ला बेला विता - ६

तो निघून गेल्यापासून तिची द्विधा मनस्थिती झाली होती. एकीकडे तिला नुपूराला त्याच्यापासून लांब ठेवायचं होतं पण त्याच्यासारख्या चिडक्या, अग्रेसिव्ह आणि संशयास्पद कॅरॅक्टरच्या माणसाबरोबर तिला एक अख्खा दिवस घालवायला नकोसंही वाटत होती. तिला फक्त एक खात्री झाली होती की तो नुपूर किंवा ती कुणाही एकीबरोबर दिवस घालवणार होता म्हणजे त्याला फक्त नुपुरामध्ये खास इंटरेस्ट नव्हता. त्याने ही ऑफर फक्त तिला आपला कंट्रोल सिद्ध करायलासुद्धा दिली असेल, उद्या तो येईलच कशावरून? पण त्याच्या स्पर्शाने, जवळीकीने तिच्याआत जी ठिणगी पडली होती ती काही विझण्याचं नाव घेत नव्हती, उलट आग पसरतच चालली होती. एकीकडे तिला त्याचा राग येत होता आणि तेव्हाच त्याचं क्रेव्हिंगही वाढत होतं. गुरुवारचा अख्खा दिवस तिने विचार करत घालवला आणि विचार करताकरताच तिला रात्री झोप लागली.

खात्री नसतानाही ती सकाळी लवकर उठून, तयार होऊन त्याची वाट बघत बसली या गोष्टीचे तिलाच आश्चर्य वाटत होते. बरोब्बर आठ वाजता तो गेटपाशी येऊन हॉर्न वाजवत होता. खिडकीतून त्याला हात दाखवून ती पळत खाली गेली. तिचे ग्रे स्नीकर्स, स्किनी ब्लॅक जीन्स आणि पीच लिनन टॉपवर लूज ग्रे हूडी अडकवला होता. आज तिचे लेयर्ड केस हाय पोनीत न बांधता खांद्यावर मोकळे सोडलेले होते आणि रोजचा प्रोफेशनल नो मेकअप लूकचा मेकअप न करता फक्त रोझ टिंटेड लिप ग्लॉस लावला होता. ती पार्किंगपासून कारपर्यंत पोहोचेपर्यंत तो तिचंच निरीक्षण करत होता. ती हाय! म्हणून, सॅक मागच्या सीटवर टाकून त्याच्या शेजारी बसली.

"अरे ती एलिगंट, प्रिम अँड प्रॉपर बेला कुठे गेलीय आज?" गाडी सुरू करता करता त्याने त्याने भुवया उंचावून विचारले.

"ती बेला कामाच्या वेळी असते, ही बेला रिअल बेला आहे" ती समोर बघत म्हणाली.

अर्ध्या तासात ते पायथ्याशी पोहोचले. हा किल्ला म्हणजे समुद्रावर लक्ष ठेवायला बांधलेला एक लहानसा कोट होता आणि त्याच्या कोपऱ्यावर एक लाईट हाऊस. लहानपणी बेलाचा हा आवडता स्पॉट होता. लाईट हाऊसच्या गोल गोल फिरून वर जाणाऱ्या पायऱ्या ती कितीदा दुडदुडत चढली, उतरली असेल. तिचे आणि दादाचे खूप फोटो त्या पायऱ्यांवर खेळतानाच होते. पण इटलीला जाणे, परत येणे, मग ला बेलाची जबाबदारी या सगळ्यात कित्येक वर्षात ती इकडे फिरकलीच नव्हती. आता तिला आपण काय मिस करत होतो ते नीटच जाणवले.

कार पार्क करून त्याने तिची सॅक पाठीला लावली आणि "चल चहा घेऊ" म्हणून तिला टपरीवर घेऊन गेला. आलं घातलेला तिखट, कडक चहा आणि एकेक क्रीम रोल खाऊन ते किल्ल्याच्या पायवाटेला लागले. वर जायला सिमेंट रोड असला तरी ड्राइव्ह करून जाण्यापेक्षा, डोंगर चढून पायवाटेने जाण्यातच मजा होती. चहाने तरतरीत होऊन तो पटापट उड्या मारत वर जात होता आणि ती त्याचा स्टॅमिना मॅच करत मागोमाग जात होती. कोवळं ऊन आणि रात्री पडून गेलेल्या पावसाच्या सरींमुळे सगळीकडेच तरारलेली हिरवी, पिवळी, पोपटी असंख्य छटांची झाडं-पानं, दगडांमध्येच झोकात उगवून पाण्याचे थेंब वागवत वाऱ्यावर लहरणाऱ्या गवताचे पुंजके, आज अजूनतरी आकाश अगदीच निरभ्र आणि निळंभोर होतं. वर जाणारी लाल मातीची पायवाट सोडून बाकी सगळा लँडस्केप फक्त हिरव्याच्या वेगवेगळ्या छटांची भरला होता आणि लांबवर खाली डोंगराला येऊन आपटणाऱ्या लाटांचा बारीक आवाज वातावरणात भरून राहिला होता.

"वॉव, तू इतकी आउटडोअर्स टाईप मुलगी असशील असं वाटलं नव्हतं मला" मधेच तो मागे बघत, तिच्या स्पीडचं कौतुक करत म्हणाला.

हा थोडं सॉरी म्हणायला, जुळवून घ्यायला बघतोय का आता.. तिला प्रश्न पडला. "असीम आपण फक्त एका कॉलेजमध्ये होतो तेही हार्डली सहा महिने. इतक्याश्या वेळात तू मी कशी आहे हे कसं जज करू शकतोस!" श्वास घ्यायला थांबत ती जरा कडवटपणे म्हणाली. पण तेवढ्याच माहितीवर ती तरी त्याचं कॅरॅक्टर कसं जज करत होती हा प्रश्नही तिला स्वतःलाच पडला.

"इथे जरा ट्रिकी आहे वर यायला, हे घे हात धर माझा.." तो वरच्या उंच दगडावरून तिच्यापुढे हात करत म्हणाला.

"नको, मी येईन" म्हणत तिच्या पुढच्याच पावलाला शेवाळलेला एक बारीक दगड हलला आणि ती घसरून दाणकन खाली आपटण्यापूर्वी त्याने तिचा हात धरून जोरात वर खेचून घेतलं होतं. त्याच्या त्या स्पर्शाने की बाहेरच्या थंड हवेने तिच्या अंगावर शिरशिरी आली. वर अजून थोडी चढण लागल्यावर मात्र ती दमली होती. झाडाखाली थांबून तिने दोघांसाठी सॅकमधला संत्र आणि बदाम घातलेला आणि अर्थात तिनेच केलेला कॉफी केक बाहेर काढला. खाऊन पाणी पिताना त्याच्या हातून बॉटल हलली आणि पाणी त्याच्या ओठांवरून हनुवटीच्या खड्ड्यात जमून हळूच त्याच्या गळ्यावर ओघळलं. ओह माय गॉड! अश्या वेळीही कोणी इतकं सेक्सी कसं दिसू शकतं म्हणत तिने जीभ चावली. दमून दोन तीन ब्रेक झाल्यावर मात्र तो तिला थोडंच राहिलंय, जरा चाल अजून.. वर पोहोचल्यावर व्ह्यू खरंच अमेझिंग असेल.. म्हणून मोटिव्हेट करत होता.

शेवटी कंटाळून तिचा हात घट्ट पकडून तो तिला शेवटपर्यंत घेऊन गेला. म्हटल्याप्रमाणे खरंच वरचा व्ह्यू सुंदर होता. त्यांच्या आजूबाजूला असलेले पावसाळी धुक्यासारखे ढग, केसांमधून वाहणारा सुसाट वारा, खाली एका बाजूला दूरपर्यंत पसरलेलं शहर आणि दुसऱ्या बाजूला उधाणलेला समुद्र!

अजूनही तो तिचा हात घट्ट धरूनच समोर बघत उभा होता आणि का कोण जाणे तिलाही तो हात सोडावासा वाटत नव्हता. निळ्या मोकळ्या आकाशाच्या बॅकग्राउंडवर त्याच्या लांब पापण्या, टोकदार नाक आणि हनुवटी उठून दिसत होती.  तिला पुन्हा एकदा त्याच्याबद्दलचं तिचं मत रिकन्सिडर करावसं वाटत होतं. ती त्याला जसं इमॅजिन करत होती ते तिच्याच हर्ट झालेल्या टीनेज मुलीच्या नजरेतून होतं. आत्ता इथे येतानाच काहीतरी बोलायचं म्हणून शेअर केलेल्या लहानपणच्या इथल्या आठवणी, वेगवेगळ्या ठिकाणी आलेले अनुभव किती इझीली ऐकले होते त्याने. खूप मोकळेपणाने बोलत होता तोही. फक्त हसतानाच दिसणारा त्याच्या ओठांचा उबदार कर्व्ह, डोळ्याच्या कोपऱ्यातल्या बारीक लाफ लाईन्स आपल्याला दिसल्याच नव्हत्या का? त्याच्याबरोबर चालताना, बोलताना ती हळूहळू रिलॅक्स होत होती. तिचा त्याच्यावरचा राग, पूर्वग्रह हळूच नाहीसा होत होता.

तो बराच वेळ शांत होऊन टक लावून बघत असलेल्या ठिकाणी तिचे लक्ष गेले. पायथ्याशी, शहराच्या टोकावर झाडी असणारा एक चौकोन. ओह, तिथेच तर त्याच्या वडिलांचा तो 'एकांत' नावाचा प्रसिद्ध मोठा बंगला होता. जिथे 'ते' सगळं घडलं होतं. शहरात येऊनसुद्धा वडिलांना न भेटता तो हॉटेलवर रहात होता म्हणजे अजूनही त्यांच्यात तणाव असावा. तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं पण तो त्याच्या वेगळ्याच जगात होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. फक्त त्याच्या गडद झालेल्या डोळ्यांतून आतली खळबळ जाणवत होती. तिचा हात अजूनही आपल्या हातात आहे हे जाणवून पटकन त्याने तिचा हात सोडून दिला.

"मी इथे असताना ह्या स्पॉटवर खुपदा येत असे." तो जरा बारीक, घोगऱ्या आवाजात म्हणाला आणि ती जरा दचकलीच. "जगावरचा राग ओसंडून जायला लागला की लपून बसायची जागा होती ही. दोनेक तासांनी सगळं शांत झालं की मग घर!"

अचानक तोंडावर पावसाच्या मोठमोठ्या थेंबांचा सुया टोचल्यासारखा मार बसू लागल्यावर त्याने पुन्हा तिचा हात धरला आणि पूर्ण भिजण्याआधी दोघेही किल्ल्याच्या दिशेने पळत सुटले.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle