ला बेला विता - १४

आज गर्दी, उत्साही आरडाओरड, हशा आणि चविष्ट खाण्यापिण्याने 'ला बेला विता' गजबजून गेले होते. प्रत्येक टेबल खचाखच भरलेले होते. सभोवतालचा उत्साह बघून बेलाच्या चेहऱ्यावरचे हसू कमीच होत नव्हते. नुपूराची 'ला बेला'मध्ये वेगवेगळ्या आर्टिस्ट्सचे गिग अरेंज करायची आयडिया खरंच कमाल होती. सगळी तिकिटं दोन दिवसातच सोल्ड आउट होती. आजची रात्र अजूनच खास होती कारण आज पहिला ऍक्ट असीमचा होता. आज आणि पुढचे सलग सहा दिवस! तो पूर्ण आठवडा इथे असणार होता. गेल्या चार महिन्यात चुटपूट लावत, घाईघाईत झालेल्या फक्त तीन भेटी तिला आठवत होत्या. त्यामानाने हा अख्खा आठवडा एकत्र म्हणजे तिच्यासाठी अगदी स्वर्गासमान होता.

असीम रोज तिच्याबरोबर नसल्याची भावना पचवणं हे तिला वाटलं होतं त्यापेक्षा खूपच कठीण होतं. वरवर पाहता आयुष्य नेहमीसारखेच सुरू होते. रेस्ट्रॉंट व्यवस्थित सुरू होते, इन फॅक्ट वाढत होते. तिने शेजारच्या दुकानाची जागाही विकत घेउन एरिया वाढवला होता. तीसच्या जागी आता पंचेचाळीस टेबल्स झाली होती. वाढत्या व्यापात ती आणि नुपूरा बिझी होत्या. तिचं मित्रमंडळ, आऊटिंग, स्वीमिंग, दर पंधरा दिवसात आईबाबांची भेट ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यासारख्याच सुरू होत्या.

पण या सगळ्यात ती असून नसल्यासारखी होती. हृदयात कुठेतरी एकटेपणाची एक खोल खोल पोकळी तयार झाली होती आणि ती त्यात रुतत चालली होती. येणारा प्रत्येक दिवस तिच्यासाठी नव्याने रिकामा रिकामा होत उगवत होता. असीमची जराशी भेट होऊन गेली की तो एकटेपणा तीव्र होऊन तिला अजूनच त्रास देत होता. त्याच्या भेटीची वाट बघण्यात ती कणाकणाने संपत होती. त्यांची शेवटची भेट फक्त दोन तासांची होती, तो कुठूनतरी कुठेतरी जात असताना मध्येच भेटून एकत्र केलेला लंच. बस्स. तेव्हा असह्य होऊन शेवटी ती त्याच्याशी भांडलीच. पण या गोष्टीवर दुसरा काही उपायही तिला सापडत नव्हता. त्यांच्यातलं हे नवं नातं अजून इतकं नाजूक आणि पर्सनल होतं की त्याबद्दल तिला कोणालाही सांगावसं वाटत नव्हतं, तिच्या घरच्यांना नाहीच पण अगदी नुपूरालाही नाही.

पण हे सगळं असूनही आज तिचा आनंद चेहऱ्यावर झळकत होता. असीम चक्क आठवडाभर इथे असणार होता. आठवडाभर! व्हॉट अ ट्रीट! आज ओपनिंग पार्टीसाठी तिने स्वीटहार्ट नेकलाईन आणि नी लेंथ टूल स्कर्ट असलेला डिझायनर एलबीडी घातला होता, वर थोडं फॉर्मल वाटावं म्हणून ब्लॅक लेसचा एक छोटासा श्रग होता. नेहमीचा फॉर्मल न्यूड मेकअप आणि केसांचा नुपूरानेच करून दिलेला फ्रेंच ट्विस्ट एवढ्यावरच ती खूप गोड दिसत होती.

तिने स्कर्ट थोडा सारखा केला आणि परत तिची परफेक्ट होस्टेसची ड्युटी सुरू केली. आज बरीचशी गर्दी तिचे आणि नुपूराचे नातेवाईक व मित्रांचीच होती. आज चक्क अभिषेकसुद्धा संध्याकाळपासून त्यांच्या मदतीला आला होता. दोन टेबलांकडे तिचं जास्त लक्ष होतं. एका मोठ्या टेबलवर तिचे पूर्ण कुटुंब होते तर दुसरीकडे मिस्टर अँड मिसेस दिवाण बसले होते.

"आज कसं वाटतंय तुम्हाला? काही त्रास नाही ना?" तिने दिवाणांना काळजीने विचारलं. अर्थात त्यांचा आजचा हसरा चेहरा बघून हे विचायची गरज नव्हतीच. कितीही दमलेले, आजारी असले तरी ते आज खूष होते. 

"मस्त! आम्ही चुकूनही चुकवला नसता आजचा दिवस. आज काही करून यायचंच होतं." ते हसत म्हणाले.

आज पहिल्यांदाच त्यांना स्वतःच्या ओळखीपेक्षा असीमचे वडील म्हणून असलेली ओळख जास्त आवडतेय असं दिसत होतं.

"शोही हाऊसफुल दिसतोय! केवढी गर्दी आहे" मिसेस दिवाण म्हणाल्या.

"हो, आज आणि पुढचा पूर्ण आठवडा! ऑनलाइन बुकिंग होतं त्यामुळे दोनच दिवसात सगळे शो हाऊसफुल झाले." तिने उत्साहाने माहिती पुरवली.

"व्वा! असीमचे शो सगळीकडे हिट आहेत. बऱ्याच वर्तमानपत्रातले रिव्ह्यू वाचले मी." विक्रम दिवाण अभिमानाने म्हणाले. "असीमला वेळ मिळत नव्हता पण तू आमच्या दोघांसाठी जे काही केलंस त्याचे आभार म्हणून त्याला काही करून हे जमवायचंच होतं. आणि हो, पहिल्यांदाच तो आठवडाभर घरी रहायला येतोय त्यामुळे आम्ही दोघे जास्त खुष आहोत." ते तिच्या पाठीवर थोपटत म्हणाले. "वी विश यू ऑल द सक्सेस! रेस्ट्रॉंटचीही छान पब्लिसिटी होईल यातून."

हम्म... म्हणूनच तो माझ्याकडे, माझ्या जवळ नसणारे. तिने मनात उसासा टाकत म्हटले. तरीसुद्धा घरी एकत्र राहून तो मनाने वडिलांच्या जास्त जवळ येईल या विचाराने तिला बरं वाटलं होतं. पण आता आठवडाभर तो वडिलांच्या घरी राहिला तर त्यांचं नातं काही लपून राहणार नव्हतं. ती विचारात असतानाच बार टेबल हटवून त्या जागी तयार केलेल्या सेंटर स्टेजवरून नुपूरा तिला घाईघाईने हातवारे करून बोलवत होती. तिकडे लक्ष जाताच तिने दिवाणांना "थँक यू सो मच, एन्जॉय द शो" म्हणत स्टेजकडे लक्ष वळवलं.

"काय झालं? ऑल ओके?" पटापट नुपूराजवळ जात तिने विचारलं.

"बेल्स! प्लीज चेक ऑन असीम वन्स... मला तो जरा टेन्स वाटला." नुपूरा काळजीने म्हणाली. मान हलवून ती तिच्या ऑफिसकडे पळाली. आज तिची केबिन असीमच्या ड्रेसिंग रूममध्ये कन्व्हर्ट झालेली होती. तिने नॉक करून दार उघडलं. असीम दाराकडे पाठ करून तिच्या डेस्कवर हात एकमेकांत गुंतवून वर हनुवटी टेकून समोरच्या भिंतीकडे बघत बसला होता.

"असीम... काय झालंय?" तिने काळजीने विचारलं.

तिच्या आवाजाने तो तिच्याकडे वळून उठून उभा राहिला आणि तिला बघताच त्याच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव बदलून हसू पसरलं.

ओह माय गॉड! ती आ करून त्याच्याकडे बघतच राहिली. क्रिस्प व्हाईट शर्ट, ब्लॅक ट्रावझर्स, डिनर जॅकेट आणि ब्लॅक टाय! त्याचे ब्लॅक शूज साईड पार्टीन्ग केलेल्या केसांइतकेच चमकत होते. नेहमी जीन्स, टीशर्ट, लेदर जॅकेटची सवय असणारी ती आज पहिल्यांदाच त्याला इतक्या फॉर्मल लूकमध्ये जवळून पहात होती. आणि ओह माय! द इमेज वॉज परफेक्शन. तिच्या पोटात खड्डाच पडला. रेमंडवाल्यांना त्यांचं स्लोगन ह्यालाच बघून सुचलं असणार. ती मनातल्या मनात हसत म्हणाली.

"काही नाही. सगळं ठीक आहे." त्याच्या आवाजाने ती तंद्रीतून जागी झाली.

स्वतःला सावरत तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिले.
"नक्की?"

"मी विचार करत होतो... बेल्स-" अचानक थांबून त्याने घड्याळात बघितलं. "नाही, आत्ता नको." स्वतःशीच बोलल्यासारखा तो म्हणाला.

"काय आत्ता नको?" ती आता गडबडली होती.
त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा ताण बघून ती अस्वस्थ झाली होती. त्याच्या डोळ्यांमधला अनोळखी भाव, पुन्हा पुन्हा जॅकेटचं बटन काढून लावणे ह्या सगळ्यातून तो लपवायचा प्रयत्न करत असलेला तणाव तिला समजत होता. हा नेहमीचा कॉन्फिडन्ट, जग गेलं चुलीत ऍटिट्यूडचा असीम नव्हताच.

"मला तुला काहीतरी सांगायचं होतं पण आता वेळ नाहीये." तो गरज नसताना पुन्हा घड्याळात बघत म्हणाला.

"प्लीज टेल मी, व्हॉट इज रॉंग विथ यू..." तिने पुढे होऊन त्याचा चेहरा दोन्ही हातात घेत विचारलं.

"रॉंग!" तो उदास हसत म्हणाला. "असं काही नाही. मी सांगितलं की मी घाबरलोय, मला भीती वाटतेय तर तुझा विश्वास बसेल? वेडेपणा आहे ना! मी स्टेजवर गेल्यावर एकदम रिलॅक्स असतो पण आधी? बॅकस्टेजला मी प्रचंड नर्व्हस असतो. हे बघ -" तिच्यासमोर दोन्ही हात धरत तो म्हणाला. त्याचे हात खरंच थरथरताना बघून तिला धक्काच बसला आणि त्याचवेळी मनात हुश्श झालं.

"एवढंच ना?" ती त्याचे हात घट्ट धरत म्हणाली. "सगळं नीट होईल. यू आर द बेस्ट!"

"आत्तातरी मला मी स्वतः वर्स्ट वाटतोय." पुन्हा तो तसंच हरवल्यासारखं हसत म्हणाला.

"चान्सच नाही. यू विल रॉक! ऍज ऑल्वेज.." ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. हा नेहमी बॅकस्टेजला असाच असतो का? तिला वाटत होतं आता ती त्याला अंतर्बाह्य ओळखते. पण नाही, अजून त्याच्या कॉम्प्लेक्स स्वभावाचे असे कित्येक धागे तिला कळायचे होते. मग अचानक तिचे डोळे चमकले. त्याने स्वतःला तिच्यासमोर पूर्ण उघडून ठेवले होते, प्रामाणिकपणे त्याला जाणवणारी प्रत्येक गोष्ट तो तिला सांगत होता. त्याची ही अँग्झायटी, भीती त्याचा कमीपणा वाटू शकते हे माहीत असूनसुद्धा त्याने तिला मोकळेपणाने सांगितलं होतं. तिला त्याला जवळ घेऊन घट्ट मिठी मारावीशी वाटत होती. पण आता ते योग्य होणार नाही, म्हणून तिने त्याला जरा चिडवून ताण हलका करायचं ठरवलं.

"आणि इथे मी आहे ना, तुझी पर्सनल चीअरगर्ल!" ती डोळा मारत म्हणाली.

"मग मी कसा हरू शकतो!" आता तो खऱ्या उस्फूर्तपणे हसला.

आणि ते अगदीच खरं होतं. त्याने स्टेजवर एन्ट्री केल्यापासून तो प्रेक्षकांना स्वतःच्या इशाऱ्यावर नाचवत होता. अगदी टू द पॉईंट हशे आणि टाळ्या येत होत्या. त्याने व्हाईट एलिटमध्ये ज्या प्रकारे खूप मोठ्या गर्दीला एंटरटेन केलं त्यापेक्षा इथे लहान ग्रुपसमोर त्याचा अप्रोच वेगळा होता. त्याचा आवाज हळू होता, लोकांशी गप्पा मारल्यासारखं, घरचा माणूस असल्यासारखा तो बोलत होता. मधेच त्याने इटालियन फूड आणि बेलावर देखील एक दोन कोट्या केल्या.

I was here the other day. I had some salted peanuts and beer in front of me. I saw Bella passing by my table and I said, "hey! A peanut is saying you are looking extremely beautiful today." त्याने स्टेजवरूनच तिला डोळा मारत खांदे उडवले.

As always she ignored me. Again I called her. Hey a second peanut says "and sexy too!" तो एक भुवई उंचावत म्हणाला. आता बेला ओठ चावून हसत होती.

Then she asked me, why peanuts? So I told her, "Oh cause they are complementary!!" आणि सगळे हसत सुटले.

मोठा हशा मिळवण्यापेक्षा शहराबद्दल बारीक बारीक किस्से सांगून, गोष्टी सांगून, आठवणी जागवून तो लोकांना हसवत होता. टाळ्यांच्या गजरात त्याच्या ऍक्टचा शेवट झाला तेव्हा तिला त्याचा सगळ्यात जास्त अभिमान वाटत होता.

"ओह गॉड, हँस हँसके मेरे तो गाल दर्द कर रहे है.   आय रिअली लव्हड द शो मॅम!" इतका वेळ तिच्या शेजारी उभी असणारी सना हसतच तिच्याकडे वळून म्हणाली.

बेलाने हसून मान डोलावली. अँड आय लव्ह असीम! The whole package! ती मनात म्हणाली. फक्त हा स्टेजवरचा हुशार, कॉन्फिडन्ट माणूस नाही तर त्या दिवशी भिजून तिच्या घरी आलेला, हरवलेला, तिची मदत मागायला न लाजणारा माणूस. जो तिच्याकडे त्याला भीती वाटत असल्याचं मान्य करतो, तिच्यावर पॅशनेट पण तितकंच हळुवार प्रेम करतो तो माणूस! ती त्याच्या खरंच खोलवर प्रेमात पडली होती.

तिने धडधडणाऱ्या हृदयावर हात ठेवत एक मोठा श्वास घेतला आणि गर्दीतून वाट काढत त्याच्या ड्रेसिंग रूमकडे जाऊ लागली. जाईपर्यंत इतक्या लोकांनी तिला भेटून शोबद्दल कौतुक आणि अभिनंदन केलं की ती आपण कुठे जात होतो हेच जवळ जवळ विसरून गेली. शेवटी गर्दीच्या बाहेर पडून ती ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचली. दार किंचित उघडं राहिलं होतं आणि आतून बोलण्याचे आवाज येत होते. असीमचा नेहमीचा शांत आवाज आणि-- नुपूराचा आवाज! तिने थबकून उघड्या दारातून समोर पाहिलं. असीम तिचे हात हातात घेऊन तिला काहीतरी सांगत होता.

"आज मी अभीला काही सांगू शकणार नाही असीम.. मी अजून तयार नाहीये. मला भीती वाटतेय." नुपुरा जरा घाबरून बोलत होती.

"पण कधीतरी त्याला कळणारच आहे" तो हळुवारपणे नुपूराची समजूत घालत बोलत होता. ते पाहून तिला कोणीतरी पोटात एक जोरदार ठोसा मारल्यासारखं वाटलं. "तू आजच बोल त्याच्याशी. जितकं लवकर सांगशील तितकं बरं. एव्हाना त्याला संशय आलाच असेल."

संशय? कसला संशय?? काय बोलतोय हा.. त्याच्या तोंडून हा शब्दसुद्धा विचित्र वाटतोय. पण तिला दिसत होतं ते खरं होतं आणि हळूहळू तिच्या मनात सगळे डॉट्स कनेक्ट झाले.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle