ला बेला विता - ५

त्याच्या इतक्या जवळ गेल्याची जाणीव तिला काही वेळाने झाली तेव्हा त्याच्या अंगाची ऊब,  त्याच्या जॅकेटचा थोडा लेदरी, थोडा वूडी गंध आणि त्याच्या डबलमिंटचा रिफ्रेशिंग वास तिच्या नाकात शिरला. त्याच्या उष्ण श्वासांची आवर्तने तिच्या केसांमध्ये तिला जाणवत होती. तिने डोळे मिटून त्याच्या छातीवर डोके टेकले पण हे पुढे कुठे जाणार ते लक्षात येऊन ती मुद्दाम हळूच ओह.. निखिल, स्टॉप इट.. म्हणून कुजबुजली. अचानक अंगावर पाल पडल्यासारखं त्याने तिला मिठीतून ढकलून बाजूला केलं. पुन्हा मघासारखेच त्याचे डोळे थंड रागाने तिच्यावर रोखलेले होते. ओठ मुडपून त्यांची एक सरळ रेष झाली होती. ती काही बोलणार इतक्यात नुपुराची हाक ऐकू आली आणि तो जिन्यात वर बघून गोड हसला. आत्ता एवढा चिडलेला असताना लगेच इतकं खोटं हसतो आहे! शेवटी अभिनय रक्तातच आहे याच्या. कमीडियन म्हणून फसला तर अ‍ॅक्टिंग नक्कीच करू शकतो हा.. ती मनात म्हणाली.

"काय ठरलं मग?" नुपूरा धडाधड जिना उतरून खाली आली.

"हो ठरलं. मीच सोडतोय तुला, म्हणजे बेलाला परत उलट ड्राइव्ह करून जायचा त्रास नको. तसाही खूप उशीर झालाय आता." तो बेलाकडे बघत म्हणाला.

"गुड! सी यू टूमॉरो बेला, मजा आली आज" म्हणून नुपूराने तिला खांद्यावर हात टाकून बाय केलं."

"बरं, नीट जा. बाय!" एवढंच ती म्हणू शकली.

"सी यू बेल्स, परत भेटलो की आपलं इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन कंटिन्यू करायचं आहे" तो तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. परत भेटणारच नाही आपण... तीही त्याच्याकडे ते दोघे गाडीत बसेपर्यंत रोखून बघत राहिली.

नुपूराला त्याच्या तावडीतून काही करून सोडवायला हवं. जो माणूस आपल्या सावत्र आईबरोबर असं वागू शकतो त्याला कसल्याच लिमिट्स नसणार. नुपूराच्या मॅरिटल स्टेटसने त्याला काहीच फरक पडत नाही हे दिसतंच आहे. पण विचार करता करता तिला त्याचा स्पर्श आठवला आणि तिच्या अंगावर काटा आला. इतक्या वर्षात तिला बॉयफ्रेंड्स होतेच की, आत्ता निखीलही काही कमी अट्रॅक्टिव नव्हता पण त्याच्याबरोबर कधीही अशी जवळीक, असा स्पार्क तिला जाणवलाच नव्हता. तिला सावरणाऱ्या त्याच्या हातांच्या आठवणीत तिला कधी झोप लागली ते कळलंच नाही.

'ला बेला विता'मधली सकाळ आज बऱ्यापैकी संथ चालली होती. सकाळी आल्याआल्या नुपूराच्या डोळ्यातली चमक आणि चालण्यातला उत्साह बघून तिच्या कपाळावर आठी आली. ती दिसल्या दिसल्या नुपूराने तिचा ताबा घेतला.

"असीम किती गोड आहे अगं, एवढा स्टार असून कसला डाऊन टू अर्थ आहे. रस्ताभर खूप गप्पा मारल्या आम्ही." नुपूरा उत्साहाने सांगत होती.

"हम्म.. आणि अभी? बेलाने विचारलं.

"अभीचं काय? मी पोचले तेव्हा तो झोपून गेला होता." ती जरा शांत होत म्हणाली. "आज दुपारी असीम फ्री आहे म्हणून कुठेतरी लंचला जाऊया का विचारलं त्याने, मी हो म्हणाले. त्याला इथे नवीन झालेली रेस्ट्रॉंट्स जरा एक्सप्लोर करायची आहेत."

प्च, कठीण आहे म्हणून बेलाने स्वतःशीच मान हलवली.

