ला बेला विता - ३

भाग २

एन्व्हलप बघून तिला धक्काच बसला. आता मला चिट्ठी लिहिण्यासारखं काय आहे आमच्यात? का ही माणसं जवळीक करायला बघतात उगाच? की हा अजूनही जाईल तिथे असाच बायकांवर चान्स मारत असतो देव जाणे.. एकदा तिच्या मनात तसंच एन्व्हलप फाडून कचऱ्यात टाकायचा विचारही आला पण तिच्यातल्या उत्सुकतेने त्याच्यावर मात केली. असून असं काय असणार त्यात, बॉंब तर नक्कीच नसेल. विचार थांबवत शांतपणे तिने एन्व्हलप उघडलं. आत पांढरी शुभ्र, गोलाकार आणि वर निळ्या शाईत 'White Elite' मोनोग्राम असलेली दोन तिकिटे!

'Asymmetric'
by A. Diwan
tuesday - thursday - saturday
16th - 18th - 20th July 2019
7.30 p.m.

मागच्या बाजूला tuesday 16 ला गोल करून  खाली बारीक इटॅलिक्समध्ये complementary स्टॅम्प होता. तिला एकदम संजीवचं म्हणणं आठवलं. <<सध्या एका कमिडियनचे गिग्ज सुरू आहेत. फारच ऐकलंय त्याबद्दल. उद्याच आहे संध्याकाळी.>> ओह माय गॉड... असीम तो कमीडियन आहे! काय संबंध? तो तर लॉयर आहे. कॉलेजमध्ये तरी त्याने कधी काही जोक केलेला आठवत नाही, हां म्हणजे प्रत्येक गोष्टीवर त्याचे सारकॅस्टिक रिमार्क्स सोडून. म्हणजे तिने नावं ठेवलेला कमीडियन तोच होता तर. पण हा मला कॉम्प्लिमेंटरी तिकिटं का आणि कश्यासाठी देतोय? तिला प्रश्न पडला आणि तेव्हाच तिला तो कश्या टाइपचा माणूस आहे ते आणि त्यांच्यातलं शेवटचं कडू संभाषण आठवलं...

तिकिटं तिने कोणाला तरी देऊ म्हणून तिथेच ड्रॉवरमध्ये ठेवली, काही झालं तरी ती स्वतः तो शो बघायला जाणार नव्हती. कालची गोष्ट ऐकल्यावर तर तिला त्याचं तोंड बघायची अजिबातच इच्छा नव्हती. सकाळी नुपूराला काहीतरी सांगताना कॅज्युअली ती तिकिटांबद्दल बोलून गेली .

"असीम दिवाण! Wow मला बघायचाय त्याचा शो. केवढं कौतुक ऐकलंय लोकांकडून, सध्या खूप फेमस आहे हां तो". नुपुरा खूप दिवसांनी नेहमीसारख्या बबली मूडमध्ये येऊन बोलत होती.

"अग मग जा की तू आणि अभिषेक. आजचाच शो आहे." बेला आनंदाने म्हणाली.

पण लगेच नुपूराचा चेहरा विझल्यासारखा झाला. "अभिषेक नाही येणार ग, त्याचा नऊ-दहा वाजेपर्यंत क्लायंट कॉल असतो. त्यातून आज वर्किंग डे आहे. तो नाही येऊ शकणार."

"अ ओ.. काय करूया मग, दुसऱ्या कोणाला तरी विचार."

"दुसऱ्या कोणापेक्षा तूच चल की. आपण दोघी मिळून किती दिवसात कुठे गेलो नाही. आणि अभि इतका बिझी असतो की कित्येक आठवड्यात आम्ही कुठेच बाहेर गेलो नाही. प्लीज येशील का तू? I would really love to go!

तिची विनवणी ऐकून बेलाला कसंतरी झालं.  आपण तरी का इतका ग्रज धरून बसतोय, निदान नुपूराला छान वाटेल म्हणून तरी जायला हवं. "अम्म, ओके! जाऊया आपण. दोघींचीच डेट! आणि नंतर सेकंड लेव्हलवर थिएटर कॅफे मध्ये कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम, कॉलेजमधल्या सारखी. किती बँडस यायचे ना तेव्हा व्हाईट एलिटमध्ये. असं इतकं मोठं पहिलंच थिएटर होतं ना हे. केवढं एन्जॉय केलंय आपण!"

येय! म्हणून नुपूराने लहान मुलांसारख्या टाळ्या वाजवल्या. "बघ तो अजून मोठा स्टार झाला तर आपल्याला मिरवता पण येईल आमचा क्लासमेट होता म्हणून. तो या फिल्डमध्ये कसा आला कोण जाणे. बारावीत तर तो बोर्डात आला होता दिल्लीला ऍडमिशन पण सहज झाली होती त्याची. एव्हाना शिकून काहीतरी खूप ग्रेट अचिव्ह केलं असेल असं वाटलं होतं मला. अर्थात तो ते यातपण करूच शकतो. हू नोज.." नुपूरा खूप दिवसांनी जुन्या नुपुरासारखी उत्साहाने बडबड करत होती.

बेलाने जायला होकार तर दिला होता पण आतून तिला धाकधूक होत होती. त्यातल्या त्यात एक बरंय की स्पॉटलाईटखाली तो असणार आहे आणि अंधाऱ्या प्रेक्षकांत ती. त्यामुळे त्याला कुठलं कळायला आपल्याला कोण बघतेय ते. चिल! म्हणून स्वतःलाच समजावून तीला जरा हलकं वाटलं. व्हाईट एलिटमध्ये पोहोचून सीट्स शोधताना पुन्हा तिला छातीत धडधड जाणवत होती पण एकीकडे शो कसा असेल याची उत्सुकताही होती. "येस्स सुरू होतंय.." लाईट्स कमी होताना नुपूर तिचा हात घट्ट धरून तिच्या कानात कुजबुजली तेव्हा तिला तिथून पळून जावंसं वाटत होतं. पण ती खुर्चीच्या पाठीला घट्ट पाठ टेकून शांत बसली. शेजारचा माणूस लाईट्स डिम होतात तोच जोरजोरात चिप्स खात होता.

"ओह माय गॉड! हा असीम आहे? एवढा हंक कधी झाला??" नुपूर तिचा हात घट्ट धरत जवळजवळ ओरडलीच. तिने एकदम दचकून समोर पाहिलं तर स्टेजवर स्पॉटलाईटखाली, हातात माईक धरून असीम उभा होता. पॉलिश केलेले ब्लॅक लेदर शूज, ब्लॅक ट्रावझर्स, टक इन केलेला व्हाईट शर्ट आणि वर परफेक्ट फिटिंगचे ब्लॅक डिनर जॅकेट. लाईटमुळे त्याचे रेशमी केस आणि डोळे चमकत होते. कॉलेजपासून आता तो खूपच वेगळा दिसत होता. कॉलेजमधला उंच, जवळपास लुकडा टीनेजर ते आता व्यवस्थित मसल्स कमावलेला, रुंद खांद्यांचा पुरुष हा मोठाच फरक होता. पडदा वर झाल्या झाल्या टाळ्यांचा इतका प्रचंड पाऊस पडला की तो बराच फेमस आहे हे तिला मान्यच करावं लागलं.

सुरुवातच त्याने स्वतःवर जोक्स करण्यापासून केली. तो इतक्या गंभीर चेहऱ्याने इतकं विनोदी बोलत होता की तिने न हसायचं ठरवूनसुद्धा तिला हसू कंट्रोल होत नव्हते. मध्येच तिच्या दिशेला तोंड करून तो बोलायला लागला तेव्हा आपण याला दिसत तर नसू म्हणून पटकन तिला भीती वाटली पण त्याने बोलणं सुरू ठेवलं,
“बाय द टाइम अ मॅन इज वाइज इनफ टू वॉच हिज स्टेप, ही'ज टू ओल्ड टू गो एनीव्हेर.”

आता ती रिलॅक्स होऊन बाकीच्यांबरोबर हसायला लागली. शो अगदी नावाप्रमाणे असिमेट्रिक होता. काही जोक्स, काही किस्से, गोष्टी, मिमिक्री सगळं काही होतं. आजूबाजूला घडणाऱ्या घटना, गव्हर्नमेंट, लोकांचे एकमेकांशी वागणे, त्यातला दुटप्पीपणा आणि उपरोध या सगळ्यांना स्पर्श करत तो लोकांना हसवत होता. पंच लाईननंतर गंभीर चेहऱ्याने तो अशी काहीतरी छोटीशी टिप्पणी करायचा की हशा दुप्पट वाढे. उदा. आत्ताच तो म्हणाला, "समवन स्टोल माय मायक्रोसॉफ्ट ऑफिस अँड दे आर गॉना पे. यू हॅव माय वर्ड!!" आणि पुढे शांतपणे म्हणे " आय एम एक्सेलिंग ऍट दीज जोक्स!" तिने हसत नुपूरकडे पाहिले तर ती खूप एन्जॉय करत होती. मध्येच काही रेस्ट्रॉंट जोक्स 'ला बेला' मधल्या त्या सेमिनारवाल्या लोकांवर बेतलेले तिला जाणवले. दीड तास कसा गेला काही कळलंच नाही. शिट्ट्या आणि टाळ्यांच्या गजरात त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आणि पडदा पडला.

वर कॅफेत जाऊन गर्दी व्हायच्या आत नुपूराने पटकन टेबल पकडले आणि ती कॉफी आणायला गेली. तिच्या डोक्यात सारखे असीमचेच विचार घोळत होते. संजीवने सांगितलेली गोष्ट खरी असेल का...  अचानक एसीच्या ब्लास्टमुळे तिच्या अंगावर काटा आला. आधीच तिच्या स्लीव्हलेस, मरून लिननच्या रॅप ड्रेसमुळे तिला थंडी वाजत होती. आज नेमकी ती श्रग आणि स्कार्फ दोन्ही विसरून आली होती. कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीमss ऐकून तिने काउंटर वरून ग्लास उचलले आणि ते दोन उंच ग्लास दोन्ही हातात वर धरून गर्दीतून वाट काढायला सुरुवात केली. तिला हील्समुळे टाइल्सवर पटापट चालताही येत नव्हते तेवढ्यात तिला नुपूराचा आवाज आला, "दिसली! इथेच येतेय.." तिने आवाजाच्या दिशेने पाहिले तर तिच्याकडे पाठ करून नुपूरासमोरच्या खुर्चीत, टेबलवर तिचे हात हातात घेऊन कोणीतरी बसलं होतं. ते लेदर जॅकेट आणि जरा विस्कटलेले ग्लॉसी केस आता तरी ती विसरणं  शक्य नव्हतं.

भाग ४

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle