणत वारीत मनापासून घेतलेला भाग असो.
साध्या साध्या सुरेख गोष्टी आयुष्यात नजरेस पडतच असतात. पण त्यांचा आनंद कसा घ्यायचा आणि त्याचं बोट धरुन पुढे कसं जायचं हे मला सोगेत्सु इकेबानानी शिकवलं.
