अमेरिकेचा व्हिसा काढला त्याची एक टर्म (१० वर्ष) उलटून व्हिसा रिन्यूही झाला पण जायचा योग काही आला नव्हता. जाईन तेव्हा पानगळीच्या ऋतूत जाईन म्हणजे भरपूर फोटो काढता येतील असा माझा प्लॅन काही प्रत्यक्षात उतरला नव्हता. पण या वर्षी अचानक काही कारणाने ३ आठवड्यांसाठी जायचा योग आला.
दोन-अडीच महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. युट्यूब बघत असताना अचानक ‘जंगल एकोज’ ह्या चॅनलवर ‘किरण पुरंदरे म्हणजेच किका’ यांची मुलाखत दिसली. आधीही त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं व हल्लीच नवरा नागझिऱ्याला जाऊन आला तेव्हा त्याच्याकडूनही त्यात भर पडली. त्यामुळे तो पॅाडकास्ट बघायला लागलो. तो बघितल्यावर मग एकामागून एक त्याचेच पॅाडकास्ट दिसायला लागले. बरेच ऐकलेही. त्यात एक फुलपाखरांवरही होता. ते ऐकताना माझ्या डोक्यात अचानक विचार आला की कुठेही बाहेर गेलो तर फुलपाखरं दिसतात उडताना पण आपण त्यांच्याकडे कधी फार लक्ष दिलं नाही. गच्चीत झाडं आहेत तेव्हा आधीही दिसली आहेत.