कभी यूँ भी तो हो - १०

इंद्रनील सकाळी लवकर उठून तयार होऊन त्याच्या कामासाठी बाहेर गेला होता. मनवा आठ वाजता उठली तेव्हा घर सुनसान होते. ती चहा करेपर्यंत जोई भू(क), भू(क) करत मागे लागला होता. नेमकं त्याचं किबल संपलं होतं. फ्रीजपण एव्हाना रिकामा होत आला होता. ग्रोसरीज आणायला हव्यात म्हणून तिने पटकन ऍप मध्ये रिमायंडर लावला. तिने ह्यूमन फूड फॉर डॉग्स गूगल करून पाहिले तर गाजर आणि सफरचंद चालतील असं दिसत होतं. मग तेच दोन्ही स्लाइस करून, बिया काळजीपूर्वक काढून तिने जोईच्या डिशमध्ये वाढले. जोईने ते हुंगून तिच्याकडे वाईट तोंड करून बघितले. "मनात नक्की त्याने 'हेल्थ फ्रीक!' म्हणत डोळे फिरवले असणार" म्हणत ती हसायला लागली.

दिवसभर प्रचंड काम असल्यामुळे मनवाला डोळ्यावरचा चष्मा काढायलाही फुरसत नव्हती. दिवसभर ती लॅपटॉपसमोर रेफरन्स बुक्स चाळत वेगवेगळी ऍग्रीमेंट्स ड्राफ्ट करत होती. कालच पिझ्झा खाऊन भरपूर कॅलरीज स्वाहा केल्यामुळे आज बाहेरचं काही नको म्हणून तिने इंद्रनीलने फ्रीजमध्ये ठेवलेल्या फळांपैकी दोन तीन सफरचंद बाहेर काढून धुवून ठेवली. एरवी तिला फळं खाणं म्हणजे शिक्षाच वाटायची. फक्त दोन तीन दिवस एखाद्या माणसाबरोबर राहून आपण त्याच्या सवयी आपल्याश्या करतोय या गोष्टीचं तिला फारच आश्चर्य वाटत होतं.

लंच म्हणून नुसतं सफरचंद खायचा कंटाळा आला होता तेव्हाच दुपारी बाहेरून 'नारsल पाssनीssये' म्हणून आवाज येत होता. ती गेटबाहेर जाऊन गाडीवाल्याकडून एक मोठं शहाळं घेऊन आली. स्मूदी रेसिपीज शोधताना तिला लिची, पेर, कोकोनट स्मूदी सापडली. चार लिची, एक मोठा पेर आणि नारळपाणी थोडा बर्फ घालून तिने ब्लेंड केले. एक उंच ग्लास भरून बाहेर आणल्यावर तिने लगेच एक फोटो काढून इंस्टावर पोस्ट केला. पाच मिनिटात भरमसाठ बदाम गोळा झाले. त्यात एक कमेंट 'way to go!' पण होती Drifter_Neil अकाउंट वरून. 'अरे हो, कालच फॉलो केलं होतं आम्ही एकमेकांना' तिला आठवलं.

तेवढ्यात वॉट्सऍप पिंगलं म्हणून पाहिलं तर पारुलने फाल्गुनीच्या 'ये किसने जाssदू किया' ओळीचे मीम बनवून, डोळा मारू स्मयलीज पाठवल्या होत्या. ते पाहून ती अगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसली. मग पटापट स्मूदी संपवून काम सुरू झाल्यावर संध्याकाळपर्यंत तिला डोकं वर करायलाही वेळ नव्हता. अधून मधून उठून फक्त जोईला खाऊपिऊ द्यायला आणि शू ब्रेक्स झाले.

सहा वाजता तिला आठवलं की अरे आपल्याला घरी जेवायला जायचंय. तिने बॅगेत कोंबून आणलेल्या कपड्यांमध्ये पजामा सेट्स सोडून कोर्टात घालायचे दोन तीन काळे पांढरे कॉम्बो होते. हुश्श, पारूलने गिफ्ट केलेला एक बेबी पिंक ऑन पिंक चिकनकारीचा स्लीवलेस कुर्ता सापडला तोच व्हाइट लेगिंग्ज बरोबर मॅच करून ती तयार झाली. अनायसे तयार होतेच आहे तर जरा नीलला टशन देऊ असा विचार करत तिने काजल, टिंटेड लीप ग्लॉस आणि थोडा मेकअप पण करून टाकला. वर होऊद्या खर्च! म्हणत त्याच बॉक्समध्ये सापडलेले ऑक्सिडाईज्ड झुमकेही घातले.

साडे सहा वाजता ती तयार होऊन जिन्यावरून खाली आली तो समोर सोफ्यावर इंद्रनील आधीच येऊन तिच्याकडे पाठ करून मोबाईल बघत बसला होता. ती हळूच खोटंखोटं खोकली तेव्हा तो पटकन वळून बघत उठून उभा राहिला. हाय! इतकी काळजात कळ आणण्याइतका देखणा का दिसतो हा माणूस? आताही लाईट ब्राऊन चिनोजवर टक इन केलेला आकाशी शर्ट आणि पायात सॉक्सशिवाय डार्क ब्राऊन बोट शूज. शर्टच्या बाह्या कोपरापर्यंत फोल्ड केलेल्या आणि शिरा उठून दिसणाऱ्या मनगटावर ट्युडरचं क्रोनोग्राफ! एवढ्यावरच इतका कातिल दिसतोय की सगळा मेकअप वेस्ट आहे आपला.. असं वाटून तिला जरा रागच आला.

तो क्षणभर सगळं विसरून तिला पहातच उभा राहिला. शेवटी भानावर येत "हेलो मनवाजी, चले?" म्हणून त्याने समोर झुकत तिला हात ऑफर केला.

आणि बाहेर दणाणून टाकणारा गडगडाट होऊन जोरदार पावसाची झड सुरू झाली.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle