सूट - भाग 3

'You can do it Billy! C'mon buddy'. स्विमिंग पूलात अर्धवट पाण्यात उभा राहून तो एका लहानशा 'बिल' ला पाण्यात उडी मारायला सांगत होता.
रोज ह्या वेळेला हे कुटुंब स्विमिंग पूलाचा आनंद घेत दिवस काढत. खिडकीच्या एका बाजूला असलेला हा पूल म्हणजे तिलुसाठी मोठा दिलासा होता. कोणत्याही वेळेला डोकावलं तरी कुणी न कुणी दिसायचंच.
'बिल'च्या आईला या बापलेकांशी काही घेणं देणं नसावं बहुतेक. ती फक्त तोकड्या कपड्यात बाजूला पहुडलेली असायची. मधून मधून हातातलं पुस्तक किंवा डोळ्यांवरचा गॉगल बाजूला करून हसू फेकायची. बिलीचा बाबा आर्जवं करून थकत नव्हता. बिलीला पोहायला शिकवायचा जणू त्याने निर्धारच केला होता. ते एवढंसं गबदूलं बाळदेखिल पाण्यात बिनधास्त उडी मारायचे.
बाळपण किती सुखाचा असतो! किती बिनघोर आईवडिलांच्या जीवावर उड्या मारत असतो आपण.. एक विश्वास असतो मनात की काहीही झालं तरी आईवडील आपल्याला खाली पडू देणार नाहीच. एवढ्यात तिलुची विचारशृंखला तुटली. 'एएए! पडला तो पडला!', तिलु जोरात ओरडली. बिलीने कठड्याच्या बाजूने न पाहता उडी मारली होती. पण तिलूचं ओरडणं ऐकून बिलीचा बाबा सावध झाला आणि त्यानं बाळाला घाईघाईने धरलं. 'Ok? Bill?'. बिलीने दुसर्याच क्षणी बाबाच्या कडेवरून बाहेर पळ काढला आणि पुन्हा पूलात उडी मारायला सज्ज झाला. तिलुला हसायला आलं. ती स्वतःशी हसायला आणि बिलीच्या बाबाने तिच्याकडे पहायला एकच गाठ पडली. त्यानंही हसून पाहीलं आणि तिच्याकडे बघत हात हलवला.
तिलु झटक्यात खिडकीतून बाजूला झाली. नाही म्हटलं तरी तिला घाम फुटला होता आणि धडधडायलाही लागलं.
विनूला फोन करावा का? नको नको, busy असेल तो. भारतात गुडूप झोपली असणार सर्व. काय करावं बरं? तिलु स्वतःशी बडबडत मागं वळून अडखळली.
'You alright?', हाऊसकीपिंगवाली विचारती झाली. ती इतका वेळ बाथरूमच्या आत असल्याचं तिलु विसरून गेली होती. त्या मुलीनं तिला आधार देऊन बसवलं. तिला पाहून विस्फारलेली तिलुची नजर स्थिरावली. हायसं वाटून तिनं हसण्यासारखं केले. एकाच वेळी तिचे झरझर बदललेले भाव पाहून ती मुलगी तिलुकडे रोखून बघायला लागली.
'I am alright' इतक्या वेळाने तिलुने तोंड उघडलं.
'Had lunch?' त्या मुलीनं विचारलं. 'You order here, right?'
'How do you know? ' तिलुने विचारले आणि जीभ चावली.
'तुझ्या रूमच्या बाहेर plates असतात ना, त्यावरून'
कसला बावळट प्रश्न पडतो आपल्याला. तिलु स्वतःवरच चिडली.
'मी लुना'
'अं?'
'माझं नाव लुना. यू इंडियन?'
ते 'are you Indian?' असे हवे. तिलुने मनातल्या मनात तिचं वाक्य दुरूस्त करून घेतलं. लोखंडे मॅडमनी शिकवलेले ग्रामर डोक्यात पक्कं बसलेलं होतं.
'हो. आम्ही indian आहोत. काय नाव सांगितले तुझं?' तिलुने संभ्रमाने विचारले.
'इट्स ल्यूsssना'
इकडे तिलुला तिची लुना आठवून हसायला आलं. तिनं चेहर्यावर दिसु दिलं नाही.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle