कभी यूँ भी तो हो - ६

भाग ५

मनवा टेरेसमध्ये बहरलेल्या बागेला स्प्रेने पाणी घालत होती. जास्वंदीच्या जोडीला मोगरा भरगच्च फुलांच्या भाराने वाकून उभा होता. एक डवरलेला देशी गुलाबपण ग्रिलला चिकटून फरशीवर गुलाबी सडा सांडत होता. दुसऱ्या कॉर्नरला मनवाची आवडती गुबगुबीत सक्युलंट्स होती. पावसाला नुसतं बघूनच हरखून टवटवीत झाली होती बिचारी बाळं. आता तिने ग्रीलवर पसरलेल्या हिरवापांढरा अ‍ॅबस्ट्रॅक्ट रंग फासल्यासारख्या ग्लेशियर पोथोसची धुळकट पानं धुवायला सुरू केली. जोईची कुंड्यांमधून लुडबुड सुरू होती. तो जरा पायाजवळ आला की मनवा लगेच हसत ओरडून त्याच्यावर स्प्रे उडवत होती. शेवटी तो दमून दुर्वांच्या पसरट कुंडीशेजारी फतकल मारून एकएक पातं चघळत बसला.

अचानक इंद्रनीलची हाक आल्यावर मनवा चमकून ताठ उभी राहिली. 'आत्ता? इतक्या लवकर का आला हा परत?? मला परत दिसणार नव्हता ना हा, मग?' तिच्या मनात विचार धडाधड एकमेकांवर थडकले. तरी पण त्याच्या तोंडून तिचे नाव ऐकून तिच्या ओल्या हातांवर काटा फुलून आला होता. जोरदार धडधड आणि उष्ण श्वास सगळंच एकत्र आलं होतं. का? ते माहीत नाही आणि तिला माहिती करूनही घ्यायचं नव्हत! दिवसभर ती त्याला मुद्दाम विसरून गेली होती. त्याचा चेहरा जरा जरी तिच्या मनात डोकावला तरी त्याला मागे ढकलून देत होती. त्याचा तो अंतर्बाह्य हलवून टाकणारा मखमली आवाज ऑलमोस्ट विसरली होती, ऑलमोस्ट.. आत्ता ऐकेपर्यंत.

तिला इंद्रनीलमुळे हे जे काही होत होतं ते अजिबात व्हायला नको होतं. 'मनवा! स्टे अवे!' तिने स्वतःलाच दटावलं. 'प्लीज तुझा वेळ असा घालवू नको, तेही पुण्यात चार दिवस टेम्पररी आलेल्या माणसावर.. शिवाय तो ६.१ तरी आहे. जवळपास फूटभर उंच! तुझा रूल आठव. हाही राहुलसारखाच असणार. तुला बरोबरीचा समजणारा माणूस शोध. एकदा सवयीचा झाला की हाही तुला कुक्कुलं बाळ समजून खिशात घालायचा प्रयत्न करणार. प्रत्येक गोष्टीत अडवणूक. प्रत्येक गोष्टीत बॉसिंग.. ना तुझ्या मतांना काही किंमत राहील ना तुझ्या विचारांना. फक्त कायम इन्फीरीयर राहायचं. यू हॅड इनफ ऑफ धिस ऑलरेडी.' भूतकाळ आठवून मनवाच्या डोळ्यातली चमक आता नाहीशी झाली होती. 'आता तुमच्यासाठी एक नोटिफिकेशन आहे मि. रायचौधरी, अ‍ॅडव्होकेट मनवा गोखले तुमच्या अ‍ॅडव्हान्सेसना दाद देणार नाही!'

"मनवाss" पुन्हा खालून हाक आल्यावर ती हाताने तोंडावर आलेल्या बटा बाजूला करत जिन्यात आली. तिच्या मागोमाग जोई दुडदुडत आला आणि नीलला बघून उड्या मारत जिन्याखाली उतरला. आनंदाने भुंकून भुंकून, उड्या मारत, शेपूट हलवत नीलला खाली बसायला लावून, त्याच्या खांद्यावर पाय ठेऊन त्याच्याकडून लाड करून घेतल्यावरच तो जरा शांत झाला. मनवा शेवटच्या पायरीवर पोहोचेपर्यंत इंद्रनील टेबलवर ठेवलेली निशिगंधाची फुलं हातात घेऊन तिच्यासमोर आला. त्याने फुलं समोर धरल्यावर तिचे सगळे विचार माळ तुटल्यासारखे खळ्ळकन गळून पडले.

"थ..थँक्स. आय ल..व्ह दीज.. तुला कसं कळलं?" अवघडून हसून फुलांचा खोल वास घेत ती म्हणाली. "अपने सोर्सेस सब जगह है" तो डोळा मारून क्युटनेसची परमावधी साधत म्हणाला. समोर त्याला डार्क नेव्ही ब्लू सूट, मॅचिंग ट्रावझर्स आणि ओपन कॉलर क्रिस्पी व्हाइट शर्टमध्ये बघून तिने मनातल्या मनात जोरात वॉव! म्हणून घेतलंच. तितक्यात त्याने समोर झुकून तिच्या गालावरून अलगद हात फिरवला. तिने एकदम धक्का बसून पाहिल्यावर त्याने हात उघडून हाताला लागलेली माती दाखवली. "ओह, आय वॉज जस्ट वॉटरिंग द प्लांटस.. आलेच" म्हणून जीभ दाखवत ती पुन्हा पळत जिन्यातून वर गेली.

त्याला रिक्लायनरवर बसून जोईशी खेळता खेळता तिची रिअ‍ॅक्शन आठवून हसू आलं. तिच्या कश्याबश्या एका मोठ्या क्लचरमध्ये अडकवलेल्या कुरळ्या बटा, दमलेला चेहरा आणि विस्फारलेले डोळे! काळा हॉल्टर टॅंक टॉप त्यावर ओला होऊन इथे तिथे चिकटलेला पातळ पांढरा क्रॉप टॉप आणि लूज ग्रे थ्री फोर्थ पजामा त्याच्या नजरेतून सुटला नव्हताच. एक लांब उसासा सोडत तो मागे टेकला.

तेवढ्यात मनवा आलीच. "तू इतक्या लवकर कसाकाय आलास?" तिने लगेच विचारलं.

"कॉझ आय एम सो टायर्ड. हे ऐकायचं आहे, की तुला खरं सांगू?" तो शांतपणे म्हणाला.

"खरं! ऑफ कोर्स लॉयरला खरंच सांगावं लागतं" शक्य तितक्या गंभीरपणे ती म्हणाली.

"ओके" तो श्वास घेत म्हणाला, "देन ट्रूथ इज आय केप्ट थिंकिंग ऑफ यू टुडे. अँड आय वॉन्टेड टू आस्क यू आउट आणि मला आजची संध्याकाळ तुझ्याबरोबर स्पेन्ड करायची आहे. झालं, धिस इज द ट्रूथ!"

जोई सोफ्यावर सावधान बसून जीभ बाहेर काढून दोघांकडे बघत होता..

भाग ७

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle