सूट - भाग 10 (समाप्त)

तिलुने पर्स check करायला सुरुवात केली.
'काय झालं?', Stan ने काळजीच्या स्वरात विचारलं.
तिलु तशीच चालु पडणार तोच Stan आडवा आला.
'का?'
'पैसे गायब आहेत यातले'
तिलु एक एक शब्द शांत पण जरा चढ्या आवाजात म्हणाली.
तिलुने निघत असताना नेहमीप्रमाणेच ड्रावरमधून नोटा पर्स मध्ये कोंबल्या होत्या. Dennis मध्ये बिलाची रक्कम भरतांना तिला नेहमीची 100 ची नोट दिसली नव्हती. कदाचित तिच्या वेंधळेपणामुळे कुठे राहिली असेल असं आधी वाटलं. पण आता संशय घ्यायला जागा होती.
'ओह नो! विसरला का कुठे?', Stan ने विचारलं.
तिलु तडक रिसेप्शनकडे निघाली तसं तो परत घाईघाईने पुढं झाला.
'तुम्ही complaint तर नाही ना करणार?'
तिलुने उत्तर दिले नाही.
'खरंच चोरी झाली असेल का? पण हे कसं शक्य आहे. लुना तिच्या बरोबर असा व्यवहार नाही करू शकत. ती तर किती आपुलकीने लागायची. हा.. पण बर्याच वेळेला तिचा काम करायचा मुड नसायचा. एकतर तिच्या सोबतच्या मुलीला काम करायला सांगायची नाही तर गप्पा मारत बसायची'
तिलुच्या मनात लुनाची विविध रूपे येऊ लागली. (हो हो, ते जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये दाखवत तसंच Wink )
कामचोर, प्रेमळ, रागावणारी, चिडवणारी, क्वचित हसणारी लुना! तिनं चोरी करावी यावर विश्वास बसत नाहीये. आता फक्त 100 ची नोट दिसली नव्हती. बापरे! अजून काय गेलं असेल? तिलु स्वतःशीच विचार करत होती. रूममध्ये काही विशेष काही नव्हतं. लॅपटॉप विनूनं नेला होता ऑफिसला आणि पर्स तिच्याकडे होतीच. तिला अजून काही आठवेना. ऐकलं ते इतकं अनपेक्षित होतं की तिला काय करायचे ते कळत नव्हतं.
'प्लीज नका करू complaint. लुना साठी तरी? '
Stan हळूच गयावया करत होता.
'मग असं वागायचं कशाला? Must do right thing',
एवढे बोलून ती रिसेप्शन कडे गेली.
ती चालत होती. पण तिचं डोकं बधीर झालं होतं. आता समजा तिने पैसे दिसत नाही म्हणून complaint केली तर? शोध घेऊनही पैसे नाही मिळाले तर staff ची चौकशी होईल. हाॅटेलचं reputation सांभाळायला कदाचित आता असलेल्या staff ला काढून टाकतील. लुना तर गेली निघून पण इथं असलेल्या हकनाक भोगावे लागेल...
विचार करत करत तिलु तिच्या नकळतच रिसेप्शनवर येऊन उभी राहिली.
तिथल्या माणसाने तिच्या कडे प्रश्नार्थक नजरेनं पाहताच ती कडाडली.
'कोण आहे इथला in charge? कसं काम करता तुम्ही? '
'काय झालं मॅडम? ', रिसेप्शनवरील staff ने विचारलं.
'मी वरच्या suite मध्ये काही दिवसांपासून राहतेय. काही व्यवस्थित ठेवाल की नाही? '
'का? काय झालं मॅडम? सफाईवाल्यांचं schedule तर बरोबर आहे. अजून काही complaint आहे का?'
'कर्मचारी येतात जातात पण काम करतात की नाही हे पहायला नको का?', तिलुने खडसावले.
'Sorry for the inconvenience madam. Training मुळे गडबड झाली असावी. मी लगेच check करतो. तुमचा रूम नंबर?'
त्याला रूम नंबर सांगून तिलु लिफ्ट कडे वळली. लिफ्टचे दार बंद होता होता तिथंच अंग चोरून उभा असलेल्या Stan ने सुटकेचा निश्वास टाकलेला तिला स्पष्ट ऐकू आला.
ती कोण होती लुनाला सूट देणारी? लुनाच्या आपुलकीने आणि मैत्रीने उलट तिला सूट दिली होती तिचं स्वत्व जपण्याची. तिच्या प्रेमळ समजावणीमुळे, क्वचित केलेल्या कान उघाडणीमुळेच तर तिलुचा आत्मविश्वास परत आला होता ना! या परक्या देशात जवळपासचा आधार म्हणायला विनू नंतर दुसरं होतं तरी कोण तिच्याशिवाय?
तिलुने खोल श्वास घेतला आणि रूमचं कार्ड swipe करून आत आली. पाय ओढतच ती ड्रावरकडे गेली, जसं काही तिच्या पायाला मणामणाचे ओझे लादले होते. थरथरत्या हातांनी तिने ड्रावर चेक केले. त्यात काहीही नव्हतं. तेवढ्यात तिला दादानं दिलेल्या घड्याळाचा बाॅक्स दिसला. साशंक मनाने तिलुने तो उघडला. तिची शंका खरी ठरली होती. आत घड्याळ नव्हतं!
'याचा अर्थ लुना जेव्हा आपल्याला पायर्यावर भेटली त्या दिवशी ती या suite मध्ये आली नसेल ना? तिनेच तर नाही ना चोरी केली?....'
तिलु हताशपणे घड्याळाच्या रिकाम्या खोक्याकडे पाहत राहिली.

*****

मध्यंतरी बराच काळ लोटला.

तिलुला भारतातील अनुभवामुळे लवकरच जाॅब मिळाला. तिचा working visa होऊन, नव्या प्रोजेक्टच्या निमित्ताने ती Louisiana ला आली होती काही दिवसांपूर्वीच.
कॅबमधून ती उतरत असतांनाच तिचा फोन वाजला.
'काय पामराला विसरलात मॅडम, फोन नाही अजिबात?', पलीकडे विनू बोलत होता.
'ए चपे! लागलास रडायला लगेच. आता अजून 2 आठवडे काढायचे आहेत', तिलुने हसून सांगितले.
'अरे वा! झाला का project extend? छान छान. मग आता कधी येणार? '
'ए ऐक ना विनू. मी काय म्हणतेय, तूच ये ना इकडे. Fall colors पहायला. मी एकदा ऑफिसात विचारून सांगते तुला', तिलुने भरभर सांगितले.
'अरे वा. चांगल्या ओळखी झाल्या वाटतं ऑफिसात'.
'ए जळू!', तिलु मनापासून हसत म्हणाली, 'तुला माहितीये, मी आता एका रेस्टॉरंट मध्ये आलेय. इथे तुझ्या आवडीचे curly fries मिळतात म्हणे'
'थांब मी आलोच. Curly fries साठी काय पण!'
तिलुने हसून फोन ठेवला.
ऑर्डर देऊन ती लॅपटॉप घेऊन बसली. दोन तीन इमेल पाठवेपर्यंत तिची ऑर्डर आली. तेवढ्यात तिला ऑफिसातून काॅल आला. काही emergency आली होती. तिची टीम मेंबर तिला उचलणार होती. ऑफिसात परत जावं लागणार होतं. तिलुने ऑर्डर पॅक करून द्यायला सांगितले व ती बाहेर येऊन parking lot मध्ये उभी राहिली. थोड्या वेळाने तिथं काम करणार्या मुलीने तिचं पार्सल आतून आणून दिले. त्याबरोबर तिला एक बाॅक्सपण दिला.
'हे काय?', तिलुने विचारलं.
'My supervisor says this belongs to you'.
असं म्हणून ती मुलगी आत निघून गेली.
तिलुने आश्चर्याने तो बाॅक्स उघडला. दादानं तिलुला दिलेलं वेगवेगळ्या डायल्सचं घड्याळ होतं ते!
पण हे तर चोरीला गेलं होतं. मग इथे कसं काय आलं? तिलु विचारात पडली. समोरून एक कार गेली आणि तिलुच्या डोक्यात प्रकाश पडला.
'ओह माय गॉड! लुनाच असावी ही!'
तिलुने गर्रकन मागं वळून पाहिलं. दिव्यांच्या प्रकाशात त्या रेस्टॉरंटचे नाव - 'Jade and Willy's' झगमगत होतं.

(समाप्त)

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle