माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-१२ (समारोप)

k11

खरंच, मला का वाटलं असेल कैलास-मानसला यावं असं? मी तिथे असताना आणि परत आल्यावरही ह्यावर बराच विचार केला. मी तशी देव-धर्म, उपास-तापास करणाऱ्यातली नाही. पाप-पुण्य ह्या कल्पनांवर माझा विश्वास नाही. समाज नीट चालावा म्हणून परलोकातील सुखाचा मोह दाखवलेला आहे, असं मला वाटतं. म्हणजे कसं की, भुकेल्याला अन्न द्यावेसे वाटावे, म्हणून त्याला ‘पुण्यकर्म’ करून मृत्यूनंतरच्या फायद्याची लालूच. वाईट वागल्यास ‘पापाची’ भीती दाखवणे. भूतदया नक्कीच चांगली, पण त्याला ‘पुण्य’ मिळवण्याची झालर कशाला? असा माझा विचार. त्यामुळे धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे अनेक जन्मातील पापे धुवायचं आकर्षण वाटण्याच काही कारणच नाही. गिर्यारोहण किंवा प्रवासाची आवड म्हणावी तर, अनेक हिमालयातले ट्रेक किंवा परदेशातील प्रवास मी खर्च केलेल्या पैशात आरामात झाले असते. आजही यूथ हॉस्टेल किंवा तश्या संस्थांच्या ट्रेकला, दिल्ली पर्यंतचा विमानाचा खर्च पकडूनही, १२-१५ हजारापेक्षा जास्त खर्च येत नाही. ह्या यात्रेला १-१.२ लाखापर्यंत खर्च येतो. म्हणजे त्या खर्चात १० ट्रेक मी आरामात करू शकले असते.

मग का? जवळजवळ २० वर्ष मी हे स्वप्न का पाहिलं असेल? युरोप ट्रीपला जावे किंवा नायगारा फॉल बघावासा मलाही वाटतो. पण ह्या इच्छेची तीव्रता काहीच्या काहीच का होती? खरं सांगायचं तर ‘का जावंसं वाटलं?’ ह्याच उत्तर पूर्णपणे अजून मलाही मिळाल नाहीये! कर्मकांड बुद्धीला पटत नसली तरी हिंदू धर्माचा पगडा माझ्या अंतर्मनावर असेल का? अश्या वेळेला पु.ल.देशपांडे म्हणतात ते,’गड्या, तू वंशाचा दिवा नसून निव्वळ दुवा आहेस’, हे खरं वाटायला लागतं.

आमच्या बॅचच्या इतर यात्रींच्या बोलण्यातून मी ‘ते’ का आले असतील? ह्याचा अंदाज घेत होते. शेकडा ७०-७५ % यात्री हे पुण्यप्राप्तीचा स्पष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून आले होते. उरलेले लोक माझ्यासारखे कुंपणावर बसलेले होते. शारीरिक क्षमता वाढवणे, अप्रतिम सुंदर निसर्गाचा आस्वाद घेणे, मनाच्या ‘वस्तुनिष्ठपणा’ कडून ‘भक्तिमार्गाला’ जाण्याचा प्रयत्न अशी अनेकविध उत्तरे ह्या शोधातून मिळाली.

वयाने मोठं होऊन ह्या जगाच्या रुक्ष धकाधकीत तगून राहणे अवघडच असतं. त्या मोठं होण्याबरोबर अपरिहार्यपणे गळ्यात येणाऱ्या कर्तव्य -जबाबदाऱ्यांच्या जडशीळ माळा, यश-अपयशात होणारी रस्सीखेच, वेळोवेळी मनाला घालावी लागणारी मुरड हे सगळं बाजारात फेरफटका मारण्याइतकं सोपं असेल कसं? ह्या सगळ्यातून थोडं थांबून वेगळ्या वातावरणात जाणे, आपल्या मनाला ‘आपल्याला नक्की हवंय तरी काय?’ हा विचार करायला भाग पाडणे, असा काहीसा हेतू माझ्या मनात होता. शिक्षण, विवाह, अर्थाजन, अपत्य संगोपन हे ठराविक टप्पे घेताना जगण्याचा वेग प्रचंड वाढला. मध्येच अचानक वाटायचं, पण आपण का धावतोय इतकं? आणि कशासाठी? नक्की पोचायचंय तरी कुठे? आपलं नक्की ध्येय तरी काय आहे? हा शोध घेण्याइतकीही फुरसत मिळत नव्हती. गेली काही वर्षे ह्या कुतरओढीने मी अगदी गळून गेले होते. परिस्थितीने दिलेले काही घाव सांभाळत, कुरवाळत राहत होते. पूर्वी स्वभावात नसलेला एक कडूपणा आला होता. त्याचा त्रास व्हायचा.

मी आनंदी / सुखी/ समाधानी होण्यासाठी स्वतःकडे पाहण्याऐवजी मला बाह्य परिस्थितीकडे बोट दाखवणं सोपं वाटत होतं. मला अमुक इतके पैसे मिळाले की, माझ्या भोवतालचे लोक अश्या अश्या पद्धतीने बदलले की, समाज असा असा झाला की, मी समाजासाठी- कुटुंबासाठी ह्या गोष्टी केल्या की मग मला छान वाटेल, सगळे मला नक्की नावाजतील, अशी भावना मनात प्रबळ झाली होती. ह्या भावनेला धक्का बसला, की निराश वाटायचं.

ह्या सगळ्यातून बाहेर पडायला मला ह्या महिन्याची फार मदत झाली. आत्मशोधाच्या ह्या प्रक्रियेसाठी अत्यंत पोषक असं वातावरण ह्या यात्रेत मला मिळालं. एकतर संगणक, आंतरजाल, दूरध्वनी आणि कुटुंबीय ह्या सगळ्यापासून मी खूप दूर होते. इतर कुठल्याही ट्रेकपेक्षाही जास्त शारीरिक-मानसिक क्षमतेचा, अनिश्चितता झेलण्याचा तयारीचा कस ह्या यात्रेत रोजच्या रोज लागत होता.

रोजच्या चरितार्थासाठीच्या गडबडीत माझा माझ्यासोबतचा संवाद केवळ रोजचे अन्न-वस्त्र-निवाऱ्याच्या प्रश्नांपर्यंतच राहिला होता. ती तुटलेली साखळी जोडायला मला इथे वेळ आणि मोकळीक मिळाली. आपल्या स्वतःच्या मतांची चिरफाड करणे, म्हणजे एक शल्यकर्मच! ते काम मी नेहमीच मागे टाकत होते. आता मात्र ते आपोआपच होत होत. धार्मिकतेकडे माझा कल नव्हता, आणि आजही नाही. परंतु माझ्यातल्या आध्यात्मिकतेचा परिचय ह्या महिन्याभरात झाला. मात्र ती आध्यात्मिकता माझ्या स्वतःच्या आत्मिक प्रगतीसाठी असेल, बाह्य प्रदर्शनासाठी नाही.

ह्या यात्रेत ‘दिव्यत्वाची प्रचिती’ घेतल्यावर ‘कर माझे’ नक्कीच जुळले. पण मी नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे गेले का? तर नाही. मी त्या बाबतीत होते तिथेच आहे. कैलास पर्वतावर किंवा मानस सरोवराच्या काठी कोणतेही देऊळ नाही. अर्थातच त्याबरोबर येणारा ‘देव’ नावाचा व्यवसाय नाही, धातूशोधक यंत्रे नाहीत, प्रसाद-माळांची दुकानेही नाहीत. ‘निर्गुण-निराकार’ असे ते रूप अनुभवून आल्यावर तर मला गर्दीने गजबजलेली, स्वतःची जाहिरात करणारी देवळे आणखीनच आवडेनाशी झाली.

पण कैलास-मानस च्या रौद्र अनुभूतीचा परिणाम माझ्या मनावर नक्कीच झाला.

मी काहीशी शांत झाले, अस मला वाटत. कपडे – दागिने हा माझा प्रांत पहिल्यापासून कधीच नव्हता. आता मी त्यापासून अजूनच लांब गेले. माझी विचार करायची पद्धत काहीशी सखोल झाली. आपल्या दिशेने येणारी काही वाक्य किंवा घटना मी थोड्या अलिप्तपणे पाहू लागले. वाद घालणे, शब्दाने शब्द वाढवणे हे टाळण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न करायला लागले. म्हणजे मी क्रोध, लोभ, मोह, माया सगळं जिंकलं का? नाही, अजिबात नाही. मी अजूनही एक माणूसच आहे, साधू- संन्यासी झाले नाही. पण तिथल्या अपूर्व अश्या शांतीचा अनुभव मन शांत करून गेला, हे मात्र खरं!!

कैलास यात्रेला येणाऱ्या यात्रींमध्ये भाविक, श्रद्धाळू लोक मोठ्या प्रमाणात असतात. संपूर्ण यात्रेत उपास करण्यापासून ते चालताना मौन पाळणारे लोक असतात. त्यांच्या मनोबलाची कमाल वाटते. पण हेच लोक लहान-सहान कारणावरून आपल्या सहयात्रींबरोबर किंवा पोर्टरबरोबर भांडताना, अद्वातद्वा बोलताना दिसले, की धक्काच बसतो. ह्या लोकांची ही व्रत-वैकल्य शरीरापर्यंतच राहतात, मनापर्यंत झिरपत नाहीत, ह्याची खंत वाटते.

पूर्वी लोकं काशीयात्रेला जात, ते घरादारावर तुळशीपत्र ठेवूनच. प्रवासाच्या, संपर्काच्या कोणत्याही सोयी नसताना ह्या यात्रेला जात असत. जाताना आपल्या घराचा, कुटुंबाचा शेवटचा निरोप घेण्याची मानसिक तयारी आपोआपच होत असेल. जगून-वाचून कोणी परत आला, तर तो त्याचा पुनर्जन्म मानला जात असे. त्या आलेल्या माणसाला आपला जीव ज्यात गुंतला आहे, त्या सगळ्याकडे साक्षी भावाने पाहणे शक्य होत असेल. ह्या सगळ्या पसाऱ्याचा केंद्रबिंदू ‘मी’ आहे, ही समजूत किती पोकळ आहे, ह्याची जाणीव होणे, हाच तीर्थयात्रांमागचा उद्देश असेल का?

महाविद्यालयात असल्यापासून मी ह्या यात्रेची स्वप्न बघितली होती. पुढे घर-संसार-व्यवसाय ह्या जबाबदाऱ्या महिनाभर बाजूला कशा टाकणार? असं वाटून खूप वर्षे ती इच्छा मी कोपऱ्यात सरकवली होती. पण प्रत्यक्षात मी नसतानाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू राहिल्या. माझ्या परीने मी सगळी ओळ नीट लावायचा प्रयत्न केला होता. तरीही, मनाच्या एका कोपऱ्यात ‘माझ्या वाचून सगळ्यांचं खूप अडेल’ अशी एक भावना होती. पण तो एक अहंभाव होता, असं आता वाटतं. आपलं घर, व्यवसाय, कुटुंब ह्या सगळ्यात गुंतून पडलेल्या मनाला थोडं बाजूला जाण्याची संधी मिळाली. निसर्गाचे ते भयचकित करून टाकणारे ते रूप बघून माझ्या सुखरूप परत येण्यामागे थोडा योगायोग, थोडं नशीब, थोड्या सगळ्यांच्या सद्भावना आहेत ह्याची प्रखर जाणीव झाली.

हे लक्षात आल्यावर मनात असलेल्या, पण करायची हिंमत न केलेल्या असंख्य गोष्टी वर आल्या. मला चित्र काढायला शिकायची आहेत, भरपूर प्रवास करायचा आहे, नवीन भाषा शिकायच्या आहेत. जी गोष्ट खरंच मनापासून करावीशी वाटते, ती परिस्थितीचा फार बाऊ न करता करून टाकायचा एक आत्मविश्वास मला ह्या प्रवासातून मिळाला. आपल्या वागण्यातून जर हे काही करायची तेवढी असोशी दिसली, तर आपले कुटुंबीय सुद्धा भरपूर सहकार्य करतात, हे लक्षात आले.

आपल्या दिनक्रमाशिवाय वेगळी गोष्ट करायला, शिकायला ‘अत्यंत आदर्श’ अशी परिस्थिती कदाचित कधीच निर्माण होणार नाही. ‘आता दोन महिने मला ऑफिसला सुट्टी आहे, मुलगा आजीकडे गेलाय, खिशात भरपूर पैसे आहेत, घरच्या कोणत्याही जबाबदाऱ्या नाहीयेत, आता मी माझ्या मनातली ही गोष्ट करते/ शिकते’ असं व्हायची शक्यता जवळपास नाहीच!! आणि वर वर्णन केलेली आदर्श परिस्थिती नसताना काही ठरवलं, तर माझ्यावर विश्वास ठेवा, आभाळ कोसळत नाही’!! सगळं व्यवस्थित रांगेला लागतं! तेव्हा ‘त्यागमूर्ती’ होण्याची नशा सोडून ‘आनंदमूर्ती’ व्हायचा निश्चय मी करून टाकला आहे.

ही यात्रा मी स्वतः केली, हे जरी खरं आहे, तरी त्यामागे अनेकांचे सहकार्य असते. सासर- माहेरचे कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, सहकारी, सहयात्री तर असतातच. पण मी नसताना एकही दिवस सुट्टी न घेणाऱ्या आमच्या घरकामाच्या मावशी, ‘तिकडून फोन करा, मी तुमचा फोन इथून रिचार्ज करेन.’ अस म्हणणारा दुकानदार, न सांगता मला भरपूर सुट्टे पैसे आणून देणारी माझी रेल्वेत काम करणारी जिवलग मैत्रीण, असे असंख्य. किती जणांची नवे घेऊ? मी लहान असल्यापासून भरपूर वाचत आले. लिखाणाची हिंमत मात्र कधीच केली नव्हती. माझ्या मोठ्या भावाने मला हे अनुभव लिहिण्याचा खूप आग्रह केला. देवनागरी लिखाणासाठीचा फॉन्ट देण्यापासून ते मला लिहिता न आलेले काही शब्द इ-मेलने पाठवण्यापर्यंत सगळी मदत त्याने मला केली.

त्याच्यामुळेच ही लिखाणाची झिंग मला अनुभवता आली. माझेच अनुभव लिहिताना कितीतरी वेळा माझे डोळे भरून आले. यात्रा संपताना झालेली घालमेल लिहिताना मी परत तशीच अस्वस्थ झाले. पण मला नक्की काय वाटलं, तेव्हा नक्की काय विचार आले, ह्या सगळ्याचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर काही परिणाम झाला का? ह्याची उत्तरे मला लिहितानाच मिळाली. प्रत्यक्ष प्रवासात असताना आपलं लक्ष ‘आपली तब्येत, आपलं सामान, ऊन/पाऊस/थंडी, उद्याच्या चढ/उताराची – चालण्याच्या अंतराची काळजी, घरची आठवण’ अश्या असंख्य ठिकाणी असत. घरी संगणकासमोर बसून शांतपणे टंकताना, हे कोणतेही ताण नव्हते. त्यामुळे स्वतःला तपासायला योग्य वेळ मिळाला. लिहील नसत, तर ह्या माझ्या ‘स्व’च्या शोधाला मी नक्कीच मुकले असते.

ह्या लिखाणाबरोबरची सर्व छायाचित्रे मी काढलेली नाहीत. मला यात्रेत गवसलेली माझी मैत्रीण नंदिनी, तसेच आमच्या बॅचचे कलाकार श्री.शरद तावडे ह्यांनी ती मला विनातक्रार, विनाअट दिली. त्यामुळे माझ्या लेखांची खुमारी खूप वाढली.

काळ-काम-वेगाची गणिते सोडवताना ज्यांच्याशी संपर्क कमी झाला होता, किंवा पार तुटलाच होता, अशा काही मित्र-मैत्रिणींशी किंवा नातेवाइकांशी मी ह्या निमित्ताने परत एकदा जोडली गेले. माझे लिखाण वाचून, ज्यांची माझी काहीही ओळख नाही, अशांनीही मला भरघोस प्रोत्साहन दिले. त्या सर्वांची मैत्री ही मला ह्या लिखाणाने दिलेली अपूर्व अशी भेट आहे.

शेवटी काय सांगू? आता शब्द अपुरे पडत आहेत. ह्या संपूर्ण यात्रेत निसर्ग सौंदर्याने, आव्हानाने, आश्चर्याने नटलेली धरतीमाता आपल्यासमोर असते. ह्या अलौकिक सौंदर्याचा अनुभव प्रत्येक भारतीयाला मिळावा, इथे प्रत्यक्ष जाऊन येण्याची ओढ निर्माण व्हावी, यासाठी आपण काहीतरी करावे, हा एक हेतू ह्या लिखाणामागे आहेच! इच्छुक आनंदयात्रींना हिमालयाचा यात्रिक होण्याचे भाग्य लाभलेल्या आमच्यासारख्या भाग्यवंताच्या हार्दिक शुभेच्छा!

ॐ नमः शिवाय......... ॐ नमः शिवाय.........

k12

ह्या मालिकेतील बाकीच्या भागांच्या लिंक्स

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle