मागच्या वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी पाडव्यापासून ३० दिवस रोज कोलम काढण्याचे चॅलेंज घेतले होते. अर्थात वहीत. ठिपके जोडण्याची सवय असल्याने अजुन रांगोळी पावडर वापरून कोलम जमत नाहीये.
गेल्या बारा वर्षात युरोप मध्ये बरीच भटकंती झाली. Schengen करारांतर्गत जर्मनीत राहून आजूबाजूचे अनेक देश फिरू शकलो, कारण वेगळा Visa लागत नाही. दोन वर्षांपूर्वी युके मध्ये जाऊन आलो, तेव्हापासून आता भविष्यात अमेरिकेत सुद्धा जाऊ कधीतरी, या विचाराने उचल खाल्ली. तिथल्या काही जागा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेतच, पण मुख्य तो देश अनुभवण्याची इच्छा होती. त्यासोबत बरेच मित्र मैत्रिणी पण तिथे आहेत त्यांची भेट होऊ शकेल असंही वाटायचं. तिथे भारतीय पदार्थ मिळतात, इथल्या पेक्षा जास्त प्रकार आणि चांगले असंही ऐकलं होतं, तेही अनुभवायचं होतं.
विकेंड हाताशी होता तेव्हा घरातल्या झाडांची सोय लावणे, गार्डन मध्ये रोज पाण्याचा टायमर लावून ठेवणे अशी सगळी कामं झाली. प्रवासात सोबत म्हणून ठेपले करून घेतले. कितीही प्लॅन केला तरी शेवटी काहीतरी फ्रिज मध्ये राहतं, ते वाया जाऊ नये म्हणून एका भारतीय मित्राच्या घरी देऊन आलो. सोमवारी सकाळी लवकर उठून, घरातल्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा तपासून, गणपती बाप्पा मोरया म्हणून प्रवास सुरु झाला. विमानप्रवास आता नवीन राहिलेला नाही, पण एवढ्या वर्षात ११ तास एकाच विमानात असा प्रवास कधीही केला नव्हता, तो यावेळी होता. फ्रांकफुर्ट हून थेट Los angeles आणि तिथून Las Vegas ५० मिनिटे असा प्रवास होता.
सकाळी, खरंतर पहाटेच जाग आली आणि खूप भूक लागली होती. तासाभरात ब्रेकफास्ट साठी जाऊ म्हणून सहा वाजण्याची वाट बघितली आणि आवरून ब्रेकफास्ट करायला गेलो. बरं अमेरिकेत बाथरूम मध्ये आंघोळीसाठी fixed shower head आहेत, युरोपात Hand shower आहेत ज्यामुळे केस ओले होण्याची काळजी नसते. मी हे ऐकून होते आणि शॉवर कॅप घेऊन गेले होते पण एकूणच Hand shower प्रकार आंघोळीसाठी किती सोयीचा आहे हे पुन्हा एकदा जाणवलं. बरं हॉटेल वाल्यांनी पण शॉवर कॅप दिली नव्हती. या गोष्टीसाठी अमेरिकेचा एक मार्क कमी केला.
हा अमेरिकेतला तिसरा दिवस होता, आलो तो दिवस वगळला तर हा दुसराच दिवस. अजूनही सकाळी खूप लवकर जाग येत होती, त्यामुळे सहा वाजताच ब्रेकफास्ट करून आलो. पुढच्या हॉटेल मध्ये ब्रेकफास्ट काही वेगळा असेल तर बरं होईल असं ते खाताना सारखं वाटत होतं. मग थोड्या वेळाने आवरून पुन्हा टॅक्सी करून विमानतळावर असणाऱ्या कार Rental area मध्ये पोचलो. तिथे एकाच ठिकाणी दहा वेगवेगळ्या रेंटल कंपनीजची ऑफिसेस होती. प्रत्येक ठिकाणी गर्दी होती, बरेच जण विमान प्रवास करून लगेच गाडी घ्यायला आले होते, आम्ही लांबचा प्रवास असल्या मुळे एक दिवसानंतर आलो होतो. गाडी घेण्याबद्दल या आधीच्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे, ती इथेच देते.