बरोब्बर दीडच्या ठोक्याला असीम दार उघडून आत आला. आज स्काय ब्लू जीन्स आणि बॉटल ग्रीन चेक्सच्या शर्टमुळे त्याचे हिरवट डोळे उठून दिसत होते. ते लेदर जॅकेट आज मिसिंग होतं. येतायेताच त्याने सनाकडे बघून त्याचं ते फेमस चार्मिंग हसू दाखवलं. त्याला बघून आता बेला रागाने आतल्या आत पॉपकॉर्नसारखी तडतडत होती.

"मे आय हेल्प यू मिस्टर दिवाण?" तिने पुढे होत विचारलं.

"मी नुपूराला घ्यायला आलोय, लंचसाठी" तो  डोळे बारीक करून तिला तिच्याइतकाच ऍटीट्यूड दाखवत  म्हणाला. "आणि आय थिंक आपण फर्स्ट नेम बेसिसवर आलो होतो."

"लंच? ती असं मला काही म्हणाली नाही... आत्ता ती जरा बिझी आहे." तिने खोटंच सांगून टाकलं.

त्याच्यामागून सना आ करून तिच्याकडे बघत होती. तेवढ्यात हायss म्हणत मोठ्ठ स्माईल देत नुपूरा किचनमधून बाहेर आली. "बेला, सगळ्या ऑर्डर्स परफेक्ट शेड्युलवर आहेत. स्वीगीवाला मुलगा आत्ताच येऊन गेला. फार गर्दीही नाहीये. मी जाऊन येते मग तासाभरात." एवढं सगळं सांगून झाल्यावर हो म्हणण्याशिवाय तिला पर्यायच नव्हता. तरीही "जरा लवकर ये, संध्याकाळच्या पार्टीची तयारी करायची लक्षात आहे ना?" म्हणून तिने आठवण करून दिली.

"डोन्ट वरी बेला, तुझ्या मैत्रिणीला सुरक्षित परत आणणार आहे मी" त्याच्या चेहऱ्यावरचं हसू आता अजून मोठं झालं होतं. असीमने तिच्या हातात हात अडकवत बाहेर नेताना बेलाकडे वळून डोळे मिचकावून दाखवले! आता नुपूरा परत येईपर्यंत हात चोळत बसण्याशिवाय काही मार्ग नव्हता. दोन दिवसांपूर्वी तिचं आयुष्य तिच्या पूर्ण कंट्रोलमध्ये होतं, पण आता, पुढच्या क्षणी काय होईल हे ती सांगू शकत नव्हती. ह्या गोष्टीचा तिला सगळ्यात जास्त राग येत होता.

म्हटल्याप्रमाणे तासाभरात नुपुरा परत आली, तिला सोडायला बरोबर असीम होताच. नुपूराला अर्जंट ग्रोसरी ऑर्डरबद्दल काहीतरी कॉल होता म्हणून ती घाईत आत पळाली. तेवढ्यात बेलाला संधी मिळाली.

"असीम? थोडं बोलायचं होतं. वेळ आहे का तुला?" ती शांतपणे पुढे होत म्हणाली.

"हो. संध्याकाळपर्यंत फ्रीच आहे मी" आश्चर्याने भुवया उंचावत तो म्हणाला.

"माझ्या ऑफिसमध्ये बोलूया" म्हणून ती त्याला कोपऱ्यातल्या तिच्या केबिनकडे घेऊन गेली.

त्या लहानश्या जागेत मध्ये टेबल असले तरी दोघांना जास्तच जवळ बसल्यासारखे वाटत होते. त्याने शर्टच्या बाह्या कोपरापर्यंत फोल्ड केल्यामुळे दिसणारे मजबूत हात, त्याच्या ब्रॉड खांद्यांमधून जनरेट होणारी हीट आणि त्यात मिसळलेला त्याच्या पर्फ्यूमचा सिट्रसी गंध तिला एसीतदेखील जाणवत होता. तिच्या निटेड नेव्ही ब्लू टॉप आणि नी लेंथ ग्रे स्कर्टमधून दिसणारे पाय आणि कर्व्हज बघूनही त्याने न बघितल्यासारखं दाखवलं. तो समोर रिलॅक्स होऊन बसला होता, तर ती कॉन्शस होऊन टेबलवेट म्हणून ठेवलेली पेबल गोल फिरवत होती. मधेच तिच्या स्लीक पोनिटेलमधून हात फिरवत होती. तिने कॉफी? विचारेपर्यंत सना ब्लॅक कॉफी घेऊन आत आली. त्याने हसून नको म्हणल्यावर ती बेलाचा कप भरून निघून गेली.

"मी आत्ताच लंच केलाय, रिमेंबर? इतकं तुफान जेवलोय. गलौटी कबाब, मटन बिर्याणी आणि शाही टुकडा! आहाहा, मस्त होतं जेवण" तो डोळे मिटून मागे रेलत म्हणाला.

"कुठे गेला होतात?" तिने हॉटेलियरच्या नजरेतून चौकशी केली.

"द नवाब! आपल्या कॉलेजच्या चौकात. नुपूरनेच सजेस्ट केलं होतं" तो डोळे उघडून तिच्याकडे पाहत म्हणाला. ती उगाच इकडचे तिकडचे विषय काढतेय हे जाणवून तो गालातल्या गालात हसला.

"हम्म, बरंच चांगलं ऐकलंय त्याच्याबद्दल." तिने पुन्हा टेबलवर दोन तीन कागद इकडे तिकडे हलवून ठेवले.

"बेला, आता टू द पॉईंट बोलणार आहेस का? नक्की काय विचारायचं आहे तुला?" त्याने खाल्लेला डबलमिंट च्युइंगगम टिश्यूत रॅप करून डस्टबीनमध्ये टाकत  विचारले.

" ओके, तुझ्या आणि नुपूराच्यात नक्की काय सुरू आहे?" तिने विचारले.

"सुरू आहे म्हणजे?"

"उगाच नाटक करू नको, तुला कळतंय मला काय म्हणायचंय ते. तिचं लग्न झालंय.."

"हो ते तूच मला ऑलरेडी सांगितलं आहेस."

"ती तिच्या लाईफमध्ये खूष आहे."

"खरंच?"

आता ती गडबडली. "हो म्हणजे सध्या काही प्रॉब्लेम्स आहेत, पण अभी तिची खूप काळजी घेतो आणि त्यांचं कॉलेजपासून एकमेकांवर प्रेम आहे. भांडणं झाली तरी ते होतील पुन्हा पाहिल्यासारखे" ती म्हणाली. "तू उगाच मध्ये येऊन त्यांचं आधीच नाजूक झालेलं नातं बिघडवू नको. तिच्याच का मागे लागलायस तू?" तिने एका दमात म्हणून टाकले.

"मी हे करतोय असं तुला वाटतं आहे?"

"मला काय माहीत, मी तुला विचारतेय तू नुपूरबरोबर काय करतो आहेस?"

"तिने तुला काय सांगितलं?" तिच्याऐवजी आता तोच तीला ग्रिल करत होता.

"हेच की तू तिला घरी सोडलंस आणि दुपारी लंचला घेऊन जाणार आहेस." तिने वाक्य तोंडातून निघताच जीभ चावली. त्याच्या चेहऱ्यावर आता जिंकल्याचं मोठं हसू पसरलं. तिची चोरी पकडली गेली होती.

"आणि आम्ही काय करतो यात तुझा काय संबंध?" त्याने खुर्ची पुढे सरकवत म्हटले.

"कारण ती माझी मैत्रीण आहे आणि मला तिची काळजी आहे" ती जरा जोरात म्हणाली.

"हेच मीही म्हणू शकतो."

"हाहा आपण कधीही फ्रेंड्स नव्हतो असीम, तू तिला आत्ता दोन दिवस भेटला आहेस. फक्त आठवड्याभरासाठी येऊन तुला मैत्रिणीची कमी जाणवत असेल तर तुझ्या गळ्यात पडणाऱ्या शंभर मुली तुला अव्हेलेबल आहेत." ती नाक फुगवत म्हणाली.

"शंभर! हे जरा एग्झॅजरेशन नाही होते का?" तो मिश्किल हसत म्हणाला. "तुला जर हे जाणवतंय तर ती कमी तूच का नाही पुरी करत?"

"काय?? नो वे." म्हणून तिने ओठ चावला.

"शुक्रवारी तुझी सुट्टी आहे आणि शनिवारी नुपुराची. मला फक्त एक दिवस शहराच्या बाहेर हाईकवर जायचंय. मी तिला विचारणार आहे, पण तुला चॉईस देतो. बघ येणार असशील तर." तो खोचकपणे म्हणाला.

वाह, याने आमच्या सुट्ट्यांचं शेड्युलही काढून घेतलंय हिच्याकडून! अजून काय काय चौकशी केली देव जाणे. "तुझ्याबरोबर? चुकूनसुद्धा नाही."

"ठीक आहे मग, तू नाही तर नुपूरा येईलच." म्हणून तो खुर्ची मागे सरकवून उठला.

पण पुन्हा तिच्या मनात नुपूराचा विचार आला. हा तिला बहकवायला आला नसता तर ती आज व्यवस्थित असती. अभीला सोडून तिने कुणाकडे बघितलंही नसतं. काय करू, कसं लांब ठेवू तिला... एकदम ती वेsssट म्हणून ओरडली.

तो केबिनच्या दारातून मागे फिरून आला. सो? त्याने एक भुवई वर करून विचारलं.

"सो.. तू कुठे जाणार आहेस?"

"मोस्टली सकाळी लवकर हाईक करून किल्ल्यावर जायचं आहे आणि मग बीच. खूप वर्ष झाली तिथे जाऊन."

प्लॅन तर टेम्पटिंग होता. इथेच राहूनही कित्येक वर्षात तिला शहराबाहेर पडायला वेळ झाला नव्हता. निखीलबरोबर फक्त मॉल्स, मुव्हीज, पब्ज एवढंच फिरणं होत होतं आणि तेच तिला इतके दिवस खटकत होतं.

"अम्म.. मला चालेल हे असं वाटतंय."

"सॉरी, यू मिस्ड युअर चान्स!" तो भाव खात म्हणाला.

"का? पण आता यायचंय मला" ती नाक फुगवून म्हणाली.

"नॉट लाईक दिस. आता तुला रिक्वेस्ट करावी लागेल. तुला माहिती आहे तुला हवी असणारी गोष्ट तू कशी मिळवतेस ते" पुन्हा त्याच्या डोळ्यातून ठिणग्या निघत होत्या आणि चेहऱ्यावर तिला ट्रॅप केल्यासारखे न समजणारे भाव आले होते. तो तिच्या टेबलसमोर उभा राहून झुकून तिच्या अगदी जवळ येऊन बोलत होता

ओहह.. अचानक तिला तो कशाचा उल्लेख करतोय ती गोष्ट लक्षात आली. सेंड ऑफ पार्टीपूर्वी त्याने आपल्या प्रेमात पडावं म्हणून प्रयत्न करणारी ती, ते प्रयत्न वाया जात आहेत असं दिसल्यावर संध्याकाळी पव्हिलीयनमध्ये अंधारात  त्याचा बास्केटबॉल संपायची वाट बघत बसलेली ती. नंतर त्याला गाठून तिचा पार्टनर होऊन पार्टीत येण्याची रिक्वेस्ट, तो ऐकत नाही बघितल्यावर पुढे होऊन त्याला मारलेली मिठी आणि त्याच्या घामेजल्या मानेचे कानांपासून कॉलर बोनपर्यंत हळूच घेतलेले किसेस... शी! किती निर्लज्ज होती ती. आता स्वतःच्या वागण्याची लाज वाटून ती त्याच्याकडे बघूही शकत नव्हती.

"काही बोलायचंय?" तिच्या डोळ्यात पहात तो म्हणाला. त्याचं कपाळ तिच्या कपाळाला टेकेल इतक्या जवळ होतं आणि गरम श्वासामुळे काय करावं ते तिला सुचत नव्हतं. तिच्या कोरड्या पडलेल्या ओठांवरून तिने जीभ फिरवली तेव्हा त्याने तिच्या ओठांकडे पाहिलं. काही कळायच्या आत त्याने तिच्या हनुवटीला धरून तिला वर त्याच्या डोळ्यात पाहायला लावलं आणि दोन्ही हात तिच्या गालांवर ठेवत, तिचे ओठ क्रश करत खोलवर किस केलं. श्वासांच्या गर्दीतून वाट काढत तिने बोलायला तोंड उघडलं पण पुन्हा एकदा हळुवारपणे त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकत ते बंद करून टाकलं. ती डोळे उघडून भानावर येईपर्यंत तो केबिनच्या दाराला टेकून उभा होता. तिने डोळे उघडताच तो काहीच न घडल्यासारखं हसून म्हणाला, "सकाळी आठ वाजता, तुझ्या बिल्डिंगखाली भेटू. तिथे थंडी, पाऊस असेल, काहीतरी उबदार कपडे घाल." पुढे ती काही बोलायच्या आत तो निघूनही गेला होता.

तिच्या पोटात आता असंख्य फुलपाखरं फडफडत होती.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle