ला बेला विता - ४

भाग ३

अर्र, हा कुठुन आला आता इथे. नको ते लोकच का येतात माझ्या वाट्याला.. नक्कीच हा टोटल फ्लर्ट आहे. ही नुपूर इतकी येडीय ना, असेल तो मोठा चार्मिंग म्हणून एवढं काय ऐकतेय त्याचं. अगदी पपी आईज करून बघतेय त्याच्याकडे. काल ती त्याच्या शेजारी बसलेली मुलगीही अशीच वेडी झाली होती. नुपूरचं ते छोटंसं मंगळसूत्र दिसलंच असेल याला, तरीही? शी! काही करून नुपूराला यांच्यापासून लांब ठेवलं पाहिजे. डोक्यात सतराशे साठ विचार डोकावून गेल्यावर ती ताठ मानेने पटकन टेबलाजवळ पोहोचली. तिला पाहून नुपूराने पटकन हात टेबलवरून काढले पण तिच्या डोळ्यातली एक्साइटमेंट नाहीशी झाली नव्हती.

"बेल्स, मला कोण भेटलं बघ!" उत्साहात नुपूरा म्हणाली.

हूं! दिसतंय.. म्हणून मनातल्या मनात तिने नाक मुरडलं. तेवढ्यात असीम उठून तिच्याकडे बघत उभा राहिला. ओह रिस्पेक्ट! किती खोटं वागतोय हा. ती त्याच्याकडे तिरपा कटाक्ष टाकून मान हलवून मिस्टर दिवाण! एवढंच म्हणाली. तेव्हाच तो तिच्याकडे किंचित हसून बघत "हाय बेल्स!" म्हणाला. तेवढ्या दोन शब्दांनी तिचं मन ढवळून निघालं, गाल रागाने लाल झाले आणि इतका वेळ असलेला कूलपणाचा मुखवटा गळून पडला.

ही मधली सगळी वर्ष पुसली जाऊन ती पुन्हा एकदा अठरा वर्षांची झाली आणि कॉलेजच्या पव्हीलीयन समोर त्याच्यावर चिडून निघून जाणाऱ्या तिला थांबवत तिच्या हातावर त्याची पकड घट्ट होत होती.

"मला बोलायचं आहे तुझ्याशी" तो शांतपणे म्हणाला.

"मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये. ना मला सांगण्यासारखं तुझ्याकडे काही आहे." ती रागातच दात चावत म्हणाली.

"कमॉन बेल्स..

"बेल्स?" आता तिच्या कपाळाची शीर ताडताड उडत होती. " चुकूनही हे नाव काढू नको. फक्त माझे फ्रेंड्स हे म्हणू शकतात. तुझ्यासाठी मी फक्त बेला आहे किंवा मिस इनामदार." त्याचा हात झिडकारून ती तिथून थरथरत्या पायांनी कशीबशी पळून गेली होती. त्यानंतर तिला त्याचं तोंडही बघायचं नव्हतं पण कॉलेजच्या वेगवेगळ्या फंक्शन, इव्हेंट्समुळे ते समोरासमोर येत राहिले आणि तो प्रत्येक वेळी तिला 'हाय बेल्स' म्हणत राहिला.

"दे इकडे, मी ठेवतो" म्हणत अलगद त्याने ग्लास तिच्या ग्लासवर घट्ट वळलेल्या हातातून काढून टेबलवर ठेवले. त्याचा आवाज, बोलणं आदराचंच होतं पण त्याच्या डोळ्यात खोल कुठेतरी एक मिश्किल चमक होती.

त्याला लक्षात होतं, हा सगळा वेळ त्याला माहिती होतं मीच ती बेला आहे म्हणून. ला बेला मध्ये माझ्याशी बोलतानाही त्याला माहित होतं... ह्या विचारांच्या गर्दीत देखील 'तो मला विसरू शकला नाही' हा विचार तिच्या मनात पटकन लकाकून गेला.

"मिस्टर दिवाण??" नुपुरा थक्क होऊन विचारत होती. "असं का इतकं फॉर्मल बोलतेयस बेला? आपण एकत्र होतो कॉलेजमध्ये.."

झालं. ही पण लगेच झाली इम्प्रेस. काय गरज होती एवढ्या गप्पा मारत बसायची. मला नाही बोलायचं याच्याशी.. विचार करतच ती खुर्ची ओढून बसली.

"ऍक्चुली आम्ही काल दुपारीच भेटलोय, मी ला बेला वितामध्ये लंच केला." असीम शांतपणे म्हणाला.

"काय? तू सांगितलं नाहीस मला बेला.." नुपुराने डोळे बारीक करून तिला विचारलं.

"निघून गेलं ग डोक्यातनं, आणि मी त्याला ओळखलंही नव्हतं." ती मुद्दाम म्हणाली. आता एवढ्या फेमस, जिकडेतिकडे मुली गळ्यात पडणाऱ्या माणसाला एक मुलगी असं म्हणते म्हणजे हा आता चिडून काहीतरी बोलणार, म्हणून ऐकायला ती तयार राहिली.

"हो, मला जाणवलं ते." तो शांतपणे तिच्या डोळ्यात पहात म्हणाला. काही सेकंद त्यांची नजर एकमेकांत इतकी गुंतून राहिली जसे काही ते बाकी गजबजाटापासून दूर एखाद्या बुडबुड्यात आहेत. नुपुरा आणि बाकी सगळेच त्यांना दिसेनासे झाले होते. "आणि तिचं कोणाशी तरी बोलणं इतकं इंटरेस्टिंग होतं की मी ओळख सांगायलाच विसरलो." तो भानावर येत पुढे म्हणाला.

तिने पटकन खाली बघत चमच्याने वनीला आईस्क्रीमचा एक मोठा लपका तोडून तोंडात टाकला. शिट! नशीब याने फक्त सुरुवातीचं बोलणंच ऐकलं, जाता जाता संजीव जे बोलला ते काही ऐकू गेलं नसेल.

"दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकणाऱ्याला काय म्हणतात माहितीये ना.." ती त्याच्याकडे न पाहता थंड होऊन जड झालेल्या जीभेने म्हणाली.

"चोरून? अख्ख्या रेस्ट्रॉंटने ऐकलं असेल ते बोलणं." तो हळू आवाजात म्हणाला तरी त्यातला आव्हानात्मक सूर तिला जाणवला.

"प्च, तुम्ही हे कशाबद्दल बोलताय हे कळू शकेल का मला?" त्यांच्या बॅक अँड फोर्थला वैतागून शेवटी नुपूराने विचारलं.

"मी संजूला माझा कमीडिअन्सबद्दलचा ओपिनियन सांगत होते.." तिने सुरुवात केली.

"क्रिटिकल ओपिनियन!" तो मधेच म्हणाला.

त्याच्याकडे रागाने बघत ती पुढे बोलत राहिली, "इन जनरल, मला हे पॉप्युलर कमीडियन्स आवडत नाहीत. तेच ते जुने जोक्स, रेसिस्ट, सेक्सिस्ट किंवा बॉडी शेमिंग करणारे रिमार्क्स नाहीतर क्रॉस ड्रेसिंग केलेले पुरुष हे सोडून काही वेगळं नसतंच. मला लिटरली ऑफेन्सिव्ह वाटतं ते सगळं."

"पण तू असीमच्या शोबद्दल असं म्हणू शकत नाहीस. बाकी सगळ्या लोकांइतकीच जोरजोरात हसत होतीस तू. मी पाहिलंय!" नुपूरा हसतच म्हणाली.

थँक्स बडी! म्हणत तिने मनातल्या मनात कपाळावर हात मारला. तिने पटकन असीमकडे तिरक्या नजरेने पाहिलं, तिला अपेक्षा होती की तो जिंकल्याच्या अविर्भावात घमेंडखोर हसत असेल पण चक्क तो लक्ष देऊन व्यवस्थित ऐकून घेत होता. तिचा कटाक्ष जाणवून त्याने भुवया उंचावून तिच्याकडे पाहिले.

"आज मी खरं तर चांगल्या अर्थाने सरप्राईज्ड होते" तिच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडल्यावर ते किती रूड वाटेल हे जाणवून ती प्रामाणिकपणे पुढे बोलत होती." मी खरंच शो खूप एन्जॉय केला. एक्सट्रीमली विटी अँड रिफ्रेशिंग! खूप दिवसांनी एवढी हसले असेन."  शेवटच्या शब्दावर तिने एकदम अडखळून आवंढा गिळला. त्याचं ते चार्मिंग हसू तिलाही अफेक्ट करत होतं तर!

"थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट्स, स्पेशली तुझ्यासारख्या कॉमेडी न आवडणाऱ्या व्यक्तीकडून येतात तेव्हा बरं वाटतं." तो म्हणाला.

"कॉम्प्लिमेंट नाही, कॉम्प्लिमेंट्स बऱ्याचदा खोट्या, समोरच्याला छान वाटावं म्हणून दिलेल्या असतात. मी जेन्यूइनली मला जे वाटलं ते सांगितलं." ती जरा रागाने म्हणाली. पण हे खरंच जेन्यूईन आहे का बेला? तिचं दुसरं मन म्हणालं. तिने कित्येक वर्षात कुठलाही लाईव्ह गिग इतका एन्जॉय केला नव्हता. सगळ्याच गोष्टी इतक्या परफेक्ट आणि जोक्स इतके इंटेलिजेंटली प्लेस्ड होते की चूक काढायला काही जागाच नव्हती. असीम दिवाण वॉज जस्ट ग्लोरियस! पण अर्थातच हे सगळं ती त्याच्याकडे कबूल करणार नव्हती.

"म्हणूनच तुझ्या कॉमेंट्सची व्हॅल्यू जास्त आहे. शो बिझनेसमध्ये खोटारडे आणि गोडबोले लोक क्षणोक्षणी भेटत असतात. त्यामुळे प्रामाणिक मत लगेच समजतं. थँक्स!" तो विस्कटलेले केस जरा स्मूद करत पुन्हा तेच खोल श्वास घ्यायला लावणारं स्माईल देत म्हणाला. "मग आता तरी फर्स्ट नेम बेसिसवर येऊ शकतो का आपण?" त्याने विचारलं.

"नो पेट नेम्स! नो बेल्स! ओन्ली फर्स्ट नेम्स, असीम" ती म्हणाली. त्याच क्षणी आपण त्याच्या चार्मला खूपच बळी पडतोय हे जाणवून तिने विषय बदलला. " मग? परत येऊन काही बदल जाणवले का शहरात?"

"बदल बरेच आहेत, सिमेंटचं जंगल वाढलं. बकालपणा वाढला. ट्रॅफिक वाढलं. रस्त्यातले खड्डे तसेच आहेत. लहानपणी ज्या जागा आपल्याला खूप ग्रँड वाटतात त्या मोठेपणी पुन्हा तिथे गेलं की खूप लहान वाटायला लागतात.. हो पण नवी रेस्ट्रॉंट्स खरंच खूप चांगली आहेत" तो नुपूराला डोळा मारत म्हणाला.

ओह नो, हा नुपूरावर खरंच लाईन मारतोय की काय, तिने मुद्दाम पुढचा प्रश्न विचारला. " तू कॉलेजला असताना इथे आला असशील की बऱ्याचदा. बाबांना भेटायला?"

एकदम त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद नाहीसा झाला. त्याचे लालसर झालेले गाल, आवळलेला जबडा आणि काही सेकंद घट्ट बंद केलेल्या पापण्या वेगळी गोष्ट सांगत होते. तरी डोळे उघडून तो कॅज्युअली म्हणाला, " नाही, दिल्लीला गेल्यापासून मी हा पहिल्यांदा येतोय इथे."

म्हणजे संजीवने सांगितलेली गोष्ट खरी होती तर. तिच्या मनात पुन्हा त्याची जुनी प्रतिमा जागृत झाली. नुपूराला खरंच याच्यापासून लांब ठेवायला हवं.

"आता इथून कुठे दौरा तुझा?" ती विचित्र शांतता भंग करत नुपूराने विचारलं.

"शनिवारपर्यंत इथेच आहे. रविवारी दुपारी कलकत्ता, मग दिल्ली नंतर दोन दिवस इंदोरपण आहे आणि मग घर!" तो जरा खुलून म्हणाला.

"आणि ते घर कुठे?" आणि "बापरे, टफ आहे ना एवढं ट्रॅव्हलिंग.." बेला आणि नुपूरा एकदमच म्हणाल्या.

"इतकंही टफ नाहीये, यात समाधान जास्त आहे. लॉ प्रॅक्टीसमध्ये मला मजा येत नव्हती. दिस इज व्हॉट आय लव्ह! फक्त हॉटेल्समध्ये राहून बोर होतं, मला माझी पुस्तकं, झाडं लागतात आजूबाजूला. मुंबईच्या माझ्या फ्लॅटमध्ये फार जागा नाहीय पण हॉटेल्समध्ये राहण्यापेक्षा आवडतं मला घरी राहायला." शेवटचं वाक्य तो बेलाकडे पहात तिच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाला.

"आणि लग्न, बायको, मुलं?" नुपुरचे प्रश्न संपत नव्हते. बेलाने तिच्याकडे डोळे मोठे करून बघितलं.

"कमॉन, अश्या प्रिमाईसमध्ये कोण मुलगी लग्न करेल माझ्याशी. तूच शोधून दे कोणीतरी" तो मिश्किल हसत म्हणाला.

बरोबर तुला सूट होतंय ते. खलाश्यासारखं प्रत्येक पोर्टमध्ये एक प्रेमपात्र असेल तुझं, बेला मनात म्हणाली.

"ओह गॉड बेला, अभी आला असेल एव्हाना. मला निघायला हवं. तू टेन्शन नको घेऊ, मी जाईन ऑटोने. कॅब येण्याइतका वेळ नाहीये आता." अचानक आठवण होऊन नुपूरा म्हणाली.

"मी तुला ड्रॉप करू शकतो, तसंही माझं हॉटेल तुझ्या घराजवळच आहे." असीम पटकन म्हणाला.

जरा जास्तच पटकन. माझ्या मैत्रिणीच्या जवळ कसा जातो बघतेच म्हणून बेलाने नुपूरचा हात धरला. "मी तुला घेऊन आलेय, तुला ड्रॉपपण मीच करणार कळलं? मीही निघतेच आहे तसंही." पर्समधून कीज बाहेर काढत ती म्हणाली.

"अरे पण तू इतकी उलटी फेरी मारून का जातेस, मी सोडतो तिला. माझ्या रस्त्यातच आहे."

आता असीमच्या नजरेत तिला आव्हान दिसत होतं. दोघी कुठे राहतो तेही माहिती आहे याला. इतक्याशा वेळात काय काय काढून घेतलंय याने नुपूराकडून? बघतेच आता. "त्याची काही गरज नाही, मी सोडेन तिला." ती मोठ्याने म्हणाली.

"अरेss काय चाललंय लहान मुलांसारखं! काय ते ठरवा दोघानी. मी वॉशरूमला जाऊन येते." म्हणून नुपूरा उठली. तेवढ्यात असीम उठून "मी खाली पार्किंगमध्ये तुझ्यासाठी थांबतो" म्हणून जिन्यात गेलासुद्धा. हेय,थांब थांब म्हणत बेला तिच्या हिल्समुळे शक्य होईल तितकं पळत त्याच्यामागे गेली. लिफ्टची गर्दी पाहून तो अर्धा जिना उतरलासुद्धा होता. थँकफुली जिन्यात तरी कोणी नव्हतं. तिने धापा टाकत त्याला गाठलं.

"नक्की प्रॉब्लेम काय आहे बेल्स?" तो हाताची घडी घालून भिंतीला टेकून उभा होता.

"प्रॉब्लेम तू आहेस!" ती रेलिंगला धरून थांबत खोल श्वास घेत म्हणाली. तिचा राग आता ओव्हरफ्लो व्हायला लागला होता.

"मी??"

"हो तूच. नुपूर इज हॅपीली मॅरीड! तूझ्यासारख्या कुणीतरी येऊन तिचं मॅरीड लाईफ खराब केलेलं मला अजिबात चालणार नाही. तिच्या मागे लागू नको, दुसरी कोणीतरी शोध जा." चिडून लालेलाल होत ती म्हणाली.

"तू?" मखमली आवाजात बोललेल्या त्या एकाच शब्दाने ती टोटली ब्लॅंक झाली. तिचे पाय थरथरायला लागले पण सावरून ती त्याला उत्तर देणार तेवढ्यात तो पुढे म्हणाला, "तू जेलस आहेस का बेला?"

"जेलस?"

"हो कारण आधी कधी तू मनात येईल ते विचारायला लाजत नव्हतीस. आताही तू विचारू शकतेस, बोलून टाक."

विचारून टाक? कशाबद्दल बोलतोय हा? ती विचार करेपर्यंत ती कशी अडखळली हे तिलाही कळले नाही. त्याने पटकन पुढे होऊन तिचे दोन्ही दंड धरले आणि ती हिल्स अडकून पडत असताना तिला सावरून जवळ ओढले. त्या फोर्समुळे तिच्याही नकळत अलगद ती त्याच्या मिठीत शिरली होती.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle